माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा –भाग ७ (तकलाकोट मुक्काम ते लीपुलेख खिंड)

Submitted by अनया on 12 January, 2012 - 11:48

माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा –भाग ७
(तकलाकोट मुक्काम ते लीपुलेख खिंड)

२०११ सालच्या जून-जुलै महिन्यात कैलास-मानसची पवित्र यात्रा करण्याचा योग आला. त्या नितांतसुंदर अनुभवाचे मी माझ्या तोकड्या भाषेत केलेले हे वर्णन.

ह्या आधीचे भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा!

भाग १ : पूर्वतयारी: http://www.maayboli.com/node/30416
भाग २ : दिल्ली ते नारायण आश्रम: http://www.maayboli.com/node/30637
भाग ३: नारायण आश्रम ते लीपुलेख खिंड: http://www.maayboli.com/node/30799
भाग ४: मुक्काम तिबेट : http://www.maayboli.com/node/31261
भाग ५: महाकैलासची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31407
भाग ६: मानस सरोवराची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31704

दिनांक ३० जून २०११ (तकलाकोट मुक्काम)

गेल्या कितीतरी दिवसांपासून चीन हद्दीपर्यंत पोचणे आणि नीटपणे दोन्ही परिक्रमा पार पडणे, ह्याचा (कोणाजवळ कबुल केल नाही तरी) ताण होताच. यात्रेला येण्याच नक्की ठरवल, तेव्हापासून जो तो बाकी कोणा-कोणाला आलेल्या अडचणींचा पाढा वाचायचा. व्यवस्थापन, निसर्ग आणि प्रकृती हे तीन प्रमुख खलनायक असायचे! दिल्लीपासून ते गुंजीपर्यंतच्या माहिती आणि सूचना सत्रांनी ही काळजी व्यवस्थित वाढवली होती.

आमचा तकलाकोटचा कॅम्प

7-t-9.jpg

आता हा सगळा ताणाचा भाग पार पडला होता. आता कॅम्पवर उन्हाळ्याच्या सुट्टीच वातावरण होत. सगळ्यांच्या ओळखी होऊन तीन आठवडे झाले होते. एकाच वेळी घाबरवणारे आणि कल्पनातीत रौद्रसुंदर असलेल्या अनुभवांनी सगळे यात्री जोडले गेले होते.

आमच्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे तीन तारखेला लीपुलेख पार करून, आल्या मार्गाने परतून नऊ तारखेला दिल्लीत पोचायचं होत. सगळ्यांच्या बोलण्यात आता ‘कोण कसा जाणार, कोणाच कधीच रिझर्वेशन आहे,’ हे विषय येत होते. घर सोडून इतके दिवस झाल्याच आता चांगलच जाणवत होत. परतीच्या प्रवासात एखादा दिवस कमी करता येईल का? अशी चर्चांच्या फेऱ्या नारंग सरांबरोबर चालू होत्या.

आमच्या नारंग सरांनी का कोणास ठाऊक, त्यांच्या पत्नीला ते एक तारखेला दिल्लीत पोचणार आहेत, अस सांगितल होत!! ते सगळ्यांना सांगायचे, ’कोई बात नही| मै फोनपे बोल देनेवाला हुं, की वेदर खराब हो गया, इसलिये अटक गये!!’ ते म्हणजे धन्यच होते.

आज आम्हाला तकलाकोटच्या जवळच जनरल जोरावरसिंग ह्यांची समाधी आहे, ती बघायला जायच होत. त्यांच्या पराक्रमाबद्दल बहुतेक कोणालाच धड माहिती नव्हती. कोणी ते १९६२ च्या युद्धात हुतात्मा झाले अस सांगत होते. पण शेवटी आमच्यातल्याच एकाने ते गैरसमज दूर केला.
जोरावरसिंग हे काश्मीरचे राजे गुलाब सिंग ह्यांचे सेनापती होते. जनरल जोरावरसिंग म्हणजे पराक्रमाचा धगधगता अंगार होता. त्यांनी आपल्या अचाट पराक्रमाने लडाख, बाल्टीस्थान, गिलगिट हे प्रदेश पादाक्रांत केले होते. तिबेटचा कैलास-मानस सरोवराचा हा प्रदेशही त्यांनी आपल्या भीमपराक्रमाने काश्मीरला जोडला होता. काश्मीरच्या राजानेदेखील त्यांना ‘जनरल’ ही पदवी देऊन आपल्या सेनापतीचा मान ठेवला होता.

