सह्यांकन २०११ - भाग ३ : ढाकोबा, दुर्ग आणि मुक्काम अहुपे व्हाया हातवीज

Submitted by आनंदयात्री on 6 January, 2012 - 00:39

सह्यांकन २०११ - भाग १: पूर्वतयारी आणि प्रस्थान
सह्यांकन २०११ - भाग २: आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा
सह्यांकन २०११ - भाग ४ : अहुपे ते सिद्धगड व्हाया गायदरा घाट
सह्यांकन २०११ - भाग ५ : सिद्धगडमाची ते मुक्काम भीमाशंकर व्हाया भट्टीचे रान
सह्यांकन २०११ - भाग ६ (अंतिम) : पदरगड आणि निरोप

साडेपाचला शिट्टी मारून लीडर्सलोकांनी सर्वांना उठवलं. आणि काही 'लाडू' तरीही अंथरूणात पडून राहिले होते, म्हणून त्यांना येऊन पेशल ट्रीटमेंट देऊन उठवलं. 'मोहिमेमध्ये वेळा पाळल्या गेल्याच पाहिजेत' या एकमेव सर्वोच्च नियमाची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली होती. गरमागरम बेड-टी तंबूबाहेरच्या लाकडी कट्ट्यावर तयार होता. 'साडेसहाला पीटीसाठी सर्वांनी शूज घालून आणि सॅक पॅक करूनच यायचे आहे' - इति सौरभ उर्फ बल्लू, आमचा मुख्य लीडर. (लांबामहाराज को-लीडर होते). नाही म्हटलं तरी, इतकी थंडी, त्यात वेळेच्या नियमांनी बांधलेला ट्रेक करायची सवय नाही, पहिल्याच दिवशी आतली सर्व 'प्रेशर्स' वेळेवर येतीलच याची खात्री नाही वगैरे वगैरे गोष्टींचा परिणाम म्हणून मी साडेसहाला धापा टाकत तंबूकडे परतलो तेव्हा, सॅक पॅक करायची बाकी होती आणि शूजही चढवायचे बाकी होते. माझ्या हंटर शूजच्या बांधलेल्या लेसकडे पाहून - 'XXXच्या, उद्या डोंगरामध्ये जर कुणाच्या मदतीसाठी १० सेकंदात शूज काढून XXXला पाय लावून पळायची वेळ आली तर काय करणार आहेस? एक सेशन घ्यायला हवं यावर!' (लांबाच! दुसरं कोण बोलणार इतक्या प्रेमळ भाषेत!)

पीटीसाठी सगळे जण वर्तुळात उभे राहिलो. पीटी म्हणजे इतक्या मोठ्या पायपीटीसाठी शरीराच्या स्नायूंना मोकळे करण्याचे बेसिक व्यायामप्रकार होते. पण त्या ढाकोबाच्या पायथ्याच्या पठारावर उगवतीच्या सूर्याला साक्षी ठेवून सर्वांची वर्तुळातील पीटी हे एक सुंदर दृश्य होते.

पीटी संपली आणि मी सॅक बांधायला पळालो. कमीत कमी आकाराची, सॅकमध्ये बसेल अशी स्लीपिंग बॅगची गुंडाळी करणे हा ट्रेकमधला एक अतिशय कंटाळवाणा प्रकार असतो. सकाळी सॅक भरताना 'नकोच ही स्लीपिंग बॅग' हा एकमेव विचार असतो. (रात्री थंडी वाजायला लागली की काय विचार असतो, ते सांगायला नकोच!) तात्पर्य, पुढच्या ट्रेकला एक 'जादूची' सॅक आणायची हा विचार मी नक्की केला आणि बाहेर आलो. गरमागरम साबुदाण्याची खिचडी तयार होती! अन् त्या खिचडीची चव काय सांगू राजांनु!! केवळ अप्रतिम! सगळ्यांनीच ढाकोबा लगेचच चढायचा आहे हे विसरून यथेच्छ हादडलं. अर्थात पूर्ण मोहिमभर सर्व जेवण, नाष्टा, चहा अनलिमिटेड होतं, हा भाग वेगळा!

