अख्खा मसुर (फोटोसहित)

Submitted by मी_चिऊ on 13 January, 2012 - 06:42
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मसुर - एक ते दिड वाटी (साधारण २०० ग्रॅम)
कांदे - २ मध्यम आकाराचे
टोमॅटो - २
लसुण - १० / १२ पाकळ्या
गरम मसाला - १ चमचा (टेबल्स्पुन)
लाल तिखट - १ चमचा (टेबल्स्पुन)
कश्मिरी लाल तिखट - १/२ चमचा (जास्त झाले तरी चवीत फारसा फरक पडत नाही कारण हे फार तिखट नसतेच)
मीठ - चवीप्रमाणे
जीरे - फोडणीसाठी
तेल
कोथींबीर

क्रमवार पाककृती: 

Akha Masur.JPG

मसुर ३ ते ४ तास साधारण कोमट पाण्यात भिजत ठेवावी. (यामुळे शिजण्याचा वेळ वाचतो.)
कांदा, टोमॅटो, बारीक चिरुन घ्या.
लसुन ठेचुन घ्या.
कढईत तेल तापवुन त्यात जीरे, लसुन आणि कांदा घाला.
कांदा शिजेपर्यंत मध्यम आचेवर परतुन घ्या.
मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला.
टोमॅटो शिजत आला की मसुर घाला व नीट परतुन घ्या.
नंतर लाल तिखट, कश्मिरी तिखट, गरम मसाला, मीठ आणि बारीक चिरलेली कोथींबीर घाला.
तीन वाटी पाणी (मसुरच्या दुप्पट) घालुन मसुर शिजायला ठेवुन द्या.
मसुर शिजल्यावर सर्विंग बाउल (की बोल Happy ) मधे काढुन कोथींबीर (आणि असल्यास क्रीम) ने सजवा.

Akha Masur 1.JPG

वाढणी/प्रमाण: 
चार ते पाच जणांसाठी
अधिक टिपा: 

आवडत असल्यास यात मसुर शिजवताना १ चमचा दही पण घालु शकतो, पण टोमॅटोचा आंबटपणा असल्याने जास्त दही नको.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गरम गरम राईस आणि ही मसुराची उसळ छान लागते. आमच्याकडे नेहमी करतात. फक्त यामधे अमसुल घालतात एवढाच फरक.

स्नेहा, तु स्लो कूकर मध्ये कशी करतेस ते लिहशिल का प्लीज? मी आत्ताच घेतलाय पण अजून वापरून बघितला नाहि.

काही नाही,नेहमीच्या पद्धतीने गॅसवर फोडणी करून, कांदे टोमॅटो,मसाले वगैरे नेहमी घालतो तसे घालून भिजलेले मसूर थोडे परतून घेते, थोडे पाणी घालून मग स्लो कूकर मधे टाकते आणि शिजू देते.असेच भिजवलेले छोले,राजमा,चवळी वगैरे सगळेच होतात. चिकन. मटन पण ह्या पद्धतीने करता येईल. शिवाय सूप पण मस्त होते.

दोन फोटोंत इतका फरक कशामुळे?>> दोन वेगवेगळ्या कॅमेर्‍यांमधुन काढल्यामुळे... दुसरा फोटो मोबाईल च्या कॅमेर्‍यातुन काढलाय.

ही भाजी/उसळ गरम तांदळाच्या भाकरी सोबतही अप्रतिम लागते. >>>>
ही उसळ कधी खाल्लेली नाही. पण तांदळाची भाकरी मला फार आवडते.
रेसिपी 'सेव्ह' केली आहे. बघुया कधी खायचा योग येतो ते .... Happy

कोल्हापूरहून येताना रस्त्यात नेहमी पाट्या दिसतात अख्खा मसुर, तेव्हापासुन उत्सुकता होती या रेसीपी बद्दल, छान दिसतेय उद्याच करते .

ओह, ही कोल्हापुरची फेमस रेसिपी आहे का? तरीच ! कारण मी एकदा टिफीनमधे नेली होती ही उसळ, तेव्हा एका बॅचलर कलिगने सांगितलं कि सातार रोडला City Prideच्या आजुबाजु/समोर कुठेतरी एक होटल आहे ( जगात भारी कोल्हापुरी Happy ) तिथे फक्त ही उसळ आणि भाकरी एवढाच मेन्यु आहे. तरीही तिथे बरेच लोक येतात. ही उसळ छान टेस्ट करते, पण ती एवढी फेमस असेल कि एक होटल फक्त या मेन्युवर चालतं हे ऐकुन आश्चर्य वाटलं होतं मला.
हे विसरलेच होते इतके दिवस, साक्षीची पोस्ट बघितल्यावर आठवलं.