जोरावरसिंग ह्यांची समाधी

7-j-1.jpg

त्या वेळी तिबेटच्या राजाने इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले होते. अर्थातच इंग्रजांनी त्यांचे बळ तिबेटी राजाच्या मागे उभे केले. धूर्त असे डाव टाकत, प्रचंड हिमवर्षाव होत असताना इंग्रजांनी जोरावरसिंग ह्यांच्या सैन्यावर हल्ला केला. त्या अनोळखी प्रदेशात निसर्गाने उलटे दान टाकले असताना देखील काश्मिरी सैन्याने आपल्या उमद्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे प्रयत्नांची शिकस्त केली. भाऊबंदकीचा शाप तर भारताला आहेच. तिबेटी आणि इंग्रजी सैन्याच्या कैचीत सापडलेल्या, थंडीने बेजार सैन्यासह लढणाऱ्या ह्या शूरवीराला शेवटी इंग्रजांनी सैन्यात फूट पाडून कपटाने १८४१ च्या लढाईत ठार मारले.
तिबेटी जनतेने आपल्या शत्रूच्या ह्या सेनापतीच्या पराक्रमाची कदर केली. तकलाकोटपासून ८-१० किलोमीटरवर जनरल जोरावरसिंग ह्यांची त्यांच्या इतमामाप्रमाणे भव्य समाधी बांधली. आज त्याचे फक्त भग्नावशेष शिल्लक आहेत. आम्ही तिथे थांबलो. सगळ्यांनी मनापासून जनरल जोरावरसिंग ह्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आपले राष्ट्रगीत आणि ‘ए मेरे वतन के लोगो’ म्हटले.

शूरा मी वंदिले

7-j-2.jpg

यात्रेला जाण्याआधी मी श्री.मोहन बने ह्यांचे ‘अपूर्ण परिक्रमा’ हे पुस्तक वाचले होते. त्यांनी ही यात्रा १९९८ मध्ये केली होती. त्यानंतर १३ वर्षांमध्ये सर्वच बाबतीत बराच फरक पडलेला जाणवत होता. त्यांनी केलेल्या तिबेटमधील रस्तांच्या, कॅम्पच्या अवस्थेत फारच चांगला बदल झाला होता. त्यांच्या बसच्या चालकाने त्यांना ही समाधी ‘कार्यक्रमात नाही’ ह्या कारणामुळे बघू दिली नव्हती. आता मात्र आम्ही तिथे ‘जन गण मन’ गाऊ शकत होतो.

हा बदल कसा झाला कोण जाणे? सगळे जग आता वैश्विक खेडे झाले म्हणून, की भारताचे आणि चीनचे संबंध सुधारले म्हणून? पण आमच्या बरोबरचे तिबेटी गाईडसुद्धा आमच्याशी मोकळेपणाने वागत होते.

समाधीला भेट देऊन आम्ही परत आलो. जेवलो. लगेच सगळेच्या सगळे यात्री खरेदीच्या दिशेने जवळजवळ पळतच सुटले!! तस बघितल, तर तकलाकोट हे सीमेवर असलेल एक लहान गाव आहे. ते काही शॉपिंग सेंटरने भरलेलं शांघाय किंवा बिजींग नाही. पण ‘जातीच्या खरेदीप्रेमींना काहीही सुंदर’ दिसत असाव!

चीनी दागिने

7-t-3.jpg7-t-4.jpg

मुलांचे, मोठ्यांचे कपडे, दागिने, तिबेटी पद्धतीच्या शोभेच्या वस्तू, मोबाईल हँडसेट, चामड्याची जाकिटे इतकच काय पण ब्लँकेट्सची सुद्धा खरेदी लोकांनी केली!

अगदी खर सांगायच तर ह्यातल्या बऱ्याचश्या चीनी किंवा नेपाळी बनावटीच्या वस्तू काही आंतरराष्ट्रीय पातळीच्या दर्जाच्या नव्हता. त्याच तोडीच्या वस्तू दिल्लीतही उपलब्ध असतात. पण ‘इतक लांब आलोय, काहीतरी न्यायला पाहिजे’, अश्या विचाराने की काय पण यात्रींनी अगदी चढाओढ लावून, हिरीरीने जाकिटे व ब्लँकेट्सची खरेदी केली.

मी पु.ल.देशपांडेंच्या शिकवणीप्रमाणे, ‘रानडे रोड, मुंबई आणि लक्ष्मी रोड, पुणे, इथे मिळत नाही अशी वस्तू नाहीये’ ह्या बाण्याने काहीच घेतल नाही. तसही सामान नको इतक होतच, अजून वाढवण्याची हिम्मत नव्हती!

