माझे आवडते शिक्षक

Submitted by माध्यम_प्रायोजक on 9 January, 2012 - 00:25

घर ते सोसायटीचं मैदान अशा दोन टोकांत सगळं जग वसलेलं आहे, अशी भावना मूळ धरत असतानाच शाळेच्या रुपाने नियतीमॅडम कहानी में ट्विस्ट घालून देतात. नवा गणवेश, नवं दप्तर असा सगळा जामानिमा करुन जेव्हा शाळेत प्रवेश होतो, तेव्हा मात्र पुढं आईला जाताना पाहून दमसासाची आवर्तनं घातली जातात. पण पहिल्यांदा आयुष्यात बाईंचं बोट धरुन नव्या नवलाईच्या जगाला सामोरं जायला आपण तयारही होतो.

त्यानंतर अनेक शिक्षक येतात, काहींबरोबर सूर जुळतात, काहींना खास टोपणनावं ठेवली जातात. कधी काही खास आकर्षणांमुळेही आठवणी रुजलेल्या असतात. अगदी चितळे मास्तरांच्या नियमाप्रमाणे ओळीत आठच शब्द किंवा प्रत्येक उत्तराला चौकट, फक्त निळंच पेन वापरायचं असल्या सवयी कधी आपल्या अंगवळणी पडतात ते कळतही नाही. त्यांचंच 'सगळं बरोब्बर' ते 'त्याला कुठं काय येतं.. उग्गाच माज!' अशा सगळ्या वळणावळणांनी हा प्रवास सुरु राहतो.

या सगळ्या प्रवासात तुम्हांला आवडलेले शिक्षक कोणते, तुमच्या आयुष्यात त्यांचं असलेलं खास स्थान, यांबद्दल आम्हांला जाणून घ्यायला आवडेल. कदाचित कृतज्ञता म्हणून किंवा आठवणींना केलेला सलाम म्हणून त्यांच्याबद्दल लिहाल का?

janimage.JPG
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या धाग्यामुळे पुन्हा एकदा मनावरचे सांपत्तिक विकास, चैनीचे राहणीमान आणि उघड्या जगात वावरण्याची झालेली सवय हे थर अकस्मात निघाले आणि एक गाडला गेलेला पण आजही ओलाच राहिलेला थर उघडा पडला. त्याचे नांव कै. चिंचाळकर सर! विमलाबाई गरवारेत गणित विषय शिकवणारा हा माणूस म्हणजे गरीब स्वभाव, कर्तव्यनिष्ठता आणि साधी राहणी यांचे अद्वितीय मिश्रण होते. काहीसे गबाळे दिसणारे आणि पावणे सहा फूटांपेक्षा अधिक उंची असलेले चिंचाळकर सर एका हातात फाईल घेऊन तो हात खांद्याच्याही वर धरून जणू एखाद्या हमालासारखे शाळेतून या वर्गातून चालत त्या वर्गात जात. मात्र हे एकच असे सर होते ज्यांना टोपणनावे जरी पडली असली तरी एकदाही त्यांची थट्टा झाली नाही. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल जे भाव असायला हवेत असे आदर्शवाद म्हणेल, अगदी ते म्हणजे तेच भाव विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होतील असे त्यांचे वर्तन होते. कामाशी काम आणी बाकी केवळ साधेपणा!

चिंचाळकर सरांच्या आठवणीही मनाला बाल्य देणार्‍या आणि व्यथित करणार्‍याच!

आमच्या वर्गात एक मुलगी होती, तिचे नांव लिहिणे येथे योग्य नाही. पण तिला अल्जीब्रा व जॉमेट्रीमध्ये जवळपास शून्यच मार्क्स मिळायचे कायम! तिला चिंचाळकर सरांनी फुकट शिकवले व तिला गणित यायला लागले.

मी एन सी सी मध्ये असताना सार्जंट झालो होतो. तोच गणवेष धारण करून शुक्रवारी शाळेत जायचे असायचे. माझ्या खोडकर स्वभावाप्रमाणे मी दंगा करत होतो त्यांच्या तासाला! तास संपल्यावर त्यांनी मला वर्गाबाहेर बोलावले व विचारले. "कटककर, या खांद्यावरच्या तीन तार्‍यांचा आणि दंडावरच्या तीन पट्ट्यांचा अर्थ काय रे?". मी उत्तर दिले, "सर, एन सी सी मध्ये मी सार्जंट आहे"! "सार्जंट म्हणजे काय?"! मी म्हणालो एक रॅन्क आहे. मह ते म्हणाले, त्या रँकचा एक अर्थ असाही असेल ना की इतरांना शिस्त शिकवायची? मग तू स्वतः शिस्तीने का वागत नाहीस? वाईट वाटले मला! इतक्या थोर माणसालाही आपल्याशी बोलताना आपल्याला झापावे असे वाटले नाही.का? तर ते स्वभावातच नाही म्हणून? वास्तविक पाहता त्यांनी एखादी थप्पड लगावली असती तरी मी ते योग्यच समजलो असतो.

चिंचाळकर सरांचा एका दिवशी, त्यांनी शाळा जॉईन केल्याच्या खूप खूप वर्षांनी सत्कार करण्यात आला होता काही कारणाने! त्यावेळी शिरीष जावळे म्हणून आमच्या वर्गात एक मुलगा होता. त्याचे सरांवर अतिशय प्रेम होते. तो रांगेत बसलेल्या जवळच्या सर्वांना म्हणाला, ए, चिंचाळकर सरांसाठी खूप टाळ्या वाजवायच्या बरं का? इतर सर्व शिक्षकांपेक्षा खूप जास्त! पण त्याला स्वतःलाच धक्का बसला जेव्हा टाळ्या वाजल्या तेव्हा! चिंचाळकर सरांसाठी , तेथे जमलेले जवळपास चारशे विद्यार्थी इतका वेळ टाळ्या वाजवत होते की अख्खी शाळा थक्क झाली होती. टाळ्या थांबेचनात! शेवटी चिंचाळकर सर पुन्हा स्टेजवर आले आणि हात करून निघून गेले. तेव्हाही त्यांच्या चेहर्‍यावर केवळ करुणा व कृतज्ञताच होती, अभिमान दिसलाच नाही.

हा माणूस गणित शिकवताना आणि हो... पदार्थ विज्ञान आणी रसायन शास्त्रही शिकवताना इतक्या तन्मयतेने शिकवायचा की आम्ही विद्यार्थी अक्षरश: असा विचार करायचो की त्यांच्या पाया पडायला पाहिजे.

माझ्याच एका वर्गमित्राच्या शेजारी ते राहात असायचे. त्याने सांगितलेली एक मजेशीर आठवण! म्हणे आपल्या घरात कोणी आंघोळीला गेले तर बाहेरचे लोक फार तर काय म्हणतात रे? म्हंटले काय? तर म्हणे 'आवरा' वगैरे असे सांगत असतील नाही का? म्हंटले हो! तर म्हणे सौ. चिंचाळकर त्यांना सांगतात की 'साबणपण लावा'! त्यावेळी आम्ही खूप हासलो, पण आज वाटते की किती हा साधेपणा आणि गरीबी! आज मी आणि बायको मिळून जे कमवतो त्याच्या अंशानेही त्यावेळी त्यांचा पगार नसेल, पण त्यांनी जे संस्कार त्यांच्या वागण्यातून केले, ते आठवले की खरच कसेसे वाटते.

तसे खूप शिक्षक आणि शिक्षिका होत्या, पण मनावर कोरले गेले ते चिंचाळकर सरच!

