लोलो जोन्स.. बेसमेंट टु बैजिंग!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

खेळाच्या मैदानात जो विजेता असतो तो लोकांच्या लक्षात राहणे ही जगाची रितच आहे... तरीसुद्धा काही काही व्यक्ती अश्याही असतात की त्यांच्या गळ्यात विजयश्रीने जरी माळ घातली नसली तरी.. त्यांच्या आवडीच्या स्पर्धेत.. ऑलिंपिक्सच्या रंगमंचापर्यंत येउन.. जिंकण्याची शिकस्त करण्यात... त्यांनी जे अडथळे व संकटे पार केली असतात किंवा जी मेहनत घेतली असते.. तीसुद्धा सगळ्या जगाला स्फुर्ती देण्यास लायक असते.

मान्य आहे की भारताला फक्त ३ च पदके या बैजिंग ऑलिंपिक्समधे मिळाली ... पण भारतासारख्या देशात.. जिथे क्रिडा या प्रकाराकडे प्रोफेशनली(क्रिकेट सोडुन!)कोणीच पाहात नाही.. किंवा जिथे क्रिकेट सोडुन बाकी कुठल्याच खेळांमधे.. प्राविण्य मिळवणार्‍यांना... आर्थिक मोबदल्याची हमी नसते.. तिथे ३ सुद्धा पदके मिळणे हेही थोडके नसे!... देशाला किती पदके मिळतात हे त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबुन नसुन तो देश खेळांना (नुसत्या एकाच खेळाला.. म्हणजे क्रिकेटला.. नव्हे!)किती प्राधान्य देतो त्यावर अवलंबुन असते... ज्या देशात सर्व खेळांचा विकास घडवला जातो व सर्व खेळातल्या खेळाडुंना व्यवस्थित आर्थिक मोबदला मिळत असतो... त्या देशाला आपल्याला ऑलिंपिक्समधे जास्त पदके मिळताना आढळुन येईल.

म्हणुनच मग भारताच्या.. (जिथे क्रिकेट सोडुन बाकी कुठल्याच खेळातल्या खेळाडुंचे गोडवे जायले जात नाहीत किंवा त्यांची दखलही घेण्यात येत नाही...) सुशिलकुमारच्या कुस्तीतल्या ताम्रपदकाला किंवा विजेंदरने मिळवलेल्या मुष्टीयुद्धातल्या ताम्रपदकाला... सुवर्णपदकाच्या झळाळीपेक्षा जास्त झळाळी येते... सुशिलकुमारचे वडिल पेशाने ड्रायव्हर व जेमतेम उत्पन्न असलेले.. पण तरीही त्यांनी त्यांच्या मुलाला कुस्तीमधे प्राविण्य मिळवण्यास प्रोत्साहन व आर्थिक सहाय्य दिले... तसेच विजेंदरचे वडिल महिपाल पेशाने कंडक्टर.. पण त्यांनीही आर्थिक बिकट परिस्थीतीशी झगडत आपल्या मुलातल्या मुष्टियुद्धाच्या कौशल्याला जोपासले.. फुलवले... अश्या या खडतर आयुष्यातुन पुढे येउन.. आपल्या अपार मेहनतीच्या व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर... या दोघांनी ताम्रपदक मिळवले... म्हणुन त्या दोघांना मनापासुन सलाम!

पण अशी आर्थिक बिकट परिस्थीती व त्या परिस्थीतीत दाखवलेली दुर्दम्य इच्छाशक्ती अमेरिकेतही बघायला मिळते हे जर मी तुम्हाला सांगीतले तर खरे वाटेल काय? आज मी तुम्हाला नेमकी अशीच एक कारुण्यजनक पण तरीसुद्धा स्फुर्तीदेणारी एक कहाणी सांगणार आहे... की जी वाचुन... तुम्हाला बड ग्रीनस्पॅन च्या....."Ask not alone for victory, ask for courage, for if you can endure you bring honour to yourself. Even more, you bring honour to us all....Morever... the honour should not go to those who have not fallen, but all honour to those who fall and rise again!....."या उदगारांची आठवण येते की नाही ते जरुर सांगा!