दिनांक १ जुलै २०११ (तकलाकोट मुक्काम)

ज्या अमावस्येच्या आंघोळीवरून मानससरोवरच्या काठावर वादावादी झाली होती, ती अमावस्या आज होती. बॅचमधले ८-१० लोक जीपने मानसच्या स्नानासाठी जाणार होते. ते आल्यावर दुपारी तिबेटमधील सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या खोजरनाथ मंदिराच्या दर्शनाला जायचे होते.
आज आमचा नेपाळी स्वैपाकी बहुधा चांगल्या मूडमध्ये असावा. त्याने आज नाश्त्याला ‘आलू पराठे’ करायचा घाट घातला होता. बऱ्याच दिवसांनी काहीतरी छान चविष्ट खायला मिळणार, म्हणून सगळे घाईघाईने पोचले. पण, त्याचा पराठे बनवायचा वेग आणि ५० यात्रींचा खाण्याचा वेग ह्यात फारच फरक पडायला लागला. इतके दिवस चालून, चढून-उतरून सगळ्यांच्या भूकांमध्ये चांगलीच वाढ झाली होती. त्या बनवणार्यानची बिचाऱ्याची तिरपीट होऊ लागली.

आम्ही दोन-दोन पराठे खाऊन उठलो. पण सगळे थोडीच हार मानणार होते. त्या जेवणाच्या हॉलमध्ये पराठ्यांवरून युद्ध सुरू झाल. बोलाचाली, शिव्यागाळीपर्यंत गोष्टी आल्या. बघताना लाज वाटत होती, पण मध्ये पडण्याची हिम्मत झाली नाही. शेवटी दुसऱ्या काही यात्रींनी मध्यस्थी केली आणि वाद शमला.

आजची सकाळ मोकळीच होती. आम्ही रिकामे लोक परत तकलाकोट दर्शनाला आणि लोक काय खरेदी करताहेत ते बघायला जाऊन जेवायच्या वेळेपर्यंत परत आलो.

भाजी बाजार

7-t-1.jpgतकलाकोटची देखणी इमारत

7-t-2.jpg

तोपर्यंत मानसला गेलेले यात्रीसुद्धा आले होते. जेवणाआधी नारंग सरांनी सगळ्यांची सभा बोलावल्याचा निरोप मिळाला.

इतके दिवस सगळ्यांच्यात मिळून-मिसळून वागणाऱ्या, विसरभोळेपणा करणाऱ्या सरांचा आज वेगळा रंग बघायला मिळाला. कोणावरही दोषारोप न करता, किंवा आक्रस्ताळेपणा न करता, त्यांनी सकाळच्या प्रकाराबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली. ‘आपण यात्रेला आलो आहोत, सहलीला नाही. पूर्वी उपाशीपोटीसुद्धा यात्रा कराव्या लागायच्या, आता तशी परिस्थिती नाही. पण थोडीशी अडचण झाल्यावर, परक्या देशात आपण अन्नावरून मारामारी करणे अत्यंत अयोग्य आहे. जर कोणाचे वर्तन चुकीचे वाटले, तर मी त्या यात्रीला परत पाठवू शकतो किंवा त्याला विदेश मंत्रालयाच्या काळ्या यादीत टाकू शकतो. मला तस करायला भाग पडू नका. इतके दिवस मजेत चाललेला हा प्रवास तसाच चालू द्या,’ अस सगळ्यांना बजावल.

त्यांच्या ह्या संयत पण कठोर बोलण्याने सगळे सटपटलेच! सकाळी भांडण करणाऱ्यांनी एकमेकांची आणि बाकी यात्रींची माफी मागितली. त्या भांडणावर पडदा पडला, पुन्हा एकदा समजुतीच वातावरण कॅम्पवर तयार झाल.

जेवण करून आम्ही खोजरनाथ मंदिराकडे जायला निघलो. हे बौद्ध मंदिर १२०० वर्षे जुने आहे. तकलाकोट पासून साधारण ३० किलोमीटरवर आहे. तकलाकोट सोडल्यापासून रखरखीत, धुळीने भरलेल्या आणि दुतर्फा डोंगर असलेल्या चढ-उताराच्या रस्त्यावरून आमची बस चालली होती. फक्त आम्ही ‘बस’लेलो असल्याने चढ-उताराची काळजी वाटत नव्हती!

खोजरनाथ मंदिर

7-kn-1.jpg7-kn-5.JPG

हा मठ नेपाळच्या हद्दीपासून अगदीच जवळ आहे. इथला पुरातन मठ चीनी आक्रमणात उध्वस्त केला होता. नंतर त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला.

