भक्ती.......

Submitted by निशदे on 16 January, 2012 - 23:00

उधळीत गुलाल, बडवीत मृदुंग,
सोहळा भक्तीचा, सुंदर सजतो ||
नाव घेती कोणी, कोणी धुंद होता
कल्लोळ भक्तीचा, दूर पसरतो ||

दूर पहा तिथे, बैसे कोणीतरी
हातातील नाणी, उगीच मोजतो ||
पोटाचेच जिथे, रोजचे सायास
कैसा भक्तीभाव, तयाला सुचतो ||

उडवती नाणी, ओवाळिती नोटा
सारे त्या भगवंता, लाच दाखविती ||
येई कोणी शेट, मागाहून पुढे
देवाहून जास्ती, सलाम ठोकिती ||

हा परी इथे, खातो शिळेपाके,
देवाच्या वाटी, साधा नमस्कार ||
भक्ती मनी दाटे, परी भूक लागे,
पोटापुढे नसतो, मनाचा विचार ||

कोणी मागी देवा, धनधान्य पुत्र
कोणी आरोग्य, आयुही मागिती ||
सारी असली जरी, देवाचीच पोरं,
एक दुजियाचा, नाशही मागिती ||

देव येई निघुनी, याच्यापुढे उभा,
"मला लेका तुझा, नमस्कार भारी ||
येती लाखो माझ्या, सामोरी आडवे
भक्तीपरी मात्र, पैशाची मुजोरी ||

बदलती देव, कपड्यासारखा
भावापेक्षा यांची, धनाची सलामी ||
पैशाच्या तोडीचा, हवा आशीर्वाद
देवालाही लावी, कराया गुलामी ||

पुंडलिक तूच, दामाजीही तूच
पैशाची श्रीमंती, नाही मला प्यारी ||
जोडी दोन हात, घेई माझे नाम
तृप्ती माझ्या मनी, तयाचीच सारी" ||

देव जाई निघुनी, मंदिरी कल्लोळ
सारेची निष्फळ, प्रयत्न यांचे ||
दोषारोप चालू, पोलीसा सांगिती,
पूरची लोटिती, हरेक उपायांचे ||

अखेरीस कोणी, आणिती पाषाण
शेंदूर फासून, "देव" सारी म्हणे ||
पुनश्च चालू, दगडाचा जयघोष,
देव परी दूर, पाहतो विषण्णे ||

गुलमोहर: 

Pages