धमाल!

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

dubeyji.jpg

रिक्षा सोडली आणि जानकी कुटीरमधे प्रवेश केला. पृथ्वीच्या गेटमधून आत शिरताना आपोआप नजर उजवीकडे कॅफेतल्या टेबलांवर फिरून आली.

आहेत का?
च्च आता कसे असतील? ते नाहीत म्हणून तर इथे जमलेत सगळे.

अ‍ॅब्सेन्स.. गैरहजेरीनेच जाणवणार आहात का यापुढे?
नो नो डोन्ट वरी.. नो रोतडूगिरी. ओन्ली 'धमाल'

एक रंगमंच, अनेक कलाकार नवशिके ते मान्यवर..
काही कविता, काही नाट्यप्रवेश, काही नाच, काही गाणी.....

सोनालीने म्हणलेली दुबेजींची आवडती कविता 'झाड'..
स्वानंदने गायलेलं 'बावरा मन'.
रत्नाजींनी वाचून दाखवलेला आजोबांनी नातवंडासाठी झाड लावण्याबद्दलचा उतारा...
क्षणात कोंडणारा घसा, डोळ्याला ओल, गालांवरून वाह्यलेलं पाणी..
बट आय अ‍ॅम नॉट क्रायिंग सर!

पहले सांस लो फिर बोलो.
फोकस..
सेन्टेन्स पुरा बोलो,
बाई, पिच अर्धा सूर खाली,
तुम्ही तेव्हा गमतीदार मराठी बोलायचात.
एकही उच्चार चूक नसायचा पण तरी वाक्याचा रिदम वेगळा होता.
ते फार मस्त वाटायचं कानाला.

पूर्वा नरेशचे अप्रतिम आणि सहज सुंदर नृत्य
इप्टा वाल्यांनी तुमच्यासाठी म्हणून सादर केलेली अप्रतिम गाणी...
अधून मधून तुमच्या आठवणी,

तू पुण्यातली कोकणस्थ तुला स्टेजवर रडता येत नसेलच.
काय ओळखलंत!
तुमचा पेन एक्सरसाइझही माझ्यापुढे निष्प्रभ ठरला होता.
पण 'आडा चौताल' मधे मला रडण्यापासूनच सीनची सुरूवात करायला लावलीत.
रडायला शिकवलंत खरं..
तरी मी आत्ता रडत बसणार नाहिये!

'खुदा के लिये.. मत देखना' मधला तुम्हीच तुमच्या 'संभोग से सन्यास तक' मधून कॉपी केलेला सीन,
कुमुद-सुहिताचे 'सुदामा के चावल'
टाळ्यांचा कडकडाट, हसण्याचा धबधबा..

सगळं काही तुमच्या ओढीने. ही कुठली जादू होती तुमच्याकडे?
जो जो तुमच्या संपर्कात आला त्याला श्रीमंत करून सोडलंत. अगदी आयुष्य बदलण्याइतकं श्रीमंत.
हे करताना त्या त्या प्रत्येकावर प्रेम केलंत. शिव्या घालत, समोरच्याचा इगो डिवचत प्रेम केलंत.
अगदी माझ्यासारख्या चिरकुट लोकांपासून पार नसीरजी, अमरिश पुरी यांच्यासारख्यांपर्यंत.

तुम्ही स्वतःच स्वतःची घेतलेली मुलाखत. थँक्स टू सुनिल आणि हिदा.
स्वतःचं डिसेक्शन करून ठेवलं होतंत तुम्ही. 'संगीत नाटक अकादमी' अवॉर्ड मिळालं तेव्हा.

सरतेशेवटी "आयुष्यभरात राहून गेलेल्या झोपेचा कोटा पुरा करत होते दुबेजी गेले तीन महिने, जेणेकरून स्वर्गात गेल्यावर लगेच नाटक करता यावं. ही मस्ट बी मेकिंग 'हेल' आउट देअर!" इति नसीरजी
"येस 'अंधा युग' विथ ओरिजिनल कास्ट!"

व्हॉट अ 'धमाल!!'