7-kn-7.JPG

खोजरनाथचा भव्य मठ अतिशय आकर्षक आहे. गाभाऱ्यात मेणबत्त्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात चांदीच्या तीन भव्य मूर्ती अजूनच तेजःपुंज दिसत होत्या. ह्या मूर्ती अष्टधातुपासून बनवलेल्या आहेत व कमळावर आरूढ झालेल्या आहेत. डावीकडची मूर्ती अवलोकितेश्वर, मध्यभागी मंजुघोष आणि उजवीकडे वज्रपाणी ह्या बोधिसत्वातील तीन पुरुष मूर्ती आहेत. काही जणांच्या मताप्रमाणे ह्या तीन मूर्ती राम, लक्ष्मण व सीतेच्या आहेत व ते रामाचेच मंदिर आहे. पण सगळ्या रचनेवर बौद्ध धर्माची छाप दिसत होती. नेपाळपासून जवळ असल्याने हिंदू धर्माचाही प्रभाव जाणवत होता.

7-kn-2.jpg

उदबत्त्यांचा सुगंध, समयांचा मंद प्रकाश आणि साधकांच्या ध्यानधारणेसाठी मांडून ठेवलेली आसने, तिथली शांतता आणि शिस्त ह्या सगळ्यामुळे पावित्र्याची जाणीव होत होती. मठाच्या भिंतींवर बुद्ध जीवनावरची मोठमोठी रंगीत चित्रे काढली होती.

7-kn-8.JPG

बाहेरील भिंतींला लागून लहानमोठ्या आकाराची चक्रे होती. प्रदक्षिणा करताना हाताने ती चक्रे फिरवत जायचे असते. ती जितकी फिरवली जातील, तेवढ्या वेळा जप होऊन पदरी पुण्य पडते, अशी समजूत आहे.

7-kn-9.JPG7-kn-6.JPG

लाल-किरमिजी अश्या सहसा न दिसणाऱ्या रंगसंगतीच्या ह्या मंदिरात आम्ही भरपूर फोटो काढून घेतले.

7-kn-10.JPG7-kn-3.jpg

बाहेर तिबेटी लोक त्यांच्या पारंपारिक वेशात आले होते. त्यांच्या बरोबरही फोटो झाले. पुन्हा बसमध्ये बसून आम्ही तकलाकोटला परतलो.

दिनांक २ जुलै २०११ (तकलाकोट मुक्काम)

म्हणता म्हणता आमचा तिबेटमधल्या मुक्कामाचा शेवटचा दिवस उजाडला. आज तकलाकोट जवळच्या एक बौद्ध गुहा बघायला जायचं होत. बसची सोय होणार नाही. साधारण दोन किलोमीटर चालव लागेल, अशी कल्पना आमच्या गाईडने दिली होती. उद्या लीपुलेखला चालायच होतच. कैलासची परिक्रमा झाल्यापासून चालण झाल नव्हत. तेवढेच पाय मोकळे होतील, ह्या उद्देश्याने सगळे यात्री वेळेच्या आधीच बूट चढवून तयार झाले होते.

रोलरने रस्ता खराब होऊ नये म्हणून घेतलेली काळजी

7-t-6.jpg

तकलाकोटला एकाच वेळेला थंडी आणि ऊन असायचं. बऱ्याच उंचीवर असल्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच जाणवायचा. सगळ्या यात्रींचे चेहरे, विशेषतः नाक बघण्यासारखी झाली होती. सनस्क्रीन लावूनही चेहरे काळे पडले होते. पण त्यामुळे तरी घरी गेल्यावर घरचे लाड करतील, अशी मी आणि नंदिनी एकमेकांची समजूत घालत होतो!

‘पूल’ ची करमणूक

7-t-8.jpgतिबेटी नागरिकांचे आवडते पेय!

7-t-10.jpgबौद्ध लामा

7-t-7.jpg

आजही हवा छान होती. पाऊस नव्हता. त्याबाबतीत आम्ही नशीबवान होतो. यात्रा सुरू केल्यापासून पावसाने फार त्रास दिला नव्हता. आता उद्याही अशीच हवा असली, तर नबीढांगवरून ‘ओम पर्वताचे’ येताना राहून गेलेले दर्शन होईल, अशी चर्चा चालताना चालू होती. थोडक्यात सगळ्यांना आता मातृभूमीचे जोरदार वेध लागले होते. कैलास परिक्रमा झाल्यापासून एकूण वेग तसा थंडावला होता. तिबेटमधले चौदा दिवसांचे वास्तव्य थोडे कमी केले तर चांगल होइल, अस सगळ्यांनाच वाटत होत. अर्थात आम्हाला कुठेही निसर्गाच्या कोपाला तोंड द्याव लागल नव्हत. तशी काही परिस्थिती उद्भवली, तर घाई होऊ नये म्हणून कदाचीत दोन दिवस जास्तीचे ठेवत असतील.

