दिनेशदा पुणे गटग १३ जानेवारी २०१२: श्रेयस हॉटेल

Submitted by मंदार-जोशी on 22 January, 2012 - 07:32

एकीकडे देखण्या बॉसिणीच्या लग्नाचा गम विसरण्यासाठी........आपलं सॉरी.......खुशी मनवत मान खाली घालून काम करत असताना आणि दुसरीकडे अर्थातच इमानेइतबारे मायबोलीवर गप्पागोष्टींवर टीपी करत असताना दक्षिणाचा फ्रायडे द थर्टीन्थला संध्याकाळी साडेआठ वाजता कसलंसं गटग असल्याचा लघुसंदेश आला आणि अस्मादिकांची तंद्री भंग पावली. संदेश नीट वाचताच दिनेशदांना भेटण्यासाठी गटग असल्याचं समजलं आणि आनंद गगनात मावेना. कारण मागच्या वेळी गटगला उपस्थित राहू न शकल्याने दिनेशदांची भेट झाली नव्हती . वेळ आणि दिवस दोन्ही गोष्टी सोयीच्या असल्याने या वेळी हा योग जुळवून आणायचाच असा नियतीनेच चंग बांधला असावा. किश्या आणि चातक, नियती म्हणजे डेस्टिनी बरं का नाहीतर हा नवीन आयडी कोण असं शोधायला पळाल लगेच Wink

आठ वाजता ऑफिस सुटल्यावर पुण्यातल्या एम.एच.१२ आणि एम.एच.१४ बरोबरच हल्ली विपुल संख्येने आढळणार्‍या एम.एच.४३ आणि एम.एच.२६ यांच्याशी हुतुतू खेळत चक्क सव्वाआठला श्रेयस हॉटेल पाशी गाडी आणताच "आत पार्किंग फुल्ल आहे" असा माझ्या असंख्य फु.गें.मधल्या एकाची हवा घालवणारी आरोळी सिक्युरीटीवाल्याकडून ऐकली आणि मग पुढची पंधरा मिनिटं पार्किंग "शोधीसी मानवा, आपटे रोडवरी" या गडबडीत गेली. मग एका सोसायटीचं गेट आणि अशक्य पद्धतीने पार्क केलेली एक स्पार्क यांच्यामधे इंच इंच लढवत गाडी लावली आणि लगेच दक्षिणा "मी श्रेयस जवळ आहे" असा लघुसंदेश पाठवला. दक्षिणा तिच्या खेडेगावातल्या ऑफिस मधून सिंहगड रोडवरील घरी जाऊन मग पुन्हा उलट श्रेयसमधे येण्याच्या दगदगयुक्त भयाण प्रवासात असल्याने तिच्या मनातच्या मनातल्या मनात "मग काय मी नाचू?" असा चिडचिडयुक्त विचार येऊन गेल्याचे अस्मादिकांना टेलिपथीने समजले. म्हणूनच मग दिनेशदांनाही तोच संदेश पाठवला आणि श्रेयसच्या गल्लीत प्रवेश करता झालो. तेवढ्यात एक गाडी तिथल्या पार्किंगमधून निघताना बघून आपल्या कुंडलीत कसलासा नवा ग्रहयोग प्रबळ झाल्याची खात्री पटली.

आत शिरण्याआधी रिसेप्शनमधे काही भद्रजन बसून गप्पा मारताना दिसले. कोण कोण येणार आहे याची यादी दक्षिणाने पाठवलेली असली तरी त्यातलं ओळखीचं असं कुणीही न दिसल्याने मी गोंधळणार इतक्यात दिनेशदांचा शांत चेहरा दिसला आणि जीव भांड्यात पडला. आत्तापर्यंत हा माणूस रेसिपी, इतर लेखन आणि अधुनमधुन होणार्‍या ईमेलमधून जसा भेटला तसाच प्रत्यक्ष निघाला. मृदू स्वभावाच्या दिनेशदांनी लगेच उठून हस्तांदोलन केलं आणि अनोळखी चेहर्‍यांतही हायसं वाटलं. ताबडतोब मनातल्यामनात त्यांना "संत दिनेशदा" असं नाव देऊन टाकलं. सगळ्यांना माझी ओळख करुन दिली. तिथे एक महिला आयडी चॉकलेटं वाटताना दिसल्या. त्यातलं एकही माझ्या वाट्याला न आल्याने त्यांच्याशी माबोवर कधीतरी साग्रसंगीत खडाजंगी झाली असावी असा एक अतिसूक्ष्म पण प्रबळ विचार मनात येऊन गेला आणि तसा तो बोलूनही दाखवला. समोरासमोर बोलताना भरमसाठ स्मायली देण्याची सोय नसल्याने तो विनोद अर्थातच नेहमीप्रमाणे फु.गे. Wink