ही गोष्ट आहे अमेरिकेच्या लोलो जोन्सची! परवा ज्यांनी बैजिंग ऑलिंपिक्समधील महिलांची १०० मिटर्स हर्डल्सची अंतिम शर्यत पाहीली.. त्यांना लोलो जोन्स ही कोण हे नक्किच माहीत असेल.... २००७ मधील ६० मिटर्स हर्डल्समधील विश्वविजेती.. ज्यात तिच्या नावावर सध्याचा विश्वविक्रम आहे. बैजिंग ऑलिंपिक्समधे.. सगळ्या जगाचे लक्ष जिच्यावर असलेली.. जिचे स्वप्न होते की एक दिवस मी ऑलिंपिक्सच्या रंगमंचावर अशी कामगीरी करीन की त्याने तिचे नाव ऑलिंपिक्सच्या इतिहासात एक ऑलिंपिक्स सुवर्णपदक विजेती म्हणुन कोरले जाइल!..

अश्या या मह्त्वाकांक्षी व बैजिंग ऑलिंपिक्समधे भाग घेउन जिंकण्याची स्वप्न बघणार्‍या लोलो जोन्सचे लहानपण..कित्येक वर्षे.. बेघर अवस्थेत व अतिशय गरीबीत.. एका चर्चच्या बेसमेंटमधे राहण्याने सुरु झाले होते....लहानपणापासुनच तिचे वडिल घरापेक्षा तुरुंगातच जास्त वेळ घालवत असल्यामुळे एकट्या आइच्या मेहनतीवर त्यांचे घर चालत होते.. जे काही तुटपुंजे उत्पन्न होते त्यात काहीच भागायचे नाही.. काम मिळवण्यासाठी..व एका ठिकाणचे घरभाडे थकले म्हणुन...सारखे एका गावातुन दुसर्‍या गावात असे तिच्या आइची व तिच्या सकट तिच्या पाच भावंडांची ससेहेलपाट होत होती.. पण त्या सगळ्या कठीण परिस्थितीत.. ज्या ज्या शाळेत ती असेल त्या त्या शाळेत...लोलो जोन्सने.. धावण्याच्या शर्यतींमधे स्वतःला झोकुन दिले व आपल्या हलाकीच्या परिस्थितीला.. विसरण्याचा प्रयत्न केला. थोड्याच वर्षात तिला कळले व की तिच्याकडे उपजतच धावण्याची कला आहे व तिच्या शाळेतल्या कोचेसनी तिच्यात रस घेण्यास सुरुवात केली. त्याने उत्तेजीत होउन तिने हायस्कुल मधे गेल्यावर.. आयोवा राज्यातल्या डे मॉइन्स शहरातल्या रुझव्हेल्ट हायस्कुलमधे आल्यावर्..आइला सांगुन टाकले की दर वर्षीच्या तिच्या नविन शाळेत जाउन शिकण्यामुळे तिला तिचा धावण्याचा सराव निट करता येत नाही व आता ती डे मॉइन्सवरुन दुसरीकडे जायला तयार नाही.. पण राहते घर नसल्यामुळे तिच्या आइला तिकडच्या एका चॅरीटेबल चर्चच्या बेसमेंटमधे तिची राहण्याची सोय करावी लागली... एकाच हयस्कुलमधे राहुन धावण्याचा व्यवस्थित सराव करायला मिळेल म्हणुन लोलो जोन्सने तो पर्याय पत्करला... पण तिने तिच्या शाळेतल्या मैत्रिणिंना ती चर्चच्या बेसमेंटमधे राहते हे सांगीतले नाही. रुझवेल्ट हायस्कुलच्या पटांगणावर रोज सराव करुन झाल्यावर.. मैत्रिणिंचे आइवडिल तिला जेव्हा घरी सोडायला त्यांच्या गाडीतुन न्यायचे तेव्हा ती त्यांना चर्चच्या आधी एक ब्लॉक थांबायला सांगायची व तिथुन मग त्यांची गाडी गेल्यावर ती चर्चमधे जायची. तिथेच चर्चमधे मग.. साल्व्हेशन आर्मीने दिलेले.. रुखे सुखे.. दान केलेले जेवण... ती जेवायची..

