ब्रेड बेसन टोस्ट

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 31 December, 2011 - 08:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बेसन (डाळीचे पीठ) - अर्धा कप
ब्रेड स्लाईस - ५ ते ६ (आकारावर अवलंबून)
कोथिंबीर, कढीपत्ता पाने (अंदाजे)

लसूण पाकळ्या - २
मिरची ठेचा - चवीप्रमाणे, किंवा बारीक चिरलेल्या २ हिरव्या मिरच्या
मीठ, तिखट, हळद चवीप्रमाणे
दही - १ डाव
तेल - मोहनासाठी १ चमचा व टोस्ट तव्यावर भाजण्यासाठी
पीठ भिजवण्यासाठी पाणी

besan bread toast1 copy (1).jpg

क्रमवार पाककृती: 

सर्वप्रथम कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण पाकळ्या व मिरची ठेचा / मिरच्या मिक्सरमधून बारीक होईस्तोवर फिरवून घ्याव्यात. एका रुंद तोंडाच्या पसरट भांड्यात बेसन घेऊन त्यात ही पेस्ट, तिखट, मीठ, हळद व १ डाव दही घालावे व नीट मिसळून घ्यावे. पाणी घालून भजीच्या पिठापेक्षा जरा किंचित जास्त सैलसर भिजवून घ्यावे व थोडा वेळ तसेच ठेवावे. (मी १५ मिनिटे ठेवले.) तेल कडकडीत तापवून या मिश्रणात एक चमचा तेलाचे मोहन घालावे व मिसळून घ्यावे.

तवा तापत ठेवून त्यावर तेल घालावे व नीट पसरवून घ्यावे. ब्रेडचे स्लाईस दोन्ही बाजूंनी पिठात बुडवून दोन्ही बाजूंना मिश्रण नीट लागल्याची खात्री करून ते तव्यावर दोन्ही बाजूंनी मंद आचेवर भाजावेत. भाजताना अधून मधून स्लाईस दाबाव्यात. त्या नीट भाजल्या जात आहेत ना हे पाहावे. एका वेळी रुंद तव्यावर दोन स्लाईसेस आरामात भाजता येतात. तयार टोस्टचे हव्या त्या आकारात तुकडे (त्रिकोणी, चौकोनी इ.) करून लोणी / चटणी / केचप सोबत गरमागरम खायला द्यावेत.

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यांवर अवलंबून :-)
अधिक टिपा: 

हा पदार्थ धिरड्याच्या किंवा भजीच्या जवळपास आहे - फक्त तेलात भाजलेला आहे. नाश्त्याला पोटभरीचा होतो. फ्रेंच टोस्टचे हे देशी रूप म्हणता येईल!!

१. ह्यात इतर भाज्या (पालक, मेथी, कांदा पात, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, ढब्बू मिरची किंवा अन्य आवडीच्या भाज्या बारीक चिरून अथवा किसून) घालता येऊ शकतात. वरची कृती ही बेसिक कृती आहे. त्यात आपापल्या आवडीप्रमाणे व चवीप्रमाणे फेरफार करू शकता.
२. बेसन थोडे कमी घेऊन इतर पिठेही ह्या पदार्थात वापरू शकता. (तांदूळ पीठ, मूग डाळ पीठ इ.) पण पदार्थाची मुख्यत्वे चव बेसनाची आहे.
३. लसणाचा स्वाद नको असेल तर ओवा / तीळ / ओव्याची चुरडलेली पाने इ. स्वादासाठी घालता येईल.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

धन्यवाद सर्वांचे! Happy

विवेक, हो नक्की नेता येईल डब्यात. पण खरी मजा तो गरमागरम खाण्यात आहे. गार कितपत चांगला लागेल माहिती नाही. (आजवर कधी तो गार खाल्ला नाहीए!!)

अकु..फार्रच सुरेख रेसिपी आणी यम्मी फोटोज.. उद्याच करण्यात येईल..
आत्तपर्यन्त ब्रेड ची भजी खाल्ली होती पण ती फारच तेलकट लागतात म्हणून इतक्या वर्षात केलीच नाहीत..
ही आयडिया फार आवडली..

आवडला मी शिळ्या पोळीचा हि बनवते. त्यात वेगवेगळ्या पालेभाज्या किंवा कांदा घालुन पोळीला लावायच. एका पोळीत पोट भरत.

चांगले झाले. फारच सोपे. तेल खुपच कमी लागले. एक चमचा तेलात ४-५ ब्रेड भाजले गेले. आता भाज्या घालुन करुन पाहीन.

मला आवडतो हा प्रकार. आई करायची नाश्त्याला दर रविवारी(मला आवडतो म्हणून). आई कढईत चक्क तळून काढायची भजीसारखे पण.
टोमॅटो सॉस बरोबर खात सकाळी कार्टून बघायचा.(करायला पाहिजे). ह्याच्यात मिरच्या खालून तळल्या तरी मस्त.

काल केले गं! मस्स्स्तच झाले Happy करायला फारच सोपे आणि विना कटकट पण खायला अगदी चटपटीत.
माझा लेक तेच भरत बसला. त्याला पुरे आता म्हणावं लागलं Happy

मीही करते हे बरेचदा. कधी अंड्याचे तर कधी असे फ्रेंच टोस्ट. कोथिंबीर, मिरची, लसूण पेस्ट घालते. कढीपत्ता घालून पाहायला हवा एकदा.
पण तुझ्या फोटोत दिसतायंत तितके मस्त सोनेरी नाही दिसत ... जरा ब्राऊन रंगावर जातातच टोस्ट Happy

कढीपत्ता वगळून बाकी वाटण तयार केलं, त्यात अंडी फोडली. त्यापूर्वी वाटणात अंदाजाने मीठ घातलं आणि French toast केले
मस्स्स्त यम्मी झाले. Happy
रेसिपीची वाट लावली... :p