या गटगच्या संयोजिका दक्षिणा हिची थोडा वेळ वाट बघून मग "आता चला गिळायला" असे हॉटेल व्यवस्थापनाकडून प्रेमळ आमंत्रण येण्याआधीच सगळे डायनिंग हॉल मधे प्रवेश करते झालो. इतक्यात पद्मजा_जो चा ती जेवायला न येता नुसतीच भेटून जाणार असल्याचा फोन आला. मग टा़गारू मनिमाऊनेही आपण आलो तर काही वेळ टपकून जाऊ पण दुसर्‍या पार्टीला जायचे असल्याने बहुतेक नाहीच कळवल्याचं समजलं. मग बेफिकीर यांचा फोन येऊन गेला की ते सुद्धा फक्त टपकूनच जातील आणि तसे ते येऊनही गेले. मघाशी जिच्याशी आपलं वाजलं असावं अशी शंका आली होती ती आरती चक्क समविचारी गटातली निघाल्याने ती शंकाही फिटली. मग तिथे उपस्थित असलेली सई हे शांत भासणारं व्यक्तिमत्व दक्षिणाची थोरली बहीण असल्याची माहिती समजली आणि मी दचकलो. हळूच आजूबाजूला बसलेल्यांकडून दोन तीनदा खात्री करुन घेतली. दक्षिणा आणि सई या सख्ख्या बहिणी आहेत ही माहिती समजल्यावर (की पचवल्यावर??) उद्या कुणी इंदिरा चिटणीस आणि सुलोचना या सख्ख्या बहिणी आहेत असं ठोकून दिलं तरी मी डोळे झाकून विश्वास ठेवेन!! smiley_laughing_01.gif

श्रेयसमधे गटग असल्याचे समजल्यावर नुकत्याच पार पडलेल्या महामहिला.....आपलं सॉरी.........महिला महागुप्त महागटगचा वृत्तांत वाचला असल्याने श्रेयसच्या कर्मचारीवर्गाच्या तत्पर सेवेबद्दल अपेक्षा फारच उंचावलेल्या होत्या. मात्र आशुचँपने मागवलेले ताक शेवटपर्यंत न आल्याने आणि माझे ताक स्वतःचे समजून पिऊन टाकल्याने या महामहिलांवर.....आपलं परत सॉरी.........महिला सदस्यांवर एखादा खटला दाखल करता येईल का असा विचार येऊन गेला. पण त्या गटगला हजर असलेल्या प्रज्ञा१२३ आणि प्रिती १ या इथेही हजर असल्याने तो विचार मनातच ठेवावा लागला. अपरिचित आयडींपैकी गिरीराज म्हणजे गिरीश आणि cool म्हणजेच सुभाष डिके, तसेच परिचित आयडींपैकी स_सा म्हणजे सचिन दिक्षित यांची ओळख झाली. जेवण झाल्यावर शशांक पुरंदरे आणि त्यांच्या पत्नी अंजली पुरंदरे (शांकली) हे भेटले. शेजारीच बसलेला इसम जी.एस. (म्हणजेच गोविंद सोवळे) असल्याचे समजताच ऐन लढाईत चिमाजीअप्पांच्या मदतीला बाजीराव येऊन मिळाल्यावर जसा अप्पांना आनंद झाला असता तसा आनंद जाहला.
Smiley Smiley

जेवण झाल्यावर बाहेर रिसेप्शनमधे पुन्हा गप्पा रंगल्या. तिथेच आणखी एक फोटोसेशन झालं. काही फोटो मी तसेच काही फोटो आशुचँपने काढले. दिनेशदांच्या भेटीने आणि श्रेयसच्या भोजनाने तृप्त झालेले आम्ही सगळे मग हळूहळू बाहेर पडून आपापल्या घराकडे प्रस्थान करते झालो.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
हे गटग आयोजित केल्याबद्दल दक्षिणाचे खास आभार कारण उपस्थित सदस्यांपैकी दिनेशदांसकट बहुसंख्य सदस्यांना पहिल्यांदाच भेटत होतो. तसेच ही पार्टी दिल्याबद्दल दिनेशदांचेही अनेक आभार.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

गटगला उपस्थित असलेले सदस्य:

Dineshada_GTG_13-01-2012.JPG

डावीकडून उजवीकडे
उभे असलेले: जी.एस., cool, स_सा, सई, दिनेशदा, आरती, दक्षिणा, शशांक पुरंदरे, शांकली, मी
बसलेले: गिरीराज, मिसेस गिरीराज, प्रज्ञा१२३, पद्मजा_जो, प्रिती १, (फोटोत नसलेली गिरीराजची चिमुकली)
आणि प्रचि काढणारा आशुचँप.

टीप: मा.जो.फु.गे. या शॉर्टफॉर्मबद्दल अधिक माहिती साठी भेटा किंवा लिहा: मंदार_जोशी Light 1

गुलमोहर: 

गटग वृतांत लिहीण्याचा फारसा अनुभव नसल्याने काही चुका झाल्या असल्यास मोठ्या मनाने आपण सगळे माफ कराल अशी खात्री आहे Happy

वृ तर भन्नाटच !
मज्जा केली कि सगळ्यांनी. दिनेशदांच्या फोटोवरून तू म्हणालास तसं खरंच संत व्यक्तिमत्व वाटतंय ..
{ मेन्यु लिहायचा राहीला [ व्हेज / नॉन व्हेज आणि दिनेशदांच्या कॉमेंटस ( घरी काय काय बांधून नेलं ते ही ) ]}

आधी ठरल्याप्रमाणे मंदार जोशी बील देणार होता, पण हात धुवून येतो म्हणून सांगून जे गेला ते लौकर आलच नाही म्हणून दक्षिणा आणि दिनेशदांनीच बिल दिलं हा भाग वृ मधून गाळला का ?

