आमरस

Submitted by pradyumnasantu on 31 January, 2012 - 17:22

जून महिना उष्ण वारा,अंगाची काहील करणारा
मी वामकुक्षित दंग
तरीही तो सुगंध
झोप माझी मोडणारा
-
देवगड हापूसची पेटी, मित्राने पाटविली
आंबा रसरसता
सुगंध घमघमता
झोप माझी उडून गेली
-
उठून कापली मी फाक,तोच ऐकली एक हाक
आई त्या खोलीत
थोडीशी ग्लानीत
तिकडे गेलो एक क्षणात
-
काय हवे आई,सांग मला,सकाळपासून तू उपास केला
पाणी देउ का?
भूक लागली का?
क्षीणपणाने आई म्हणाली आमरस दे मजला
-
कठोरपणे मी तिला म्हणालो ’आई’, मधुमेहाला आमरस चालत नाही
काही दुसरे माग
करू नको ग राग
’नको’ म्हणूनी आमरसास ती हट्टून राही
-
क्षीणपणे ती पुन्हा म्हणाली,"त्या गोष्टीला वर्षे झाली"
तू होता पोटी
डोहाळे आंब्यासाठी
लागलीच तुझ्या बाबांनी हापूसची पेटी आणलेली
-
आमरस हापूसचा मग केला स्वत:च्या हातानी
चांदीच्या वाटीतून प्यालेले स्मरते इतक्या वर्षांनी
सारे जाणवले
हॄदयी कालवले
तरीही नाकारून मागणी मी गेलो तिथुनी
-
रात्री पत्नीने धिक्कारले मला, म्हणाली
काय बिघडले असते जर आई थोडा रस प्याली
आवंढा गिळला
आमरस बनवला
चांदीची वाटी भरूनी आईकडे नेली
-
आई पलंगावरी निपचीत पडली होती
मालवलेली अन तिची प्राणज्योती
एका चमच्याने
हापुसच्या रसाने
ओठ तिचा माखला, नी माझा अश्रू ओघळला
त्याचवेळी हातून तिच्या एक आंबा घरंगळला

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हापुसची कविता म्हणून खुश झालो होतो,पण शेवट दुखःदायक<<>>
मधूमेह्>जखमा>पाय कापणे>अंधत्व>
>शेवटचे सहा महिणे संपुर्ण अंथरून>या सगळ्यात गेलेली तेरा वर्षे> जगण्याची अनावर ईच्छा>आणि शेवट>माझ्या आईचा.(मधुमेहामुळे आठवण आली)

pradyumasantu - आपली कविता आणि विभाग्रज यांचा अभिप्राय दोन्ही चटका लावून गेले.

विभाग्रजः दु:खी आठवण करून दिल्याबद्दल क्षमस्व. पण आई मुलाला काही दिल्याशिवाय रिकाम्या हाती कधीच जात नाही. माझा तसा अनुभव आहे. तिची ही आठवणही तुम्हाला काही उपहार देऊनच जाईल.
मामी: आभार. पण 'बापरे' कुठल्या अर्थाने?

pradumnasantu अतिशय ह्रदयद्रावक कविता.शेवटच्या कडवे अप्रतिम

सुरूवातीला गमतीशीर होईल की काय असे वाटून पुढे वाचणार नव्हतो पण आईचा विषय आला आणि वाचली....शेवट भिडला.

विजयरावः
सुरूवातीला गमतीशीर होईल की काय असे वाटून पुढे वाचणार नव्हतो पण आईचा विषय आला आणि वाचली....शेवट भिडला>>>>>>
प्रतिसादाबद्दल आभार.
गमतीशीर कविता आवडत नाहीत का? माझी 'भाजीवाली बाई माठ कसा दिला' ही कविता आवर्जून वाचा. आपल्याला आवडेल.

गमतीशीर कविता आवडत नाहीत का?>>>

असे काही नाही, केवळ विनोदनिर्मितीकरीताच लिहीलेली असेल तर आवडत नाही. कविता हा पुरेशा गांभीर्याने करायचा विषय आहे असा माझा समज आहे. अर्थात ती माझी वैयक्तिक आवडनिवड म्हणता येईल.

आपण सांगीतलेली कविता जरूर वाचतो.

नाव वाचून नव्हतोच वाचनार आधि. पण सहज उघडली वाचली अन
रचना साधारण असली तरी आशय काळजाला भिडला. मनात घर करून गेला.

छान व्यक्त झालात.

तुमची कविता आणि विभाग्रजचा प्रतिसाद आणि विभाग्रजला तुम्ही दिलेला प्रतिसाद सगळच हेलावुन टाकणारं.तुमच्यापुढे नतमस्तक.(तुम्ही म्हणजे 'रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा')

प्रद्युम्न, असे दु:खदायक वाचवत नाही हो, काळजाला घरे पडतात. विभाग्रज तुझ्या दु:खात सहभागी आहोत.

उल्हासजी, अविनाश, एम्.कर्णिक आभार
अविनाशजी: आशय काळजाला भिडावा याखातर रचना फार सुंदर बनवण्याचा प्रयत्न जाणूनबुजून टाळला आहे.

फालकोर | 1 February, 2012 - 06:43
डोहाळे शब्द उडवला तर? फक्त 'आमरस'कसं वाटतं?>>>>>
आपका प्रतिसाद सर आँखोंपर, चेंज कर दिया है!

फालकोर
तुमची कविता आणि विभाग्रजचा प्रतिसाद आणि विभाग्रजला तुम्ही दिलेला प्रतिसाद सगळच हेलावुन टाकणारं.तुमच्यापुढे नतमस्तक.>>>>>>
मी कवी या नात्याने स्टेजवर आहे. आपण समोर खुर्चीवर. स्टेजवरील कलाकार नतमस्तक होत असतो. खुर्चीवरील रसिक कौतुक करतो किंवा रागावतो. म्हणून आपण नतमस्तक होउ नका, तो माझा हक्क आहे. निदान आज तरी.
हार्दीक आभार.

सत्यजित
विनोदी कवित टर्न घेते... शेवट रुचला नाही... माझाची अ‍ॅड आठवली.>>>>>>
प्रतिसादाबद्दल आभार.
एका मध्यमवर्गीय घरातील एका खोलीत मित्राने आठवणीने पाठविलेली आंब्याची पेटी ठेवलेली आहे. पलिकडच्या खोलीत मधुमेहाने आजारी आई पहुडलेली आहे. दुसर्‍या खोलीत मुलगा. आंब्याच्या सुगंधाने मुलाची झोप मोडते. त्याला आंबा खावा वाटतो. आईलाही तो सुगंध हवाहवासा वाटतो. आपल्या गरोदरपणातील डोहाळ्यांची तिला आठवण येते व ती मुलाकडे आमरसाची मागणी करते. ती पुरी होत नाही तेव्हा आजारी अवस्थेतच जाऊन एक आंबा काढून आणते व त्या सुगंधाच्या सहवासात आपल्या पतीच्या व बाळंतपणाच्या मधुर स्मृती जागवून प्राण सोडते.
सत्यजीतजी आपल्या रसिकतेविषयी आदर राखून विचारू इच्छितो की यात आपल्याला विनोद कुठे दिसला?
आपल्याला शेवट रुचला नाही हे मी मान्य करतो. तो आपला हक्क आहे. पण सत्य घटना आपल्या रुचण्याचा आदर करत नसतात हेही मान्य केले पाहिजे