जन गण मन चित्रपट: प्रथम प्रदर्शन सोहळा, पुणे

Submitted by मंदार-जोशी on 27 January, 2012 - 07:55

जन गण मन हा नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे हे मायबोली.कॉमवर वाचल्यावर माझ्या नेहमीच्या "टी.व्ही.वर आल्यावर बघू" ह्या ब्रीदवाक्याचा जप मनात करत पुन्श्च कामात डोकं घालणार इतक्यात अनपेक्षितपणे चिन्मयचा (चिनुक्स) फोन आला की "जन गण मनच्या प्रिमिअरची मायबोलीला पाच तिकिटं मिळत आहेत, जाणार का?" मागच्या वेळी असाच एक चित्रपट बघण्याची संधी गमावल्याने या वेळी काहीही करुन जमवायचंच असा विचार केला, आणि माणशी एकच तिकीट मिळणार असल्याने गृहमंत्र्यांना भरपूर मस्का लावून चिन्मयला होकार कळवला. चित्रपटाचा प्रथम प्रदर्शन सोहळा म्हणजेच प्रिमिअर सिटिप्राईड कोथरुडलाच असल्याने फार लांबही जायचा प्रश्न नव्हता.

JMG001_Poster.jpg

"कुणाला तरी शोधत असलेला गोंधळलेला चेहरा" हे मायबोली गटगला घेऊन जायचे व्यवच्छेदक का काय म्हणतात ते लक्षण घेऊन अस्मादिक सिटिप्राईड कोथरुडमधे दाखल झाले. कोण कोण येणार याची चिनुक्सने साधारण कल्पना दिलेली असली तरी फोन झाल्यानंतरच्या दोन दिवसात दाबून काम आल्याने ती यादी संपूर्णपणे विसरून गेलो होतो. सिटिप्राईडच्या सरकत्या जिन्यावरुन वर येत प्रवेशद्वारातून आत शिरताच नेहमीच्या परंपरेला (याला पामर लोक सवय म्हणतात) अनुसरुन लहान पोरं दरवाज्याआड लपून एकमेकांना "भोsss" करतात तसं धाडकन् समोर येत दक्षिणाने "मंद्याssss" अशी चित्कारीवजा आरोळी ठोकली आणि 'कोकण मीट्स कोल्हापूर'चा छोटासा एपिसोड पार पडला. मग सुरू झाला तो इतर सदस्यांचा शोध. चिनुक्स पाच मिनिटात पोहोचत असून बाकीचे तिथेच क्रॉसवर्डच्या आसपास असल्याचं समजलं आणि मग हिम्सकूल (हिमांशू कुलकर्णी), चारुदत्त, आणि अमृता भिडे (आस) हे सदस्य भेटले. चिनुक्सही लगेच पोहोचला आणि आपण चित्रपट बघायला आलेलो नसून फक्त तुम्हाला भेटायला आलो असल्याचे सांगत आम्हाला थोडंसं आश्चर्यात टाकलं, पण लगेच चित्रपट आधीच बघितल्याचं प्रांजळपणे सांगूनही टाकलं.

JMG002.jpgचिनुक्स, चारुदत्त, हिमस्कूल आणि दक्षिणा

मग पार पडला तो चित्रपटातल्या कलाकारांबरोबर छायाचित्र काढण्याचा कार्यक्रम. माझी मेहुणी संदीप खरेची प्रचंड, लय मोठी, खूपच जबरदस्त वगैरे फॅन आहे. त्यामुळे संदीप खरे आणि सलील कुलकर्णी हे दिसल्यावर त्यांच्या बरोबर छायाचित्र काढून घेण्याची आणि पर्यायाने भरमसाठ धूर बघण्याची संधी मी दवडणार नव्हतोच.

JMG003.jpgअस्मादिक म्हणजेच मंदार_जोशी, संदीप खरे, आणि आस (अमृता भिडे)

JMG004.jpgडॉ. सलील कुलकर्णी, नंदू माधव, आणि दक्षिणा

JMG005.jpgआस (अमृता भिडे), डॉ. सलील कुलकर्णी, मंदार_जोशी, आणि नंदू माधव

JMG006.jpgडॉ. सलील कुलकर्णी आणि मधुरा

JMG007.jpgदक्षिणा, मधुरा, आणि चारुदत्त

JMG008.jpgदक्षिणा आणि संतोष जुवेकर

JMG008_ALT.jpgदक्षिणा, संतोष जुवेकर, आणि आस (अमृता भिडे)

JMG009.jpgबबलीची भूमिका करणारी अस्मिता जोगळेकर, चारुदत्त, आणि काटूच्या भूमिकेतला चिन्मय संत

JMG010.jpgमधुरा आणि नंदू माधव

JMG011.jpgआस (अमृता भिडे) आणि मधुरा

अशा रितीने फोटो काढण्याची हौस पूर्ण झाल्यावर चित्रपट बघण्याची उत्सुकता असलेले सगळे चित्रपटगृहात प्रवेश करते झाले.

चित्रपट बघितल्यानंतर या चित्रपटाने आपल्याला काय दिलं (key takeaways) असा विचार माझ्या मनात हटकून येतो. या चित्रपटाने जे दिलं ते मात्र शब्दांत मांडणं अशक्य आहे. नंदू माधव यांच्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटल्याप्रमाणे बुद्धिमत्ता ही एकाप्रकारची कधीच नसते — पण हे न समजल्याने त्यांनी साकारलेले सोनटक्के मास्तर यांची नेहमी घुसमटच होते. हीच कथा देशातल्या बहुसंख्य शिक्षकांची आहे. पाड्यावरच्या, आदिवासी मुलांना शहरी मुलांसारखंच शिक्षण देण्याच्या नादात आपण त्यांच्या मनातली शिक्षणाविषयीची उरलीसुरली आस्था घालवून बसत आहोत. टक्केगुरुजींप्रमाणे आपली लेव्हल आणि त्यांची लेव्हल यात आपण उच्च आणि नीच असा फरक करून शिक्षणाचा खेळखंडोबा करतच आहोत.

गरीब आणि श्रीमंत यातली दरी या विषयी आपण बोलतो ते नेहमी शहरातल्या उंच इमारती आणि झोपडपट्ट्या यांच्याकडे बघून. आपण शहरात आणि गावात राहून देश, देशभक्ती, जात, धर्म, कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, इतिहास, ब्रिटीश राज कसे जुलूम करणारे होते वगैरे भाष्य करतो. पण देश म्हणजे काय, आपल्या देशाचं नाव काय, जुलूम कशाला म्हणतात हे प्रश्न टक्केगुरुजींनी विचारल्यावर मख्ख चेहर्‍याने बघणारी पाड्यावरची मुलं बघून आपल्याला निश्चितच धक्का बसतो. हे चित्रपटातलं दृश्य असलं तरी आज अनेक खेड्यापाड्यातलं जळजळीत वास्तव आहे. Grass root level - तृणमूळ पातळी म्हणजे काय हे या पाड्यावरचं जगणं बघितलं की लक्षात येतं आणि एक राष्ट्र म्हणून आपण अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे याची जाणीव झाल्यावाचून राहत नाही.

