प्राजक्त फुलला दारी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 February, 2012 - 05:01

प्राजक्ताचे नाव काढताच डोळ्यासमोर येतो तो प्राजक्ताचा सडा त्याचा मंद
सुगंध. प्राजक्ताच्या फुलाच रुपडंही अगदी सुंदर, केशरी रंगाचे देठ ह्याचे
खास आकर्षण. प्राजक्त साधारण जुलै, ऑगस्टमध्ये बहरून येतो. असेच एक
प्राजक्ताचे झाड माझ्या लहानपणी माझ्या माहेरच्या अंगणात होते. पावसाला सुरुवात झाली की काही दिवसांतच हा प्राजक्त बहरून यायचा. सकाळी छोट्या
असणार्‍या कळ्या संध्याकाळी टपोर्‍या झालेल्या पाहताना मला खूप मजा
वाटायची.

ह्या टपोर्‍या कळ्या अंधारातच गुपचुप फुलायच्या आणि सकाळी थेट
अंगणात त्यांचा सडा पडलेला दिसायचा. सकाळी उठून हा सडा पाहण्यासाठी
अंगणात जायचे. ओल्या जमिनीवर मंद सुगंध दरवळणारी ती केशरी-पांढरी फुले
पाहून मन उल्हसित व्हायच. मग परडी भरून ही फुले गोळा करायची.

Prajakt.JPG

ही गोळा करता करता अजून एक छंद असायचा म्हणजे झाड हालवून प्राजक्ताच्या फुलांचा
पाऊस अंगावर घ्यायचा. त्या कधी दवाने तर कधी पावसाने भिजलेल्या फुलांचा
मऊ, गार स्पर्श मायेचा पाझर घालायचा. ह्या प्राजक्ताच्या फुलांच्या
पावसातील आनंद म्हणजे टप टप टप टप पडती प्राजक्ताची फुले ह्या
बालगीताच्या ओळी सार्थकी लावायच्या.

प्रत्येक सीझनला प्राजक्ताची फुले यायला लागली की आवर्जून प्राजक्ताचे
हार बनवून ते देवांच्या तसबिरींना घालायचे. बर हार बनवायचे ते पण
वेगवेगळ्या पद्धतीने. एका लाइनमध्ये सगळी फुले, एक पाकळ्याना पाकळ्या व
देठांना देठ चिकटवून म्हणजे कमळासारखा आकार येतो दोन फुलांचा मिळून तर एक
कष्टाचा प्रकार होता तो म्हणजे देठ काढून नुसत्या फुलांचा हार. हा हार
अगदी भरगच्च व गुबगुबीत दिसे. पूजेसाठी हार घालून झाले की उरलेल्या
फुलांची ओटीवर रांगोळी काढायची. हे झाले माझे बालपणाचे दिवस.

लग्न झाले आणि सासरी आले. माझ्या सासर्‍यांनी नवीनच जागा घेतली होती. त्या जागेत एक छोटं प्राजक्ताच कलम लावल होत. अगदी अंगणातच. २-३ वर्षातच ते मोठ्ठ होऊन त्याचा सडा पडायला लागला. परत माझे बालपणीचे दिवस आठवले.
मग आता ह्या सड्याचा आनंद तर उपभोगायलाच हवा. पण पुर्वी सारखा वेळ आता
मिळत नाही म्हणून सकाळी मी चहा घेऊन अंगणातल्या लादीवर बसून कपातला चहा
संपेपर्यंत गवतात पाय सोडून हिरव्यागार गवतावर पांढरा-केशरी प्राजक्ताचा
सडा आणि त्याचा मंद सुगंध अनुभवते. ही अनुभवलेली पाच मिनिटे माझ्यासाठी
दिवसभराचा उत्साह निर्माण करतात.

Prajakt1.JPG

आता बालपणी एवढा रांगोळी वगैरे काढण्यापर्यंत वेळ नसतो. पण प्राजक्ताची
फुले पाहिली की राहवत नाही. मग सुट्टीच्या दिवशी परडी भरून फुल गोळा करते
आणि सासूबाईंना त्याचे हार बनवून देते वेळ असेल तर स्वतःही घालते. रात्री
शतपावली करताना नवीन उमलणाऱ्या फुलांचा पुन्हा सुगंध भरभरून घेते. त्याने
रात्रही अगदी सुगंधी होऊन जाते.

