नवा अट्रोसिटी कायदा करा - स्त्रियांच्या गौरवार्थ!

Submitted by दामोदरसुत on 9 January, 2012 - 05:34

नवा अट्रोसिटी कायदा करा- स्त्रियांच्या गौरवार्थ!
’स्त्रियांचा पोषाख’ या विषयावर सांगोपांग चर्चा एका संकेतस्थळावर वाचली. त्यानंतर अलिकडे एका वाहिनीवर सार्वजनिक ठिकाणी वावरतांना स्त्रियांनी कसे वागले आणि राहिले पाहिजे यावर खडाजंगी चालली होती. त्या वाहिनीवर ’संस्कृतिसंरक्षक’ म्हणून ज्या पुरुषाची हेटाळणी इतरांकडून नेहमीप्रमाणे चालू होती त्याचे कांही मुद्दे मला पटत होते. तेवढ्यात त्याला दुर्बुद्धि झाली आणि " भारतीय स्त्रीला आपल्या संस्कृतीत कसे गौरवले आहे " याचे सविस्तर पुराण त्याने लावल्यावर एक भगिनी एकदम उसळून म्हणाली, ’’अहो एवढे महात्म्य सांगता, तर मला सांगा भांडणे सुरू झाली की शिविगाळ करतांना तमाम पुरुषवर्ग निःसकोचपणे आईबहिणींवरून अतिशय हीन शिव्या देतो. हा काय गौरव झाला? तेव्हा कुठे जातो तुमच्या संस्कृतितील स्त्री-गौरव?’’
त्या भगिनीचा हा प्रश्न ऐकताच मला त्या 'संस्कृतिसंरक्षका’चा आणि समस्त पुरुषवर्गाचा अगदी त्रिफळा उडाला असे वाटले. तिचे म्हणणे बिनतोड होते. आपण सर्वजण अगदी समजायला लागलेल्या वयापासुन स्त्रीचा तसला गौरव होतांना पाहत आलेलो आहोत. समता हवी या मुद्द्यावर ’स्लट वॉक ’ करण्याचा हक्क बजावणाऱ्या स्त्रियांना हे आजपर्यंत कसे काय खटकले नाही? का या शिव्या बहुसंख्य स्त्रियांना गैर वाटत नाहीत? त्याक्षणी मला असे वाटले की खरे तर स्त्रियांनी ((जाती, धर्म, वंश, रंग कोणताही असो.) शासनाकडे खालील मागणी केली पाहिजे.
" कोणाही व्यक्तीने आईबहिणीवरून कोणालाही शिवी दिली तर तो दखलपात्र गुन्हा समजावा. ज्या कोणाला शिवी दिली गेली त्याने तक्रार केल्यास स्त्रीत्वाचा अपमान केला यासाठी त्या माणसाला अटक केली जावी. कमितकमी १०० स्त्रियांसमोर त्याला सार्वजनिक जागी गुढगे टेकून जाहीर क्षमायाचना करणे अधिक ५०० रु दंड अशी कमीतकमी शिक्षा हवी." या क्षमायाचना समारंभाचा फोटो देखिल कोर्टातर्फ़े शिव्याबहाद्दराच्या खर्चाने वर्तमानपत्रात अधिकृतपणे दिला जावा.
आणि ...... यदाकदाचित स्त्रिया अति-बलाढ्य झाल्या तर भविष्यात पुरुषांच्या गौरव रक्षणार्थ अशा कायद्याची गरज भासली तर ? तेव्हा त्याचा मसुदाही कायदेतज्ञांनी आताच तयार करून ठेवावा. उद्देश हा कि समतेच्या तत्वासाठी पुन्हा नवी चर्चा करण्यात वेळ आणि शक्ति जावू नये.