एकदा मराठी, संस्कृत आणि इतिहास असे शिकवणार्‍या सौ. सोहोनी बाई वर्गावर आल्या तेव्हाच नेमके आम्हाला ऑफ पिरियड आहे म्हणून चिंचाळकर सरही आले. ते आमचे क्लास टीचर होते तेव्हा! सोहोनी बाई म्हणाक्या की 'सर मला या वर्गाचे तीन तीन विषय आहेत , हा ऑफ पिरियड मी घेत ना'! त्यावर मिश्कीलपणे सर म्हणाले की 'माझ्याकडे तर चार चार विषय आहेत, तुमचाही एखादा तास मला घेऊद्यात कृपया'! वर्ग खूप हासला. सोहोनी बाईही हासत निघून गेल्या. सरांकडे खरच फिजिक्स, केमिस्ट्री, अल्जीब्रा आणि जॉमेट्री असे चार विषय होते त्या वर्षी आमचे!

साधी राहणी, गरीबीतही समाधान, केवळ आणि केवळ कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांवर प्रेम!

इतकेच चिंचाळकर सर!

ते गेल्याची बातमी अनेक वर्षांनी अचानक रस्त्यात भेटल्ल्या एका मित्राने अगदी सहज काहीतरी सांगावे तशी दिली. तेव्हाही 'हो का' असे म्हणून मी विचारांच्या नादात निघून गेलो. पण नंतर एकटा होतो तेव्हा फार फार वाईट वाटले. वाटले की त्यांच्या मुलाबरोबरच त्यांना अग्नी देण्याचे पुण्य मलाही मिळाले असते तर?

प्रतिसाद लांबल्याबद्दल माफी!

पण या धाग्यामुळे लिहिता आले. विमलाबाई गरवारे च्या धाग्यावरही हे लिहावेसे वाटले नव्हते.

चिंचाळकर सरांना मनापासून आदरांजली!

ही एखादी स्पर्धा वगैरे असल्यास खरच त्यात रस नाही,त्यांच्याबद्दल लिहिता आले याचेच धन्यवाद!

-'भूषण कटककर'!

कल्पना आवडली. शाळा आणि जुन्या आठवणींना उजाळा असंच म्हणावं लागेल. Happy लवकरच लिहिन इथे. बेफिकीर आपण लिहिलेल्या आठवणी सहीच आहेत. 'सार्जंट' ची आठवण मस्तच. इथे विद्यार्थ्यालाही शिकायला मिळेल आणि शिक्षकालाही. कारण अनुभव आणि आठवणींतूनच शहाणं होता येतं ना.

ते गेल्याची बातमी अनेक वर्षांनी अचानक रस्त्यात भेटल्ल्या एका मित्राने अगदी सहज काहीतरी सांगावे तशी दिली. तेव्हाही 'हो का' असे म्हणून मी विचारांच्या नादात निघून गेलो. पण नंतर एकटा होतो तेव्हा फार फार वाईट वाटले. >> असेच आमच्या इंग्लीशच्या भट सरांबद्दल झाले होते. आधी एवढे त्यांच्या मागे पुढे करायचो पण त्याच वर्षात बेस्ट फ्रेंडही गेली आणि कॉलेज संपल्यावर ते गेल्याचीही बातमी समजली तेव्हा 'ओह' सोडून जास्त काही मनात आले नव्हते.
हे इथे लिहीताना आत्ता चिपळूण्कर सरांची आठवण येतेय. आता नक्कीच काहीतरी लिहीन.

मी इथे लिहिण. आत्ता मी ऑफीसात आहे. ईच्छा असूनही मला इथे लिहिता येणार नाही. भावना नीट मांडता येणार नाहीत. भिती वाटते बॉस लोकांची. नंतर लिहिण.

माझे आवडते शिक्षक-
माझ्या सुदैवाने अनेक चांगले शिक्षक मला मिळाले (याचाच अर्थ हा की चांगले विद्यार्थी मिळणे त्यांच्या नशिबात नव्हते!) पण ज्यांनी विषयाच्या पलीकडे जाउन काही दिले ते मात्र नेहमीच जास्त लक्षात राहतात.
बी.एस्सीच्या तीन वर्षात झूलॉजी शिकवणारे मद्वण्णा सर हे त्यापैकीच. मध्यम उंची पण दणदणीत बांधा, भरघोस मिशा, सतत मिस्किल हास्य असलेले डोळे आणि चेहर्‍यावर कायम ' आता काय बरं मजा करावी' असे भाव. याउप्पर अफाट विनोदबुद्धी आणि तीव्र निरिक्षणशक्ती याचा जोरदार मिलाफही. त्यांच्या लेक्चरला आमच्या वर्गातला सगळ्यात कंडम पोरगाही हजेरी लावणारच.

सरांचे शिकवणे अत्यंत निवांत, गप्पा मारत, हजारो संदर्भ देत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विषयाची 'मजा' कुठेही लोप न पावता. उत्तम 'प्रोफेशनल' शिक्षक कसा असतो हे मी त्यांच्याकडून शिकलो. इंटरनेट्चा अत्यंत प्रभावी वापर आणि एकंदरीतच तंत्रज्ञानाबद्दल जागरुक असणे हे सर्वप्रथम त्यांच्याच शिकवण्यात पाहिले. आम्हाला शिकाव्या लागणार्‍या अभ्यासक्रमातील अनेक कालबाह्य गोष्टी त्यांना खट्कायच्या पण त्या शक्य तितक्या रिलेव्हंट करुन शिकवायचा प्रयत्नही ते करायचे. विद्यार्थ्याने स्वतःचा विचार करणे शिकणे हे सर्वात महत्वाचे शिक्षण आहे या सूत्रावर त्यांची शिकवण्याची पद्धत आधारीत होती. उदा. प्रॅक्टीकलला सुरुवात करताना, 'आपण हे प्रॅक्टि़कल का करतो आहोत?' या प्रश्नानेच ते सुरुवात करायचे, आणि मग तेथून भरपूर चर्चा-वाद करुन मग आम्ही प्रत्यक्ष प्रयोग सुरु करायचो.

मी थर्ड इअरला असताना विद्यापीठात शिक्षकांचा मोठा संप झाला. फक्त मद्वण्णा सर आणि त्यांचे अजून एक सहकारी त्यात सामील झाले नाहीत. संपूर्ण कॉलेजात पंधरा दिवस फक्त आमचेच वर्ग चालू होते. एकदा सर शिकवीत असताना इतर शिक्षकांचा मोर्चा आला आणि डिपार्टमेंटच्या बाहेर उभे राहून त्यांनी सरांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. सरांनी तेवढ्यापुरते शिकवणे थांबवले आणि डोळे मिचकावून हलक्या आवाजात आम्हाला म्हणाले ' जास्त वेळ ओरडत नाहीत हे!'. आपल्याला एखादी गोष्ट मान्य नसेल तर गर्दीच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस जमले पाहिजे हा मोठाच संस्कार त्यादिवशी सरांनी केला.

अनेक वर्षांनी जेंव्हा मी शिक्षक झालो तेंव्हा त्यांना भेटलो आणि त्यांच्या उत्तम शिकवण्याचे रहस्य विचारले. 'कधीही तयारी न करता वर्गात जायचे नाही', सरांनी एका वाक्यात सांगितले. मला जरा आश्चर्य वाटले कारण मला वाटायचे की ते अगदी सहज शिकवून जातात, तयारी वगैरे लागतच नसेल त्यांना. यावर सर हसून म्हणाले, 'दीज आर द एफर्ट्स टू शो एफर्टलेसनेस!'.

सरांचा हा मंत्र जपायचा मी अजूनही प्रयत्न करतो आहे.