त्या रुझव्हेल्ट हायस्कुलमधे.. सिनिअर होइसपर्यंत तिने आपले नाव .. धावण्याच्या शर्यतीत.. खुपच गाजवले. पण तिच्या प्रत्येक शर्यतीत तिचे आइवडिल का येत नाहीत असा प्रश्न तिच्या सर्व मैत्रिणिंना पडायचा... शेवटी.. हायस्कुलच्या शेवटच्या वर्षात असताना लोलो जोन्सची खरी गोष्ट समजल्यावर..डे मॉइन्सच्या काल्डवेल फॅमीलीने.. तिची दया येउन... आपले घर तिच्यासाठी खुले केले व तिला त्यांच्या घरात फुकट राहायला दिले.. तरीही घराजवळच्या एका बेकरीमधे लोलोने काम करुन त्यांना भाडे दिले... त्या काल्डवेल फॅमिलीने.. तिच्यावर अजुन एक उपकार केले.. त्यांची नात.. जी ल्युझिआना स्टेट युनिव्हर्सिटीत शिकत होती.. व जी १०० मिटर्स हर्डल्समधे अमेरिकन रेकॉर्ड होल्डर होती.. तिने लोलो जोन्सची शिफारस आपल्या हेड ऍथलेटिक कोचकडे(डेनिस शेव्हर) केली व तिच्या हायस्कुलमधल्या कामगीरीकडे बघुन व तिची चाचणी घेतल्यावर.. त्या कोचने लोलो जोन्सला ऍथलेटिक शिष्यवृत्ती देउन ल्युझिआना स्टेट युनिव्हर्सिटिच्या मायटी... ऍथलेटिक टिममधे..... सामील करुन घेतले. त्या युनिव्हरसिटिमधे.. तश्या चांगल्या प्रशिक्षकाच्या हाताखाली.. लोलो जोन्स दिवसेंदिवस आपल्या धावण्यात चांगलीच प्रगती करु लागली... त्यांच्या युनिव्हर्सिटिला तिने अनेक स्पर्धा जिंकण्यात मदत केली व स्वतःला एका जागतिक दर्जाची १०० मिटर्स हर्डलर म्हणुन इस्टॅब्लिश केले... पण शिक्षण जरी स्लॉलरशिपमुळे फुकट असले तरी जेवण्यासाठी व राहण्यासाठी मात्र लोलोकडे पैसे नव्हते... व त्या चार वर्षात तिने आपल्या क्रेडिट कार्डवर.. कर्जाने पैसे घेउन... ग्रोसरी केली.. घरभाडे दिले.. तसेच अपार्टमेंट्मधे.. ल्युझिआनाच्या असाह्य उन्हाळ्यात.. एअर कंडिशन चालु ठेवण्यासाठी पैसे नसल्यामुळे.. तिने मित्र मैत्रिणिंना.. एअर कंडिशन युनिट बिघडले आहे अश्या थापा मारल्या...

२००४ मधे कॉलेज ग्रॅज्युएशन संपल्यावर.. तिने आपले सर्व लक्ष २००४ अथेन्स ऑलिंपिक्समधे.. अमेरिकेच्या टिममधे स्थान मिळवण्यासाठी... केंद्रित केले. पैशाचे मात्र अजुन हालच होते.. एका जागतिक दर्जाच्या ऍथलिटला जसा आहार पाहीजे असतो तसा आहार तिला परवडत नव्हता.. नोकरी करुन.. धावण्याचा सराव.. ऑलिंपिक्सच्या टिममधे प्रवेश मिळवण्याचा खटाटोप.. तिला जमला नसता.. क्रेडिट कार्डवरचे कर्ज त्यामुळे तिच्या डोक्यापर्यंत आले होते... एखाद्या स्पॉन्सरची तिला नितांत गरज भासू लागली.. पण तसा चांगला स्पॉन्सर मिळवायला तिला आधी अमेरिकन ऑलिंपिक्स टिममधे स्थान मिळवुन दाखवायला लागणार होते...

