रिएलिटी शो - काय पहायला आवडेल ????

Submitted by कौतुक शिरोडकर on 16 February, 2012 - 11:50

नमस्कार मित्रांनो !
मनोरंजनाच्या नावाखाली रिएलिटी शोच्या आडून आम्ही नेमका काय गोंधळ घालतो ते तुम्हाला माहीत आहेच. मी वेगळं काही सांगत नाही. सगळे रिएलिटी शोज गायन, नृत्य, टॅलेंट हंट, विनोद यासारख्या ठराविक साच्यात अडकले आहेत. थोडा पलिकडे जायचा विचार जर कुणी केलाच तर तो बिचारा पलिकडच्याच किनार्‍यावर राहतो.
माझ्या बर्‍याचश्या मिटींग्स मध्ये नेहमी एक मुद्दा मला प्रकर्षाने ऐकावा लागतो. तो म्हणजे 'लोकांना हेच हवं असतं.' मी जेव्हा इथले निरनिराळे बाफ वाचतो तेव्हा मग मला प्रश्न पडतो की जर लोकांना हेच हवं असतं तर मग इथे इतक्या तक्रारी का ? चॅनल्समध्ये बसून लोकांना काय हवय याचं ठाम मत मांडणार्‍या या अधिकार्‍यांना 'लोक' म्हणजे कोण अपेक्षित आहेत ? घरात कामाचा पसारा आवरत बसणार्‍या आणि त्यातून दोन घटका विरंगुळा शोधणार्‍या गृहीणी की पेंशनर्स ? बाकीच्यांच काय ?
'मास' आणि 'क्लास' असे दोन विभाग आधीच केले गेले आहेत. त्यातही मासला जे आवडेल ते क्लासला आवडेलच असं नाही आणि क्लासला जे आवडते ते मासला आवडूच शकत नाही हा एक वेगळा अट्टाहास.
मी इथे मास आणि क्लास या भानगडीत न पडता एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला रिएलिटी शो मध्ये काय पहायला आवडेल किंवा कोणत्या विषयावरचे शोज तुम्ही एन्जॉय करू इच्छिता ? यावर तुम्हा सर्वांची मते समजून घ्यायला हा धागा उघडतोय.
चला तर मग फक्त आणि फक्त या विषयावरच चर्चा करू, गप्पा मारू आणि शक्य झाल्यास काही ठाम मते सुद्धा मांडू. कदाचित उद्या तुमच्या मुळे एखाद्या नवीन विषयावरचा रिएलिटी शो जन्म घेऊ शकेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे....

मी मागे एकदा सोनी आणि झी ला दोन कल्पना इमेल करून सांगितलेल्या..... त्या खालील प्रमाने...

1) जाहीराती संबधी: - एक अशा शो हवा ज्यात चांगल्या जाहीरातींची आतली माहीती सांगितली जाईल... बर्याच अॅड खुप छान बनवलेल्या असतात .. त्याचे कल्पना सुंदर असते.. लोकांना त्या जाहीरातींचे मेकिंग ऑफ बघायला नक्कीच आवडेल...जे लोक नेहमी पडद्यांमागे राहतात त्यांचे मनोगत सुध्दा कळेल...त्ांची कल्पना.. त्या मागचा विचार... अवघ्या 30 सेकंदात जाहीरात लोकांच्या मनात बसवन्याचे काम ही लोक करतात...यांची माहीती जगाला होने गरजेचे आहे...काहींचे गाणे छान असते पण फार लोकांना ती जिंगल कोणी बनवली हे माहीतीच नसते... उदा. झंडू बाम ची जिंगल अशोक पत्की यांची आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल...
असे मेहनती आणि डोकेबाज लोक नक्कीच जगासमोर आले पाहीजे....जेणे करून इतर मुल सुध्दा त्यामागची मेहनत कल्पकता बघून काही शिकतील आणि रूची घेतील....
मी या शो ची थोडक्यात रूपरेषा लिहीली होती... पण काही रिस्पॉंस नाही आला....

....

दहावी/बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एखादा विषय घेऊन चर्चा नाही का करता येणार?
आणखी एक म्हणजे क्वीझ वगैरे.

नविनच असले पाहिजे असे नाही पण क्विझ कॉम्पिटिशन व्हायची (प्रत्येक शाळेचे संघ त्यात भा घ्यायचे) तशी परत पहायला आवडेल.