मी पण अशीच करते, मसुर वाफवून घेऊन मग फोडणी देते....ही उसळ साध्या भाताबरोबर खुप छान लागते.

मसुराची आमटी, भात आणि तळलेले बोंबिल्/सुरण एकदम झक्कास बेत! Happy

धन्यु सगळे.. Happy

हो ही तीच कोल्हापुरकडची सुप्रसिद्ध Wink अख्खा मसुर.
भाता बरोबरही छान लागते.

थोडी तिखट असल्याने भाकरी सोबत खाताना हॉटेलवाले दही आणि पापडपण देतात सोबत. एकदम झकास लागते..

अग प्रिति, खात असाल तर थोडा लसुणही घालुन पहा फोडणीत, चान चव येते. Happy

रेसिपी 'सेव्ह' केली आहे. बघुया कधी खायचा योग येतो ते ..>> नक्की बघा, आवडेल तुम्हाला.

पण ती एवढी फेमस असेल कि एक होटल फक्त या मेन्युवर चालतं हे ऐकुन आश्चर्य वाटलं होतं मला.>> अग माउ १ नव्हे अशी खुप हॉटेल आहेत जी फक्त या मेनु वर चालतात. Happy बघ ट्राय करुन.

मसुराची आमटी, भात आणि तळलेले बोंबिल्/सुरण एकदम झक्कास बेत!>>हो का, आता असही करुन बघेन Happy

.

तोपासु रेसिपी Happy
मसुराची आमटी, भात आणि तळलेले बोंबिल्सु एकदम झक्कास बेत! >>>>> आम्ही मात्र तूप आणि आमटी भात यावरच समाधान मानतो बाकी घरातले हाणतात बोंबील वगैरे

ही साधारणपणे नेहमीच केल्या जाणार्‍या मसुराच्या उसळीसारखीच वाटते आहे. आज कोल्हापूरहून पुण्याला जा ये करताना जिकडे तिकडे आख्खा मसूर व भाकरी ह्याच्या पाट्या होत्या. ह्यात नेहमीच्या उसळीपेक्षा वेगळेपण काय आहे? म्हणजे अचानक हा मेनु असा एवढा हिट्ट का बरे झाला असावा हेच कळले नाहीये??

ही पहा सी के पी पद्धत
१ वाटी मसूर ५-६ तास भिजवा, त्यात १ कान्दा बारीक चिरून, १ चमचा तिखट आणि हळद घालून कूकरला ३-४ शिट्ट्या करा. वाफ निघाली की गॅसवर मन्द आचेवर उकळवा. त्यात मिठ आणि आमसूल घाला. २ चमचे सुके खोबरे भाजून मिक्सरमधुन काढून घाला आणि ५ मिनीटे उकळवा. आमटी तयार

केदार, प्रज्ञा धन्स.

सुमेधाव्ही, अग यात ग्रेवी थोडी थीक आणि मसालेदार असते आणि टोमॅटो/ दही यामुळे थोडा आंबटपणा असतो. तसच ही थोडी तिखट सुध्धा असते.
आपल्या नॉर्मल उसळ पेक्षा ही चवीला बरीच वेगळी असते. ट्राय करुन बघच. Happy

deepac73, आमटीची पद्धत आमच्याकडेही अशीच असते. Happy

आ हाहा !!

मझे लहानपण आठवले. ही आमाटी म्हणजे आमच्या काकांच्या घरी एकत्र कुटुंबात होणारा एकमेव झण्झणीत पदार्थ!! बाकी आमचे सगळे जेवण टीपिकल ब्राम्हणी, आमसुल्+गुळ. ही आमटी असली की सकाळ पासुन बेत व्हायचे. आम्ही का कोण जाणे ह्या आमटीला "गाडीवरची आमटी" हे नाव दिले होते. कदाचित आमच्या इतर जेवणाच्या मानाने ही तिखट करत म्हणुनही असेल. ह्या आमटी बरोबर कंपल्सरी लुसलुशीत पाव आणि घरचं ताज लोणी हवचं!!!

मस्त वाडगाभरुन आमटी, त्यावर ताज लोणी आणि ताजा लुसलुशीत पाव. तोंपासु......
माझ्या लहानपणीच्या अनेक मजेच्या संध्याकाळींची आठवण करुन दिलीत्....धन्यवाद.

आताही मी लग्न झाल्यास ही आमटी केली न्हवती. कारण सासरचे अगदीच गुळमट जेवतात. पण मुलगी आणि नवरा अनुकुल आहे पाहुन हळु हळु त्यांची टेस्ट डेव्हलप केली. आता हा बेत असला की एरवी तिखट पदार्थ बघुन पळुन जाणारी मुलगी, स्वतः ताट वाट्या घेवुन जय्यत तयारित टेबलावर बसलेली असते.

Pages