झलक शीर्षकगीताची (उल्हास भिडे)

Submitted by UlhasBhide on 17 January, 2012 - 01:22

जगभरात विखुरलेल्या अनेक मायबोलीकरांच्या सहभागाने ’मायबोली शीर्षकगीत’ संगीतबद्ध करणं हा उपक्रम
म्हणजे एक फार मोठं आव्हान. पण आपले ज्येष्ठ मायबोलीकर श्री. योगेश जोशी यांनी (योग) घेतलेली अपार मेहनत, त्यांना गायक मायबोलीकरांनी तितक्याच तळमळीने दिलेलं सहकार्य, आणि मायबोलीच्या संस्थापकांनी यात जातीने लक्ष घालून संबंधितांशी संपर्क साधून दिलेला सल्ला, सूचना, मार्गदर्शन तसंच ऍडमिन, व्यवस्थापन समिती आणि या विषयातील तज्ञ मायबोलीकर यांचा सक्रीय सहभाग या सार्‍यामुळे हे काम सुकर झालं आणि अतीशय योजनाबद्ध रीतीने पार पडलं.

योगेश जोशी(योग) :
सिनिअर माबोकर म्हणून कुठेही आढ्यतेचा लवलेश नाही. संगीत क्षेत्रातलं आणि तत्संबंधी तंत्रज्ञानातलं उत्तम ज्ञान आणि अनुभव असूनही बढाया मारण्याची वृत्ती नाही. अगदी down to earth माणूस. गायक माबोकरांच्या चुका/त्रुटी स्पष्टपणे पण मार्दवपूर्ण शब्दात सांगण्याची, समजवण्याची धाटणी. प्रत्येकाकडून जास्तीत जास्त चांगलं करवून घेण्याचं कसब. वेळ आणि वेग यांचं संतुलन राखत अतिशय शांत चित्ताने, हसतमुख राहून स्वत:च्या घरातलं कार्य असल्यासारखा हा माणूस झटला. “योग यांना बघून तर झपाटलेपण काय असतं याची प्रचिती आली” असं अनिताताईंनी म्हटलंय ते तंतोतंत खरं आहे.
स्वत: झटून, सर्वांचं सहकार्य मिळवून हे सर्व घडवून आणलं याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. अशा टीम-लीडरबरोबर काम करणं हा खूप आनंददायक अनुभव असतो. हा आनंद सर्व संबंधित माबोकारांनी अनुभवला असेलच.

माबोकर गायक, गायिका :
यांचं योगदान तर खूपच महत्वाचं. दिलेल्या सूचनांनुसार त्यांनी गीताची नियमित तालीम केल्यामुळे प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या वेळी त्यामानाने कमी रिटेक्स घ्यावे लागले. काही प्रसंगी गीतातील काही विशिष्ट जागा घेताना जरी ३-३/४-४ रिटेक्स झाले तरी सांगितलेले बदल अंमलात आणून, न कंटाळता सर्वांनी योगेशना संपूर्ण सहकार्य दिलं. खरं तर यातल्या प्रत्येक गायकाला ही गोष्ट माहित आहे की, जरी संपूर्ण गीत त्याच्या / तिच्याकडून गाउन घेतलेलं असलं तरी प्रत्येकाने गायलेल्या एखाद-दुसर्‍या निवडक ओळीचा अंतर्भाव गीतात केला जाणार आहे. “एकाच काय, अर्ध्या ओळीचा अंतर्भाव जरी झाला/न झाला तरी आपण सर्व मिळून काहीतरी चांगलं घडवतोय, हेच मोठं समाधान आहे” अशा स्वरूपाचे उद्गार त्यांच्याकडून ऐकल्यावर मन भरून आलं, फार पूर्वी ऐकलेल्या एका गीताच्या ओळी आठवल्या -----
"असू आम्ही सुखाने पत्थर पायातील
मंदिर उभविणे हेच आमुचे शील"

एक सुंदर कलाकृती निर्माण करायची हे सर्वांचं ध्येय. ध्येय ही एक प्रकारची नशा (अर्थातच उदात्त अर्थाने) असते. आणि ध्येयपथावर स्वत:ला झोकून देऊन निरंतर मार्गक्रमण करणं हीदेखील तितकीच नशा, ’मधुशाला’ मधे हरिवंशरायजी बच्चन यांनी म्हटल्याप्रमाणे :
“मदिरा पीने की अभिलाषा ही बन जाए जब हाला
अधरों की आतुरता में ही जब आभासित हो प्याला”
गेले काही महिने सगळेच या उदात्त नशेने, ध्येयाने झपाटलेले होते.

पण या सगळ्यात माझा प्रत्यक्ष सहभाग अगदीच नगण्य. कारण ना मी गाऊ शकत, ना गीताबरोबर प्रकाशित होणार्‍या व्हिज्युअल इफेक्ट्स बाबत स्वत: काही ठोस करू शकत. त्यामुळे moral support इतकीच काय ती माझी मदत.
असो .....