7-g-10.JPG

साधारण तासभर चालल्यावर आम्ही कर्नाली नदीवरचा पूल ओलांडून त्या गुहांजवळ पोचलो. वाळूने बनले असावेत अश्या डोंगरात त्या गुहा होत्या. माझ्या मराठी डोळ्यांना ‘राकट, कणखर, दगडांचे’ डोंगर बघायची सवय, हे ठिसूळ डोंगर पाहून भीतीच वाटत होती. जोरात हाक मारली, तरी हे सगळ प्रकरण कोसळेल, अस वाटत होत.

7-g-1.jpg7-g-2.jpg7-g-3.jpg

गुहा बघायला जाण्यासाठी एक शिडी चढून जायचं होत. वर गर्दी होईल, म्हणून १२ लोक एकावेळी सोडत होते. आमच्या बॅचच एक माहितीपुस्तक करायचं, अशी एक कल्पना होती. खाली गप्पा मारत बसलेल्या यात्रींचे तावडेंनी त्यासाठी प्रत्येकाचे स्वतंत्र फोटो काढले.( यात्रेहून परत येऊन आता सहा महिने झाले, अजून ते पुस्तक तयार होतच आहे!!)

7-g-5.jpg7-g-9.jpg

आमचा नंबर लागल्यावर आम्ही वर गेलो. वरून तकलाकोटचे विहंगम दर्शन होत होते. लांबवर दिसत असलेले डोंगर बघून उद्या आपल्याला असेच डोंगर ओलांडायचे आहेत, हे लक्षात येऊन काळजी वाटत होती. थंड वाऱ्यावर थोडा वेळ थांबून आम्ही आत शिरलो.

7-g-7.jpg7-g-8.jpg

आत मंद दिव्याच्या प्रकाशात बुद्ध मूर्ती चमकत होती. शांत-स्तब्ध वातावरणात सगळे तिथे थोडावेळ बसलो. गेल्या काही दिवसात आलेल्या विलक्षण अनुभवांची उजळणी सगळे आपल्या मनात करत होते. आमच्या आत्तापर्यंतची यात्रा जशी सुरळीत पार पडली, तशीच उर्वरीत यात्राही पडूदे अशी मनापासून प्रार्थना करून आम्ही खाली उतरलो.

परत कॅम्पवर आल्यावर सगळे परत आपापल्या सामानाला भिडले. उद्या सामान दिल्यावर ते एकदम कालापानीला मिळणार होत. मानस सरोवराचे आणि गौरी कुंडाचे पानी सगळ्यांनी वेगवेगळ्या कल्पना लढवून पॅकबंद केल. काहीजणांनी २०-२० लिटरचे कॅन भरून घेतले होते. जाऊन परत त्या पाण्याने अंघोळ करणार होते की काय कोण जाणे?

लीपुलेखच्या परतीच्या अवघड प्रवासात लागणारे, थंडीपासून बचाव करणारे कपडे, थोडा सुकामेवा, रेनकोट वगैरे आवश्यक गोष्टी जवळच्या लहान सॅकमध्ये भरल्या. मी सोबत बुटांचे दोन जोड आणले होते. त्यापैकी एक जोड तिबेटमध्ये येतायेताच फाटल्यामुळे फेकून दिला होता. काही कपडेही टाकून दिले होते. (बरेचसे ट्रेकर ट्रेकला जाताना जुने कपडे नेतात, आणि परत आणत नाहीत.) खाण्यापिण्याच सामानही संपल होत. ह्या सगळ्यामुळे माझी मोठी सॅक थोडी हलकी झाली होती. तरटाच्या पोत्यात सहज जात होती. ती तशी कोंबून वर ठळक अक्षरात नाव घालून आम्ही आमच सामान वेळेआधीच जमा केल. खोली एकदम सुबक, सुंदर, देखणी दिसायला लागली!

ज्या यात्रींच्या सामानात थोडी जागा शिल्लक होती, ते नव्या उत्साहाने शेवटची खरेदी करून आले. सगळ्यांची पारपत्रे आणि सामान जमा करून घेऊन नारंग सर आणि आमचे तिबेटी गाईड काही सोपस्कार पूर्ण करायला गेले.

