सह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान

Submitted by आनंदयात्री on 2 January, 2012 - 00:04

नेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंतीचे! २००९ मध्ये तोरणा ते रायगड, २०१० मध्ये बागलाण प्रांतातली ४ किल्ले आणि २ सुळक्यांची भटकंती असे सलग दोन डिसेंबर सार्थकी लावल्यानंतर यंदा काय, हा प्रश्न जसा अचानक पडला तसा ताबडतोब सुटलाही! आणि उत्तर होते - चक्रम हायकर्स, मुलुंड, आयोजित "सह्यांकन २०११"!

१९८३ पासून 'चक्रम' दरवर्षाआड 'सह्यांकन' या नावाने सह्याद्रीमधली दीर्घमुदतीची मोहीम आयोजित करते. यंदाच्या मोहिमेचा प्लॅन पुढीलप्रमाणे होता -

दिवस १ - रात्री मुलुंडहून प्रयाण, ढाकोबा पायथ्याच्या सिंगापूर (पळू) गावामध्ये मुक्काम.
दिवस २ - आंबोली घाटाने चढून ढाकोबा पायथा गाठणे व मुक्काम.
दिवस ३ - ढाकोबा डोंगर पाहून, उतरून दुर्ग किल्ल्याकडे प्रयाण, दुर्ग किल्ला पाहून, पायथ्याच्या दुर्गवाडीपासून हातवीज-डोणी मार्गे अहुपे येथे मुक्काम.
दिवस ४ - अहुपेहून गायदराघाटमार्गे सिद्धगडमाची, सिद्धगडकिल्ला पाहून पुन्हा माचीवर मुक्काम.
दिवस ५ - गायदराघाट चढून भट्टीच्या रानातून कोंडवळमागे भीमाशंकर व मुक्काम.
दिवस ६ - भीमाशंकरहून पदरगड पाहून, गणेशघाटाने खांडस येथे उतरून "सह्यांकन २०११"ची सांगता.
मोहिमेचा नकाशा -

(सौजन्यः 'चक्रम'ची वेबसाईट)
(प्लॅनमध्ये नकाशापेक्षा काही बदल झाले होते- दुसर्‍या दिवशी दुर्गवाडीऐवजी आम्ही ढाकोबा पायथ्याला मुक्काम करणार होतो आणि चौथ्या दिवशी तावलीघाटातून साखरमाचीमार्गे न जाता गायदर्‍याच्या पठारावरूनच गायदरा घाट उतरून सिद्धगड गाठणार होतो)

यातले बरेचसे भाग उदा. अहुपे ते भीमाशंकर, भीमाशंकर ते खांडस, दुर्ग-ढाकोबा, सिद्धगड, पदरगड हे एकेकटे ट्रेक म्हणून करता येतात. पण एकाच मोहिमेत या सर्वांना जोडून घेणार्‍या काहीशा परिचित-अपरिचित वाटांनी भ्रमंती हे यंदाच्या 'सह्यांकन'चे वैशिष्ट्य होते. आमची संपूर्ण मोहीम तशाच वाटांनी पार पडल्यामुळे संपूर्ण वर्णनामध्ये कदाचित काही अनवट वाटांबद्दल वाचायला मिळेल.

मला स्वतःला 'चक्रम'च्या 'सह्यांकन'बद्दल खूप उत्सुकता होती. चोख संयोजनासाठी 'सह्यांकन'चे आणि पर्यायाने 'चक्रम'चेही अतिशय आदराने नाव घेणारे अनेक जण भेटले होते. त्यामुळेच सह्यांकन २०११ च्या तारखा आल्या आल्या, ऑफिसमधून पाच दिवसांची सुट्टी टाकली आणि पहिल्याच बॅचमध्ये नाव नोंदवून टाकले. माझा खूप जुना आणि पहिल्यापासूनचा ट्रेकमित्र मयूरही येणार होता, पण त्याला आयत्यावेळी हापिसने परदेशी पाठवल्यामुळे अखेर मोहीम सुरू होताना माझ्या बॅचमध्ये मला ओळखणारा असा मीच एकटा उरलो. तसेच आमच्या बॅचमध्ये (होतकरू, हौशी इ) फोटोग्राफरही मी एकटाच असल्यामुळे या पूर्ण मोहिमेमध्ये माझे स्वतःचे फोटो कमी घेतले गेले आहेत (तुम्ही आनंदाने टाकलेला सुटकेचा निश्वास मी ऐकलाच नाही बरं!)

