विनोदात कारुण्य की कारुण्यातला विनोद !

Submitted by pradyumnasantu on 5 February, 2012 - 15:26

एक म्हातारी इब्लीस
अतिशय खडूस
असली विशेषणं कितीही लावली
तरी ती ठरतील फडतूस

चांगला होता म्हातारा
हिच्या जाचानंच गेला बिचारा
आता बसलीय भरत
घरच्याना जाच करत

आठवणींनी कळवळते
रोज रात्री आकाशाकडं पहात बसते
आता तर तिनं शोधलाय एक झगमगता तारा
म्हणते तो पहा तो पहा, तो पहा माझा नवरा म्हातारा

सर्वाना लावायची तिकडं पाहायला दोन दोन तास:
"बघा बघा कसा माझ्यासाठी झगमगून भरतोय उच्छ्वास
चमकून मारतोय मला डोळा
जिवंत असताना असाच करायचा चावट चाळा"

पहाता पहाता म्हातारीच्या डोळ्यात पाणी तरळायचं
तिच्या जाण्याची वाट पहाणा-यांच्या मनातही काही खळबळायचं
ती डोळे टीपायची म्हाता-याचाच जुना सदरा वापरून
आणि मग त्या सद-याचाच किती वेळ वास घेत बसायचं

देठ तिचा चिवट,तशीच ती पुष्कळ टीकली
अलिकडं मात्र जरा सुकल्यागत वाटली
सर्वांना सांगते मी गेल्यावर म्हाता-याच्या ता-याकडे बघायचं
माझ्या ता-यालाही त्याच्याजवळच शोधायचं
खोल गेलेले डोळे त्याच जुन्या सद-यानं टीपत बसली
म्हाता-याच्या गोड आठवणींनी मधेच खुदकन केविलवाणं हसली

त्या रात्रीची काय सांगू त-हा
विकार तिचा खूपच बळावला
एकटक ती पाहत होती आकाशाकडे
आणि अरेरे-----
अचानक तो तारा निखळला

म्हातारीनं कल्लोळ केला
अरे बघा बघा म्हातारा परत आला
सांगायचं आहे का काही कारण
की म्हातारीनं ’जायचा’ बेत तात्काळ पुढे ढकलला

सगळं चाललंय सुरळीत
म्हातारी झालीय टुणटुणीत
रोज दिवसभर जाते भटकायला
(म्हा)तारा कुठे पडलाय ते शोधायला

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुमच्या प्रत्येक कवितेतून गोष्टच सांगता तुम्ही. विषयही वेगवेगळे असतात.
आवडली कविता Lol ( कारुण्य आहे खरे पण तरी मला हसूच आले वाचून. )

विनोदाला कारुण्याची झालर वगैरे ऐकलं होतं आजवर.
कारुण्याला विनोदाची झालर असा काहीसा फील आला शेवट वाचल्यावर.
या कथासदृश कवितेतलं हे वेगळेपण आवडलं.

उल्हासजी: आभार. माझ्या 'मै मै मै कारटून' या कवितेवर अभिप्राय देताना श्री एम्.कर्णिक यांनी 'कारुण्याला विनोदाचे अवगुंठन' असलेली कविता असा उल्लेख केला होता. वास्तविक त्या कवितेत माझा तसा प्रयत्न नव्हता. पण त्या कल्पनेने मला आकर्षित केले व मी ही कविता लिहिली. मात्र ती पूर्ण झाल्यावर विनोदाला कारुण्याचे अवगुंठन आहे की कारुण्याला विनोदाचे हे समजणे धूसर बनले.
अर्थात कारुण्याला विनोदाची झालर लावणारा श्रेष्ठ कलाकार म्हणूनच चार्ली चॅप्लीन ओळखला जातो. की मी पुन्हा गफलत करतो आहे?

म्हातारी कशी हस्ली र S S S, आठवुनि म्हातार्‍याला र तिच्या म्हातार्‍याला ।
शोधायाला लाग्ली र S S S म्हातार्‍याS Sच्या तार्‍याला र त्याS S च्या तार्‍याला ॥

भारीच हो प्रद्युम्नसंतु