तिबेटी वस्तू

7-t-5.jpg

काही यात्रींकडे चिवडा, खाकरा, फरसाण असा खाऊ शिल्लक होता, त्यांनी ते सगळा एकत्र केला. त्यात टोमॅटो, चटण्या घालून भेळ बनवली. (कांदा अजूनही निषिद्ध होता) सगळ्यांनी त्या भेळीवर दुष्काळातून आलेल्या माणसांच्या थाटात आडवा हात मारला!

संध्याकाळी एका छोट्या कार्यक्रमात आम्हाला दोन्ही परिक्रमा पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे मिळाली. आम्ही सगळ्यांनी आमच्या दोन्ही गाईडचे मनापासून आभार मानले. आमच्या व्यवस्थेसाठी त्यांनी खूप कष्ट घेतले.

नारंग सरांचा सत्कार

7-t-12.jpg

यात्रींबरोबर मजा करताना आमचा तिबेटी गाईड टेम्पा

7-t-13.jpg

तलेरा अंकलना दोन-तीन दिवस दवाखान्यात सलाईन लावून ठेवल होत. आता ते पूर्ण बरे झाले होते. रात्रीच्या कार्यक्रमात ते सामील झाल्यामुळे सगळे खुष झाले. नंतर हिंदी गाण्यांच्या तालावर मनसोक्त नाचून सगळे आपापल्या खोल्यात शिरले.

दिनांक ३ जुलै २०११ (तकलाकोट मुक्काम)

आज आपल्या देशात परत जायचं, ह्या कल्पनेमुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. वेळेच्या आधीच चहा आणि जुजबी नाश्ता उरकून सगळे यात्री तयार होते. कॅम्पच्या बाहेर सगळ्या बॅचचा, आमच्या तिबेटी गाईड व व्यवस्थापकांबरोबर फोटोचा कार्यक्रम झाला. जी थोडीफार गैरसोय, वादावादी झाली होती, त्याबद्दल कटुता न ठेवता, त्यांचे आभार मानून ‘जेकारे वीर बजरंगी, हर हर महादेव, ओम् नमः शिवाय’ च्या गजरात आम्हाला कैलास-मानस सरोवराचे दर्शन घडवणाऱ्या तिबेटचा निरोप घेऊन लीपू खिंडीकडे निघालो.

7-ll-3.jpg7-ll-4.jpg7-ll-5.jpg

बसच्या दार-खिडक्या बंद असल्या तरी तकलाकोटची थंडी अंगाला बोचत होती.
बाहेर आता परिचित वाटणारे दृश्य दिसत होते. हळूहळू उजाडू लागले होते. सगळे यात्री ते निर्मनुष्य अनोखे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत होते. तेथील पिवळे, लालसर रंगांचे उंचच उंच डोंगर सूर्याच्या सोनेरी उजेडात जास्तच खुलून दिसत होते. उंच पर्वतावर अनेक ठिकाणी बर्फ पडलेले दिसत होते. लवकरच आमचा बसचा प्रवास संपला.

7-ll-10.jpg

यात्रींसाठी घोडेवाले आमची वाट पाहत उभे होते. आमच्या सामानाची मोजदाद होऊन ते खेचारांवर लादले गेले. चीनी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आमची पारपत्रे कालच दिली होती. पुन्हा एकदा त्यांनी आमचे व्हिसाच्या कागदपत्रांवरचे आमचे फोटो, पारपत्रावरचे फोटो आणि प्रत्यक्ष व्यक्ती निरखून, ताडून बघितल्या. ज्या व्यक्ती तीबेटात गेल्या त्याच परत जात आहेत, ही खात्री पटल्यावर त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला जायला परवानगी दिली.
पायीच जावे की काय, असा विचार होता. पण समोर असलेल्या बर्फाच्छादित उंच लीपुलेखकडे नजर गेल्यावर बहुतेक सगळ्यांनी घोड्यावर मांड टाकली. आतापर्यंतची यात्रा निर्विघ्नपणे झाली, आता हा परतीचा प्रवास तसाच होऊदे, अशी देवाची प्रार्थना करून प्रवास सुरू केला.