आगावा, शेवटचा परिच्छेद म्हणजे मर्म आहे मर्म! नशिबवान आहेस!
(मी पण इकडे लिहीतो ते माझ्या क्षेत्रातील "अभ्यासच (एफर्ट्सच) करीत" अस्तो. बर्का! Wink )

बेफिकीर, छान मान्डलय Happy

बेफिकीर, आगाऊ सुरेख लिहीलेत! काही काही शिक्षक खरंच मनात घर करुन जातात.
आता शिक्षकांबद्दल लिहायचे तर किती एक शिक्षक डोळयांपुढे आले आणि त्यातल्या काहींबद्दल तर लिहायलाच हवे असेही वाटले.
शाळेत असताना आम्हाला इतिहासाला बापट बाई होत्या. नागनाथपाराजवळ राहणार्‍या सदाशिव पेठी. कोकणस्थी तेज त्यांच्या चेहर्‍यावरुन ओसंडत तशा त्या किंचित ठेंगण्या म्हणाव्यात अशाच. गोरा रंग तर असा की चिडल्या की रागाने लाल होत असत. त्यांना बोलताना किंचित डावीकडे मान हलवायची सवय होती. त्यांची ती लकब शाळेत प्रसिध्द होती. बाई फक्त इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्रच शिकवायच्या नाहीत तर आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेचं नेतृत्व करायच्या. त्यांची शिस्त इतकी कडक असायची की स्पर्धांची तयारी करणार्‍या मुली ग्राऊंडवर तोंडातून शब्द काढत नसत. खो खो स्पर्धांची तयारी घेताना बाई स्वत: मुलींसोबत खोखो खेळत. कबड्डीचीही तयारी करुन घेत. आसन स्पर्धा आणि खो खो स्पर्धांसाठी बाई असल्या की शाळेला ढाल मिळणारच. आख्ख्या शाळेला त्या लहानशा मूर्तीचा आदरयुक्त धाक होता. मुलींना पटांगणात रांगेत उभं करायचं असलं की तो सावळा गोंधळ सावरायला बापट बाईच हव्यात. "हिरवा स्वेटर घातलेली मुलगी, काय बागेत आलायत का??" माईक वरुन त्यांचा कडक आणि धारदार आवाज आला की शांतता! बाई चिडल्या की काही खरं नसायचं.
पण याच बाई जेव्हा वर्गावर तासाला यायच्या तेव्हा फार मजा यायची. स्पर्धांच्या तयारीत किती तरी तास ऑफ जायचे. तरीही बाईंना मागे आपण कुठं थांबलो होतो ते बरोबर आठवायचं. इतिहास तर त्यांनी नेहमीच गोष्टरुपानं शिकवला. मुघल संस्कृती, फ्रेंच राज्यक्रांती, भारताचा स्वातंत्र्यलढा शिकवावा तर त्यांनीच. पुस्तकाबाहेरच्याही कितीतरी गोष्टी जाता जाता सांगून जात. मुहम्मद तुघलकानं केलेली छळवणूक, हिटलरनं ज्यूंवर केलेले अत्याचार त्या सांगत असताना तास झाल्यावरही कितीतरी वेळ वर्ग शांत राहिलेला अजून आठवतो. बाई इतिहास शिकवताना भूगोलाचा संदर्भ घ्यायच्या आणि भूगोल शिकवताना इतिहासाचा. म्हणजे भौगोलिक परिस्थिती आणि संस्कृतींचा उदय, भरभराट आणि अस्त यांची अशी काही सांगड घालायच्या की दोन्ही विषयांचा घरी जाऊन अभ्यास करायची वेळच आली नाही. घटना कालानुक्रमे लावा या प्रश्नाची कशी रेवडी उडवायची याची त्यांनी मस्त युक्ती सांगितली होती. मला इतिहास भूगोलात नेहमीच पैकीत पैकी मार्क मिळायचे ते त्यांच्यामुळेच. बाईंची जितकी भीती वाटायची तितकाच आदर, कौतुकही. क्रीडा स्पर्धांसाठी बाई जिवाचं रान करत. रात्री आठ शिवाय बाई कधी शाळेतून बाहेर पडलेल्या आठवत नाहीत. जेव्हा शाळेला ढाल किंवा करंडक मिळे तेव्हा खाली अंगणात बाईंना आणि स्पर्धक मुलींना उभं करुन चारी बाजूंच्या गॅलर्‍यांमधून सर्व मुलींना उभं केलं जाई. मग जोरजोरात शाबास शाबास? शाब्बास!! चा आवाज घुमे. बापट बाईंसाठी प्रचंड टाळ्या वाजवल्या जात. बाई सार्‍यांच्या खूप लाडक्या होत्या. माझी आईही याच शाळेत होती. आणि ती असताना बापट बाई नुकत्याच रुजू झाल्या होत्या. तेव्हा त्यांचे माहेरचे नाव डोंगरे बाई होते. हे मला कळाले तेव्हा खूप गंमत वाटली होती.
२ वर्षांपूर्वी कळाले की बाई गेल्या!! अचानक सकाळ मध्ये आमच्याच एका बाईंनी त्यांच्यावर लिहीलेला लेख दिसला! तेव्हा कळाले बाईंचे नाव सौ. उज्ज्वला बापट होते. खूप मोठा धक्का होता तो. बाईंचे वय फार नव्हते. पण त्यांना पॅरलिसिसचा अ‍ॅटॅक आला आणि दोन महिने आजारी पडून त्या गेल्या. त्यांचा असा शेवट व्हायला नको होता. हळहळलो. शाळाही हादरली असणार. आम्हाला दिसत होत्या त्या साडी नेसलेल्या, तोंडात शिट्टी घेऊन ग्राऊंडवर खो खो खेळणार्‍या, पळताना लालेलाल झालेल्या छोट्याशा बापट बाई. अंगणात रांगेत उभं राहताना दंगा केला की माईकवरुन आवाज देणार्‍या कडक शिस्तीच्या बापट बाई. गॅदरिंगलाच फक्त छान मोत्याची माळ घालून नटून येणार्‍या सुंदर बापट बाई. पेपर देताना पैकीत पैकी मार्क दिसले की दुर्मिळ वाटणारं हसू चेहर्‍यावर उमटलेल्या बापट बाई. इतक्या ताठ, कणखर, शिस्तप्रिय बाईंना शेवटी पॅरलिसिस व्हावा? त्यांना नक्कीच सहन झालं नसणार ते. शेवटची शिट्टी त्यांनी स्वत:साठीच फुंकली असणार. सगळी गडबड,धावपळ,खेळ आटोपता घेण्यासाठी.

शेवटची शिट्टी त्यांनी स्वत:साठीच फुंकली असणार. सगळी गडबड,धावपळ,खेळ आटोपता घेण्यासाठी.

बेफिकीर, आगाऊ , आशूडी छान लिहिलंत. Happy

आगाऊ, मस्त!
'दीज आर द एफर्ट्स टू शो एफर्टलेसनेस!'>> कायमची नोंद करून ठेवावी असं वाक्य आहे. खूप छान!

आशू, खूपच छान! खूप आवडली तुझी आठवण.
<<जेव्हा शाळेला ढाल किंवा करंडक मिळे तेव्हा खाली अंगणात बाईंना आणि स्पर्धक मुलींना उभं करुन चारी बाजूंच्या गॅलर्‍यांमधून सर्व मुलींना उभं केलं जाई. मग जोरजोरात शाबास शाबास? शाब्बास!! चा आवाज घुम<< हे वाचूनच रोमांच उभं राहिलं अंगावर... हे प्रत्यक्ष अनुभवणार्‍यांना किती सुंदर वाटत असेल. पोस्टीचा शेवटही हृद्य केला आहेस.

आवडता शिक्षक :- आशु सेन्सेई!