सह्यांकनच्या आयोजनाबद्दल खरंतर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. थोडक्यात सांगायचे तर अतिशय सुनियोजित, शिस्तबद्धरित्या आखलेली आणि मुख्य म्हणजे गेली २८ वर्षे नियमितपणे सुरू असलेली एक प्रचंड दुर्गमोहीम असं वर्णन करावं लागेल. नाष्टा-चहा-जेवण - संयोजकांतर्फे! कसल्याही, अगदी कसल्याही अडचणीला तोंड द्यायला दांडगा अनुभव असलेल्या कार्यकर्त्यांची फळी टप्प्याटप्यावर सज्ज! खरं सांगतो, सह्यांकन म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ! (ते वर्णन पुढे येईलच).

सह्यांकनसाठी माझी तयारी नाव नोंदवल्या दिवसापासूनच सुरू झाली. नवे शूज, स्लीपिंग बॅग इथपासून सराव म्हणून ढाकबहिरी आणि भैरवगड असे दोन पावरफुल ट्रेकही करून झाले. ११ डिसेंबरच्या pre-सह्यांकन गटगमध्ये 'आपल्या बॅचमध्ये जवळजवळ सगळेच पन्नाशीच्या आसपासचे तरूण आहेत' हा नवा शोध लागला आणि मी पुरता बेचैन झालो! "इतका मोठा ट्रेक करायला हे वय योग्य आहे का" हा पहिला आणि 'इतर' उरलेले प्रश्नही शेवटपर्यंत मनातच राहिले. हां हां म्हणता दिवस उलटले आणि पाच दिवसांच्या मोठ्या, दीर्घ, खडतर, कष्टप्रद इ इ (स्वतःहून ओढवून घेतलेल्या) पायपीटीच्या प्रस्थानाचा दिवस उजाडला. मी पहिली बॅच घेतल्यामुळे १९ डिसेंबरला रात्री मुलुंडहून निघायचे होते.

११ तारखेच्या गटगमध्ये 'चक्रम'च्या एका पदाधिकार्‍याने वेळेचे महत्त्व बराच वेळ भाषण करून समजावून दिले होते. काय वाट्टेल ते झाले तरी गाडी नऊ वाजता सुटेल, तुम्ही साडेआठलाच हजर रहा अशी भक्कम तंबीही होती. त्यामुळे १८ तारखेला जरी 'उद्या गाडी साडेनऊला सुटेल' असा 'चक्रम'मधून निरोप आला असला तरी मी उगाच 'बस मिस' व्हायला नको म्हणून जेवण सोडून आठ वाजताच चक्रमच्या ऑफिसमध्ये पोचलो. आणि तिथे गेल्यावर कळले, की काही खरंच अपरिहार्य कारणामुळे बस अनिश्चित काळ उशीरा येणार आहे! ('सह्यांकन'चं आयोजन हे खरंच एक प्रचंड मोठं काम आहे, त्यात अशा आयत्यावेळेच्या अडचणींना गोष्टींना संयोजकांना सामोरे जावंच लागतं. आमच्यानंतर एकाही बॅचला असा उशीर झाला नाही, हे उल्लेखनीय!)

या सुरूवातीच्या सगळ्या भ्रमनिरासामध्ये एकच गोष्ट अत्यंत आनंददायी होती, ती म्हणजे आमच्या बॅचचा लीडर - विनय नाफडे उर्फ लांबा! वय ५० च्या आसपास, तरीही, हक्काने ज्याला 'अरे लांबा' म्हणू शकतो असा एकदम मस्त माणूस! साडेसहा फूट उंच हे व्यक्तिमत्त्व अजब आहे! गेल्या पस्तीस वर्षांपासून ट्रेक करत असलेल्या या माणसाकडे अनुभवाबरोबरच अफाट एनर्जी, कुठल्याही (लिटरली कुठल्याही) विषयावर तासनतास बोलण्याची तयारी, उत्तम विनोदबुद्धी, आणि कमालीचा खेळकर पण तोडफोड स्वभाव हे सद्गुण अगदी ठासून भरले आहेत. सह्यांकनप्रमाणेच लांबाचीही सत्कीर्ती मी ऐकली होती. त्यामुळे हा आपला लीडर आहे म्हटल्यावर मी तर अगदी ज्जामच खूष झालो होतो. लीडरप्रमाणेच बॅचमध्येही एक एक नमुने भेटले. एक गोष्ट फार उत्तम झाली ती म्हणजे, बॅचची पटसंख्या अवघी १७ होती. पण त्यात वय वर्षे १३ पासून ५७ पर्यंतची व्यक्तिमत्त्वे एकत्र आली होती. दोन शाळकरी मुले सोडली तर तिशीच्या आतला तरूण वगैरे मी एकटाच होतो. त्यातला एक तर आत्ता दहावीमध्ये शिकतोय. तो मोहिमेमध्ये आलेला पाहून मी त्याच्या ('अविचारी', पाल्याकडे 'दुर्लक्ष' करणार्‍या) मातापित्यांच्या धाडसाला मनातूनच साष्टांग नव्हे, दशांग नमस्कार घातला.

