मनातली 'शाळा'

Submitted by आनंदयात्री on 24 January, 2012 - 23:50

तो नववीत आहे. आपणही नववीतच आहोत. त्याचा वर्ग, मुख्याध्यापक अप्पा, बेंद्रीण बाई, परांजपे बाई, मांजरेकर सर, घंटा देणारा शिपाई असं सगळं कंटा़ळवाणं विश्व आहे. आपलंही असणार! सुर्‍या, फावड्या, चित्र्या हे जानी दोस्त आणि मिसाळ, बिबिकर, सुकडी, आंबेकर असे ठळक नमुने! हे सगळेही आपलेच! त्याची टिपिकल आई, अंबाबाई, पोराला चक्क समजून घेणारे वडील, त्याचा लाडका नरूमामा - हे तर आपलेच सगे! पण.... त्याला वर्गातली एक मुलगी ज्ज्जाम आवडते. ही गोष्ट तो सगळ्यांपासून लपवतो. मित्रांमध्ये, मामाबरोबर बोलताना प्रेमाबिमाचा विषय निघाला की विषयच बदलतो किंवा निघून जातो, तिच्यासाठी आपल्या दोस्तांनाही बरोबर 'वापरून' घेतो - असं काय काय करतो. पण वेळ येते तेव्हा मात्र तिला थेट सांगतो. आपण केलं होतं असं? आणि ते ही शाळेत असतांना? अर्थात, आता आपण एकमेकांजवळ कबूल करायला हरकत नाही - हो! अनेकदा केलं होतं, पण मनात! कारण मुख्य प्रॉब्लेम हा होता, की 'हे' नक्की काय वाटतंय हे तेव्हा आपल्याला कळलंच नव्हतं! ही मनात जपलेली, आणि काळाच्या ओघात पुसट झालेली 'शाळा' घेऊन दिग्दर्शक सुजय डहाके आपल्याला भेटायला आलाय!

मिलिंद बोकीलांच्या प्रसिद्ध "शाळा" या कादंबरीवर आधारित 'मधल्या सुटी'सह दोन तासांचा 'शाळा' हा चित्रपट म्हणजे गतकाळाची सुंदर सफर आहे. चित्रपटाला कथानक असं विशेष नाही. जे कादंबरीत आहे तेच, पण थोडक्यात आणि प्रभावीपणे! शाळकरी वयातलं भावविश्व, मनात फुलणारे वसंत, अधमुर्‍या वयातली हिरवळ... असं सगळं सगळं चित्रपटात खूप सुंदर टिपलंय! मुकुंद जोशी (अंशुमन जोशी) या मुलाभोवती फिरणारा हा चित्रपट! पहिल्या परिच्छेदातला 'तो' म्हणजेच हा मुक्या! मग त्याचे दोस्त, त्या प्रत्येकाचं 'सामान', जणू 'त्या' एका मंजिलसाठी जगायच्या इच्छा - अगदी आपल्याही जिव्हाळ्याचं विश्व! शिरोडकर (केतकी माटेगावकर) ही मुक्याची 'लाईन'!

अंशुमन जोशी आणि केतकी माटेगावकर ही निवड अत्यंत अचूक झाली आहे. त्या दोघांचे सीन्स, त्या वयातील भावना, ती उर्मी, लज्जा, एकंदरीत वागणं - केवळ लाजवाब! सर्वात कौतुक म्हणजे, त्या धडधडत्या भावना संवादातून बाहेर येताना कुठेही थिल्लरपणा, उथळपणा झालेला नाही! अत्यंत संयमित तरीही थेट पोचणारा अभिनय करून घेण्यात दिग्दर्शकाला पैकीच्या पैकी गुण! एक-दोन ठिकाणी केतकी थोडी भूमिका सोडून बाहेर आल्यासारखी वाटते, पण इट्स ओकेच! ती खूप फ्रेश आणि सुंदरही दिसली आहे! इंटर्वलच्या आधी त्याला 'लाईन' क्लिअर असल्याचं सांगताना, 'चेस'स्पर्धेच्या वेळी 'आता जिंकून टाक' हे सुचवताना तिने दिलेले 'सिग्नल' पाहून थेटर 'खल्लास' होतं हे 'त्या' सरलेल्या वयाचे स्मरणे! अंशुमनचा चेहरा पूर्ण चित्रपटभर छान बोलतो. मुळात त्यांचं खरं वय लक्षात घेतलं तर अभिनयातले अगदी बारकावे माफ करावेसे वाटतात. सुर्‍या, चित्र्या, फावड्या - एकदम झक्कास! 'चष्मा लावणार्‍या ढासू मुलांमुळे देशाचं काहीही होत नाही, ते होतं ते या असल्या मुलांमुळेच!' हे सांगणारा नरूमामा (जितेंद्र जोशी) आपल्यालाही हवा होता एवढं वाटतं, ते पुरेच आहे! मुक्याच्या वडिलांच्या भूमिकेत नंदू माधव अगदी मस्त - अगदी समजूतदार बाप! मुख्याध्यापक अप्पा (दिलीप प्रभावळकर), बेंद्रे बाई (देविका दफ्तरदार) ठीक. मांजरेकर सर (संतोष जुवेकर) म्हणजे 'आपले' सर वाटतात. बाकी अमृता खानविलकर का आहे याचं उत्तर बहुधा पहिल्याच प्रसंगात दडलेलं असावं! (तात्पर्य सुरूवात चुकवू नका!)