शिक्षक म्हटलं की सहसा डोळ्यासमोर येणारी व्यक्ती असते मध्यम वयाची. मग वयानुरूप चष्मा, अंगाने थोडे जाड असणे असू शकते. ह्याच्यापेक्षा थोडा फरक दिसेल, तो कॉलेजच्या वयात. इथे कधीकधी काही मित्र एकमेकांना एखादा विषय शिकवतील, नंतर त्यांच्याच सोबत दंगामस्ती घडेल. हे शिक्षक कधीकधी परीक्षेच्या दोन दिवस आधी, आणि बरेचदा परीक्षेच्या आदल्या रात्री येतात. वर्षभर न समजू शकलेल्या गोष्टी काही तासात आपल्या डोक्यात जिरवून अवघ्या काही तासात आपली नैया पार लावून देतात! आजपर्यंत भेटलेल्या अशा अनेकानेक गुरु लोकांना वंदन वगैरे करून त्यापैकी सर्वात आवडत्या गुरुबद्दल सांगावं म्हणतो.

"बंटी आणि बबली" मधे अमिताभ बच्चनने सांगितलंय त्या स्टायलीत म्हणायचं तर, "ये वर्ल्ड है ना वर्ल्ड, इसमे दो तरह के गुरु होते हैं. एक, ज्यांना त्यांच्या विषयातलं काहीच शिकवता येत नसतं आणि दुसरे, ज्यांना सगळं येत असतं, पण तो विषय शिकवण्यायची इच्छाच नसते". आशु सेन्सेई हे तिसर्‍या प्रकारचे शिक्षक होते. आपण आयुष्यात जे काही शिकतो, ते अशा प्रकारच्या शिक्षकांमुळेच! आशु सेन्सेईंना त्यांच्या विषयातलं सगळं येत होतं, आणि आपल्या समोर आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जपानी भाषेच्या अभ्यासाची गोडी लागावी अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती.

आशुतोष देशपांडे.
वय वर्ष : २०, शिक्षण : बीसीएस (कॉम्प्युटर सायन्स) ची परीक्षा दिलेली, निकालाच्या प्रतिक्षेत. कॉप्युटरचा अभ्यास सांभाळून, गेली तीन वर्षे जपानी भाषेचा अभ्यास. जपानी भाषेमधे दाखवलेल्या गुणवत्तेमुळे, जपान फाऊंडेशनच्या एका शिष्यवृत्तीसाठी पुण्याहून शिफारस झालेली, अंतिम निर्णयाच्या प्रतिक्षेत.

ही २००२ ची गोष्ट आहे.
आशुतोष माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठा. आमचं कॉलेज एक आणि कॉम्प्युटरचा क्लासही एकच. पण तरीही फार ओळख नव्हती. क्लासमधे अचानक एके दिवशी "जपानी भाषा शिका!" असा बोर्ड लागलेला दिसला, आणि चौकशी करता शिक्षक कोण, तर "आशुतोष" असा बोध झाला. मीही नेमका तेव्हाच, 'नुसतं कॉम्प्युटर शिकण्यापेक्षा काहीतरी जास्त असलेले बरे..' अशा विचारात असल्याने लगेच फी भरली. त्या दिवसापासून आमच्यासाठी त्याचे नाव, 'आशु सेन्सेई' अर्थात 'आशुतोष गुरुजी' झाले!

कुठलाही विषय शिकवताना तो जास्तीत जास्त सोपा करून शिकवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यातून जपानी भाषा मुळातच क्लिष्ट कारण त्यात 'कांजी' अर्थात चित्रलिपी असते. तिचा अभ्यास हा फक्त आणि फक्त सरावानेच होतो. आता, रोज नेमानं नुसती ती अगम्य अक्षरं गिरवली म्हणून कोणाचा सराव झाला असता, तर अजून काय हवं होतं? आशु सेन्सेईंनी पहिलं काम केलं, ते त्या भाषेबद्दल प्रेम आणि कुतुहल निर्माण करण्याचं!

आठवड्यातून तीन दिवस, संध्याकाळी ७.३० ते ०९.३० आमचा क्लास असे.
रोज थोड्या थोड्या कांजी स्वतः व्हाईटबोर्डवर लिहून दाखवणे - त्यांचा उगम, त्यांच्यापासून बनणारे शब्द सांगणे - विचारलेल्या कुठल्याही शब्दाचा त्वरीत अर्थ सांगणे - चुकून कधी ते शक्य न झाल्यास त्यात कमीपणा न मानता "हा माझा श्युकुदाई!" असं हसून म्हणणारे आशु सेन्सेई आठवतात. चांगल्या गोष्टी विरळा असणार्‍या ह्या दुनियेत, 'तुमची शंका म्हणजे माझा श्युकुदाई अर्थात 'गृहपाठ!' असं म्हणणारे सेन्सेई, अगदी देवासारखे वाटत!

सुरुवातीला पन्नास साठच्या संख्येने जमणारे विद्यार्थी, कॉम्प्युटरची परीक्षा आली तसे कमी-कमी होत गेले. कॉम्प्युटरची परीक्षा हे एक कारण, आणि जपानी भाषेतली नवलाई संपून डोकेफोड करायला सुरु होणे हे महत्त्वाचे कारण होते. ही गोष्ट आशु सेन्सेईंच्या लक्षात येणारच होती. "मी स्वतः एकाच वेळी कॉम्प्युटर आणि जपानीचा अभ्यास केलेला आहे. आणि जर मी करू शकतो तर तुम्ही का नाही?" असं जीव तोडून सांगणार्‍या आशु सेन्सेईंना पाठ दाखवणं बहुतेकांना जमलंच नाही. "थोडे दिवस विश्रांती घ्या हवी तर, पण इतके दिवसांचा अभ्यास वाया जाऊ देऊ नका!" हा त्यांचा आग्रह आम्ही मोडू शकलो नाही. सर्वांनाच त्यात यश मिळाले नसेलही, पण मरगळ झटकून टाकण्याचा प्रयत्न मात्र प्रत्येकाने केल्याचं आठवतंय.

"भाषा ही गोष्ट घोकंपट्टी करून येण्यासारखी नाही. घोकंपट्टीने शब्द पाठ होतील, पण व्याकरणाशिवाय बोलणं कसं जमणार? सतत बोला. जे काही मराठीतून बोलता, हिंदी / इंग्रजी किंवा ज्या कुठल्या भाषेतून बोलता, तेच सारं जपानीमधून बोलण्याचा प्रयत्न करा, अडलं तर मी सांगेन, पण बोला! किंवा असं करूया. आजपासून नियम, क्लासमधे फक्त आणि फक्त जपानीमधेच बोलायचं!"

त्या दिवसापासून आमचं जग बदलून गेलं. रस्त्यावरून जात येता मित्राशी बोलायचं ते जपानीमधून. विषय काहीही असो. म्हणजे, "हे काय आहे? - ही 'बस' आहे. - ही कुठे जाणारी बस आहे? - ही कोथरूडला जाणारी बस आहे. - कोथरूडला जाणारी बस, जाताना अमेरिकेहून जाते का? - नाही. कोथरूडला जाणारी बस, जाताना अमेरिकेहून जात नाही. - स्वित्झर्लंडहून जाते का? - हो, स्वित्झर्लंडहुन जाते. - ती कोण आहे? - ती एक सुंदर मुलगी आहे. - ती तुझी बहीण आहे का? - नाही नाही, ती माझी बहीण नाही, खरे तर ती तुझीच बहीण आहे. "

परीक्षेपुरतं शिकवणारे शिक्षक आणि विषयाची गोडी लावणारे शिक्षक ह्यातला फरक सगळेच जाणतात. आशु सेन्सेईंनी दोनही गोष्टी केल्या. जेव्हा वेळ कमी होता, तेव्हा फक्त परीक्षेपुरता अभ्यास, पण थोडा रिकामा वेळा मिळताच पुन्हा सगळं - सगळं समजावून सांगणं. जपानी भाषेची विशेष आवड आणि गुणवत्ता दाखवणार्‍यांना वेगवेगळ्या वेबसाईट्स किंवा पुस्तकं आणून देणं असो, किंवा तितकेसे प्रगत नसलेल्यांना किमान काठावर आणण्यासाठीची धडपड असो, त्या सहा महिन्यांच्या काळात मी बरेचदा बघितली आहे.