जुलै २००४... अथेन्स ऑलिंपिक्ससाठी टिम निवडणुकीची स्पर्धा... १०० मिटर्स हर्डल्समधे.. लोलो जोन्सने फायनल मधे स्थान मिळवले... आता फक्त फायनल शर्यत.. त्यात जर पहिल्या तिघात तिने स्थान मिळवले तर.... तिचे अमेरिकन ऑलिंपिक्स संघात स्थान निश्चित! व त्यामागोमाग मग एंडॉर्स्मेंट्स व स्पॉन्सरची रांग तिच्यामागे लागणार होती... नको नको! आपण असे एवढ्या पुढचा विचार करायचा नाही... तिने त्या ऑलिंपिक्स ट्रायल्सच्या फायनल रेसला उभे असताना.. असे स्वतःला बजावले... शर्यत सुरु झाली...लोलो जोन्स नेटाने धावत होती.. पहिला अडथळा पार झाला.. दुसरा... तिसरा.. चौथा..पाचवा.. असे एकापाठोपाठ एक अडथळे सहज पार करत लोलो जोन्स सुसाट सुटली... आणि शर्यत अर्धी संपल्यावर तिच्या लक्षात आले की ती...त्या वर्षीची १०० मिटर्स हर्डल्समधली..अमेरिकेची सगळ्यात वेगवान धावपटु जोऍना हेज....हिच्या बरोबरीने पहिल्या स्थानावर आहे... सहावा.. सातवा.. आठवा.. अडथळा पार करुन झाला... ते ३३ इंच उंचीचे अडथळे लोलो जोन्सला... तोपर्यंत तिच्या आयुष्यात तिने पार केलेल्या अडथळ्यांच्या पुढे अगदीच खुजे वाटत होते... ऑलिंपिक्सला जायचे आपले स्वप्न पुरे होणार याची तिला खात्री वाटु लागली... आणी...पण!.. नवव्या अडथळ्यावर लोलो जोन्सचा पाय अडथळ्यात अडकला व ती जमीनीवर पडली... त्या अनपेक्षित घटनेनंतर.. त्या क्षणी... तिला असे वाटले की तिच्या डोक्यावर विजेचा लोळ कोसळला की काय... तिच्या अंगातली सर्व शक्ती गळुन गेली.... तिच्या आयुष्यभरच्या मेहनतीवर असे क्षणार्धात पाणी फिरले होते....तिची सर्व स्वप्ने.. तिच्यासोबत त्याक्षणी.. धुळित जाउन पडली होती....

त्या गोष्टीने एकदम हताश होउन तिने तिच्या ऍथलिट करिअरपासुन संन्यास घ्यायचे ठरवले व तिचा तो निर्णय तिने तिच्या ल्युझिआना स्टेट युनिव्हर्सिटिच्या कोचला सांगीतला... पण त्या कोचने तिला दोन धिराचे शब्द सांगुन तिच्या त्या निर्णयापासुन तिला परावृत्त केले. ऑलिंपिक्सनंतर त्याने स्वतः तिला युरोपिअन सर्किट मधे हर्डल्स शर्यतीत भाग घ्यायला जर्मनीला... स्टटगार्टला पाठवले... लोलोनेही एक शेवटचा डेस्परेट प्रयत्न म्हणुन त्या शर्यतीत भाग घेतला.. त्या शर्यतीत दुसरा नंबर पटकावुन.. ज्यात ऑलिंपिक्स विजेती जोऍना हेज व त्यावेळचे वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर्सही होते... व त्या वर्षी व २००५ मधे तिने जगभरच्या शर्यतीत.. वारंवार पहिल्या ३ मधे स्थान मिळवुन आपले नाव सर्व जगात प्रसिद्ध केले.. एसिक्स शुज व ओकली सन ग्लासेस कंपनीची स्पॉन्सरशिप व एंडॉर्स्मेंट तिला मिळाले आणी तिच्या आर्थिक संकटातुन ती एकदाची मुक्त झाली...