भाज्यांचे भाव, पात्रांचे वेष, जुनी घड्याळं यातून १९७५ चा काळ छान उभा राहिला आहे. छायाचित्रण, संगीत - ठीकठाक. मुळात चित्रपटाचा प्राण हा त्या वयातलं विश्व असल्यामुळे फोकस तिथेच ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.

बाकी अजून सांगण्यासारखं विशेष काही नाही! तुम्ही कादंबरी आधी वाचून नंतर चित्रपट बघायला जात असाल तर उत्तम आणि न वाचता जात असाल तर अति-उत्तम! पण तुम्ही कुठल्याही प्रकारातले असा, अल्लड वयातल्या नागमोडी आणि बहुधा अव्यक वळणांवर भरलेली ही 'शाळा' एकदा नक्कीच बघण्यासारखी आहे!

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.com/)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल मी परत एक्दा गमभन पाहील..सुर्‍या ,,जोशी,,आणी फावड्या चे डाय्लोग एक नंबर आहेत...मधली गाणि आणि त्यावरच नाचकाम ही मस्त.....
शिरोडकर च लाजुन "आपल्याला नाही जमायच बुवा " हे वाक्य म्हन्जे खल्लास आहे एकदम Happy
चित्रपट अजुन पाहीला नाही... Sad

पुस्तक सहा वर्षांपुर्वीच वाचले आहे. खुप आवडले होते. चित्रपटही बघणार! गमभन काय आहे? नेटवर चित्रपट उपलब्ध आहे का?/ सीडी आहे का? रैना, तू कुठे बघितला?

आजच "शाळा" बघितला. कादंबरी वाचून गेल्यामुळे कादंबरीची व चित्रपटाची तुलना झाली आणि कादंबरीच्या तुलनेत चित्रपट खूपच फिका वाटतो. हा चित्रपट तुटकतुटक वाटतो. प्रसंगात सलगता न वाटता वेगवेगळे तुकडे जोडल्यासारखे वाटतात. त्यामुळे फारशी मजा आली नाही. ही कथा पूर्ण ३ तास लांबीचा चित्रपट व्हावा इतकी दमदार आहे. पण जेमतेम १०० मिनिटांचा चित्रपट केल्यामुळे कथेला फारसा न्याय मिळालेला नाही असे वाटते. केतकी माटेगावकर दिसते छान आणि कामही चांगले केले आहे. जितेंद्र जोशी दिसतो चाळिशीच्या पुढचा व त्यामुळे लग्नाळू वयाचा न वाटता खूप निबर व प्रौढ वाटतो. नंदू माधवांनी टोप न लावता काम केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं. एकंदरीत एक चांगली कथा बरीचशी वाया घालविली आहे.

मला पण खुप उत्सुकता आहे...
आणि आम्ही सगळे शाळेतले सवंगडी मिळुन पहायला जणार आहोत ही शाळा

शेवटी काल 'शाळा' पहायचा योग आला!
प्रचंड आवडला असं नाही म्हणणार पण मजा आली. ज्यांनी पुस्तक वाचलेले नाही त्यांना किती आवडेल याची शंका वाटते. अभिनय, पार्श्वसंगीत, छायाचित्रण, कलादिग्दर्शन या बाजू मात्र अप्रतिम!
मुख्य शाळा सोडली तर बाकी सगळे शूटींग माझ्या लाडक्या पन्हाळ्यातले आहे. त्यामुळे काहीवेळातर मी प्रसंग सोडून लोकेशनच बघत बसलो, अरे ही ती गल्ली, हे तिथून दिसते इ.इ.!!!!!!!!

मस्त झालाय चित्रपट. आता पुस्तक वाचताना पात्रे दिसतील.बेलबॉटम्स बघून मजा वाटली.
मुकुंदाचा मामा त्याला 'मी तुझी मदत करीन' असे म्हणाला Sad

काल शाळा पाहीला स्टार प्रवाह वर...पण नाही अपील झाला...पुस्तकच ग्रेट आहे आनि ज्यांनी गमभन नाटक पाहील असेल त्यांना नाटकातला सुरया जास्त आवडेन

खरच सिनेमा पाहताना नाहि वाटलं इतक पुस्तक वाचताना आपण रमलो होतो.. पुस्तक वाचताना त्या त्या ठिकाणांच वर्णन अक्षरश: आपल्या डोळ्यासमोर येतं इतकं सिनेमा पाहताना नाहि वाटलं.. पुस्तकच मस्त.

काल शाळा पाहीला स्टार प्रवाह वर...पण नाही अपील झाला...पुस्तकच ग्रेट आहे आनि ज्यांनी गमभन नाटक पाहील असेल त्यांना नाटकातला सुरया जास्त आवडेन
>>>>

अनु १०/१०
अगदी अगदी
प्रचंड अनुमोदन
मला नाटक अती आवडलं होतं पण सिनेमा नाही भावला

Pages