मंदार, माझ्याकडचेपण फोटो इथेच टाकतेय. चालेल ना?
थंडीमधे एकतर सगळे गारठलेले होते. त्यात गरमागरम जेवण समोर आल्यावर सगळे आडवा हात मारताना
DINESHDA GTG 1.jpgDINESHDA GTG 3.jpg

आशुचँप फोटो काढताना
DINESHDA GTG 2.jpg

प्रिती१, जी-एस आणि दिनेशदा

DINESHDA GTG 4.jpg

जी-एस, दिनेशदा आणि गिरीराज.

DINESHDA GTG 5.jpg

<<दक्षिणा आणि सई या सख्ख्या बहिणी आहेत ही माहिती समजल्यावर (की पचवल्यावर??) उद्या कुणी इंदिरा चिटणीस आणि सुलोचना या सख्ख्या बहिणी आहेत असं ठोकून दिलं तरी मी डोळे झाकून विश्वास ठेवेन!!>> Lol
मंदार मस्त लिहील आहेस रे. फोटो पण झकास Happy

दक्षिणा आणि सई या सख्ख्या बहिणी आहेत ही माहिती समजल्यावर (की पचवल्यावर??) उद्या कुणी इंदिरा चिटणीस आणि सुलोचना या सख्ख्या बहिणी आहेत असं ठोकून दिलं तरी मी डोळे झाकून विश्वास ठेवेन!! >>> Rofl

मस्त... श्रेयस मध्ये आता मायबोली गटग साठी एक टेबल कायम स्वरुपू नोंदवून ठेवायला हरकत नाही... Wink

दिनेशदा खरच एकदम संत व्यक्तिमत्व वाटतात... म्हणजे आहेत असेच म्हणायचे आहे मला.. Happy जीप्स्याच्या फोटो एक्झिबिशनला भेटलो पण निसर्ग गटग हुकवले कालचे... Sad

छान.

आमच्या पुण्यात कसं साग्रसंगीत जेवायला वाढतात न? उगाच आपलं बफे वगैरे नाही की बोलत असताना उठा आपली डिश भरून घ्या . Happy

प्रज्ञा, अगं कुणाला पसंत पडेल नाही पडेल म्हणून इतर फोटो वापरले नाहीत. एक ग्रूप फोटो टाकला.

प्रिती, आयडीत बदल केला आहे.

मंदार,
खुसखुशीत लिहिलंस.

------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर : एक विनंती. आयडी शब्द न वापरता माबो सभासद/मेंबर असा शब्द वापरल्यास बरं वाटेल. आयडी सारख्या(व्हर्च्युअल वर्ल्ड टाइप) संकल्पना आता जुन्या झाल्यात असं माझं वै.मत.

लिंबूभौ,

आठवण नक्कीच निघालेली असणार, कारण अनेकांना ठसके, उचक्या लागत होत्या हे मी या डोळ्यांनी पाहिले Proud

मंदार - वृत्तांत छान लिहिलाय! उल्हासरावांशीही सहमत! (कदाचित सदस्य हाही एक शब्द आहे म्हणा) !

मला दिनेशरावांना ओझरते भेटूनही आनंद झाला, तुम्हा सर्वांना अर्थातच अधिक आनंद झालेला असणार. Happy

-'बेफिकीर'!

मी मिसले हे गटग......
मजा आली वृत्तांत वाचुन, धन्स मंदार. दिनेशदा, आपली भेट तुमच्या पुढच्या भेटीत Happy

sahi

उल्हासरावांशीही सहमत! (कदाचित सदस्य हाही एक शब्द आहे म्हणा) ! >>>>
पण बेफिकीरजी मला तरी आयडी हा शब्द वाचला की Cyborg चा फील येतो.
सदस्य, सभासद, मेंबर शब्दात तसा फील येत नाही.

मस्त वृत्तांत. मला ही द्क्षीणाने समस पाठवला होता पण मी येऊ शकलो नाही.

>>>> मला ही द्क्षीणाने समस पाठवला होता पण मी येऊ शकलो नाही.
मला ही द्क्षीणाने समस पाठवला (न)व्हता पण मी येऊ शकलो नाही. Wink

अरे गटग वृत्तांत कमी आणि स्व-वृत्तांत जास्त वाटतोय. Lol

दक्षिणा आणि सई या सख्ख्या बहिणी आहेत ही माहिती समजल्यावर (की पचवल्यावर??) उद्या कुणी इंदिरा चिटणीस आणि सुलोचना या सख्ख्या बहिणी आहेत असं ठोकून दिलं तरी मी डोळे झाकून विश्वास ठेवेन!! >> Rofl

बाकी वृतांत छान ... Happy

Pages