कला, तंत्रज्ञान आणि मायबोलीकरांनी ’आपल्या मायबोलीचा उपक्रम’ यशस्वी करण्यासाठी आत्मीयतेने घेतलेली मेहनत; अशा त्रिवेणी संगमातून एक सृजनसोहळा सांघिकरीत्या घडतोय, शीर्षक गीतातल्या या ओळी :
मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते विश्वात 'मायबोली'

प्रत्यक्ष साकार होताना दिसतायत आणि मीही या सृजनसोहळ्यातला एक छोटासा अंश आहे हे माझं परमभाग्य.

.... उल्हास भिडे

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:

झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच समाधान होत नाहीये पुन्हा पुन्हा ऐकूनही! सुरूवातीचा आलाप ऐकून अंगावर रोमांच आले. नंतरचे ऐकताना, बघताना भारावून जायला झाले. Happy खूप खूप सुंदर झालंय हे.
भिडे, योग आणि सारे गायक-तंत्रज्ञ, फँटॅस्टिक जॉब! हार्दिक अभिनंदन. Happy

गितातील 'तोड' जमला नाहीय....... आणखी परीणाम कारक हवा.....

'मराठी', 'मराठमोळी' 'खनक' हवी.

सुरुवात छान झालीय....तोड निरस, अपरीपक्व, अगदीच निरउत्साही.

(मायबोलीला शिर्षकगीत असावं असं सहजच वाटलं म्हणुन निर्मिती केली असेल तर 'गीत'/झलक छानच आहे. )

धन्यवाद!!!

खुपच सुरेख....आल्हाददायक व श्रवणीय आहे..सुरवातीचा आलाप मस्त आहे..पुढील कडव्यांची प्रतिक्षा आहे.

धन्यवाद मायबोली व मायबोलीकर!

भारत, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, ईंग्लंड, अमेरिका या देशातील सर्व मिळून २१ मायबोलीकर (कुटूंबीय्)गायकांनी गायलेल्या या गाण्यातील प्रत्त्येक सहभागी गायकाचे अनुभव दर दिवशी दोन या प्रमाणे पोस्ट केले जाणार आहेत. वय वर्षे पावणे चार ते पन्नाशी ओलांडलेले अशा सर्व मायबोलीकर गायकांच्या अपार मेहेनत, सुरेल आवाज, आणि मायबोलीवरील प्रेम, यांनी सजलेल्या या गीतातील सर्वांचे अनुभव त्या त्या वैयक्तीक धाग्यावर आवर्जून वाचावेत अशी मी विनंती करतो. ते अनुभव ईथे लिहून त्यांच्या अनुभवात सर्व वाचकांना वाटेकरी केल्याबद्दल त्यांचे खरे तर आभारच मानायला हवेत.

संपूर्ण गाणे प्रकाशित होईल तेव्हा गीतातील कुणी कुठली ओळ गायली (खालील नमूद प्रत्येक गायकाने गीतातील वेग वेगळ्या ओळी गायल्या आहेत) हे त्या बरोबर नमूद केले जाईलच. वर ऊल्हासजींनी म्हटले तसे हे गीत कुणा एकट्या दुकट्याचे नसून समस्त मायबोली परिवाराचे आहे. तरी व्यावहारीक अर्थाने तूर्तास वर प्रकाशित झलक मधिल गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

रारः वरील झलक गीताची ऊत्कृष्ट दृक्श्राव्य क्लिप बनवणार्‍या तुझ्या टिम ची नावे देखिल ईथे नमूद करावीस अशी विनंती.

सुंदर, सुंदर, सुंदर! काका, गीताचे शब्द आणि संगीत यांची सुरेख गट्टी जमली आहे. मस्त वाटलं. झलकच इतकी सुंदर आहे, तर गाणं कसं असेल. कधी ऐकायला मिळतंय पूर्ण गीत असं झालंय. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन!

गीत, संगीत, स्वर सगळंच अप्रतिम आहे, दर्जेदार झालंय. ( भुंगा गायक आहे ? छुपा रुस्तम )
देव काका पण होते ना ? आवाज ओळखलाच. शेवटच्या फोटोत उल्हासकाका होते का ते ?

सर्वांचं अभिनंदन !

आणि मामी म्हणतात तसं अ‍ॅनिमेशन ज्यांनी केलय त्या टीमचं अभिनंदन.. उत्तम झालंय काम.

सुरेख्,इतकं गोड वाटतंय ना कानाला... झलक ऐकून पुढच्या गाण्याबद्दल उत्सुकता शिगेला पोचलीये!!!

अ‍ॅनिमेशन टीम ची कल्पकता अप्रतिम!!!

सुरेख!

कल्पना, प्रेझेंटेशन, गायन सर्वच मस्त. मायबोलीची प्रत्येक नवी कलाकृती पाहिली की वाटतं आता ह्याच्यापुढे काय असू शकणार पण मायबोलीकर एका मागून एक सुखद धक्के देतच असतात.

मायबोलीचा आणि मायबोलीकरांचा अभिमानच वाटत आणि वाढत जातो.

आत्ता घरून ऐकली/पाहिली.
आवडली... अभिनंदन!
Happy

Pages