छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. परराष्ट्रीय धोरण...

Submitted by सेनापती... on 27 December, 2011 - 12:09

छत्रपति शिवरायांची बलस्थाने - १: कोशबल -
छत्रपति शिवरायांची बलस्थाने - २ : दुर्गम-दुर्ग
छत्रपति शिवरायांची बलस्थाने - ३. लष्करी व्यवस्था
छत्रपति शिवरायांची बलस्थाने - ४. युद्धतंत्र

शिवरायांचे राज्यकारभार विषयक नेमके धोरण काय होते??? याबाबत काही जाबते आपण आधीच्या भागात पाहिले आहेतच. त्यांनी 'अरिमित्र विचक्षणा' कशी केली होती? स्वराज्य सुरवातीपासूनच चहुकडून शत्रुपक्षाने घेरलेले होते आणि राज्याला अंतर्गत शत्रू देखील खूप होते. ह्या दृष्टीने राजांनी परराष्ट्रीय धोरण कसे ठरवले आणि कसे राबवले हे समजून घेणे महत्वाचे आहे.

अरि म्हणजे शत्रू किंवा जवळ ज्याचे राज्य तो. तर मित्र म्हणजे अर्थात सुहृदय. कौटिल्य अरिमित्राचे ६ प्रकार सांगतो.

१. सहज शत्रू - राजाचे नातलग आणि सिमेलगतचे राष्ट्र.
२. कृत्रिम शत्रू - आपल्या विरोधात जाउन इतर राज्यांना सुद्धा विरोध करण्यास भाग पाडणारा.
३. सहज मित्र - सिमेलगतचे राष्ट्र सोडून अन्य राज्यांचा राजा.
४. कृत्रिम मित्र - लाभ संपादन करण्याच्या दृष्टीने मैत्री ठेवणारा.
५. मध्यम - संधीविग्रहात अनुकूल असलेला.
६. उदासीन - बलवान असून मैत्री ठेवणारा.

स्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सहज शत्रू राष्ट्र होते. शिवाय मुघल सुद्धा स्वराज्याचे सहज शत्रू होतेच. पण आत्ता शत्रू असणारे राज्य नंतरच्या काळात कृत्रिम मित्रराष्ट्र सुद्धा बनू शकते. मुघलांशी १६६५ मध्ये तर आदिलशाही बरोबर १६७७-७८ मध्ये राजांनी ही भूमिका घेतली होती. मुघल, आदिलशाही, क़ुतुबशाही, इंग्रज आणि पोर्तुगीझ या ५ राज्यांबरोबर शिवरायांनी कसे राजकारण केले ते आपण आता बघू.

मुघल -

स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात मुघलांनी मराठ्यांकडे कृत्रिम मित्र म्हणुन पाहिले होते. आदिलशाही पोखरली जाते आहे ह्याचा त्यांना फायदाच होत होता. पण १६५७ मध्ये मराठ्यांनी जुन्नर आणि नगर येथे हल्ले करून मुघलांचे शत्रुत्व ओढावून घेतले आणि मग ते बनले सहज शत्रू. उत्तरेला स्वराज्याची सीमा आता थेट मुघलांशी भिडली होतीच. कल्याण-भिवंडी या उत्तर कोकणावरील आक्रमण आणि अफझलखान वधानंतर तर मुघल थेट चाल करून आले. १६६०-१६६३ ही ४ वर्षे खुद्द शास्ताखान पुण्यात तळ ठोकून होता. सर्व व्यर्थ आहे हे कळल्यानंतर अधिक मोठी मोहिम मिर्झाराजा घेउन आला आणि पुरंदरचा तह घडला. या तहाने मुघल मराठ्यांचे कृत्रिम मित्र बनले. अर्थात त्यांचा सहज शत्रू असलेल्या आदिलशाहीचा पाडाव करायला. पुढे मात्र १६७० मध्ये जिझिया कर, उत्तर हिंदूस्थानमधील मंदिरांवरील आक्रमणे या व अनेक बाबींमुळे हा तह मोडला आणि मराठे-मुघल पुन्हा एकदा समोरा समोर आले. मुघलांशी मराठ्यांचे असलेले संबंध असे बदलत गेले. पुरंदरच्या तहाचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे आदिलशाहीला सुद्धा आपण मुघलांविरोधात मराठ्यांशी मैत्री का करू नये ही जाणीव झाली. ह्यातून पुढे १६७७ मध्ये मराठे - आदिलशाही तह घडला.

