केल्याने देशाटन - १

Submitted by kanksha on 24 December, 2011 - 07:22

"केल्याने देशाटन , पंडित मैत्री, सभेत संचार,
मनुजा, ज्ञान येतसे फार ... "
लहानपणापासून अनेकदा ऐकलेली, वाचून - ऐकून अगदी पार गुळगुळीत झालेली ओळ. पण या ओळींची सत्यता अनुभवली ती मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या 'मातृभूमी दर्शन' उपक्रमातून. फ्रान्सीस बेकन देखील म्हणतो -
"Travel in the younger sort , is a part of education ; in the elder, a part of experience ."
म्हणूनच प्रवास, त्यातही समवयस्कांच्या समूहासोबत केलेला प्रवास हा शिक्षणाचा एक भागच आहे आणि त्याचबरोबर मोठ्यांनादेखील अनुभवसमृद्ध करणारा गुरु आहे.

अशा या नियोजनबद्ध सहलीचा सर्वात प्रमुख फायदा म्हणजे त्यातून लागणारी स्वयंशिस्त. एरवी घरात आईच्या प्रत्येक हाकेला, दोन मिनिटांत उठतो असं उत्तर देत उठायला अर्धा-अर्धा तास लावणारेही गाडी निघून जाईल या भीतीनं कोणीही हाक न मारताच साडेपाचलाच उठून बसतात. शिवाय उठल्यावर अंथरुणात रेंगाळत न बसता पटकन आवरायला सुरुवात करणं, अंघोळ लवकर उरकणं, या सवयी इथंच पहिल्यांदा जडतात. आपलं सर्व सामान रोजच्या रोज जागच्या जागी ठेवणं, वस्तू सांभाळून न हरवता वापरणं या छोट्या छोट्या सवयी पुढे खूप उपयोगी पडतात.

सहलीतनं अंगी बाणणारा आणखी एक गुण म्हणजे स्वावलंबन. आजच्या हम दो - हमारे दो / एक च्या जमान्यात, शाळेत जाताना डबा- waterbag भरण्यापासून ते बुटाची लेस बांधून देण्यापर्यंत आई- बाबा मदतीला असतात. त्यामुळे जेवण झाल्यावर आपलं ताट उचलून ठेवणं, आपल्या अंथरूण-पांघरुणाची घडी घालणं, या गोष्टीसुद्धा अनेकांना अवघड जातात. पुढच्या आयुष्यात होस्टेलवर राहायचं झालं की याच सवयी उपयोगी पडतात.

एवढंच नाही, तर बिना बोर्नविटाचे दूध पिणं, नावडती भाजी कुरकुर न करता खाणं, यासारख्या गोष्टी शिकायला तर सहलीशिवाय दुसरा पर्यायच नसतो. तीन तास सिंहगड चढून, फिरून कडकडून भूक लागली की मग पानातली कोणतीही भाजी अगदी अमृतासारखी गोड लागते. शिवाय मित्र-मैत्रिणींच्या गप्पांची जोड कोणत्याही पदार्थाची चव अधिकच रुचकर बनवते. त्यामुळेच साधी ग्लुकोजची बिस्कीटेसुद्धा आवडीनं खाल्ली जातात. अनेक नवनवे पदार्थ खायला मिळाल्यानं आपल्या खाद्यज्ञानात भरपूरच भर पडते. रंगामुळे सुरुवातीला विचित्र वाटणारी सोलकढी किंवा नाचणीची भाकरी, यांनादेखील आपल्या मनात आवडीची जागा मिळते. मालवणी खाजा, कर्नाटकातला सेट डोसा असे वेगवेगळ्या प्रांतातले वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ मनात कायमचे घर करून राहतात. रुमाली रोटी सारखा प्रकार अनेकांनी खाल्लाही नसेल, पण आम्हाला सहलीत तो खायला तर मिळालाच, पण त्याचबरोबर हवेत वरचेवर झेलत सुन्दरशी रुमाली रोटी बनवण्याचं बल्लावाचार्यांचं कौशल्यही तिथं पाहायला मिळालं.

हे झालं खाद्यपदार्थांचं. पण त्याचबरोबर जी फळं आपण नेहमी खातो, जे जॅम वापरतो , त्या फळांची झाडं, फळप्रक्रिया केंद्रं बघण्याची मजा काही औरच असते. कोकणातल्या नारळी-पोफळींच्या बागांची वर्णनं, नेहमीच पुस्तकात वाचलेली असतात. फळाबाहेर बी असणारा एकमेव झाड म्हणजे काजू हे सामान्यज्ञानाच्या पुस्तकात असतं. ते बघायला मिळतं, ते कोकणच्या सहलीतच. करवंदांच्या जाळीत हात घालून करवंद तोडण्यात वेगळीच मजा असते. सागरगोटेसुद्धा झाडाला लागतात हे मला तर सहलीत गेल्यावरच कळलं. सिंधुदुर्ग किल्ल्यातलं फांदी असलेलं नारळाचं झाड, समुद्रात असूनसुद्धा गोड पाणी देणाऱ्या दूध, दही, साखर बाव या विहिरी अजूनही जशाच्या तशा आठवतात. रायगडावरून पहाटे पाहिलेलं इंद्रधनुष्य, धुक्यात लपेटलेला सह्याद्री पर्वत आणि हे सगळं बोचऱ्या थंडीत अनुभवताना मध्येच झालेला हलक्या सरींचा शिडकावा आठवला की आजही अंगावर रोमांच उभे राहतात.

हे सगळं झालं निसर्गानं दर्शन घडवलेल्या दृश्यांबद्दल. पण हा निसर्ग निर्जीव नाहीये. तो आपल्याला खूप काही शिकवतो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी बोलू....

गुलमोहर: 
शब्दखुणा: