वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[३]

Submitted by दामोदरसुत on 9 February, 2012 - 02:23

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[३]

[*] याज्ञिधर्मिणि धर्मि पापे पापाः समे समाः।
लोकास्तमनुवर्तन्ते यथा राजा तथा प्रजा॥
-- आर्य चाणक्य
अर्थ - एखाद्या राज्यामधील राजा जर धर्मपालन करणारा असेल तर त्याचे प्रजाजनही धर्माचरण करतात. राजा पापी असेल तर प्रजाजनही पापी निघतात. राजा पक्षपात न करणारा असेल तर प्रजाजनही समता पाळणारे निपजतात. जसा राजा तशी त्याची प्रजा.
चाणक्याच्या काळात राजेशाही होती. राजाच्या स्वभावानुसार त्याचे नियम व्हायचे. आता लोकशाही असली तरीही ’यथा राजा तथा प्रजा ’ हे वारंवार वापरले जाणारे वचन पूर्णपणे कालबाह्य झाले असे मुळीच नाही. फक्त त्याच्या आधी ’जशी प्रजा तसा राजा’ जोडायला हवे. सध्या जरी लोकप्रतिनिधि प्रजेकडून निवडले गेले तरी नंतर त्यांनाच कायदे करण्याचे अधिकार असल्यामुळे ते सर्व आजचे राजेच! त्यामुळे आता ते वचन ’ यथा प्रजा तथा राजा, यथा राजा तथा प्रजा ’ असे म्हणणे अधिक योग्य हॊईल. आता निव्वळ राजावर दोष ढकलून चालणार नाही. प्रजा नालायक असेल तर ती नालायकांनाच सत्ता देईल आणि मग नालायकच राजे मिळतील. People get the government they deserve! अशी इंग्रजीत म्हण आहे.
इस्त्रायलची जनताच कणखर आहे म्हणून त्यांचे राज्यकर्ते [राजे] तसेच असतात. म्हणून तर त्यांच्या सभोवारच्या प्रचंड शत्रुराष्ट्रांच्या नाकावर टिच्चून ते चिमुकले राष्ट्र स्वाभिमानाने तेथे उभे आहे आणि आपण? वीस पंचवीस वर्षे झाली तरी दहशतवादाला देखील नष्ट करू शकलो नाही. काश्मिरी पंडितांना भारतातच निर्वासित व्हावे लागले त्याची आपल्याला खंत आहे?
’यथा राजा तथा प्रजा’ हे वचन आणखी एका सुभाषितात आढळते. तो श्लोक असा -
यथा देशः तथा भाषा, यथा राजा तथा प्रजा
यथा भूमी तथा तोयं, यथा बीजं तथा अंकुरः॥
म्हणजे जसा देश तशी भाषा, जसा राजा तशी प्रजा. जशी जमीन तसे पाणी आणि जसे बी तसे त्याचे रोप.

[*] "आज आपल्या परिसरातील मान्यवर साहित्यिकांचा सन्मान करण्यासाठी आम्ही आजच्या प्रमुख पाहुण्यांना विनंति करण्यासाठी गेलो. ते त्यांच्या कामांमध्ये अत्यंत व्यस्त असूनही आमच्या निमंत्रणास त्यांनी आपली अनेक कामे बाजूला ठेवून तत्काळ होकार दिला. त्यांच्याशी बोलतांना त्यांचे साहित्यप्रेम, साहित्यवाचन व साहित्याचा अभ्यास किती श्रेष्ठ आहे त्याची कल्पना आली. खरोखरच आपण अत्यंत भाग्यवान आहोत की आपल्याला असे प्रमुख पाहुणे लाभले." इ.इ. स्तुतिसुमनांचा वर्षाव चालू राहातो. खेळाडूंचे, गायकांचे वगैरे सत्कारांनाही हेच प्रमुख पाहुणे असलेले आढळतात आणि थोड्या फरकाने तीच स्तुतिसुमने वर्षिली जातात कारण ’सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ते’
सार्वजनिक चांगल्या उपक्रमांना पैशांची गरज असते. हा पैसा उभा करण्याचा व्यवहार्य मार्ग म्हणजे त्या उपक्रमात मनापासून रस असणारी एखादी श्रीमंत व्यक्ती गाठणे किंवा ज्यांना सतत प्रसिद्धीच्या झोताची आवश्यकता भासते त्यांची ती गरज व उपक्रमाची पैशाची गरज भागवणे.
उपक्रमात ज्यास्तीत ज्यास्त गर्दी जमण्याच्या प्रसंगी बोलावून प्रसिद्धीलोलुप व्यक्तिला गौरवावे लागते. उपक्रम कोणताही असो त्याला धरून त्या व्यक्तीच्या अंगी ते ते गूण चिकटवावेच लागतात. समजा प्रसिद्ध साहित्यिकाला पुरस्कार द्यायचा असला आणि श्रीमंत दात्याचा आणि साहित्याचा कसलाच संबंध नसला तरी तो जोडावाच लागतो कारण
यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पण्डितः श्रुतवान गुणजः।
स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते॥