सांगण्यासारखं तसं बरंच काही आहे, पण तरीही विशेष जाणवलेली एक गोष्ट सांगाविशी वाटते.
"आशुतोष, म्हणजे वीस वर्षांचा एक मुलगा. कॉलेज संपत आलेलं, आणि आता निकाल लागून नोकरी मिळण्याच्या प्रतिक्षेत. आपल्याला येत असलेली 'जपानी भाषा', हे अ‍ॅसेट, आपल्या प्रतिस्पर्ध्यांना शिकवून आपल्या नोकरीच्या शक्यता कमी करण्याची हुशारी करणारे किती लोक तुम्हाला माहिती आहेत?"

"जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी शिकवावे. शहाणे करून सोडावे, सकळ जन!"
काहीसे ह्या वचनाप्रमाणे वागणारे ते २००२ मधले आशु सेन्सेई आठवले, की मन उचंबळून येतं. नि:स्वार्थ बुद्धिने शिकवण्याचे काम करणारा हा आमचा मित्र. असं वाटतं, की परत एकदा तो जपानीचा वर्ग भरावा, परत एकदा ७.३० वाजावेत. सगळेजण बोलत असताना अचानक वर्गात येऊन "मिनासान कोंबांवाऽ! ओ गेंकी देस काऽ?" असं झुकुन म्हणणारे सेन्सेई दिसावेत! साधारण साडेनऊ वाजल्यावर जपानीचा तास संपवताना ते म्हणायचे ते पेटंट वाक्य बोलून, आजचं लिहीणं इथेच थांबवतो!

"मिनासान, क्योऽवा कोरेदे ओवारीमास!" अर्थात, "लोकहो, आज इथेच थांबूया!" Happy

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

* कोंबांवाऽ :- गुड इव्हिनिंग
* ओ गेंकी देस का - कसे आहात?"
* आशुतोष देशपांडे : - https://www.facebook.com/ashu.deshpande

तशा खूप आठवणी आहेत...पण एक,अगदी लहान वयातली माझ्या वर्गशिक्षिकेची आठवण..जी मी कधीच विसरू शकत नाही...त्यात माझंही मीच कौतुक(शिरोडकर नव्हे) केलंय...ते सोडून वाचा.

१९५८ च्या १५ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन! त्याच्या शालेय आयुष्यातील पहिलाच!मालाड मधील समस्त शाळेच्या मुलांना मालाडमधीलच एका नामांकित शाळेच्या मैदानावर जमायचे होते.विद्यार्थ्यांच्या नेण्या-आणण्याची जबाबदारी ज्याच्या त्याच्या पालकांवर सोपवण्यात आलेली होती. तोही आपल्या वडिलांबरोबर मैदानावर येऊन दाखल झाला.तिथे वर्गशिक्षिका चाफेकरबाईंकडे त्याला सोपवून त्याचे वडील काही कामानिमित्त निघून गेले. कार्यक्रम कधी संपू शकेल ह्याची पूर्वकल्पना माहीत करून घेऊन त्यावेळी आपण उपस्थित राहू असे आश्वासन जाताना त्यांनी त्याला आणि बाईंना दिले. आपल्या शाळकरी सवंगड्यात तो मिसळला आणि समारंभ सुरू होण्याची वाट पाहू लागला.

सरतेशेवटी समारंभ सुरू झाला. प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मग त्या डौलदारपणे फडकणाऱ्या झेंड्याला सामुदायिकपणे वंदन करून झाले. राष्ट्रगीत झाले. मोठ्या वर्गातील स्काउटच्या मुलामुलींनी सामुदायिकपणे संचलन सादर केले. त्यांनी ध्वजाला प्रणाम केला आणि मग पाहुण्यांना मानवंदना दिली. देशभक्तिपर गीते आणि स्फूर्तिदायक गीतांचे गायन सादर करताना मुलांबरोबर शिक्षक आणि पाहुणेही भारावून गेले. मग पाहुण्यांनी मार्गदर्शनपर चार शब्द सांगितले आणि तो रंगलेला कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर मुलांना पेढे वाटले गेले.

त्याच्या शालेय आयुष्यातील(इयत्ता १ली) तो पहिलाच स्वातंत्र्यदिन असल्यामुळे तोही इतरांसारखाच भारावून गेला होता. कधी एकदा घरी जातो आणि हे सगळे आई-वडिलांना सांगतो असे त्याला झाले होते. ज्यांचे पालक हजर होते ते आपापल्या मुलांना घेऊन जाऊ लागले. एकेक करत आपली मित्रमंडळी घरी जाताहेत हे पाहून त्यालाही त्याच्या वडिलांची तीव्रतेने आठवण व्हायला लागली. होता होता शेवटी मैदान रिकामे झाले आणि तो चाफेकर बाईंचा हात घट्ट धरून (घाबरला होता)आपल्या बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. आता त्याला ते वाट बघणे असह्य व्हायला लागले आणि त्याने रडायला सुरुवात केली. आधी हळूहळू स्फुंदत मग त्याने चांगलाच 'आ'कार लावला.त्याच्या ह्या रडण्याने बाईदेखील भांबावून गेल्या. त्यांनी त्याच्या त्या 'आ' केलेल्या तोंडात एक पेढा टाकला.पेढा चावण्याच्या निमित्ताने त्याचे रडणे क्षणभर थांबले आणि पेढा संपल्यावर पुन्हा सुरू झाले. बाईंना काय करावे काही सुचेना.त्यांना त्याचे घरही माहीत नव्हते आणि त्यालाही ते कुठे आहे हे नीट सांगता येत नव्हते.त्या त्याची समजूत घालायचा आणि रडणे थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्याने आ वासला की बाई तोंडात पेढा भरवत होत्या. तो तेवढा वेळ गप्प की मग पुन्हा रडगाणे सुरू करी. बाईंच्या हातातील पेढ्याच्या खोक्यातले पेढे संपत आले तरी त्याचे रडणे थांबत नव्हते.बाईदेखील रडकुंडीला आल्या. त्याला ओरडावे असे बाईंना क्षणभर वाटून गेले पण त्या गोंडस (खरेच तेव्हा तो तसा होता!खोटं नाही सांगत. हवं तर हरितात्यांना विचारा!!)मुलाला ओरडणे त्या आई इतक्याच प्रेमळ बाईंना शक्यच नव्हते.आता ह्याला कसे आवरायचे हे काही त्यांना कळेना.पण त्यांचे नशीब थोर म्हणून दूरून घाईघाईत येणारे त्याचे वडील त्यांना दिसले आणि एकदाची त्यांची ह्या गंभीर प्रसंगातून सुटका झाली.

वडिलांनी जवळ येताच उशीर झाल्याबद्दल बाईंची क्षमा मागितली आणि मग आपल्या मुलाने दिलेल्या त्रासाबद्दल पुन्हा एकदा क्षमा मागितली. इतका वेळ रडकुंडीला आलेल्या बाई आता सावरल्या होत्या. त्यांनी उलट त्याचे कौतुकच सांगायला सुरुवात केली. तो कसा रडत होता;मध्ये मध्ये पेढा भरवल्यावर कसा गप्प व्हायचा आणि मग पुन्हा कसा रडे सुरू करायचा,आणि रडतानादेखील किती गोड दिसत होता वगैरे वगैरे.आधीच सर्व मुलांच्या आवडत्या असलेल्या बाई त्या तसल्या अवस्थेतही त्याला अधिक आवडून गेल्या. बाईंकडे पाहून त्याने एक स्मितहास्य केले आणि त्यांचा निरोप घेऊन आपल्या बाबांचा हात धरून तोंडाची टकळी चालवत, उड्या मारत मारत तो मार्गस्थ झाला.