मंदार, महागुरु... नेमकी याच संदर्भात काल चर्चा झाली. यासारखा एक कार्यक्रम पुर्वी येऊन गेलाय. मला त्या एंकरच नाव आठवत नाही. पण साधारण तीन शाळांचे तीन विद्यार्थी यात असत आणि मग वेगवेगळ्या विषयांवरचे प्रश्न विचारले जात. प्रश्न कधी कधी पास केले जात. रॅपिड फायर आणि क्विक बझर पण यात होते. कौबक किंवा हाटे .. असे कार्यक्रम याच धर्तीचे. फक्त वलयांकीत असल्याने जास्त गाजलेले.
यावर नवीन संस्कार करून सादरीकरण करायला हरकत नाही. फक्त आणि फक्त शाळेकरी मुलांसाठी असलेला एखादा कार्यक्रम. Happy

१. हल्ली रिअ‍ॅलिटी शो म्हणजे स्पर्धा असेच समिकरण होत चाललय. हे स्वरूप बदलून 'मैफिल' या स्वरूपात काही सादर करता आले तर त्याचा निखळ आनंद घेता येइल.

२. खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम बरा होता. म्हणजे त्यात अनेक चांगले लोक येऊन गेले पण त्यातून त्यांच्या कार्याचा, कलेचा परिचय करून देण्याऐवजी थोडेशी सवंगताच होती. ती सवंगता टाळून त्यांचा परिचय करून दिला तर खूप छान वाटेल. त्या करता सुहासिनी मुळगावकर, सुधीर गाडगीळ असे कलेची जाण असलेले मुलाखतकार लागतील.

३. सुरभी सारखा निव्वळ महाराष्ट्राची ओळख करून देणारा कार्यक्रम.

४. फिरोदिया, पुरुषोत्तम अशा धर्तीवर काही नाट्यस्पर्धा - यात केवळ नवोदितांनाच वाव हवा.

उदय, 'मेकींग ऑफ अ‍ॅड'ची संकल्पना चांगली आहे. यात रिसर्च फार आहे. जाहीराती बनवणार्‍या कंपन्यांकडे फुटेज असेलही. जमवाजमव करावी लागेल. कोण किती सहकार्य करेल ते पहाव लागेल. पण जाहीराती बघण्याची आधीच आपल्याल हौस. त्यात जाहीरातीवरची सिरियल म्हटल्यावर प्रेक्षकवर्ग लिमिटेड होणार. पडद्यामागच्या कलाकारांमध्ये कोणाला रस नसतोच. सिनेमा संपला की शेवटची नामावली सुरु होईपर्यंत लोक घरी पोहोचतात. कदाचित त्यामुळे ही संकल्पना बारगळली असावी.
सायो, इथे म्हणजे नेमके कुठे ? तसही जे बघवत नाही त्याबद्दल न बोललेलं बरं. Happy

माधव, उत्तम कल्पना.
सह्याद्रीवर मैफल हा प्रकार असतोच. पण तो फार साचेबद्ध आहे. त्यात नाविन्य आणून करता येईल.
पुर्वी दुरदर्शनवर मुलाखतीचे सुंदर कार्यक्रम असायचे. पण आता मुलाखत हा प्रकार बराचसा न्युज चॅनेलच्या अखत्यारित गेल्यासारखा असल्याने इतर चॅनल्स त्याला फार प्रतिसाद देत नाही.
महाराष्ट्राची ओळख करून देणारे टेलेंट हंट शोज आहेत म्हणा. पण नाट्यस्पर्धा हा प्रकार नक्कीच विचार करण्याजोगा आहे. मध्ये एका चॅनलला सुचवला होता. पण त्यांनी फार प्रतिसाद दिला नाही. पण ही संकल्पना खरच चांगली आहे. यातून हौशी कलाकारांना संधी मिळू शकते.

कौतुक, असे दर्जेदार कार्यक्रम प्राइम टाइम मध्ये दाखवले तर खरा उपयोग होइल.

अजून एक कल्पना - साहित्याची (कथा, कविता इ.) ओळख करून देणारा कार्यक्रम. माबोवरच जी स्पर्धा झाली होती त्यात अनेक चांगली पुस्तके कळली होती.