चित्रपटाच्या बाबतीत आवर्जून नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे अचूक पात्रनिवड. चित्रपट बघताना अर्थातच प्रेक्षकांना सर्वप्रथम भेटतात ते अभिनेते, आणि हा एका चित्रपट अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर जवळजवळ सबकुछ नंदू माधव आहे. "बच्चन" म्हणजे सर्वोत्कृष्ठ असण्याचा मापदंड असं मानणार्‍या आणि आपण शिकवत असलेली शाळा आपल्या 'लेव्हलची' नसल्याने सदैव तिथून आपल्या गावी बदली करुन घेणे या ध्येयाने पछाडलेल्या आणि तरीही या पोरांना होईल तितकी मदत करणार्‍या म्हाळुंगे इथल्या एका पाड्यावरच्या शाळेतील शिक्षक रामचंद्र सोनटक्के साकारणारे नंदू माधव यांचे या आधी बघितलेले सिनेमे म्हणजे ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ’वळू’. मायकल क्लार्कने दुपारभर भारतीय गोलंदाजीला धू धू धू धुवून शतक झळकावल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा मागल्या पानावरुन पुढे धुलाईला सुरवात करुन द्विशतकी मजल मारावी तद्वत् नंदू माधव यांनी आधीच्या चित्रपटांतील कसदार अभिनयावर कळस चढवणारी कामगिरी या चित्रपटात करुन त्यांच्याविषयीच्या असलेल्या सगळ्यांच्याच अपेक्षांची पूर्ती केली आहे.

दिग्दर्शक अमित अभ्यंकर यांनी अत्यंत सहज आणि अभिनय वाटू नये असं त्यांच्याकडून काम करुन घेतलं आहे असं वाटत राहतं. किंबहुना नंदू माधव यांना काही सांगावं लागलं नसावंच! असंच सहज काम चित्रपटातील सगळ्या कलाकारांनी केलं आहे. इतर कलाकारात सर्वप्रथम संतोष जुवेकरचा विशेष उल्लेख करायलाच हवा. हा असा दुर्मिळ नट आहे की जो बिझनेसमन, शहरी मध्यमवर्गीय, गावगुंड किंवा या चित्रपटात काटू-बबलीचा बापासारख्या कुठल्याही भूमिकेत शोभून दिसतो. जीव ओतून काम करणे म्हणजे काय ते संतोषच्या अभिनयाकडे पाहून समजतं. मधुरा वेलणकर यांनी काटू-बबलीची आई छानच साकारली आहे. काटूच्या भूमिकेतला चिन्मय संत आणि त्याची बहीण बबलीच्या भूमिकेतली अस्मिता जोगळेकर यांचा जबरदस्त अभिनय बघून असं नक्कीच वाटलं की बालकलाकार हा शब्द चित्रपटविषयक लिखाणातून तरी हद्दपार करुन फक्त कलाकार किंवा नट हाच शब्द वापरायची सक्ती करायला हवी. हे दोन्ही कलाकार शहरी मुलं आहेत हे सांगून खरं वाटलं नसतं आणि आम्ही त्यांना प्रिमिअरला भेटलो नसतो तर त्यावर कदाचित कधीच विश्वास ठेवला नसता. चित्रपटातल्या या प्रमुख भूमिका वगळता इतर लहान भूमिकांच्या बाबतीतली पात्रनिवडही वाखाणण्यासारखी आहे. स्त्रीलंपट आणि पंचक्रोशीतली बडी आसामी असणार्‍या शेटच्या भूमिकेतले संदीप मेहता हे जुन्या हिंदी चित्रपटांतल्या प्रेम चोपडा-छाप हलकटपणाची आठवण करुन देतात. जेष्ठ अभिनेता उदय सबनीस यांनी भ्रष्टाचारी आणि चालू शिक्षणाधिकारी गायधनी साहेब उत्तमरित्या उभा केला आहे. टक्केगुरुजींच्या बायकोच्या भूमिकेत पूजा नायकही धमाल करुन जाते.

मंदार नामजोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या चित्रपटाच्या कथा-पटकथा-संवाद या तीनही विभागात कुठेही कमकुवत दुवे न सोडता जबरदस्त कामगिरी केली आहे ती समीर जोशी यांनी. डो. सलील कुलकर्णी यांचं संगीत आणि संदीप खरे यांचे शब्द यांनी नेहमीप्रमाणेच आपली जादू दाखवली आहे.