ह्या फुलांच आणि माझं नातही अस आहे की माझं लग्न झाल आणि माझ्या
मिस्टरांनी त्यांच्या पराग ह्या नावाला मिळत जुळत म्हणून माझ नावही
प्राजक्ताच ठेवल. आमच एकत्र कुटुंब आहे. माझ्या जाऊबाई रोज ही फुले
देवपूजेसाठी गोळा करतात. माझी मुलगी श्रावणी २ वर्षांची असताना एक दिवस
लवकर उठली होती आणि तिने पाहील की तिची काकी फुल गोळा करतेय. तेंव्हा ती
जोरात ओरडली ए काकी ती माझ्या आईची फुले आहेत तू गोळा नको करुस. एक क्षण
मला काही कळले नाही. नंतर मला आणि सगळ्यांना समजल की आम्ही रोज
प्राजक्ताची फुल म्हणून उल्लेख करतो त्याचा अर्थ माझ्या मुलीने माझीच
फुले असा घेतला होता. दुसर्‍या अर्थाने तिच प्राजक्ताच फुल आहे.

असा हा माझ्या अंगणात बहरणारा प्राजक्त. ह्याचे नि माझे मला काही
ऋणानुबंध आहेत अस वाटत. हे माझे प्राजक्ताच्या फुलांवरचे प्रेम म्हणून का
कोण जाणे पण जरी फुलांचा बहर ओसरला, त्यांचा हंगाम गेला तरी अगदी
उन्हाळ्यातही ७-८ तरी फुलांचा सडा आमची मैत्री निभावण्यासाठी, माझे मन
प्रसन्न करण्यासाठी अंगणात पडतो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तो केशरी देठ.. आहा ती दुग्धपांढरी फुले ... जुन्या आठवणींचा सडाच दिसला डोळ्यासमोर.
जागूताई, तु सुद्धा 'प्राजक्ता'च आहेस ना. Happy

जागू मस्तच
आमच्या घराजवळ रास्तेवाड्यात दर दोन तिन घरामागे एक प्राजक्ताचे झाड होते. शाळा भरण्यापुर्वि अम्ही ती फुले गोळा करून आणायचो आणि त्याचा हार करून वर्गातल्या देवतांच्या फोटोंना घालायचो.

प्राजक्ताची फुल म्हणून उल्लेख करतो<< ह्या आता तिच्या लहानपणीच्या अठवणी झाल्या Happy

अंगणात पारिजातकाचा सडा पडे..

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात

ही गोळा करता करता अजून एक छंद असायचा म्हणजे झाड हालवून प्राजक्ताच्या फुलांचा
पाऊस अंगावर घ्यायचा. >>>>>> आहाहा....!!! भारी......

मस्तं लिहिलय!! Happy

प्राजक्ताचे झाड म्हंटले कि मला मालाडचे दत्त मंदिर आठवते, त्याच्या मागे किशोर नाईक हा माझा मित्र रहायचा, त्यांच्या अंगणात भले मोठे झाड होते.
ते देऊळ, ते झाड अजून असेलही..
आता आमच्या घराजवळ पण आहे, पण आठवते ते तेच..

जागूताई, प्राजक्ताची फुलं आवडली.. माझ्या माहेरी होती दोन छानशी झाडं.. एक सात-आठ वर्षांपूर्वी रस्तारुंदिकरणात गेलं.. आणि दुसर्‍याला गेली दोन वर्ष कीड लागते आहे.. त्यामुळे बर्‍याच दिवसांनी फुलं बघायला मिळाली.. काही असलं तरी ह्या दुसर्‍या झाडाला पालवी फुटते पण फुलं म्हणावी तेवढी येत नाहीत.. नाही म्हणायला परपल रंप्ड सनबर्ड ची एखादी तरी जोडी दोन तीन वेळा अजूनही त्यावर न चुकता घरटं तेव्हढं नक्की बांधते.. पिलं उडून गेली की ते झाड पुन्हा सुनं-सुनं.. आठवण आली.. तूही लक्ष ठेव.. तुझ्याकडेही झाडावर पक्षी घरटं बांधत असतील कदाचित.

अक्षरशः प्राजक्ताचा सुवास दरवळतोय हा लेख वाचताना आणि प्रचि बघताना!
सुंदर!
रच्याकने, माझेही बालपण प्राजक्ताची दरवळ, कळ्या, फुले, सडा, पाऊस, परड्या, माळा या सगळ्यांनी भरलेलं होतं! यावेळी खुप वर्षांनी सासरच्या घरी हे सगळं थोड्या प्रामाणात अनुभवलं! सकाळी चहा पितांना पाच मिनीटं झाडाजवळ जाऊन प्राजक्ताचं रुपडं आणि सुवास पुढील काही वर्षांकरीता भरुन घेतला आहे!