अखेर, बस यायला पावणेबारा वाजले. मग विलंबाबद्दल त्या पदाधिकार्‍याचा औपचारिक माफीनामा पार पडला आणि आम्ही सर्वांनी झोप पूर्ण होण्यासाठी लवकर बस सोडायची असल्यामुळे तो लग्गेच (मौनानेच) स्वीकारलाही! बस सुरू झाली आणि आम्ही सर्व आपापल्या सीटवर झोपलो सुद्धा! लांबा बहुधा जागा होता.

सिंगापूरला पोहोचलो तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते. बसमधून उतरल्या उतरल्या अंधारात डोळे फाडून आजूबाजूला बघत असताना अचानक चिरपरिचित नानाच्या अंगठ्याने दर्शन दिले. म्हणजे पलिकडचा कडा हा नाणेघाट असणार!

एका शाळेच्या खोलीत आणि व्हरांड्यात निवासाची सोय होती. तिथे आम्ही आपापले बिछाने अंथरले. मुक्कामाच्या ठिकाणी अतिशय उशीरा पोहोचल्यामुळे उद्या साडेसात ऐवजी एक तास उशीरा निघायचे आहे, असे लीडर्सने डिक्लेअर करून जरासा दिलासा दिला. वद्यपक्षातली चंद्रकोर उगवली होती. व्हरांड्याच्या समोर उरलेल्या अंधारात जीवधन किल्ला आणि व्हरांड्यामध्ये पांघरूणांमध्ये आम्ही साडेतीन वाजता गुडूप झालो होतो.

गेले दोन महिने केवळ मनातल्या मनातच कैकदा पूर्ण केलेली सह्यांकन मोहीम प्रत्यक्ष सुरू व्हायला आता फक्त पाच तास उरले होते...

(क्रमशः)

-- नचिकेत जोशी


ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.com/

सह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा
सह्यांकन २०११ - भाग ३ : ढाकोबा, दुर्ग आणि मुक्काम अहुपे व्हाया हातवीज
सह्यांकन २०११ - भाग ४ : अहुपे ते सिद्धगड व्हाया गायदरा घाट
सह्यांकन २०११ - भाग ५ : सिद्धगडमाची ते मुक्काम भीमाशंकर व्हाया भट्टीचे रान
सह्यांकन २०११ - भाग ६ (अंतिम) : पदरगड आणि निरोप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त सुरवात....... नेहमीप्रमाणेच मस्त वर्णन..
येऊद्यात पुढचे भाग (पटापट.... Proud )

उत्सुकता आहे पुढील भाग वाचण्याची, पटापट येउ द्यात भाग.

रच्याकने : माझ्या जुन्या कंपनीतील सहकारी श्री. सुधीर आठवले हे पण चक्रमचे मेंबर आहेत.
सालाबादप्रमाणे या वर्षीसुद्धा ते सह्यांकन साठी गेले होते.

लांबा द ग्रेट तुला लीडर म्हणून मिळाला तिथेच तुझे पैसे वसूल झाले. Trek दरम्यानची त्याची शब्दफुले वाचायला उत्सुक आहे. त्याचा श्टाइलिश फोटो डकवायला हवा होतास.

आनंदयात्री मस्तच सुरुवात...

पुढच्या भागांची उत्सुकता लागून राहीलीय.... पुढच्या भागात फोटोंचे कोलाज नको स्वतंत्र फोटो टाक...

लवकरच पुढचा भाग येऊदे.

मस्त नची Happy
छान सुरुवात ...
ज्या ट्रेकची सुरवात अडखळत होते त्या ट्रेकचा शेवट नेहमीच आनंददायी असतो >> अनुमोदन इंद्रा Happy

धन्स लोक्सांनो!
पुढचा भाग उद्या...

आबासाहेब, होय, आठवले काका होते आमच्या बॅचमध्ये.

बागेश्री, कोलाजबद्दल धन्स! Happy

हेम, जी शब्दफुले येथे देणं शक्य आहे, ती देईन.. बाकीची फोनवर! Proud

माधव, मनोज - Happy
'परंपरे'नुसार स्वतंत्र फोटोच देणार आहे..

लिहून पूर्ण असेलच तुझे... दररोज एक भाग तरी टाक..

सेनापती, जरा दमानं घ्या हो! तुमचे दम परवडत नाहीत आम्हाला.. Proud
फोटॉ एडिटायचेत...

वा वा वा नचिकेत, तू अगदी व्रतपालनासारखे हे ट्रेक्स / भटकंती करतोस हे पाहून खूप समाधान (व थोडा हेवाही) वाटले. तुझी लेखनशैली एकदम अप्रतिम आहे, पुढील वर्णन वाचायला खूप उत्सुक आहे.