जिथे खूप करता येते रोम / ते दोन दिवसांकरता होम (भाग ३) (पॅरीस/म्युनीकच्या कमानींसहित)

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
<1’

भाग १
भाग २

तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीला सम्राट सेप्टिमस सेवेरस व त्यांच्या मुलांचा विजय साजरा करायला संगमरवरी लाद्या असलेली ही २१ मी. X २३ मी. X ११ मी. इतकी भलीमोठी विजयकमान बनविली गेली. सेवेरस हा पार्थियन सम्राट (सध्याचे इराण/इराक). प्रत्यक्ष कमानीवरील भागात चक्क चार खोल्या आहेत. त्यावर आधी एक रथ होता तो मात्र काळाच्या ओघात नाहीसा झाला. जुन्या रोमन नाण्यांवर ही कमान रथ आणि सम्राटासहित दिसते. रथाप्रमाणे अजून काही भाग आणि कोरीव काम जरी नष्ट झाले असले तरी ही कमान खूपच शाबूत आहे. याचे एक मुख्य कारण म्हणजे आधी एका चर्चमध्ये आणि नंतर एका किल्ल्याचा भाग म्हणून या कमानीचा वापर झाला होता. कमानीच्या दोहोबाजूंना मिश्र जातीचे (composite order) चार-चार स्तंभ आहेत. मिश्र जातीच्या स्तंभांची उंची त्यांच्या त्रिज्जेच्या वीसपट असते आणि हे स्तंभ (मागच्या भागात पाहिलेल्या) कॉर्निथियन प्रकारच्या अलंकारिक पानांचा वापर आयोनिक प्रकारच्या शिर्षाबरोबर करुन बनविले जातात. ही पाने "acanthus" झाडाची असतात. (कॉर्निथियन आणि आयोनिक शिवाय तिसरा मुख्य प्रकार असतो डोरीक). तीन-चारशे वर्षांपुर्वीपर्यंत मिश्र जात ही कॉर्निथीयन प्रकाराचीच एक उपजात आहे असे समजल्या जाई.

पहिल्या भागातील त्रजनच्या स्तंभाप्रमाणेच या कमानीवरही अनेक युद्धप्रसंग चित्रित केले आहेत, पण हे तितके मनोवेधक नाहीत. त्या चित्रांशिवाय या कमानीबद्दल इतकी माहिती उपलब्ध असण्याचे कारण म्हणजे त्यावरील 'शिलालेख' सुस्पष्ट आहे. त्यावर सम्राट सेप्टिमस सेवेरस आणि त्यांचा मुलगा "Caracalla" चा उल्लेख आहे. आधी त्याच्या दुसऱ्या मुलाचा "Geta" चा पण उल्लेख होता. पण तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीला "Caracalla" ने "Geta" चा काटा काढला आणि सर्व सार्वजनिक ठिकाणांवरुन त्याचा नामरूपी आणि चित्ररुपी उल्लेख नष्ट करायचा आदेश दिला. लिखित इतिहास म्हणजे दगडांवरील रेघा नसून जेत्यांनीच तो लिहिला (किंवा मिटवला) असतो हे यावरून सिद्ध होते.

तेथून जवळच आहे रोम्युलसचे मंदिर. मॅक्सेनशियसचा मुलगा रोम्युलस. त्याला त्याच्या मृत्युनंतर देवत्व बहाल केले गेल्याने त्याचे हे मंदिर.

या मंदिराचा चौथ्या शतकातील पितळेचा दरवाजा अजूनही शाबूत आहे. सोळाव्या शतकापर्यंत येथे कॉन्स्टंटाईनचा उल्लेख होता. कॉन्स्टंटाईनने मॅक्सेनशियसचे नाव असलेल्या सर्व वास्तू आपल्या नावे केल्या होत्या. ऐतिहासिक नोंदी या पाऱ्याप्रमाणे चंचल असतात याचा हा अजून एक नमुना. (इतिहास पारादर्शक असतो असे म्हणता येईल का?) हे मंदिर पेगन पद्धतीच्या मंदिराचा एक उत्तम नमुना आहे.