जागू, बालपण आठवल. आताही आमच्या सोसायटीत प्राजक्ताच झाड आहे. खूप प्रसन्न वाटत त्या फुलांच्या दर्शनाने आणि सुगंधाने. Happy
तुला झब्बू देऊ का? Wink
१.DSCN0074.jpg

२.DSCN0076.jpg

३.DSCN0092.jpg

प्राजक्त फक्त पावसाळ्यातच फुलतो असा माझा समज अनेक वर्ष होता. पावसाळा नसताना चिंचवडला श्री गजानन महाराज मंदिरात फुलणारा प्राजक्त पाहिला आणि हा समज दुर झाला.

अक्षरशः धुंदावून टाकणारे फूल........... Happy
खूप खूप धन्यवाद जागू........अगदी लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्यात........ Happy

जागू, किती सुंदर शब्दात लिहिलंस सगळं!
प्राजक्ताची फुले, त्यावरचं तुझ लिखाण, ह्या सर्वाला अनुरूप तुझं नाव सगळंच हळुवार....! Happy

जागू... मस्त लिहिले आहेस..

ठाण्याला माझ्या घरासमोर झाड आहे प्राजक्ताचे... Happy नेहमी सडा पडलेला असतो. आम्ही गाडीने कुठे जात असलो की फुले वेचून गाडीत ठेवतो मग संपूर्ण प्रवास कसा एकदम बहरलेला.. Happy

जागु, खरचं छान लिहिलयं खुपच... आवड्लं.
विचार केला तर खरचं चकित व्हायला होते नाही का ? कि देवाने या जगात किती प्रकारची फुले , त्यांचे
छान छान सुगंध निर्माण केले आहेत. प्रत्येकाची गोडी वेगळी आणि अवीट. Happy

मस्त Happy

जागुदी ..... प्राजक्ताचे झाड म्हंटल तर फुले येणार, त्याच्या सुगंधाने बहरणारे इतर फुलझाडासारखेच एक झाड पण माझ्यासाठी माझ्या बालपणीच्या आठवणींचा खजिनाच. आमच्या घराजवळच एक रामच देऊळ आहे त्या देवळाच्या समोर प्राजक्ताच झाड आहे (आत्ता ते फक्त माझ्या आठवणीतच आहे.... आत्ता खरच असेल की नाही माहीत नाही. आई ला विचारायला हव. शहरीकरणाच्या रेट्यात सगळ्या आठवणी सगळी ठिकाण धूसर होत चालली आहेत) मी आणि माझ्या बालमैत्रेणी आम्ही दर रविवारी प्राजक्ताची फुले वेचायला जायचो. अगदी परडी भरून फुले घरी आणून झोपळ्यावर बसून सुई मध्ये ओवून कधी हार तर कधी घराच्या मुख्य दरवाज्याला सुंदर तोरण बनवायचो. कधी कधी ह्याच फुलांनी घराच्या पायरीत आणि उंबरठ्यात रांगोळी काढायचो. एकीच्या घरची रांगोळी काढून झाली की लगेच दुसरीच्या घरी जायचं कारण ही फुल जास्त हाताळली की लगेच मलूल होवून जातात म्हणून.
मला खरच खूप वेड आहे प्राजक्ताच्या फुलांच....मला प्राजक्ताच झाड माझ्या इथल्या अंगणात (Backyard) मध्ये लावायचं आहे. अगदी सुरवाती पासूनच स्वप्न आहे हे पण काय माहीत Snowfall मध्ये हे झाड तग धरून राहील की नाही?
हा खरच योगायोग आहे की काय माहीत नाही....आजच एक वाईट बातमी समजली आई कडून. माझ्या एका बालमैत्रेणीने आत्महत्या केली. काल पासून सगळ्या आठवणी दाटून येताहेत आणि त्यातलीच ही एक प्राजक्ताच्या फुलांची आठवण....ही फुले पाहून मला अश्रू आवरण कठीण झाल. खरच किती सध्या गोष्टी प्राजक्ताच एक झाड त्याची फुल त्याला येणारा मंद सुगंध....निसर्गाचाच एक भाग पण किती वेगळेपण आहे ह्या सगळ्यात...किती महत्व आहे त्याला माझा आठवणींच्या राज्यात..........आठवणी कश्या अगदी फेर धरून येतात नाही!!!

जागू, सुरेख लिहिलंयस Happy फोटोही मस्तच

आम्ही गाडीने कुठे जात असलो की फुले वेचून गाडीत ठेवतो मग संपूर्ण प्रवास कसा एकदम बहरलेला.>>>>सेनापती, खासच रे. Happy

Pages