छान लिहिलंय सगळ्यांनी. चिंचाळकर सरांबद्दल अगदी सहमत. माझे पण वर्गशिक्षक होते १० ला. खरच देवमाणूस!

१. शिंत्रे सर -
डोंबिवलीकरांना संस्कृत शिकवणारे (visually challenged) शिंत्रे सर माहीत असतीलं. त्यांच्या क्लासमधे मुलांनी धडा वाचायचा आणि सरांनी शिकवायचं अशी पद्धत होती, आम्ही समोर दिसत असलेलही चुकीचं वाचलेलं सरांना बरोबर कळायचं.कितीतरी वेळा क्लास लवकर सुटावा म्हणून आम्ही चुकीची वेळ सांगायचो, नंतर कळलं की सरांकडे काच काढलेलं एक घड्याळ होतं, तरी सरांनी कधी लवकर नाही जायचं असं म्हणून थांबवलं नव्हत, कधी आमचे आवाज कंटाळवाणे वाटले की नुसतेचं वेगवेगळे श्लोक सांगून पाठ्येतरची तयारी करून घ्यायचे.

त्यांच्या न दिसण्याचा फायदा घेउन एकदा पावसाळ्यात लाईट गेलेले असताना आम्ही मुलं मेणबत्तीमधे हात / बोट घालण्याचा चाळा करत होतो (आता लिहिताना पण स्वतःचा राग येतोय) , त्यांच्या मुलाने पाहील्यावर आमची चांगलीचं खरडपट्टी काढली, पण सर एका शब्दाने कोणाला काही म्हणाले नाहीत. पुढचे काही दिवस मला सरांशी बोलायाचीही लाज वाटत होती, तेव्हा सरांनी "तुम्ही मुलं एवढ्या पावसात आलात म्हणून मी शिकवत होतो, सांगितलं असतं कंटाळा आलाय तर सोडलं असतं" असं म्हणाले तेव्हा तर मेल्याहून मेल्यासारखं झालं Sad Sad

२. उदय आणि प्रसाद तांबे -
सिनियर कॉलेजचे मॅथ्स चे क्लास घेणारे हे दोघं भाऊ. डोंबिवलीचं नाही ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर सगळीकडून सरांकडे मॅथ्स शिकायला मुलं येतात. मी रुईयाला आर्ट्स ला होते पण मला Maths मधे specialization करायचं होतं, तेव्हा SYBA ला मी प्रसाद सरांकडे क्लास लावला. दोघही भाऊ अतिशय हुषार आणि student-friendly. सगळ्या मुलांना सर मित्रचं वाटतं. एखादा टॉपिक ऑप्शनला टाकायचा असेल तर सरांना स्पष्ट सांगून क्लासमधून बाहेरही पडता येत असे. सुट्टीत सर सलग ४ तास क्लास घ्यायचे, तेव्हा सुरूवातीला सांगत की कंटाळा आला, डोक्यात काही शिरत नाहीये असं वाटलं की लगेचं सांगा, चहाचा ब्रेक घेऊ. आम्ही सुद्धा हक्काने चहा घेत असू Happy . एखादं theorem सर इतके छान समजावत, की अगदी बिघडलेलं पोरही रंगून जाईल. कधी खूपदा सांगूनही आमच्या चेहर्‍यावर प्रश्णचिन्ह दिसलं की त्यांनाचं गिल्टी वाटे की मी सोप करून नाही सांगू शकलो Happy

उभ्या आयुष्यात ह्या २ सरांना कधीही "तो" म्हणणं जमणार नाही, साधारण क्लास संपला की मुलं उदयदादा, प्रसाददादा म्हणायला लागतात, पण आदरापोटी म्हणा किंवा काही मी अजून "सर" मधून बाहेर नाही आल्ये. शिक्षक कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण हे दोघं भाऊ.

बेफिकीर तुमची पोष्ट खूप आवडली. कळकळिने लिहिलय ते पोहोचतय वाचकांपर्यंत. Happy

हा बाफ वाचल्या वाचल्या डोक्यात पहिलं नाव आलं ते खाडिलकर बाईं यांचं...
त्या आम्हाला संस्कृत शिकवत. मी इयत्ता ६वी आणि ७वीत टिमवि च्या संस्कृतच्या २ परिक्षा दिल्या होत्या त्याचा अभ्यास खाडिलकर बाई घेत. तेव्हा आम्हाला मुख्य अभ्यासक्रमात संस्कृत हा विषय नव्हता. मला चांगले मार्क पडल्याने त्या मला ओळखत असत. इयत्ता ८वीत त्या आम्हाला शिकवायला आल्या. त्या खरंतर गोर्‍या नव्हत्या त्यांना ल्यूकोडर्मा होता त्यामुळे त्या संपुर्ण गोर्‍या दिसत.:( केसाची एक विशिष्ट रचना, शिवाय कपाळाला कुंकु आणि त्याखाली अजुन एक छोटा ठिपका ही त्यांची स्टाईल. साडीचा पदर दोन्ही खांद्यावर. त्यांचा पदर एका खांद्यावर आलेला (अगदी चुकुनही) मी ५ वर्षात एकदाही पाहिला नाही. स्वभाव अतिशय मृदु, विद्यार्थिनींना शिस्त लावण्यासाठी मारणे गरजेचे आहे हे त्यांच्या कोशातच नव्हते. त्यांनी एकदा समजावून सांगितल्यावर तीच चूक पुन्हा घडेल? काय बिशाद? पण ते समजावणं कधीही, आवाजाच्या एका विशिष्ट पातळीतच घडे. त्यांचा आवाज चढलेला मी कधीच ऐकला नाही.
शाळेत एक फॅड असते, आवडत्या शिक्षिकांना फुल/गजरा द्यायचा. आमच्या वर्गातल्या एका मुलिच्या घरी गुलाबाचं झाड होतं.. ती नेहमी आणायची. तिचं पाहून एकदा एका मुलिने गुलाब विकत आणून बाईंना दिला.. बाईंनी तिला प्रेमाने विकत आणून मला देऊ नको असं न दुखवता सांगितलं.
संस्कृत हा विषय म्हणलं तर प्रचंड सोपा नाहीतर प्रचंड कठिण. सुभाषितं, त्यांचे अर्थ.. त्या वारंवार सुंदर प्रकारे समजावून सांगत. काही मुलिंना ते तरिही समजले नाहीत तर त्या पुन्हा पुन्हा ते सांगत. एकदा तर असा प्रसंग आला की एका मुलिने सुभाषिताच्या अर्थात काहीतरी (डेव्हिएटेड) शंका काढली. सर्व वर्ग+ बाई विरूद्ध ती मुलगी असं चर्चासत्र संपुर्ण तासभर रंगलं होतं. मुली जाम कंटाळल्या, तिचा नाद बाईंनी सोडावा असं वारंवार सांगत होत्या.. पण बाईनी ठामपणे सांगितलं की ती सुद्धा तुमच्या सारखीच माझी एक विद्यार्थीनी आहे, तिच्या सर्व शंका दूर करणं हे शिक्षक म्हणून माझं कर्तव्य आहे.
पुढे त्याच बाई शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या.. गंमत म्हणजे त्यांचे पती आम्हाला संगित शिकवत. एकदा कोणतीतरी महत्वाची कॅसेट ते शाळेत आणायला विसरले म्हणून परत घरी गेले आणि शाळेची प्रार्थना झाल्यावर आले, बाईंनी त्यांना उशिर झाला म्हणून घरी पाठवले. हा किस्सा त्यावेळी आमच्या एज्युकेशन सोसायटीत प्रचंड गाजला होता.
इयत्ता नववीत मी वर्गाची लिडर होते आणि पहिल्या पासूनच 'ब' तुकडीत Proud त्यावेळेला 'अ' तुकडीला संपुर्ण १०० मार्कांचं संस्कृत, 'ब' वर्गाला हिंदी-संस्कृत ५०-५० मार्कांचं विभागून होतं. (माझ्या हिंदिचा तर अजूनही आनंद आहे. :फिदी:) मी लिडर असल्याने, शिवाय ६वी ७वीत संकृतच्या परिक्षा दिल्याने त्या विषयाची चांगली ओळख मला झाली होती. आम्हाला ही अ तुकडीप्रमाणे १०० मार्काचे संस्कृत त्यांनी करून द्यावे अशी मी गळ घातली. त्यावर त्यांनी पटापट हालचाली करून आम्हाला ते करूनही दिले. त्या विषयात फारशी गती नसलेल्या मुलिंकडे विशेष लक्ष दिले. वेळप्रसंगी अधिक तास सुद्धा घेतले.
अजून बर्‍याच आठवणी आहेत, पण या ठळक आणि डोक्यात फिट बसलेल्या..
बाबा सुद्धा त्या एज्यु. सोसा. मधून रिटायर झाले पण शिक्षक मित्र असल्याने अजूनही शाळेच्या बातम्या मिळत राहतात. खाडिलकर बाईंच्या मृत्यूची सुद्धा बातमी बाबांकडूनच मिळाली. कोणता तरी पुरस्कार स्विकारताना स्टेजवर त्यांना हार्टअटॅक आला असं ऐकलं. नक्की माहीती नाही. Sad