बरोब्बर साडेसात वाजता आम्ही १७ 'वारकरी' दोन लीडर्स आणि दोन कँपलीडर्सच्या सोबत ढाकोबाकडे निघालो. अर्धा-पाऊण तास चालून ढाकोबावर पोचलो. ४१४८ फूट उंचीचा ढाकोबा हा डोंगरच आहे, किल्ला नाही! घाटाखालून वर चढणार्‍या अनेक छोट्या मोठ्या वाटांवर लक्ष ठेवायला वगैरे याचा उपयोग होत असावा. इथून व्ह्यू मात्र जबरी दिसतो. माझ्या मते नाणेघाटाचे पठार सर्वात देखणे जर कुठून दिसत असेल, तर ते ढाकोबावरून!

फोटोत जीवधन किल्ला, वानरलिंगी, काल जिथून चढलो ती दरी आणि आजूबाजूचा परिसर -

वरून दिसणारा कँप (झूम करून)

मागे भैरवगडावरून नाणेघाट-नानाचा अंगठा पाहिले होते. त्याच्या बरोब्बर पलिकडच्या बाजूने इथून बघता येते. त्याच रेषेत दूरवर सिंदोळा किल्ला दिसतो. पश्चिमेकडे दुर्ग, थोडंसं उजवीकडे खूप मागे गोरखगड - मच्छिंद्रगड असे ओळखीचे दोस्त दर्शन देतात. ढाकोबावर भन्नाट वारा सुटला होता. थोडा वेळ तिथे टाईमपास करून खाली उतरलो. पुन्हा कँपवर पोचलो तेव्हा नऊ वाजले होते. पॅक-लंच व सॅक घेऊन साडेनऊ वाजता निघायचे होते. त्याप्रमाणे घड्याळाने काटे त्या जागी नेल्यावर आमची परेड निघाली. आता लक्ष्य होते दुर्ग किल्ला!

ढाकोबाला उजव्या हाताला ठेवून झाडीतून एक वाट दुर्ग किल्ल्याकडे जाते. ही वाट बरीच लांब आहे. दोन डोंगर उतरून-चढून असे दोन अडीच तास चालल्यावर एकदाचे आम्ही दुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो.
दुर्गच्या वाटेवरच्या एका पठारावर घेतलेला फोटो. मागे जिथून निघालो होतो तो ढाकोबा डोंगर.

दुपारच्या बाराच्या उन्हात किल्ला चढायचा होता खरा! पण पायथ्यापासून किल्ला अगदी दहा-पंधरा मिनिटात चढून होतो. दोन्ही बाजूला पूर्ण झाडी आहे. पायथ्याला दुर्गादेवीचे अतिशय सुंदर, शांत मंदिर आहे.

उंचीने ढाकोबापेक्षा कमी असलेल्या या किल्ल्यावर (उंची - ३८५५ फूट) बघण्यासारखे काहीही नाही. तटबंदी, दरवाजे कधीकाळी असलेच, तर आता पूर्ण पडले आहेत. दुर्गला पोहोचण्यासाठी थेट आंबोलीपासूनही वाटा आहेत.

उतरल्यावर थोडीशी विश्रांती घेऊन एक वाजता आम्ही डोणीच्या दिशेने चालायला सुरूवात केली. या फोटोत पुढचा दुर्ग व मागचा ढाकोबा.

डोणी हे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातलं एक छोटंसं गाव. इथून अहुपेपर्यंत आमच्यासाठी जीपड्याची सोय केलेली होती. दुर्गवाडीपासून एक वाट दरीत उतरून पलीकडचा डोंगर चढते. त्या सपाटीवर जुन्नर तालुक्यातलं हातवीज हे गाव आहे.
या विहीरीपाशी ती पायवाट हातवीजमध्ये येते.

त्या गावातूनच पुढे आणखी एक पठार पार करून वाट दरीमध्ये उतरते.

उतार उतरून एका ओढ्याच्या काठी आम्ही दोन वाजता जेवणाच्या पुड्या सोडल्या. बसल्या बसल्याच थोडा वेळ झोपून तीन वाजता ओढ्यापलीकडचा चढ चढायला सुरूवात केली. इतके खाल्यानंतरही ज्या गतीने तो खडा चढ चढून आम्ही सगळे वर पोचलो, ते पाहून हा सह्याद्रीही सुखावला असेल (असं मलाच वाटत राहिलं).

'घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नसताना' एक माणूस मात्र याला अपवाद होता - तो म्हणजे अर्थातच लांबा! अर्थात, सचिन करंबेळकर नावाचे सर्वात वडील असलेले काकाही (काका फक्त म्हणायला, एरवी मी त्यांना 'अहो सचिन' म्हणूनच हाक मारली असती!) लांबाला हळूहळू जॉईन होऊ लागले होते. अतिशय मिष्कील, नकलाकार सचिननी (ब्रँच मॅनेजर, एसबीआय, लालबाग म्हणून आमच्यातील 'लालबागचा राजा') अख्खा ट्रेकभर आम्हाला प्रचंड हसवलं.
तर, तो चढ चढल्यावरही वाटेत डोणीच्या वाड्या-उपवाड्या लागल्या. घेवड्याची शेतं डोलत होती.

तिथून पुढे बरंच चालल्यावर अखेर साडेचारच्या सुमारास आम्ही डोणीला पोहोचलो. आमचा जीपवाला गायब होता. मग तिथेच एका घर कम दुकानाच्या ओसरीवर सगळे पसरलो. फोटोत भगव्या टी-शर्टमधली व्यक्ती म्हणजे 'सचिन करंबेळकर'.

वाट पाहून अखेर जीपऐवजी एका टेंपोतून पुढे निघायचे ठरवले. टेंपोमध्ये उभं राहण्यापेक्षा डायवरच्या डोक्यावरच्या टपावर बसलेलं चांगलं म्हणून आम्ही काही लोकांनी तिकडे मोर्चा वळवला. वाटेत झालेला सूर्यास्त त्या हलत्या टपावरूनच टिपला आणि अर्ध्या तासात ते अंतर पार करून अहुपेला पोचलो.

अहुपेला स्वागताला SAP (सह्यांकन आयोजक प्रमुख) अनिकेत उर्फ पप्पू आणि गॅरीकाका (गॅरीकाका म्हटल्याचं त्यांना कळलं तर माझी काही खैर नाही, असं मला सांगण्यात आलं आहे!) हजर होते. कमालीच्या खर्जातल्या आणि एकाच पट्टीतल्या गूढसम आवाजात गॅरीकाकांनी उच्चारलेलं 'त्या तिकडे एक मंदिर आहे, त्याचे दर्शन घेऊन या' हे वाक्य सचिननी (नेमकं) 'त्या तिकडे दरी आहे, काल तिथे ३ मर्डर झाले, दोन सुसाईड केसही आहेत आणि आज तुम्ही आलात' असं काहीतरी ऐकलं आणि आम्हाला हसून लोळायला अजून एक मुद्दा मिळाला.

ते मंदिर पाहून आम्ही अहुपे टॉप बघायला गेलो. अहुपेजवळचं ते पठार विलक्षण सुंदर आहे. अतिशय विस्तीर्ण असं माळरान, कड्याच्या टोकाशी असलेली दोनच झाडं, समोर खोल दरी, खाली खोपीवली गाव, डाव्या हाताला डोंगराआडून गोरख-मच्छिंद्रगडाचे डोकावणारे सुळके, मावळलेला सूर्य आणि कातरवेळ.... तिथे माझ्यातल्या मी मनभर राहून घेतलं...

पुन्हा माघारी येऊन अहुपे गावातल्या शाळेकडे, जिथे आमचा कँप होता, निघालो. दिवसभराच्या पायपीटीनंतरही संध्याकाळच्या त्या प्रहरी, त्या सुनसान रस्त्यावरून अंधुक प्रकाशात, टॉर्च वगैरे अजिबात न लावता, सर्वात शेवटी मी एकटाच चालत होतो. ट्रेकमध्ये अशा स्वतःबरोबर राहण्याच्या वेळा अगदी ओढून स्वतःजवळ घ्याव्याशा वाटतात.