--------------------------------------------------------------------------------------------
तळटिपा - १. कोणीही उस्फूर्तपणे स्टेजवर येऊन एकट्याने/ समूहाने ५ मिनिटाचे काहीतरी परफॉर्म करायचे. क्रम ठरवलेला नाही, एकत्रित तालमी बिलमी असं काही नाही. असा दीड दोन तासाचा कार्यक्रम म्हणजे 'धमाल!' दुबेजींची अतिशय आवडती अ‍ॅक्टिव्हिटी होती. हे नावही त्यांनीच दिलेले होते.
२. 'अंधा युग' हे धर्मवीर भारतींचं अतिशय गाजलेलं नाटक. महाभारतावर आधारित आहे.

विषय: 
प्रकार: 

नी, थेट मनातून उतरल्यामुळे व्यवस्थित पोहोचतय. दुबेजींच्या निधनाची बातमी वाचल्यावर पहिल्यांदा मला ही तुझीच आठवण आली होती.
अजून थोडं विस्तारीत लिहायला हवं होतंस हे माझं मत, कारण लेख वाचायला सुरू झाला की लगेच संपतोय..

छान Happy आवडलंच.
स्टेज, नाटक इ.शी प्रेक्षक म्हणूनच केवळ संबंध आहे, (तू सोडल्यास) त्या क्षेत्रातलं कुणीही परिचित नाही, दुबेजींचं एखादं नाटक चुकूनमाकून पाहिलंय म्हणावं तर ते ही नाही. तरीही त्यांच्याबद्दल आजपर्यंत वर्तमानपत्रांतून जे जे आलंय ते सगळं मी न चुकता वाचलेलं आहे.

अशी हसतमुख राहून दिलेली श्रध्दांजली मला वैयक्तिकरीत्या खूप भावते. अशा धमालीदरम्यान गालावर ओघळलेले दोन अश्रू अधिक मौल्यवान भासतात.

अशी हसतमुख राहून दिलेली श्रध्दांजली मला वैयक्तिकरीत्या खूप भावते. अशा धमालीदरम्यान गालावर ओघळलेले दोन अश्रू अधिक मौल्यवान भासतात.<<< Happy
दुबेजींना रडूगिरी एरवीच आवडत नसे. जगण्याच्या, अस्वस्थ असण्याच्या, खळबळीच्या इतके प्रेमात पडलेले होते ते की रडण्यासाठी आणि रडणार्‍यांसाठी जागाच नव्हती त्यांच्याकडे.

रडायला शिकवलंत खरं..
तरी मी आत्ता रडत बसणार नाहिये! >> हे इतके पुरे आहे माझ्यासारख्या त्यांच्या कार्यक्षेत्राचा फारसा परीचय नसलेल्या माणसांना त्याच्याबद्दल सांगण्यासाठी.

सुंदर लेख.

नी, कुठेही रँडमली लिहिल्यासारख नाही वाटल मलातरी. दुबेजी मलातरी फक्त ऐकुन आणि वर्तमानपत्रातुनच माहिती होते पण तुझ्यामुळे त्या माहितीत भर पडली.
त्यांना त्यांच्याच आवडीनुसार श्रद्धांजली दिलिस, आवडल.

एक आगळी वेगळी शोकसभा. मी त्यांना भेटले आहे. इथे तारामती चा प्रयोग तारामती बारादरी मध्येच झाला होता त्याला ते आले होते. ग्रेट व्यक्तिमत्त्व.

खुप खुप आतून लिहिलेय, आवडलं.
दुबेजी गेले तेव्हा मला तुझीच आठवण आली होती...
खरच खुप छान लिहिलंयस, अगदी त्यांनाही आवडेल असं...

छान लिहिलंयस. सोनाली कुलकर्णीनंही सोकुल मधे दुबेजींवर फार भावपूर्ण लिहिलं होतं.
ही वेगळ्या शैलीमधली श्रद्धांजली!

सोनाली कुलकर्णीनंही सोकुल मधे दुबेजींवर फार भावपूर्ण लिहिलं होतं.<<
ते फारच मस्त होतं. 'श्वास घ्यायला शिकवलं' हे तर शब्दशः खरं होतं त्यातलं.

मनापासून लिहिलंय अगदी.... आवडलं. दुबेजींना अशा प्रकारे श्रद्धांजली वाहिलेलीही आवडली.

नीधप, अतिशय सुरेख काव्यमय लिहिलं आहेस. फोटो फार छान आहे. इतक्या जवळून घेतलेला त्यांचा फोटो कधी पाहिली नव्हता. सोनाली कुलकर्णींनी त्यांच्यावर सोकुल मधे जे लिहिलं ते वाचायला मिळू शकेल का कुठे? धन्यवाद.

Pages