तिची अशी प्रगती तिने पुढची २ वर्षेही चालुच ठेवली व २००७ पर्यंत तिने ६० मिटर्स इंडोअर हर्डल्सम्धे विश्वविक्रम करण्यापर्यंत तिने मजल मारली. व फायनली... ४ वर्षानंतर परत एकदा ती अमेरिकन ऑलिंपिक्स टिममधे स्थान मिळवण्यासाठी..जुलै २००८ मधे युजिन्,ओरेगन इथे... ऑलिंपिक्स ट्रायल्सला हजर झाली. पण त्या ट्रायल्समधे मात्र तिने... २००४ च्या ट्रायल्सची पुनरावृत्ती होउ दिली नाही... इन फॅक्ट.. या वर्षीचा १०० मिटर्स हर्डल्समधला जगातला सगळ्यात वेगवान वेळ नोंदवुन.. पहिल्या क्रमांकावर येउन... दिमाखाने तिने अमेरिकन ट्रॅक टिममधे स्थान मिळवले. या ऑलिंपिक्स ट्रायल्सच्या आधीसुद्धा...या वर्षीच्या.. जगभरच्या १०० मिटर्स हर्डल्स्मधे.. तिने विजेतेपदे मिळवुन.. बैजिंग ऑलिंपिक्समधली.. संभाव्य विजेती म्हणुन.. सगळ्या जगाचे लक्ष तिच्याकडे वेधले होते...

बैजिंग ऑलिंपिक्सच्या आधी महिनाभरच.. तिच्या डे मॉइन्स गावात.. मिसिसीपी नदिच्या पुराने केलेल्या प्रचंड हानीनंतर.. लोलो जोन्सने.. तिकडे जाउन.. आपल्या पदरचे १२,००० डॉलर्स एका बेघर झालेल्या सिंगल मदरला दिले.. झालच तर तिच्या जुन्या रुझवेल्ट हायस्कुलसाठी... ट्रॅक डागडुजीसठी व नविन अडथळे विकत घेण्यासाठी तिने ३००० डॉलर्स दान केले... ती पुर्वी ज्या चर्चच्या बेसमेंटमधे राहत होती.. त्या चर्चलाही तिने घसघसशित आर्थिक मदत केली.

तर अशी ही लोलो जोन्स... तिन दिवसांपुर्वी... बैजिंग ऑलिंपिक्सच्या.. १०० मिटर्स फायनल्स शर्यतीसाठि ब्लॉकसमोर ओणवी उभी राहीली.... आपण कल्पना करु शकतो की त्या वेळी तिच्या डोक्यात किती विचारांचे थैमान चालले असेल... तिच्या २६ वर्षाचा सगळा खडतर प्रवास तिला तिचा डोळ्यासमोर दिसत असणार्..तिचे चर्चच्या बेसमेंटमधे काढलेले लहानपण.. साल्व्हेशन आर्मीने दान केलेले जेवण.... ल्युझिआनाला राहत असताना.. तिकडच्या जिवघेण्या ह्युमिड उन्हाळ्यात..एअर कंडिशनशिवाय काढलेले कॉलेजमधले दिवस.... आतापर्यंत प्रॅक्टिस व शर्यतीत धावुन केलले अविरत परिश्रम... हे सगळे तिच्या डोळ्यासमोरुन.. चलतचित्रासारखे जात असेल... पण त्या सगळ्या विचाराच्या वादळाला थोपवुन तिला आज तिच्या अल्टिमेट स्वप्नपूर्तीसाठी.. एकाग्र चित्ताने धावायचे होते...