JMG013.jpg कथा-पटकथा-संवाद विभाग सांभाळणारे समीर जोशी आणि दिग्दर्शक अमित अभ्यंकर

JMG012.jpgJMG016.jpg चित्रपट संपल्यानंतर झालेल्या अनौपचारिक ओळख कार्यक्रमात कलाकारांचा संच

JMG015.jpg

सहाय्यक दिग्दर्शक सिकंदर सय्यद यांच्या मदतीने दिग्दर्शक अमित अभ्यंकर यांनी आपल्यासमोर एक नितांतसुंदर कलाकृती ठेवली आहे. तेव्हा "टिव्हीवर लागेल तेव्हा बघू" असं ज्यांचं ब्रीदवाक्य आहे त्यांनी निदान या सिनेमाच्या बाबतीत तरी ते गुंडाळून ठेवावं आणि चित्रपटगृहात जाऊन हा डोळे उघडणारा अनुभव जरूर घ्यावा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल चिन्मय दामले म्हणजेच चिनुक्स यांचे अनेक आभार. मायबोलीशी निगडित विशेष आभार यासाठी की या निमित्ताने हिम्सकूल यांच्याशी फोनवरुन असलेल्या ओळखीचे रूपांतर प्रत्यक्ष भेटीत झालं आणि चारुदत्त आणि अमृता या दोन नवीन ओळखी झाल्या.

छान वृत्तांत आणि छान फोटो.
सेलिब्रिटीजनी माबोकरांबरोबर अगदी उत्साहाने फोटो काढून घेतलेत. Happy

उकाका, सगळे कलाकार अगदी साधे वाटले. ज्याला down to Earth म्हणतात तसं. Happy
त्यांच्याशी अधिक बोलायला मिळालं असतं तर मला खात्री आहे खूप काही शिकायला मिळालं असतं आम्हाला.

छानै वृत्तांत...... माबोकरही सेलेब्रिटिच वाटताहेत. Happy

मंदार... मधुरा वेलकणकर बरोबर दक्षिणा आणि चारुदत्त आहेत.. संतोष जुवेकर नाही..

आणि वृत्तांत उत्तम झाला आहे..

टक्के गुरुजींच्या बायकोच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले नाही!! माझ्या माहितीप्रमाणे पूजा नायक आहे. खूप छान अभिनय करते.
बाकी वृत्तांत व फोटो मस्तच.

मंदार, खुपच मस्त व्रूतांत ..
आणि सगळ्यांचे फोटो पण जबरी आलेत.. Happy विशेषत: माबोकरांचे..
सिनेमा आवर्जुन बघायला हवा.:)

मंदार, छान वृतांत लिहिलायस. फोटो तर खासच.
रच्याकने, संदीप खरे आणि डॉ. सलील कुलकर्णींचा "आयुष्यावर बोलु काही " हा कार्यक्रम आम्ही गोव्याला गेल्या वर्षी पाहिला. नंतर त्यांच्यासोबत फोटोसुद्धा काढले. आणि तेसुद्धा छान हसत , न कंटाळता सर्वांना फोटो देत होते, सह्या देत होते. खूप छान वाटले.

मंदार, मस्तच ...
माझी माबोकरांना भेटायची हि पहिलिच वेळ ... भारी वाटले Happy ...
मंदार, दक्षिणा, हिम्सकूल, अमृता आणि चिनुक्स .. खूप धन्स ... :)...

काटू-बबली सारख्या कित्येकांची 'जन गन मन' चि व्याख्या " अर ते गानं मनायचय ना .. पेडा गावनारे " ... एवढिच असू शकते यावरहि चित्रपट नकळत बोलून जातो. श्रेयनमावली बरोबर विरुन जणारा हा विषय नाही .. .. .. चित्रपटात मांडलेल्या विचारांचे किडे नंतर डोकं खात रहातात . .