वादकांचा रियॅलिटी शो पहायला आवडेल, त्यातही शास्त्रोक्त आणि फिल्मी दोन्हीला वाव असावा. पेटी, तबला, अजून काही पारंपारिक वाद्य, जसं शहनाई, सारंगी, अगदी बुलबुल सुद्धा. (ही वाद्य आजकाल हळूहळू लोप पावत आहेत.)
या रियॅलिटी शो मध्ये ड्रम्/केसिओ(कीबोर्ड) इ. वाद्य नकोत.
हार्मोनियम, तबला, संतूर, व्हायोलिन, सतार, सारंगी, ढोलकी, योंगा, पिपाणी, बासरी, रूद्रवीणा, सारखी वाद्ये हवीत.

मराठी पाऊल पडते पुढे मध्ये जसं त्या एका शिक्षकाने (नाव विसरले :() मल्लखांब पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणला आणि बरेचसे लोक पुन्हा त्या कलेकडे वळले.
तसं काहीसं व्हावं असं वाटतंय. त्यामुळे चांगले वादक ही पुढे येतील.

बायदवे, मुंबईचे मल्लखांब शिक्षक आहेत श्री. मिहीर खेडेकर आणि रत्नागिरीचे निराधार मल्लखांब वाले आहेत श्री. शांताराम गुरुजी. Happy

मला तीन प्रकार सुचवावेसे वाटतात

१. सुशोभन : घराचे , ऑफिसचे इ.इ. त्यात काय आवड नावड इ. बघून कमी खर्चात काय करता येईल अशा स्वरुपाचे.
२. तोडगेश्वर - प्रत्येक गावाला शहराला वाहतुकीचे/पाण्याचे इ.इ. प्रॉब्लेम असतात तर अशा समस्यांसाठी त्याच गावातली मुले काय तोडगा सुचवतील. वगैरे.
३. खजिना - शहरात/गावात लपवलेल्या खुणांवरून मार्ग शोधणे. अमेझिंग रेस सारखेच.

नंद्या, सुशोभन आणि तोडगेश्वर हे माहीती विभागात जात असल्याने मनोरंजनाला प्राधान्य देणार्‍या प्राईमटाईममध्ये याची वर्णी लागणे अशक्य. खजिना ह्या प्रकारात पुरेसा रिसर्च आणि चांगल आर्थिक बळ लागेल यात शंका नाही. तसेच प्रत्येक भागात नाविन्य आणण्यासाठी क्रियेटीव्ह टीमला झुंजावं लागणार. Happy

कौ, तो बोर्नविटा क्वीझ कॉन्टेस्ट होता, अतिशय गाजलेला कार्यक्रम आणि शो चा होस्ट होता Derek O'Brien Happy

लहान मुलांसाठी नाट्यछटांचा कार्यक्रम करता येइल. झालच तर संगीत नाटकांतील नाट्यप्रवेश! त्यानिमित्ताने जुन्या स्मृतीस उजाळा मिळेल.

दोन-तीन दिवसांपुर्वी मुलुंड बाफवर याविषयी छान चर्चा चालू होती. आता तिथल्या पोस्टी पुसल्या गेल्या असतील. Happy

रिअ‍ॅलिटी शोमध्ये रिअ‍ॅलिटी बघायला आवडेल.
स्पर्धा म्हटली की कोण जिंकणार ते आधीच ठरलंय हे न कळण्याइतके प्रेक्षक दूधखुळे नसतात. त्यामुळे परीक्षकांचे खोटे खोटे नाटकी प्रतिसाद ऐकायला आवडत नाहीत.
स्पर्धा असण्यापेक्षा केवळ कलेचं सादरीकरण बघायला आवडेल. पण त्या त्या वाहिनीच्या मार्केटिंग, सेल्स आणि फायनान्स डिपार्टमेंटला ते परवडणार नाही Wink

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गडावर, जंगलात ट्रेक यासंबंधी सर्वसामान्यांना माहिती मिळेल असा रिएलिट शोच्या माध्यमातुन कार्यक्रम

महागुरूंना अनुमोदन.
कौतुक, मिलिंद गुणाजी हा शाळेच्या मुलांना ट्रेकवर घेऊन जातोय किंवा गड-किल्ल्यांवर घेउन जातोय ही कल्पना कशी वाटते?

मनोरन्जन आणि लोकांना आवडेल अशी बिग बोससारखि मालिका कर्ता येइल. तितकि सवंग नाहि. पण आपले आवडते कलाकार कसे राहतील, काम स्वयपाक कर्तील, एकमेकाशी कसे वागतील हे बघायला आवडेल. मराठी लोक साधे अस्तात असं म्हणत्त्तात, ते तसे असतात्त का हे समजेल खरेच. विचार करा.