गुलमोहर: 

कोण म्हणतं फक्त पुरूषच अश्या शिव्या देतात? प्रमाण जास्त असलं तरी 'आई-बहिणींवरून' एकदम गलिच्छ शिव्या देणार्‍या स्त्रियांना मी ऐकलं आणि पाहिलं आहे. आपण सुचवलेला मुद्दा योग्यच आहे. कारण स्त्रीचा आदर हा समाजात राखलाच पाहिजे. पण अश्या कायद्याला आणि त्याच्या तरतुदीला कितीसं महत्व मिळणार आहे. ग्रामिण भारतात किंवा ग्रामिण महाराष्ट्रात जाऊन बघा. तिथल्या 'स्त्री' किती शुल्लक कारणावरून अश्या शिव्या ऐकाव्या लागतात आणि ते सुद्धा तीच्या घरातल्या व्यक्तिकडूनच. आता तीने लगेच तीच्या नवर्‍याला कोर्टात खेचावं का? हे अभिमानास्पद आहे असं नाही. पण या सगळ्याचा योग्य विचार करूनच योग्य तो कायदा आमलात आणायला हवा. या सगळ्याला संगत, आजूबाजूची परीस्थिती, तिथला परीसर यासगळ्या गोष्टी अवलंबून असतात. समोरचा बिनदिक्कत शिव्या देतोय कुणाला तरी आणि त्या आपल्याला ऐकू येतायेत तेव्हाच ठरवायचं कि मी माझ्या आयुष्यात कितीही संताप आला तरीही माझ्या तोंडून एक सुद्धा अशी शिवी येता कामा नये. 'शिव्या देणं' व्यक्तीसापेक्ष दोष आहे आणि तो त्यानेच सुधरायला हवा.

रायबा, अहो कायदा करा हे जरा गमतीने म्हंटले असावे. पण मुद्दा, स्त्री जातीचाच फक्त शिव्या देण्यासाठी का उपयोग होतो हा असावा.
मला तर वाटते, स्त्रिया या आदराला पात्र असल्याने, शिवी देऊन एखाद्याचा अपमान, निंदा करायची तर त्याच्या घरातल्या स्त्रियांचा वाईट उल्लेख करणे म्हणजेच जास्तीत जास्त अपमान, अगदी हद्द झाली, याहून आणखी काय वाईट, अशी भावना असावी. पुरुषाचा काय अपमान करणार? ते कुठे आदराला पात्र आहेत एरवी तरी? पुरुष असे असतात म्हणून तर काही स्त्रियांवर 'स्लट वॉक' करायची वेळ येते!

एकिकडे भारतीय स्त्रीला आपल्या संस्कृतीत कसे गौरवले आहे याचे गुणगान करायचे आणि दुसरीकडे
स्त्री जातीचाच फक्त शिव्या देण्यासाठी उपयोग करायचा या दांभिकपणाकडे त्या भगिनीने जे लक्ष वेधले ते सर्वांच्या नजरेला आणून देणे हा एक उद्देश! याशिवाय आधुनिक स्त्रीने या विरुद्ध आवाज कसा काय उठवला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करणे हा दुसरा उद्देश.

झक्की चे मत <<मला तर वाटते, स्त्रिया या आदराला पात्र असल्याने, शिवी देऊन एखाद्याचा अपमान, निंदा करायची तर त्याच्या घरातल्या स्त्रियांचा वाईट उल्लेख करणे म्हणजेच जास्तीत जास्त अपमान, अगदी हद्द झाली, याहून आणखी काय वाईट, अशी भावना असावी>> पटले.

याला "mother insult" असे नाव आहे. सर्व संस्क्रुतीमधे आणी भाषांमधे हा प्रकार आढळतो असे म्हणतात (मला असे शब्द फक्त संस्क्रुतमधे माहीत नाहीत पण कुणालातरी तयार करता येतील. कदाचीत लॅटीन मधे नसतील - ग्रीक मधे तील्त असे ऐकले आहे.).

"yo mamma/your mother" विनोद मात्र माझ्या माहितीप्रमाणे भारतीय भाषांमधे प्रचलित नाहीत.