गॉडफार्मर

Submitted by pradyumnasantu on 22 January, 2012 - 17:08

गॉडफार्मर

स्वर्गात जाहली चर्चा
आकाश नांगरुन काढा
गाळून थेंब घामाचे
पिकपाणी काहीतरी ओढा

तत्काळ आरंभ करावा
आदेश दिला इंद्राने
हे काम करावे पूर्ण
सूर्यदेव वा चंद्राने

आदेश मिळाल्यावरती
कामास लागला सूर्य
मद्ध्यान्हापर्यंत झाली
नांगरून अख्खी पूर्व

राहिले काम जे अर्धे
त्या झाली संध्याकाळ
हर एक नभाचे ढेकुळ
फोडुनिया केले विरळ

बेण्यावर शिंपून पाणी
भिजण्यास ठेवल्यावरती
सूर्यदेव गेले घरला
घेण्यास जरा विश्रांती

चंद्रदेव इकडुन आले
पाहुनी सूर्य झोपेत
उचलून बियाणे आयते
पेरले मुक्त शेतात

वा-याने जलदां आणले
अन दिधले त्यांनी पाणी
पिक तरारून मग उठले
भरभरुन पिकलि चांदणी

हे सारे होता होता
जशी पहाट ती किणकिणली
चांदण्यांनी भरुनि कणगी
चंद्राने गाडी हाणली

सूर्यदेव उठुनी पाहती
गायब सारे झालेले
मद्ध्यान्हापर्यंत शोधून
ते ’आगबबूले’ झाले

कितीतरी दिवस ते गेले
हे असेच चाले थेट
सूर्याने कष्ट करावे
पिक चंद्र्गृहाला भेट

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आई शप्पत!येवढी भन्नाट कल्पना!मानलं बाबा तुम्हाला प्र......जी.
आवडली म्हणुन लिहिली तर कवितेचा अनादर केल्या सारखा होईल्.आवडती पहिली.

कितीतरी दिवस ते गेले
हे असेच चाले थेट
सूर्याने कष्ट करावे
पिक जाते चंद्र्गृहात>>>पिक चंद्र्गृहाची भेट.(बघा जमतं का.)

काय सुंदर कल्पना आहे.

म्हणूनच कविचा मोठेपणा सांगताना केशवसुत म्हणतात

आम्ही कोण म्हणूनी काय पुसशी?
आमी असू देवाचे लाडके.........

फोले पाखडता तुम्ही सत्व निके आम्ही.

खरच खूप सुंदर्.

झकास..............!

कविता आवडली.
पिक तरारून मग उठले
भरभरुन पिकलि चांदणी >>>> खूप छान.
सर्वच कल्पना वेगळ्या आणि मस्त आहेत.

प्रद्युम्न,
आता कवि म्हणून माझी लेखणी मी खाली ठेवावी म्हणतो. किती किती म्हणून कौतुक करू तुमचे आणि तुम॑च्या कल्पनावैभवाचे! स्काय इज द लिमिट म्हणतात. तुम्ही तर कविता त्याहूनही वर नेलीत.
अप्रतिम कविता.

भन्नाट कल्पना,बिनडोक रावणानंतर चांदण्यांची शेती,फुल 2 धमाल.खुप आवडली कविता.

एम. कर्णिक लाजवू नका. आप तो बडे भाई है. आपला प्रतिसाद वाचून् झालेला आनंद लपवू इच्छीत नाही. आभार.