आदिलशाही -

स्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सुरुवातीपासूनच ते 'सहज शत्रू' राष्ट्र होते. मात्र राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. छत्रपति शिवराय दक्षिण दिग्विजय येथे गेले असताना मुघल-आदिलशाही एकत्र येउन मराठ्यांविरोधात उभी राहिली. मात्र पराभव झाल्यानंतर मुघलांनी थेट विजापुरलाच वेढा घातला. मराठ्यांकडून अनेक लढायांमध्ये पराभव मिळाल्यानंतर देखील मुघलांकडून येणाऱ्या दबावामुळे त्यांनी मराठ्यांशी १६७७ मध्ये मैत्रीचा तह केला. मुघलांना परास्त करत खुद्द शिवरायांनी विजापुरचा वेढा उठवला. अरिमित्र संबंध हे असे बदलत असतात.

कुतुबशाही -

स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात विशेष महत्त्व नसलेल्या कुतुबशाहीला मात्र राजाभिषेकोत्तर काळात महत्त्व प्राप्त झाले. दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये कुतुबशाही सोबत सख्य करून आदिलशाही आणि मुघल यांना परास्त करायचे हेच मराठ्यांचे धोरण होते. शिवराय खुद्द १६७७ मध्ये कुतुबशहा यास भेटावयास गेले आणि उभय पक्षांमध्ये तह घडला. यात मोहिमेचा खर्च कुतुबशहाने करायचा तर मराठ्यांनी लढाया करायच्या आणि मुलुख जिंकायचा असे ठरले.

तहाचे प्रकार ३. ज्येष्ट, सम आणि हीन.

तर तहाचे षाड़गुण्य अशा प्रकारे असतात.
१. संधि - काही अटींवर शत्रुशी तह करणे.
२. विग्रह - शत्रुस युद्धस उद्युक्त करणे.
३. यान - शत्रूची उपेक्षा करणे.
४. आसन - अनाक्रमणाचा करार.
५. संश्रय - आत्म समर्पणाच्या भावनेने झुंज देणे.
६. द्वैधीभाव - संधि आणि विग्रह या दोघांचा वापर करून कार्यभाग साधणे.

या प्रकारेच शिवरायांनी मुघल, कुतुबशहा आणि आदिलशहा यांच्याबरोबर तह केले. याशिवाय इंग्रज आणि पोर्तुगीझ या पश्चिम किनाऱ्यावर बस्तान बसवलेल्या ह्या परकीय सत्तांबरोबर शिवरायांनी अतिशय धूर्तपणे राजकारण केले.

इंग्रज -

इंग्रज मराठ्यांचे कायम सहज शत्रू राहिले. त्यांच्या सोबत मैत्रीचा कधीही प्रयत्न झाला नाही. सूरत आणि राजापुर येथील त्यांच्या वखारी मराठ्यांकडून लुटल्या गेल्या. पन्हाळा मोहिमेदरम्यान सिद्दीला मदत केली म्हणून राजांनी ४ इंग्रज अधिकाऱ्याना कैदेत घातले होते. पुढे ४ वर्षांनी त्यांची सुटका झाली. जलदुर्ग खांदेरी बांधताना मराठ्यांना त्रास देणाऱ्या सिद्दीला मदत करतात म्हणून मराठ्यांनी मुंबईवर हल्ला करण्याचे योजून इंग्रजांच्या तोंडाचे पाणीच पळवले होते.

पोर्तुगीझ -

या सत्तेला मराठ्यांनी नेहमी स्नेह आणि दंड या दोन्ही पात्यात पकडून ठेवत यशस्वी राजकारण केले. दुर्गाडी येथे जहाज बांधणीचा उद्योग सुरू करताना राजांनी पोर्तुगिझांची मदत मागितली होती. पुढे १६६० मध्ये मुघल आणि आदिलशाही स्वराज्यावर हल्ले करत असताना आणि इंग्रज सिद्दीला साथ देत असताना मात्र पोर्तुगीझ तटस्थ राहिले. मराठ्यांची पहिली आरमारी मोहिम बारदेश येथे गेली ती पोर्तुगीझ राज्याच्या सिमेमधून. तेंव्हा सुद्धा ते निष्क्रिय राहिले. मोघलांनी मराठ्यांविरोधात मदत मागितली असताना त्यांने ती साफ़ नाकारली. अगदी संभाजी राजांच्या काळात देखील पोर्तुगीझ मराठ्यांच्या बाजूनेच तटस्थ राहिले. १६९१ मध्ये पोर्तुगीझ गव्हर्नर आपल्या राजाला लिहितो,'रामराजा आणि बाद्शाहाचे अधिकारी या दोघांचा विश्वास आम्ही संपादन केला आहे. मात्र आमच्या राज्याला मुसलमानांपेक्षा हिंदू बरे. मुसलमानांवर कधीही विश्वास ठेवू नये.'