मंदिरामागे आहे कॉन्स्टंटाईनचा प्रासाद. ३५ मी. उंच आणि एके काळी संगमरवरानी सुशोभित ही फोरममधील सर्वात भव्य वास्तू. येथे न्यायनिवाडा आणि व्यापार चाले. मायकेलअॅंजेलोने संत पॉलच्या भव्य गिरीजाघराचा घुमट बांधतांना येथील सुडौलतेचा आणि नियमिततेचा अभ्यास केला होता असे म्हणतात. १९६० च्या अॉलिंपिकमधील कुस्त्यांच्या स्पर्धेचे आयोजन येथे केले गेले होते.

या प्रासादाच्या भव्यतेची अजून कल्पना या बऱ्याच अंतरावरुन काढलेल्या चित्रावरुन यावी.

रोमन फोरमच्या दुसऱ्या बाजूला आहे टिटोची कमान. सम्राट डोमिशियनने आपल्या मोठ्या भावाच्या स्मरणार्थ पहिल्या शतकाअखेर बांधलेली ही विजयकमान. मिश्र जातीचे स्तंभ सर्वप्रथम इथे वापरले गेले असावेत. पॅरीसमधील आर्क द त्रॉं सकट अनेक विजयकमानी टिटोच्या कमानीच्या घाटावर आधारीत आहेत.

या कमानीच्या आतल्या एका भिंतीवर जेरुसलेमच्या मंदिरातून पळवलेल्या गोष्टींची मिरवणूक कोरलेली आहे. मिरवणुकीत प्रथम स्थान आहे अर्थातच यहुदींच्या सोनेरी दिवास्थाला (Menorah). असे मानल्या जाते की इस्राईलचे मानचिन्ह या चित्रावरून ठरविले गेले.

फोरमला लागूनच असलेले पलाटाईन हे रोमच्या सातापैकी मधल्या टेकडीवर पसरले आहे. पॅलेस हा शब्द पलाटाईन वरुनच आला आहे. फोरमपेक्षा हे ४० मी. उंचीवर आहे. फोरमच्या या पॅनोरामात या आणि आधीच्या भागात उल्लेखलेल्या अनेक वास्तू दिसतात.

याच टेकडीवर त्या कोल्हीने ल्युपरकाल नामक गुहेत रेमस आणि रोम्युलस यांना वाचवले होते. इथल्या वास्तूंची जास्त पडझड झाली आहे. त्यामुळे ऐतिहासिक महत्व असले तरी त्या तितक्या चित्तवेधक वाटत नाहीत. अनेक ठिकाणी पूर्वस्थितीकरण सुरु आहे. एक-दोन ठिकाणी तर काळजीपूर्वक आणि म्हणून संथ गतीने सुरु असलेले उत्खननही दृष्टीपथात येते.

स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणारा हा भाग खाजगी बगीचा असावा असे समजल्या जाते.

हा पहिल्या शतकातील महाल. याच्या अंगणात संगमरवराच्या रंगीत रांगोळ्यांसारख्या रचना आहेत. तत्कालीन रोमन कवींच्या मते हा महाल सर्वात सुंदर होता.

फोरम आणि पलाटाईन टेकडी पाहून होईपर्यंत आपल्याला पाय, पोट आणि कॅमेरा धरुन थकलेले हात आहेत ही जाणीव झाली होती. सकाळी हॉटेल शेजारच्या छोट्या रेस्त्रॉंमधे न्याहरी झाली होती (काही हॉटेल्सच्या डिल्समधे असते त्याप्रमाणे न्याहरी इथेही समाविष्ट होती, पण २०० फूट दूर). थोडी बिस्किटे व दाणे खाऊन झाले होते. खरेतर डींचची (लंच + डिनर मधली) वेळ झाली होती. पण घेतलेले तिकीट हे कोलेसियमलाही लागू असल्याने, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा याच भागात यायचे नसल्याने रस्त्यावरील एका गाड्यावरुन एका युरोला एक अशी दोन केळी घेऊन रिचवली आणि रोमन सैनिकांच्या वेषात तासनतास उभे राहून तपस्या करणाऱ्या लोकांची मनातल्या मनात पाठ थोपटत (पण त्यांच्याबरोबर फोटो न काढता) पुढे सरकलो.

कॉन्स्टंटाईनने चौथ्या शतकाच्या सुरुवातीला मॅक्सेनशियसचा पराभव केल्यावर कोलेसियम जवळची ही विजयकमान बनवली. इतर अनेक ठिकाणचे आयते भाग यात वापरले गेले आणि चार वर्षात पूर्ण कमान तयार झाली.