शर्यत सुरु झाली... व लोलो जोन्स सुसाट धावत सुटली.. तिच्या शरीरातले सगळे स्नायु घट्ट करुन.. हातांच्या मुठी लयबद्द पाठी पुढे असे करत ती एक एक अडथळा पार करत होती...पाच अडथळे झाले.. सहा.. सात.. आठ..अडथळे झाले... लोलो जोन्सने स्टेडिली आपला लिड वाढवत नेला.. ८ अडथळ्यांनंतर तिच पुढे होती... ऑलिंपिक्स सुवर्णपदक तिच्यापासुन फक्त २० मिटर्स दुर होते.. तरी तिला असे वाटत होते की तिला सुवर्णपदकाने लपेटले आहे.. शी कुड स्मेल द व्हिक्टरी... तिचे डोळे विस्फारले होते.. पण!.... परत एकदा तिच्या आयुष्यात... तिच्या कमनशिबाने आपले कुरुप स्वरुप तिच्यापुढे आ वासुन उभे केले... नववा अडथळा पार करताना तिचा पाय त्या अडथळ्याला किंचितसा चाटुन गेला व त्यामुळे अल्पश्या वेळाकरता लोलो जोन्सचा तोल गेला.. पण तो तिचा गेलेला तोल.. क्षणार्धात तिला पहिल्या स्थानापासुन सातव्या स्थानावर फेकुन देण्यासाठी पुरता झाला... आणि बिचार्‍या लोलो जोन्सच्या डोळ्यादेखत तिच्या ऑलिंपिक्समधे सुवर्णपदक मिळवण्याच्या स्वप्नाच्या चिंधड्या झाल्या...

हताशपणे फिनिशलाइनवर.. आपल्या ओंजळीत आपला चेहरा झाकत.. लोलो जोन्स आपले दु:ख लपवायचा केविलवाणा प्रयत्न करत होती...आतापर्यंत तिच्या आयुष्यत आलेल्या पहाडाएवढ्या संकटांना तिने ओलांडण्यात यश मिळवले होते.. पण आज त्या केवळ ३३ इंचाच्या एका अडथळ्याला पार पाडण्यात तिला अपयश आले होते... तरीही परत एकदा आपल्या पायावर उभे राहुन तिने सगळ्या जगाला मुलाखत दिली व आपला पराभव मान्य केला.. ती म्हणाली की १० अडथळे मला पार करता येत नसतील तर मी ऑलिंपिक्स विजेती ठरायला पात्र नाही... मला ऑलिंपिक्स विजेती व्हायचे होते.. मी त्या सन्मानापासुन फक्त १० मिटर्स दुर होते... बट!... इट वॉजन्ट मेंट टु बी...!

तर अशी ही या लोलो जोन्सची गोष्ट!.. अजुन ती फक्त २६ वर्षाचीच आहे आणी २०१२ च्या लंडन ऑलिंपिक्ससाठी ती प्रयत्न करणार आहे असे तिने जाहीर केले आहे. आज जर मला लोलो जोन्स प्रत्य्क्ष भेटली तर मी वर दिलेल्या बड ग्रिनस्पॅनच्या उदगारांची तिला जरुर आठवण करुन देइन.........."Ask not alone for victory, ask for courage, for if you can endure you bring honour to yourself. Even more, you bring honour to us all....Morever... the honour should not go to those who have not fallen, but all honour to those who fall and rise again!....."

HATS OFF LOLO JOHNS!!!

ग्रेट मुकुंदा... तुमच्या लेखन प्रतिभेलाही सलाम!!!

मुकुंद,तुम्ही तिला भेटलात तर माझ्याही शुभेच्छा नक्की कळवा!

पूर्वी ऑलंपिक होते म्हणून होते की ज्यात भारताला तसे काही मिळत नाही इतकेच माहीत होते.तुमच्या लिखाणाने प्रत्येक इवेंट जिवंतपणे पहाणे शिकलो,अनुभवणे शिकलो आणि महत्वाचे म्हणजे त्यामागची मेहनत्,जिद्द जाणायला शिकलो.देश्,धर्मा पलिकडे जाऊन खेळाची खरी मजा घ्यायला तुम्ही शिकवले. तुम्ही जितक्या बारकाईने इंच्,सेकंदाचे गणित समजू शकतात तितके नाही जमत पण इंचाइंचाने तशी प्रगति नक्कीच करत आहे.