7-ll-6.jpg

बघाव तिथे बर्फच बर्फ दिसत होते. त्या बर्फावरून एक काळी रेघ मारल्यासारखी पायवाट दिसत होती. त्या पायवाटेवरून आमचे घोडे एकमेकांच्या मागून आस्ते कदम चालू लागले. त्यातील काही द्वाड जनावरे वाटेतील घोड्यांना ढुशी मारून तर कधी बाजूने वाट काढत पुढे सरकू लागली, की सर्वच घोड्यांची चाल बिघडत होती. काही घोडे त्यांचा पाठलाग करीत. माझा घोदादेखील वेग वाढवू लागल्याने मी त्याचा लगाम जोरात ओढू लागताच तोंडाला दुखल्याने तो जास्तच वेगाने पळू लागला, आणि माझी अक्षरशः पाचावर धारण बसली. सुदैवाने वाटेत एक उंच चढण लागल्याने सगळ्यांचा वेग मंदावला आणि मला हायसे झाले. भारतातले पोनीवाले आपल्या सोबत चालतात. घोड्यांची टक्कर होऊ नये, म्हणून व्यवस्थित लक्ष ठेवतात. हे तिबेटी पोनीवाले मात्र एकीकडे बिड्या ओढत आमची तारांबळ बघत हसत होते.

7-ll-1.jpg7-ll-7.jpg7-ll-8.jpg

आम्ही तिबेटमध्ये गेलो त्या दिवशीपेक्षा आज बर्फाच प्रमाण जास्त वाटत होत. घोड्यांचे पाय बर्फात रुतत होते. ओठ आवळले तरी दातावर दात आपटून आवाज येत होता. थोड अंतर पार केल्यावर पोनीवाले आम्हाला उतरायचा आग्रह करू लागले. हो-नाही करत शेवटी बरेचसे यात्री उतरले. काही यात्री मात्र नाहीच उतरले. बॅचमधल्या ज्येष्ठ किंवा आजारी यात्रींना घोड्यावर बसू द्यावे, आणि जे चालू शकतात त्यांनी चालावे, हा साधा संकेतही लोक धुडकावून लावत होते. नारंग सर सगळ्यांच्या शेवटी होते. ते बिचारे ओरडून त्या यात्रींना ‘ आप प्लीज उतर जाईये, लेडीजको बैठने दिजीये|’ अस सांगत होते. काही जणांनी ते ऐकल,पण काही जण हट्टाने नाही म्हणजे नाहीच उतरले. मुळचा मनुष्यस्वभाव कैलास-मानसच्या दर्शनाने बदलेल, अशी आशा ठेवणे, चुकीचच होत!

7-ll-11.JPG

एक-एक पाउल कष्टाने उचलावे लागत होते. श्वासाचा वेग आणि पावलांचा वेग व्यस्त प्रमाणात वाढत होते. अंगावर घातलेले यच्चयावत गरम कपडे आणि खांद्यावरच्या सॅकच वजन जाणवत होत. कोणालाच एकमेकांशी बोलण शक्य नव्हत. एरवी सगळ्यांची चेष्टामस्करी करणारेही शहाण्या मुलांसारखे एका रांगेत चालले होते.

7-ll-2.jpg

लीपूखिंडीच्या उंच टोकावर काही काळ्या आकृत्या हालताना दिसल्यावर मागून कोणीतरी ओरडले, ‘हौसला रखो, अपना देश आ गया, वो देखो अपने जवान दिखाई डे रहे है|’ सगळ्यांच्या अंगात उत्साहाची नवी लाट आली. चिंचोळ्या वाटेची शेवटची जीवघेणी चढण आम्ही धापा टाकत चढत असताना पाचव्या बॅचचे यात्री, पोर्टर-पोनीवाले, आय.टी.बी.पी.चे जवान, अधिकारी सगळे ‘ओम नमः शिवाय, शिवबाबा की जय’ अश्या घोषणा देऊन आमचा उत्साह वाढवत होते. माझे पोर्टर-पोनीवाले सुरेश-रमेश ‘दिदी-दिदी’ हाका मारून मला हात करत होते. त्या सगळ्याचे आनंदी-उत्साही चेहरे पाहून आत्ताच घरी आल्यासारख वाटायला लागल.

पंधरा दिवसानंतर दृष्टीपथात आलेली भारताची भूमी

7-ll-9.jpg

त्या संचारलेल्या मनस्थितीत मी शेवटची पावले टाकली आणि एकवीस जून ते तीन जुलै एवढ्या दिवसांनंतर मायभूमीत प्रवेश केला.

ह्या पुढचे भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा!

भाग ८: लीपुलेख खिंड ते गाला : http://www.maayboli.com/node/32246

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.. Happy
सामान आवरा आवरी हा मोठा आणि महत्त्वाचा कार्यक्रम होता तर एकंदरीत. जवळजवळ प्रत्येक भागात ह्याचा उल्लेख दिसतोय. Happy

साती, हा निश्चय केल्याबद्दल तुमच अभिनंदन ! भारत सरकारची पुढच्या म्हणजे २०१२च्या यात्रेची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याची लिंक : www.mea.gov.in/staticfile/kailash/KMY-advt.2011.pdf.