खाडिलकर बाई आणि इतर असे अनेक शिक्षक विविध कारणांसाठी प्रिय होते. त्यांच्याबद्दल पुढच्या पोष्टमध्ये........ सध्या इथेच थांबते. Happy

माझे आवडते शिक्षक? आबा, शिक्षक नव्हे गुरूच अरे गुरू नव्हे गुरूमाऊलीच ती!

पहिली ते पाचवी शिक्षण सॉल्लीड मनोरंजक होतं. सकाळी उठून सुभाषितं, नंतर वहीच्या पानावर लिहिलेला तो सुविचार, स्वच्छ गणवेष आणि शेणानं सारवलेल्या भुईवर बसलेले अवघे वीस पंचवीस विद्यार्थी. त्यातही मुलींची संख्या जेम-तेम म्हणजे हाताच्या बोटांवर मोजण्या इतकीच. पहिला नंबर मिळवण्यासाठीची धडपडही दिसत नव्हती. खरंतर मला पहिल्यापासूनच शाळेचा कंटाळा, शाळेला अचानक सुट्टी मिळावी आणि मला चकाट्या पिटत भटकायला मिळावं अशीच काहीशी स्वप्नं पडायची. पाचवी पर्यंत पहील्या पाचांमधे तर सोडा पण शेवटच्या पाचांमधे पण मी पाचवाच यायचो. हि पंजोबांचीच पुण्याई म्हणावी लागेल की प्रत्येक पुढच्या वर्गात मी घरच्याच वशिल्यानं पहिला नं. मिळवणार्‍या विद्यार्थ्यापेक्षापण अभिमानानं जायचो. बक्कळ पैसा, घोड्याची गाडी असा काहीसा रुबाब असायचा त्यांचा अगदी आयुष्याच्या शेवटापर्यंत तसाच राहीला. आमच्या एकत्र कुटुंब इतकं मोठं होतं कि एकत्र जमल्यावर घर रंगीबेरंगी जत्रा भरल्यासारखंच वाटायचं. अशीच एकदा जत्रा भरलेली असताना, घरी श्री. जगताप मास्तरांनी मला बदडत बदडत आमच्याच घरातल्या आंगणात आणला आणि एकच आरोळी टाकली आहो, रघुनाथ आबा, हा बघा तुमचा पंतू, एवढसं ठेंगणं ह्या वयात स्वत:ला साहबजादा समजायला लागलंय. माफ करा, पण हा खरा वारसदार शोभतोय तुमचा". आबा, काहीच बोलला नाही. फक्त जगताप मास्तरांना सांगितलं, संध्याकाळी भेटतो तुम्हाला. एवढ्या वेळेस माफ करा. यापुढे असं होणार नाही. हे पाहून मला आबाची थोडीशी चीडंच आली. काय करणार, एवढा मोठा आबा पण एका मास्तुरड्याची माफी मागतोय हे माझ्या सारख्या सनकी बुद्धीला न पटण्यासारखं होतं. मी लगेच आबाच्या मागं खोलीत शिरलो आणि आबाला विचारलं.. "काय हो आबा", तुम्ही त्या मास्तराची माफी का मागितलीत? आबानं एक नाही दोन नाही.. मी परत विचारलं तरीही काहीच नाही. काही वेळानं मी परत त्याच्या जवळ गेलो आणि परत एकदा विचारलं तेव्हा मात्र आकाशात लख्ख वीज चमकून ते पाताळाला छेदत खवळावी असा आवाज झाला आणि माझ्या कानशिलावर आबांची चार बोटे मुद्रांकित झाली. मी एका फटक्यात चड्डी ओली केली. कारण कानात दरवर्षी आख्ख्या सुपार्‍या फोडणारा, दररोज तालमीत तीन तास व्यायाम करणारा आबा जेव्हा मारतो तेव्हा काय होणार याची कल्पना सुद्धा भयानकच आहे. तेवढ्यात, सगळी जत्रा खोलीत आणि खोलीतला आबा बाहेर अंगणात. तो दिवस आयुष्यातला झणझणीत दिवस मी आजही विसरणार नाही.

दुसर्‍या दिवशी आबानं मला पहाटे तीन वाजताच उठवलं आणि म्हणाला, चल रे आज पासुन तुझ्या शाळेला सुट्टी आपण शेतावर जायचं आणि तिथं तुला दिवसभर जसं वागायचं तसं वाग पण मी सांगितलेल्या कामाची सवय झाल्यावरचं. मला थोडसं बरं वाटलं काळा फळा असलेला शाळा नामक कोंडलेला पिंजरा मला नकोच होता तसाही. पहिल्यांदा त्यानं मला शेतातलं तण गोळा करायला सांगितलं, तेव्हा त्यानं समजून सांगितलं कि, "आपल्या आयुष्यातही असंच तण माजत असतं आणि आपण त्याला जेवढं खत पाणी घालतो तेवढंच ते माजत जातं तेव्हा त्याला वेळीच छाटला पाहीजे". ह्या सगळ्यावर वेळच्यावेळी नियंत्रण असायला हवं". मग त्या तणातला किडा जागा व्हावा तसा माझ्यातलाही किडा जागा झाला आणि विचारलं, आबा, हे तण चरायला गुरं आहेतच कि त्यांना सोडूया आपण ह्या रानात". तेव्हा त्याची ठरलेली शिवी .. राxxxच्या, गुरांपेक्षा वायफट आहेस तु. तण जर तसंच ठेवलं तर पिकाला नुकसान होतं आणि गुरांना भरल्या पिकांच्या रानात सोडलं तर पिक राहील का? तुला जसं शेलकं खायची सवय आहे ना मग तशीच ह्या गुरांना सुद्धा आहे. तेव्हा मला रघुनाथ आबानं आयुष्यभर पुरून उरणारा आणि इतरांना शिकवता येणारा पहिला धडा शिकवला. मी मज्जा करून, दमुन , थकून घरी पोहचलो आणि गचा गचा भात गिळून आबाजवळच झोपलो.