अहुपे कँपमध्ये पोचलो तेव्हा सात वाजले होते. सकाळी ढाकोबाकडे निघाल्यापासून तब्बल साडेअकरा तासांनी आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी आलो होतो. चहा-शंकरपाळे झाल्यावर स्वीट कॉर्न सूप आलं. (मी फक्त कॉर्नच शोधून खाल्ले). राहायची सोय आज खोल्यांमध्ये होती (म्हणजे चैन होती!). जनरेटरच्या कृपेमुळे लाईट होते. जेवणात पिठलं-भाकरी, कोशिंबीर, पापड, आमटी-भात असा फर्मास मेनू होता.

जेवताना मला चांगलीच थंडी वाजायला लागली. बाहेर गार वाराही सुटला होता. मोहिमेचे दोन दिवस संपले होते. मोहीम अंगात चढू लागली होती. वेळापत्रक ठरलेले होते. त्यात कुठलाही बदल होणार नव्हता. उद्या गायदर्‍याने उतरून सिद्धगड गाठायचा होता. उद्याही बरीच चाल होती. झोप पुरेशी मिळणे आता आवश्यक होते. त्यामुळे कालच्याप्रमाणे कुठलीही मैफल, गप्पाटप्पा आज जमल्या नाहीत. जेवून स्लीपिंग बॅगमध्ये शिरलो आणि माझ्या बाजूलाच 'घोरासूर ऑफ द बॅच' असूनही कसलाही अडथळा न येता स्वस्थ झोपूनही गेलो.

आजचा हिशोबः
२१ डिसेंबर २०११
एकूण चाल - अंदाजे १२ किमी.
वैशिष्ट्यः प्रामुख्याने दुर्गवाडी-हातवीज-डोणी ह्या अनवट वाटेने भ्रमंती. नियमीत चढ-उतार तसेच सपाटीवरून चिक्कार पदभ्रमण.

(क्रमशः)
- नचिकेत जोशी

(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.com/ )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चालला आहे वॄत्तांत, आम्हीही सर्व वाटा फिरतो आहोत Happy

तिथे माझ्यातल्या मी मनभर राहून घेतलं... >>>>> फार आवडल Happy Happy Happy

गरमागरम बेड-टी तंबूबाहेरच्या लाकडी कट्ट्यावर तयार होता. >> डोंगरकपार्‍यात मुक्काम करून सकाळी गरमा गरम 'आयता' चहा- कसली ड्रीम सिच्यूएशन आहे ही!!

'त्या तिकडे दरी आहे, काल तिथे ३ मर्डर झाले, दोन सुसाईड केसही आहेत आणि आज तुम्ही आलात' >> नो डाऊट तुम्ही चिक्कार मजा केली असणार आहे!

मनभर!> क्या बात!!

लाडू Lol

आनंदयात्री, लेखातल्या चांदण्या काढून टाकल्या तर पान व्यवस्थित दिसेल.
आत्ता पान नीट न दिसल्याने व्यवस्थित जमत नाही वाचायला.

आता दिसतेय, धन्यवाद. मस्त वर्णन आणि फोटो.

अफलातून रे यात्र्या.................!!!!

लगे रहो....!

हुशश्sssss... दुसरा दिवस संपला. आता उद्या काय याची उत्सुकता आहे.
लवकर येउ द्या पुढ्चा भाग.

Happy mast

मित्रमैत्रिणींनो धन्यवाद!
Happy

रोहन, हो अरे... तसंच हवामान होतं.. क्लिअर दिसत नव्हतं... सिंदोळ्यापलीकडे एकाच रेषेत तीन उंच डोंगर दिसत होते पण ओळखता आले नाहीत..
दुसर्‍या दिवशी.सिद्धगडावरही हाच प्रॉब्लेम आला..

हेम, बागेश्री, पद्मजा, Happy

पुढचा भाग सोमवारी.

अरे काय सुंदर लिहितोस तू..... दिल खुश हुवा....
फोटोही जबरीच, मोजक्या शब्दात व्यक्तिचित्रही मस्तच रेखाटतोस......

आंदा यात्रेचे इतक सुंदर वर्णन..... जळतय रे आमच्या नशीबी हे कधी जमणार लगे रहो वाचत वाचत तुमच्याबरोबर फिरणंही होइल

Pages