आरमाराचे बळ अधिक असलेल्या या सागरी सत्ता ताब्यात-धाकात ठेवायच्या तर आपले देखील आरमार हवे हे राजांनी खूप आधी ओळखले होते. यातून जलदुर्ग आणि आरमार यांची निकड निर्माण झाली. स्वराज्याचे ते एक वेगळे अंग बनले.

क्रमश: ...

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार

संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य), शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी), छत्रपती शिवराय - पत्ररूप व्यक्तीदर्शन - डॉ. रामदास, अथातो दुर्गजिज्ञासा (लेखक- प्र. के. घाणेकर)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर माहिती सेनापती! तहाचे प्रकार आणि अरिमित्रविवेचन आवडलं.

मात्र एक शंका आहे.

>> पन्हाळा मोहिमेदरम्यान सिद्दीला मदत केली म्हणून राजांनी ४ इंग्रज अधिकाऱ्याना कैदेत घातले होते. पुढे
>> ४ वर्षांनी त्यांची सुटका झाली.

माझ्या माहितीप्रमाणे फिलीप गीफर्ड लिंगाण्यावर कैदेतच मरण पावला. हे मी बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या शिवचरित्रात वाचलेलं आठवतं.

बाकी लेख छानच आहे.

आ.न.,
-गा.पै.

अत्यंत उपयुक्त माहिती. अभ्यासपुर्ण लेखन. एक दिवस खास या मालिकेसाठी देऊन वाचून काढणार आहे. अखंड लिहीत रहा. धन्यवाद!

वसाहतवाद्यांनी बाकिच्या देशांत (उदा दक्षिण अमेरिकेतील, आफ्रिकेतील देश ) कसा शिरकाव करुन घेतला, याची माहीती महारांजापर्यंत पोहोचली असेल का ? मी कधी तसे वाचले नाही.

सुरेख विवेचन. या निमित्ताने अनेक मुद्द्यांचा अभ्यास आम्हालाही घडतो आहे. फार छान. यातील पोर्तुगीज मराठे संबंधांवर मी थोडा अभ्यास केला आहे. महाराजांनी पोर्तुगीजाना घाबरवून गप्प केले होते. तेरेखोल, फोंडा आणि रामाचे भूशिर इथे मजबूत किल्ले आणि सैन्यतळ ठेवून आणि आरमाराद्वारे महाराजानी पोर्तुगीजांवर वचक बसवला होता. पोर्तुगीजांच्या ताब्यात फक्त ३ तालुके राहिले होते, आणि मोगलांची टोळधाड आली नसती तर महाराजांनी पोर्तुगीजांना कधीच गोव्यातून उखडून टाकले असते. पोर्तुगीजांचे उपद्व्याप पाठीमागून सुरूच असत, गोव्यातल्या देसायांना आणि सावंतवाडीच्या सावंतांना महाराजांविरुद्ध चिथावण्या देण्याचे काम सतत सुरूच असे, पण महाराजांविरुद्ध समोरासमोर युद्ध करण्याएवढं धैर्य पोर्तुगीजांच्यात नव्हते.

गा.पै..
>>> माहिती तपासतो. काही बदल असल्यास नक्की करतो. धन्यवाद.

दिनेशदा..
>>> कुठे-कुठे शिरकाव करून घेतलाय हे संपूर्णपणे त्यांना माहीत नसेलही पण शिरकाव कसा करून घेतला हे त्यांना नक्की ठावूक होते.

इंग्लंडच्या राजाने १६ जानेवारी १६६८ रोजी शिवाजी महाराजांना पत्र लिहून ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी परवानगी दयावी म्हणुन विनंती केली. उत्तरादाखल २ ऑगस्ट १६६८ रोजी महाराजांनी जे पत्र आपल्या वकिलामार्फ़त इंग्लंडच्या राजाला पाठवले त्यात त्यांचा मुत्सद्दीपणा आणि जागरूकता दिसून येते. राजे म्हणतात,"दगाबाजी केलियास दोस्ती राहणार नाही आणि कंपनिस ताकीद करावी की व्यापाराशिवाय दुसरे कामात शिरू नये."

राजांना ठावूक होते की या लोकांचे खावंद त्या-त्या देशात राज्य करत आहेत.

ज्योती ताई...
>>> आग्रा येथून सुटून आल्यावर १९ नो. १६६७ रोजी शिवरायांनी पोर्तुगीजांविरुद्ध बारदेश येथे स्वारी केली तेंव्हा त्या भागातले काही वतनदार राजांना शरण आले तर काही पोर्तुगीजांकड़े पळून गेले. डिचोली येथील काही देसाई जे राजांना शरण आले होते त्यांना खालील कौलनाम्याने राजांनी वतन विषयक आश्वासन दिले. त्यात "देसाई मलसणवे यास त्याच्या हरामखोरी बद्दल योग्य ते शासन मिळेल" असे स्पष्ट लिहिले आहे.