यापुढे जेव्हा जेव्हा खेळातली मजा,उत्कंठा अनुभवेल त्यात्या वेळी तुम्हाला मनोमन धन्यवाद नकीच देईन... अगदी न ठरवता आणि स्वत:च्याही नकळत!!!
या बाबतित जन्मभर तुमचा ऋणी राहीन!!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.

HATS OFF LOLO JOHNS!!!

ग्रेट मुकुंदा... तुमच्या लेखन प्रतिभेलाही सलाम!!!

वा.. खूपच सुंदर लिहिलय...
मुकुंद, तुम्ही तुमचे सर्व लेख एकत्र करून पुस्तक छापा.. त्यातल्या सर्वच गोष्टी सगळयांना खूप स्फूर्तीदायक होतील...

वा खुप छान!!!
मुकुन्द, तुमच्या सगळ्या लेखांचे प्रिन्ट आउट माझ्या साठी घेउ का? म्हणजे कधीही वाचायला उपयोगी पडतील.

सुशिलकुमारचे वडिल पेशाने ड्रायव्हर व जेमतेम उत्पन्न असलेले.. पण तरीही त्यांनी त्यांच्या मुलाला मुष्टियुद्धामधे प्राविण्य मिळवण्यास प्रोत्साहन व आर्थिक सहाय्य दिले... तसेच विजेंदरचे वडिल महिपाल पेशाने कंडक्टर.. पण त्यांनीही आर्थिक बिकट परिस्थीतीशी झगडत आपल्या मुलातल्या कुस्तीकौशल्याला जोपासले.. फुलवले... >>>

मुकुंद, अगदिच रहावलं नाही म्हणून! पण विजेंदर हा मुष्टीयोध्दा आहे आणि सुशीलकुमार हा कुस्तीगीर. आपल्या सुंदर लेखात कसलीच उणीव राहू नये म्हणून ही लेखनकामठी. आगावूपणाबद्द्ल क्षमस्व !

मुकुंद,खूपच छान लिहिलय.. एकदम प्रेरणा देणारी गोष्ट आहे ही लोलो जोन्सची.. लैकिकार्थाने ती सुवर्णपदक मिळवु शकली नसेल पण एवढया खड्तर आयुष्याशी झगडत ती आता यशाच्या ज्या शिखरापर्यंत पोहोचली आहे त्याचे महत्व नक्कीच सुवर्णपदक जिंकण्यापेक्षा कमी नाही...

मन्या.. चूक ध्यानात आणुन दिली म्हणुन धन्यवाद... त्यात बिलकुल आगावुपणा नव्हता..तुझे बरोबर आहे.. मी पहिल्या वाक्यात बरोबरच लिहीले होते पण अनावधनाने पुढच्याच वाक्यात त्यांच्या वडिलांच्या बाबत लिहीताना नावांची आदलाबदल झाली... चुकीची दुरुस्ती केली आहे.

अभिप्राय नोंदवला त्या सगळ्यांचे आभार... खर म्हणजे लोलो जोन्सची गोष्ट.. प्रतिकात्मक रित्या... ही... हजारो ऍथलिट्ससाठी.. जे पदक न मिळवताच परत जातात... त्यां सगळ्यांनाच लागु पडते.. जगभरचे सगळेच ऍथलिट दर चार वर्षांनी येणार्‍या या ऑलिंपिक्स सोहळ्यामधे भाग घेउन आपले कौशल्य अजमावुन पाहाण्यास खुप आतुर असतात.. त्या सगळ्यांनी आपापल्या दृष्टीने.. फक्त ऑलिंपिक्स स्पर्धेत पोहोचण्यासाठीसुद्धा.. प्रचंड मेहनत घेतली असते.. बरेच सॅक्रिफाइस केलेले असते.... फरक इतकाच की.. प्रत्येकाचे अडथळे निराळे.. प्रत्येकाचे सॅक्रीफाइस निराळे...त्यामुळे ते सगळेच माझ्या दृष्टिने शाबासकीस पात्र असतात..