दुसर्‍या दिवशी आबा परत लवकर उठला आणि चल उठ म्हणाला, आज आपण पव्हायला शिकायचंय. मला जाम भारी वाटलं. लगेच उठलो आणि आबाबरोबर नदीकडं चालत निघालो. चालता चालता आबाला नको ते प्रश्न विचारून अगदी भांबावून सोडलं. (शी आय डी व्हणारेस का - असं माझी आत्या नेहमी म्हणायची Wink ). नदी जवळ आली तसा आबा म्हणाला थांब हितंच.. मी एक मुटका मारून जरा पोहून येतो. मी हि तिथेच थांबलो. अबानंही, लंगोटपेक्षाही छोटशी स्विमिंग कॉश्च्यूम गुंडाळली आणि थंडगार पाण्यात मारली उडी.. मी बघतच राहीलो. आत्ता आबा वर येईल, नंतर वर येईल पण आबा काय वर येईनाच. माझी तर हवाच टाईट. आयला, आबा बुडाला काय? बराच वेळ झाल्यानंतर आबा परत वर आला दोन मि. आणि परत पाण्याखाली गेला आणि नदीच्या दुसर्‍या टोकालाच बाहेर आला. हे सगळं पाहून नेहमी नदीवर येऊन बेडकाबरोबर बेडूकचाळे करणारा मी आज बेडूक मला चाळवत असल्या सारखे मी स्तब्ध होऊन आबच्या पोहण्यावर लक्ष देत होतो. आबा, पोहून झाल्यावर माझ्या जवळ आला आणि म्हणाला पाणी लय गार आहे आपण दुपारच्याला येऊ नायतर विहीरीवर जाऊयात पोहायला. मी एका आश्चर्याच्या तंद्रीत असल्यानं मान डोलावली आणि आबा बरोबर परत एकदा घरला चालु लागलो. पण माझ्याच प्रश्नांचा भडीमार माझ्यातुन बाहेर पडून आबावर आदळू पाहत होता आणि दोन चार मिंनिटात तेच झालं. आबाला पहिलाच प्रश्न.. पाणी एवढं गार होतं तर मग तु पाण्याच्या आत पव्हला कसा? आबा म्हणाला अरं तसाच पव्हलो. सराव आहे मला. अरं पण तरी पण.. मग माझ्या दुसरा प्रश्न इतका वेळ पाण्याच्या आत मधे होतास मग जीव गुदमरला नाय का तुझा? माझा तर आईनं आंघोळ घालताना एक जरी तांब्या तोंडावर ओतला तरी जातो का राहतो अशी गत होतीया. तेव्हाही त्याचं तेच उत्तर.. माझंही असंच व्हायचं पण १५ वर्ष्याचा सरावानं हे जमतं आता. मग परत माझा पुढचा प्रश्न, वाहतं पाणी व्हतं तरी पलिकडं कसा गेला, तुला भ्या नाही का वाटलं ? श्या, पाण्याला भ्यायचं असतं पण एकदा का दोस्ती झाली कि झाली .. त्यासाठी व्यायाम आणि मनाची तयारी पायजे. तुझ्या समोर जर मी सायीनं भरलेली 'तामतुली' ठेवली तर तु ती मिळवण्यासाठी जितकी धडपड करशीला ना? मी लगेच म्हणालो व्हय मी करीनंच. मग, मला त्या नदीच्या पल्याड बर्‍याच तामतुल्या दिसायच्या.. म्हणूनच मी जिद्दिनं त्या मिळवण्याचा प्रयत्न करू लागलो. तामतुली मिळायची नाही पण मला चांगलं पोहायला यायला लागलं ना?
असंच आपल्याला जे करायचं आहे किंवा आपल्या आयुष्याला जे कलाटणी ( वळण ) देणारं असतं ना ते म्हणजी सायीची तामतुली आणि तु ते मिळवण्यासाठी केलेले खरेखुरे प्रयत्न, कष्ट म्हणजेच त्या सायीला खातानाची गोडी. तेवढ्यात विहीर आली, आबा म्हणाला कपडे काढ मी लगेच काढले. आबाकडं कॉश्च्यूम तरी होती पण माझ्याकडं तेवढी पण नव्हती. पण मला बघणारा आबाच तिथं होता.

आबानं तेवढ्या विहीरीच्या काठावरून मला धक्का दिला आणि मी विहीरीत पडलो. ढुंगाएवढ्या पाण्यात कधी न उतरलेला मी गच्च भरलेल्या विहीरीत कुठल्याही आधाराची मदत न घेता पडलो मग काय होणार. आबा वरून बघत होता आणि मी गटांगळ्या खात बोंबलत होतो. पाच मिनिटे झाली पाच मिनिटात विहिरीत भितीनं दोनदा मुतूनही झालं तरी आबा वरून म्हणत होता. हात पाय हलव, म्हणजी तरंगशील तरी. मी आता खपणार तेवढ्यात आबानं माझ्या कमरेत हात घालून मला वर आणला मी तेव्हा बेशुद्धच होतो. १० मि. मी शुद्धीवर आल्यावर पाहिलं तर झोपाळ्यावर मी तसाच भोंगळा. दोन हातांनी झाकता येईल तेवढा झाकलं. सगळे घाबरलेले, पण आबा समोर बोलायची काही हिम्मत नाही. तेवढ्यात आबा कपडे बदलून माझ्याजवळ आला आणि म्हणाला, कि तुला काय जमत नाय? तु आपला उद्यापासून शाळेतच जा. तेच तुला जमल नाही जमलं तर हा आबा आहेच तुझ्या वशिल्याला टांगलेला. मी गप्प बसलो आणि दुसर्‍या दिवसापासून पुन्हा शाळेत जाऊ लागलो. नंतर मी सहावीच्या वर्गातून पुढच्या वर्गात जाताना मी पहिल्या पाचात नाही पण शेवटच्या पाचात का होईना पण पहिला नंबर मिळवला. जेवढा वेळ मिळेल तेव्हा आबाच्या संगत अश्या बारीक सारीक गोष्टींचा आयुष्यात कसा उपयोग कसा होतो हे समजून घेतलं. मी नववीत असताना दसर्‍याच्या दिवशी 'रघुनाथ आबा' गेला आणि माझ्या तळहातावर आयुष्याच्या सोन्याचं पान ठेऊन गेला. जे अजूनही माझ्याजवळ आहे.

तेव्हापासून, आज तो इथे नसतो तेव्हाही तो असता तर त्यानं मला काय शिकवलं असतं आणि काय करायला सांगितलं असतं यावर विचार करतो आणि बरेचसे कठिण निर्णय मी आयुष्यात घेतो. माझा आबा, माझा गुरू आणि माझा मास्तर माझ्यासोबतच असतो आणि तो मी असे पर्यंत असाच माझ्या सोबत राहणार.

रच्याकने, इथे माझा आवडते शाळेतले शिक्षक यावर लिहणं अपेक्षित होतं तर, मी आवर्जून सांगतो माझा रघुनाथ आबाच माझी शाळा आणि माझा आबाच माझा मास्तर.

*तामतुली म्हणजे दुधासाठीची चरवी किंवा भांडं.

*जगताप सरांनी मला बेदम मारण्याचे कारण म्हणजे मी त्यांच्या पायावर कुदळीच्या दांड्यानं जोरात आघात केला होता आता त्यावेळेसचा माझा जोर म्हणजे कितीसा असेल? पण कारण मात्र शुल्लक होते.
याचीच गंभीर दखल त्यांनी घेतली आणि ती रघुनाथ आबाला व्यवस्थित समजावून सांगितली.

*श्री. जगताप सर अजूनही आहेत, सातारा जवळच्या वीटा गावचे आहेत ते. ८१ वर्षांचे झालेत. उभ्या आयुष्यात एकदाही कुठलाही शैक्षणिक पुरस्कार न स्वीकारलेला रयत शिक्षण संस्थेतला आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक रयतेतला रयतेसाठीचा कडक शिस्तीचा शिक्षक म्हणून त्यांची ओळख. रिटायरमेंट नंतर कित्येक दिवस ते अध्यापन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना 'शिक्षक' कसे व्हावे याचे शिक्षण देत होते.

Pages