अनन्या, कल्पना उत्तम आहे. पण एका मराठी अभिनेत्रीच्या बाबतीत पुण्यातच काय घटना घडली होती त्याचं लोकांना विस्मरण झालेलं नाही. त्यामुळे ही कल्पना चांगली असली तरी व्यवहार्य नाही.
हां जुने कलाकार घेऊन करायचं असेल तर ठीक आहे.

बिग बोस मधे काहीही चालू असत, तसं काही नाहि, ते लोक तर लाज शरम सोडलेले आहेत. जस्ट १० लोक एकत्र राहिले, त्यान्ना टास्क म्हणून नाटक बसवाय्ला दिले, जोक सांगायचे, आठवणी सांगायच्या असे काम दिले तर एक मस्त मालिका होइल. मराठी कलाकार एक मस्त क्लीन शो करू शकतील. अवधूत गुप्तेचा प्रोगामही मस्त होता. ते लोक बोलताना ऐकायला आवडायचे. असा प्रोग्राम केला तर त्यांच्या अजून जवळ गेल्यासारखे वाटेल.

"लोकाना हेंच हवं असतं"ही भ्रामक कल्पना माध्यामानीच लोकांच्या मनात रुजवली असावी, असंच कधी कधी वाटतं. महाराष्ट्राला ७५० किमि चा किनारा आहे पण नौकानयन, समुद्रावरचं जीवन किती माध्यमानी दाखवलंय ? त्याबद्दलचं आपलं अज्ञान अगाधच म्हणायला हवं. माबोवरच नंदिनी व सेनापति यानी त्यासंबंधात माहिती द्यायला सुरवात केली व किती प्रचंड प्रतिसाद आला ! त्यावर 'रिअ‍ॅलिटी शो' कसा बेततां येईल हें उत्स्फुर्तपणे नाही मी सांगू शकत पण ही कल्पना राबवणं मला तरी नाविन्यपूर्ण, आवश्यक व आकर्षक वाटतं.

बोर्नव्हिटा क्विझ काँटेस्ट!
तसेच << मिलिंद गुणाजी हा शाळेच्या मुलांना ट्रेकवर घेऊन जातोय किंवा गड-किल्ल्यांवर घेउन जातोय ही कल्पना कशी वाटते? > अशा पद्धतीमधे काहीतरी. देशी!

बिग बॉस
अजिबात नको! फालतूपणा

झी वर 'बिझनेस' संदर्भात एक रिअ‍ॅलीटी शो होता ज्यात स्पर्धकांना वेगवेगळ्या टास्क्समधून आपला बिझनेस सेन्स दाखवायचा होता, तसं काही मराठीत शक्य आहे का? किंवा याच धर्तीवर सामाजिक प्रश्न सोडवण्याची कुवत जोखणे असं काही?

चांगला उपक्रम आहे हा.
रिअ‍ॅलिटी शोज वर बोलूयात.. पण अपेक्षा व्यक्त करायचा चान्स घेतो.
मला व्योमकेश बक्षी, श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिका खूप आवडल्या होत्या. कथा मजबूत, स्क्रीप्ट बांधेसूद, दिग्दर्शन आणि अभिनय या सगळ्या आघाड्यांवर या मालिका आवडल्या. व्योमकेश बक्षी ने तर डिटेक्टिव्ह मालिकांच्या कल्पनांनाच छेद दिला. एक तर विशिष्ट कालखंड, साधी राहणी, नॉर्मल व्यक्तिमत्व.. रहस्याचे विषय पण साधे साधेच.. म्हणूनच ती पटली आणि त्यात जास्त मजा आली.

मालगुडी डेज , स्वामी ( छोट्या मुलाची), द्विधाता या काही उल्लेखनीय मालिका! ठराविक भागात संपणा-या आणि पाणी न घालता केलेल्या मालिका असतील तर रिअ‍ॅलिटी शोजची संख्या भरमसाठ होणार नाही.

रिअ‍ॅलिटी शोजमधे घरी बसून एखादं वाद्य शिकता येईल किंवा गायनाचे मुलभूत धडे मिळतील असे शोज पहायला आवडतील.

पुरूषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक यासारखे कायमस्वरूपी व्यासपीठ जर या माध्यमातून मिळाले तर खूप चांगल्या एकांकिका वाहिनीला काही प्रयास न करता मिळतील आणि ब-याच जणांना संधी !

Pages