अशी उचलेगिरी सगळीकडेच होते. पश्चिमात्य परिभाषेत त्याला स्वतंत्र स्थान सुद्धा प्राप्त झाले आहे - "spolia". परिस्थिती मुळे कोरीव कामाऐवजी गाभाच बदलल्याची उदाहरणे भारतात सुद्धा आहेत. काशीत अनेकदा विनाशकाली महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मूर्ती दुसऱ्याच एखाद्या मंदिरात नेल्या जात. किंवा विहीरीत टाकल्या जात. मग कधितरी पूर्व जागी न जाता त्या तिसऱ्याच ठिकाणी उगवत. तसेच, भारतातल्या प्रमाणेच येथेही एका 'प्रकारची' जागा दुसऱ्या 'प्रकाराने' काबीज केल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.

कॉन्स्टंटाईन स्वत: पेगन होता पण नंतर त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. या विजयद्वारी नेहमीप्रमाणेच विजयदृष्ये असली तरी काशीप्रमाणेच चिरंतन समजल्या जाणाऱ्या रोम शहराला आपण काबीज केले असे दाखविणे त्याने टाळले आहे. १९६० च्या अॉलिंपीकमधील मॅरॅथॉनची विजयदोरी हे विजयद्वार होते.

त. टि. :
हा तो पॅरीसचा शॉम्सलिसच्या एका टोकाला असलेला सुप्रसिद्ध आर्क द त्रॉं (अवाढव्य ५० मि. X ४५ मि. X २२ मि.) व त्यावरील काही रिलिफ्स. टिटोच्या कमानीशी असलेले साधर्म्य लगेच लक्षात येईल. हा बांधायला ३० वर्षं लागले.

हा पॅरीसमधलाच आर्क द त्रॉं दु कॅरुस. हा १९ मि. X २३ मि. X ७ मि. चा असुन ३ वर्षांत बांधून झाला. हा सेवेरसच्या कमानीसारखा आहे. याचा कॉड्रीगा (रथ) मात्र शाबूत आहे (२०० वर्षांत काय होणार म्हणा?) पॅरीसच्या दोन्ही कमानी नेपोलियनच्या विजयाशी आणि फ्रेन्च राज्यक्रांतीशी निगडीत आहेत.

त. टि. २:
म्युन्शन (म्युनीक) चे Siegestor / विजय द्वारः (ऑक्टोबर २००८)

१८५२ सालची ही कमान टिटोच्या कमानीसारखी असली तरी इथल्या क्वाड्रीगात घोड्यांऐवजी सिंव्ह वापरले आहेत - बव्हेरीयन प्रभावामुळे.

हे २१ मि X २४ मि X 12 मि असून विजयद्वार म्हणुन बनवले गेले पण नंतर दुसर्‍या महायुद्धात पडझड झाली आणि मग शांतीची बोली सुरु झाली. त्यावरील संमिश्र संदेश असा आहे: Dem Sieg geweiht, vom Krieg zerstört, zum Frieden mahnend (विजयाला समर्पीत, युद्धाने उध्वस्त, शांतीचे द्योतक) - देर आए दुरुस्त आए.

(क्रमश:)

विषय: 

मी पैली. पैली. Happy

हा भाग पण मस्त झाला आहे. पारादर्शक शब्दाचे पेटंट घेणेचे करावे. मेनोरा च्या शेजारी दोन कोरीव भाग आहेत ते उगीचच टीवी कॅमेरा व लाइट सारखे दिसत आहेत. शेवटची कमानच जास्त भारदस्त दिसत आहे. ( कट पेस्ट असून. ) केळी फार महाग पडली का? पुढील वेळी ब्यागेत ब्रेड व अमूल बटर,
पारलेजी नेणेचे नक्की करावे. फोटो कॉंपोझिशन व कलरस्कीम मस्त. जुन्या विटा व पितळेचे द्वार खास आहे.

रोम मध्ये रात्री आठ वाजता सूर्यप्रकाश असतो का? एंजल्स व डेमन्स बघताना घरी असा प्रश्न पडला होता.

> मेनोरा च्या शेजारी दोन कोरीव भाग आहेत ते उगीचच टीवी कॅमेरा व लाइट सारखे दिसत आहेत.

खरच की! माझे लक्षच नव्हते गेले.

उन्हाळ्यात आठापर्यंत सहजच असु शकतो सूर्यप्रकाश.