गिरीराज... मी जानेवारीपासुन हे जे काही सगळे लिहीले.. ते अगदी मनापासुन लिहीले आहे.. ते वाचुन तुला जे वाटले व तुझ्या मनापासुन दिलेल्या वरील अभिप्रायातुन तु जे व्यक्त केलेस.. ते माझे लिखाण वाचणार्‍या बर्‍याच वाचकांच्या मनातसुद्धा आले असेल अशी आशा आहे... आणि एक.. धन्यवाद मला नको देउस.. धन्यवादाचे खरे मानकरी आहेत..मी लिहीलेल्या गोष्टींमधले प्रेरणादायी ऍथलिट्स व यापुढेही त्यांच्यासारखाच प्रेरणादायक व उत्कंठावर्धक पराक्रम करणारे ऍथलिट्स.. त्या सगळ्यांचे आपण सगळेच ऋणि असायला पाहीजे... असो..

अजुन एक गोष्ट इथे वाचा...

http://sports.yahoo.com/olympics/beijing/track_field/news?slug=cr-somali...

छे, प्रत्येकवेळी ऑलिंपिक संपले की फार हूरहूर लागते.. १५ दिवस कसे गेले कळलेच नाही. पण चीनचा उद्घाटन आणि समाप्तीचा सोहळा अप्रतीम होता. तसा कोणाला जमला नव्हता आणि जमेल का ही शंकाच आहे.
मुकुंद , सर्व लेख मस्त आहेत. धन्यवाद.
विजेन्दर , सुशीलकुमार ह्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले यश ह्या बद्दल तुमचे मत एकदम बरोबर. त्या विजेंदर चे वडिल मुलाखतीत दिसले.. एकदम पातळ माणूस, बारीकसे. ते म्हणाले, त्यानी पोळी, दूध, तूप , भाजी असेच पदार्थ बळकट होण्यासाठी खाल्लेत. म्हणजे त्यांना जर अजून नीट प्रशिक्षण मिळाले, अजून पूरक आहार मिळाला तर??
आत्ता आजतक वर ते दोघे परत येत आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी चिक्कार लोक विमानतळावर आलेत ते दाखवत आहेत.

क्षणाकरता पाणी तरळले डोळ्यात.
धन्यवाद मुकुंद!

खरच तुमचा लेख खुप भावला.
त्यातले "Ask not alone for victory, ask for courage.........."
हेच वाक्य मनात घोळ्वत शनिवारी सकाळी TenSports सुरु केले. योगायोगाने झुरिच इथे १०० मीटर अडथळ्यांची अंतिम शर्यत सुरु होणार होती. ऑलिंपिक विजेत्यांबरोबर लोलो जोन्स सुध्दा शर्यतीला तयार होत होती.डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ऑलिंपिक च्या अपयशाचे नर्व्हस् नेस कुठेही नव्हते. त्याच तडफेने ती मैदानात उतरली होती.
लोलो ६ क्रमांकाच्या लेन मधे होती.
शर्यत सुरु झाली... अगदी तुमच्या लेखाप्रमाणेच मी ही मनाशी हर्डल्स मोजु लागलो. एक, दोन, तीन,चार.... लोलो ४ थ्या स्थानी.. सहाव्या अडथळ्यापर्यंत ती पुढे आली.. पण तरीही अजुन तीन अडथळे राहीले होते...मग आठवा, नऊवा आणि दहावा....आणि ती जिंकली. क्षणासाठी वाटले.. आज तिच्या निर्धारा समोर सारे अडथळे खुजे झाले आहेत.
तिच्या या सुवर्ण पदकाला कदाचित ऑलिंपिक ची सर येणार नाही पण " the honour should not go to those who have not fallen, but all honour to those who fall and rise again!....."या उदगारांची आठवण मात्र जरुर झाली.

सुधाकर.

नेहेमीप्रमाणेच खुप छान लेख मुकुंद. गिरी ने आम्हा सर्वांच्या भावना व्यक्त केल्या आहेत...