उशीर करू नका. काही मदत लागली, तर मी आहेच.

पराग,
तुमचा अंदाज म्हणजे अगदी बघा करेक्ट आहे! तिथे दुसरी काहीच करमणूक नव्हती. त्यामुळे सामान काढणे-भरणे, काहीतरी विसरलं हे लक्षात आल्यावर पुन्हा काढून भरणे अशी मजा होती. बाथरूम असतील, तर अंघोळीला नंबर लावणे, ही दुसऱ्या क्रमांकाची करमणूक होती.

सर्व प्रवास वर्णन उत्तमच, पण त्या जोडीला मानवी स्वभावाचे जे विविध कंगोरे स्पष्ट केलेत ते ही खूप शिकवून जाणारे.........
त्यामुळे खूपच मनोरंजक, त्याच बरोबर अंतर्मुख करायला लावणारे सुरेख लिखाण....
मनापासून धन्यवाद.

>>’कोई बात नही| मै फोनपे बोल देनेवाला हुं, की वेदर खराब हो गया, इसलिये अटक गये!!’ >>
Lol म हा न!
>>काहीच घेतल नाही. >> है शाब्बास!

बाकी काही भांडणाचे अनुभव वगैरे वाचून खेद वाटला, पण व्यक्ती तितक्या प्रकृती. मस्त लिहिले आहे.

आता यात्रा संपत आली, या विचारांनी वाचताना सुद्धा थोडं वाईट वाटतं आहे.

खूप छान, जिवंत, प्रवाही वर्णन. आणि फोटो सुद्धा.

मस्तच Happy

>>>बाथरूम असतील, तर अंघोळीला नंबर लावणे
इतक्या थंडीतही अंघोळ हा प्रकार आहे का?

बाकी लिखाण एकदम मस्त आहे.

अनया,धन्यवाद गं.
पण आमची परिस्थिती आवा चालली पंढरपूरा अश्यागत आहे.
जरा माझी पोरंबाळं सुट्टी होऊ देत माझ्यापासून मग २०१७ नंतर पुढे केव्हातरी जाईन.
देवा,तोपर्यंत चीनला ही यात्रा चालू ठेवण्याची सद्बुद्धी दे. Happy

पाषाणभेद, अहो, आमच्याबरोबर अंघोळीचे भक्त खूप होते. ‘यात्रेला आल्यावर बिनाअंघोळीच कस राहणार?’ अश्या पंथातले! काही विचारू नका. आम्ही बऱ्याच वेळा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ‘अंघोळीच्या गोळ्या’ घ्यायचो!

साती, अहो ठीकच आहे. जमेल तेव्हा जा! पण तुम्हाला अगदी स्वानुभवाने सांगते, पोरबाळ कधीच सुट्टी होत नाहीत. माझा लेक १५ वर्षांचा आहे, तरी जाताना अडखळलेच! सोय होण्यासारखी असेल, तर लवकरात लवकर जा. आपली ताकद चांगली असेल, तर आपण जास्त आनंद घेऊ शकतो.

मी ऐकल त्याप्रमाणे, भारत सरकार चीनकडे लडाखकडून यात्रेचा मार्ग सुरू करण्यासाठी परवानगी मागत आहे. २०१७ पर्यंत तस झाल तर लडाखपासून ४-५ दिवसात, सिंधू नदीच्या काठाने कै.मा.स. ला पोचू शकाल.

अनया, हा भाग पण अप्रतिम! परत आपल्या घरी यायचे हा आनंद आणि एवढ्या सुंदर यात्रेचा आता शेवट होणार ह्याची हुरहुर अशा मानसिक अवस्थेचा अंदाज हा लेख वाचतानासुद्धा जाणवतो.
घरबसल्या कैलास मानससरोवर यात्रा घडवून आणल्याबद्दल परत एकदा धन्यवाद!!!!!!!!

फार छान. हाही भाग मस्त आहे. मनुष्य स्वभावाचं चित्रण अगदी वास्तव आहे. कुठेही गेलं तरी माणुस आपलं मी पण विसरु शकत नाही. हाच तर दोश आहे. खरेतर आपला धर्म आपल्याला नेहेमी "मी पण" विसरुन पुढे जाण्याची शिकवण देतो.

ह्या वरुन एक कविता आठवली

जीवन त्यांन्ना कळले हो
मी पण ज्यांचे पक्व फळापरी
सहज पणाने गळले हो.....
जीवन त्यांन्ना कळले हो.

Pages