म्हणजे ज्याच्याजवळ पैसा आहे तो कुलीन असतो, तो विद्वान असतो , तो गुणग्राहक असतो, तो वक्ता असतो आणि देखणा असतो कारण सर्व गूण (पैशाला भुलून) पैशांच्याच आश्रयाला जातात (पैशालाच चिकटतात.).

[*] माझ्या नातवाला निव्वळ ऐकविण्यानेच सुभाषिते पाठ झालली होती. पण अर्थ? तो जाणून घेण्याची त्याची इच्छा व्हावी म्हणून मी त्याला एक नवे सुभाषित ऐकवायला सुरुवात केली. लवकरच तेही त्याला पाठ झाले. लहान मुले एरवी कितीही बडबड करोत. कोणाला कांही म्हणून दाखवायला सांगितले तर सहकार्य करतीलच याची शाश्वती नसते याचा अनेकांना अनुभव असेल. माझा नातूही अपवाद कसा असेल? त्याला हे नवे सुभाषित त्याच्या मित्राला म्हणून दाखवायला सांगितले. आपण कसे भारी आहोत हे दाखवायला कोणाला आवडत नाही? त्याने ते म्हणून दाखवल्यावर मी म्हणालो, ’अरे हे सुभाषित तू गाढवासारखा आहेस असे म्हणते हे तुला माहीत आहे का?’ असे विचारून मी त्याला त्या सुभाषिताचा अर्थ ऐकवला. त्यानंतर सुभाषितांचे अर्थ समजून घेण्याची इच्छा त्याच्या मनात हळूहळू निर्माण होऊ लागली. ते सुभाषित असे -
यथा खरः चंदन भारवाही, भारस्य वेत्ता न तु चंदनस्य।
तदैव शास्त्राणि बहुनि अधित्य, अर्थस्य मूढाः खरवद वहन्ति॥
म्हणजे चंदन वाहून नेणारे गाढव त्याचे फक्त वजन जाणते पण त्याच्या अंगचे गूण (सुवास, शिल्पकामासाठीची योग्यता इ.) जाणत नाही तसेच जे लोक शास्त्रांचा खरा अर्थ जाणून घेतल्याशिवायच खूप अभ्यास करतात ते गाढवाप्रमाणेच शास्त्रांचे निव्वळ ओझेच वाहतात.
आता निव्वळ चांगली सवय म्हणून नव्हे तर आरोग्यासाठी काय करायला पाहिजे हे सर्व कांही कारणांसह तो त्याच्या शाळेच्या पुस्तका्तून शिकतो. कधितरी आळसाने झोपण्यापूर्वी दात घासायचे टाळू लागला की मी त्याला म्हणतो कि तू ’अर्थस्य मूढाः खरवद वहन्ति’ आहेस. त्याचा अर्थ त्याला बरोबर समजतो. उपयोग होतो. पण उद्या माझ्या कडून असे कांही घडले तर या वचनाचा प्रयोग तो माझ्यावरही करू शकेल अशीही शक्यता आहेच!
पण म्हणतात ना? ’शिष्यात इच्छेत पराजयम’!
’शिष्यात इच्छेत पराजयम’! या नेहमी उदधृत (quote) केल्या जाणाऱ्या वचनाचे पूर्ण सुभाषित कोणाचे संग्रही असेल तर प्रतिसादात देण्याची विनंती आहे.
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[१] http://www.maayboli.com/node/32396
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[२] http://www.maayboli.com/node/32495
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[४] http://www.maayboli.com/node/32602

गुलमोहर: 

संस्कृत श्लोक आणि त्याचा अर्थ असा विस्ताराने सांगण्याची पद्धत फार आवडली. त्यामुळे तो श्लोक नीट समजतो.

चारुदत्तजी, प्रज्ञाजी व aschigजी प्रतिसादांबद्दल धन्यवाद, कारण त्यामुळे पुढील भाग लिहिण्याची इच्छा होते.
aschig जी आपली सुचना वेळ होताच कृतीत उतरवेन.