हा काय गौडबंगाल आहे यार....!! पुण्यात कॅमेरा अलाऊड करतात ... पण मुंबईत कॅमेराच अलाऊड नव्हता प्रिमिअरच्या फ्लोअरवर Sad

शाळा म्हाळुंगे गावातच आहे... मुलं तुरुपवाडीतली आहेत.. आणि टक्के मास्तरांचे गाव कुठेच सांगितलेले नाही. फक्त त्यांना म्हाळुंगे मधून बदली हवी आहे..

hurrryyyyyeeeeeeeeeeeee!!!!

kaay baap lihilay vruttant!
majja aali vachun..

ani arthaat tumha sagalyanna bhetun suddha!

plz plz plz sagalyanni bagha!

फार छान लिहीलं आहेस मंदार.

आधी दुर्लक्ष करणार होरो पण हे वाचून आता सिनेमा पहावा असं वाटू लागलंय. सेलेब्रिटीज सोबत फोटोबद्दल सर्वांचे अभिनंदन ( विशेष अभिनंदन दक्षिणाचे - तिचेच जास्त आलेत फोटोज). अर्थात माबोवरच्या एका सेलेब्रिटीबरोबर नेहमी वावरत असल्याने विशेष काही वाटलं नसेलच.

दक्षीणा चुकल दक्षिणा - मंदार सिनेमा पहाण्याबरोबर फोटोचा चांगला चान्स मारला. झाली काय गम्मत मी आधी फोटो बघायला सुरवात केली. आधी दक्षिणा - मग मंदार सोबत जेष्ठ कलाकार मंडळी. आधीच दक्षिणा फोटोजनिक, त्यात जन गण मन चित्रपट: प्रथम प्रदर्शन सोहळा. क्षणभर खात्रीच झाली की दक्षिणाला या चित्रपटात भुमिका मिळाली. मंदारला पण मिळाली असेल साईड खलनायकाची .

वृत्तांत वाचल्यावर चित्रपटाबद्दल चांगल वाटल पण या लोकांना भुमिका वगरे काही नाही हे वाचुन भ्रमनिरास झाला.

ओ निनीनचंद्र

मंदार चिकणा आहे. त्याला साईड खलनायक काय करता राव ?
त्याने पैसे दिले तर मी त्याच्यासाठी एक सिनेमा बनवीन आणि त्यात त्याला मुख्य हिरोची भूमिका देईन (हिरॉइन वर तो फोनवरच बोलत असतो असं दाखवून तो एक प्रश्न मिटवता येईल ).

सर्वांना विनंती,
आपले प्रतिसाद हा लेख, चित्रपट आणि मायबोलीचा माध्यम_प्रायोजक म्हणून सहभाग यापुरते मर्यादित ठेवावे.
चित्रपट पाहिला असल्यास आपले मत सुद्धा इथे नोंदवले तरी चालेल. पण कथा लिहू नये.

___________________________________________

@ नितीन
>>दक्षिणा - मंदार सिनेमा पहाण्याबरोबर फोटोचा चांगला चान्स मारला.
असं बोलू नये नितीन, वर कुणाचा तरी जळफळाट झालाय त्यात कशाला तेल ओतताय? Wink

भुंगा | 27 January, 2012 - 22:48
हा काय गौडबंगाल आहे यार....!! पुण्यात कॅमेरा अलाऊड करतात ... पण मुंबईत कॅमेराच अलाऊड नव्हता प्रिमिअरच्या फ्लोअरवर

Biggrin
___________________________________________

@ भुंगा
तु तुझी पोस्ट का संपादित केलीस समजले नाही. त्यामुळे तू नक्की कशासाठी धन्स म्हणतो आहेस त्याबद्दल इतरांचा गोंधळ होऊ शकतो. कुणाची अशी गैरसोय होऊ नये म्हणून तुझी आधीची पोस्ट इथे डकवतोय. Happy

JMG_BhungaScreenshot.JPG

पुढच्या वेळी कृपया आधी तथ्यांची खातरजमा करुन घे. म्हणजे अशी पोस्ट एडिट करण्याची आवश्यकता भासणार नाही. Happy

Pages