हे काय होते ..?

Submitted by मिलन टोपकर on 24 January, 2012 - 11:01

जे स्पर्श आपलंसं
गालांस होत होते,
माझ्याच आसवांचे
अलवार हात होते ...!

मज सोबतीस 'ती' ही
होती हवी म्हणुनी
माझे नी सावलीचे
घरटे उन्हात होते ...!

माझी वरात ज्यांनी
खांद्यावरुन नेली
मारेकर्‍यांत माझ्या
त्यांचेच हात होते ...!

माझ्या मनातले ते
अंधार दाटलेले
वणव्यात आठवांच्या
उजळुन जात होते ...!

गेले उडुन पक्षी
नभ मोकळे, भकास
हे कोणत्या दिशेचे
वारे वहात होते ...?

गुलमोहर: 

मज सोबतीस 'ती' ही
होती हवी म्हणुनी
माझे नी सावलीचे
घरटे उन्हात होते ...!............... व्वा !! क्या बात है...

शेवटच्या कडव्याची डागडुजी केल्यास ही कविता आनंदकंदातली एक चांगली गजल होवू शकते.

गझलेच्या ढंगातली कविता..... छानच आहे.... आवडली.
पहिलं कडवं अधिक आवडलं.
---------------------------------------------------------------------------------
वृत्ताच्या दृष्टिकोनातून काही बदल आवश्यक असावेत असं वाटतं.
"होती हवी म्हणुनी" ...... "होती हवी म्हणूनी"
"उजळुन जात होते" ...... "उजळून जात होते"
"गेले उडुन पक्षी" ...... "गेले उडून पक्षी"

रसभंगाला वाव नसावा म्हणून सांगावसं वाटलं. कृ.गै.न.

त्याचप्रमाणे पहिल्या ओळीत टायपो असावा असं जाणवतं
ती ओळ अशी हवी आहे का ?
"जे स्पर्श आपलेसे"

भिडेसाहेब, गैरसमज, राग कशाबद्दल? जरा गडबडच झाली.
डॉ. कैलासजी, केवळ तेच जमेना (नभ मोकळे आणि भकास असेच हवे होते, म्हणून "कविता" ह्या सदरात टाकली).
बाकी सार्‍या मनमोकळ्या प्रतिसादकांचे आभार.

मज सोबतीस 'ती' ही
होती हवी म्हणुनी
माझे नी सावलीचे
घरटे उन्हात होते >>>>

किती सुरेख ?!!! Happy

आवडली!

डॉक्टरांनी शेवटच्या कडव्याची डागडुजी केल्यावर गझल होईल अशी ग्वाही दिलेली असली तरी पहिल्या कडव्यातील अलामतीवर बलामत येत आहे हे त्यांच्या नजरेतून निसटल्यामुळे रुग्णांचे काय हाल होत असतील याची सूक्ष्म कल्पना आली. मुलीचे लग्न ठरत नसले की तिच्या चाळिशीपर्यंत तिला नवनव्या पोषाखात त्याच त्याच स्थळासमोर सादर केल्यासारखी कविता

जे स्पर्श आपलंसं
गालांस होत होते,
माझ्याच आसवांचे
अलवार हात होते ...!>>>>>>>>सल

मज सोबतीस 'ती' ही
होती हवी म्हणुनी
माझे नी सावलीचे
घरटे उन्हात होते ...!>>>>>>>>>मार्मिक

माझी वरात ज्यांनी
खांद्यावरुन नेली
मारेकर्‍यांत माझ्या
त्यांचेच हात होते ...!>>>>>>>>>व्यावहारिक सत्य

माझ्या मनातले ते
अंधार दाटलेले
वणव्यात आठवांच्या
उजळुन जात होते ...!>>>>>>>>नैराश्य

गेले उडुन पक्षी
नभ मोकळे, भकास
हे कोणत्या दिशेचे
वारे वहात होते ...?>>>>>>>>हताशपणा

गजल प्रकाराकडे झुकणारी उत्तम व अर्थपूर्ण कविता. अगदी मनाला भिडली.

भिडेकाकांच्या प्रतिसादातूनही विद्यार्थी म्हणून शिकायला मिळाले.

गंभीर समीक्षक ....
मुलीचे लग्न ठरत नसले की तिच्या चाळिशीपर्यंत तिला नव्या नव्या पोषाखात त्याच त्याच स्थळासमोर सादर केल्यासारखी कविता >>> जरा जास्त खुलासात्मक लिहिलेले वाचायला आवडेल.

अविनाश, दाद, मनःपूर्वक आभार. अविनाश, प्रत्येक कडव्यावर मार्मिक टिप्पणी आहे. अश्याच प्रतिक्रियेतून आपल्या भावना, आपल्याला जे म्हणायचे आहे ते योग्य तर्‍हेने पोचत आहे, ह्याचे समाधान लाभते. Thanks