पाक कौशल्यातली तू दाखवी वळवळ इथे

Submitted by कौतुक शिरोडकर on 17 December, 2011 - 12:11

(आमची प्रेरणा... www.maayboli.com/node/31190
या पिढीच्या महान गझलकाराची जाहीर माफी मागून)

पाक कौशल्यातली तू दाखवी वळवळ इथे
तेल आहे तापलेले, फ्राय कर, तळ तळ इथे

तू वडे करशील या भीतीमुळे येते अता
यायची केव्हातरी चकलीमुळेही कळ इथे

बघ तुझे पक्वान (?) कसल्याश्या सुवासे गंधती
अन मला भंडावतो करपा वरी दरवळ इथे

मी गिनीपिग नेहमी जेवावया गप बैसतो
'व्यक्त हो' केव्हातरी माझी मुकी हळहळ इथे

वाट किचनाची स्मशानालाच जाते शेवटी
ते वळण येईल आपोआप सध्या 'जळ' इथे

मी कढी वा सार चाखत, पुटपुटत भंजाळतो
'येथ मीठागर असावे... सागरी खळबळ इथे'

फक्त तेव्हा भात होतो भात म्हणण्यासारखा
तांदुळाना त्याज्य जेव्हा वाटते जळफळ इथे

हुंदका येतो जशी जाणीव ही होते मला
कालही होताच तो अन आजही पडवळ इथे

भोजनाच्या ताटलीचे चक्र सोसावे कसे
टाळता.. उत्साह येतो, पाहता.. मरगळ इथे

सोडुनी लज्जा खरे ते चित्र मी रेखाटले
आठवू गोष्टी किती मी, मांडतो मळमळ इथे

दोष पोटाचा नसे हा ... ते खरे बोले पहा
सोसते आहे सदा ते, मोशनी चळवळ इथे

गुलमोहर: 

मूळ गझल इतकी सुंदर आहे कि तिचे विडंबन होऊअच नये असं वाटलं. पण विडंबन छान जमलं आहे.
या विडंबनामुळेच माझे आवडते गझलकार बेफिकीर यांची एक सुंदर गझल वाचायला मिळाली याबद्दल श्री शिरोडकर यांचे आभार Happy

कौ Rofl

मूळ गझल व त्या अनुषंगाने हे विडंबन दोन्हीही झकास........

Rofl

हे तर भन्नाट होते
वाट किचनाची स्मशानालाच जाते शेवटी
ते वळण येईल आपोआप सध्या 'जळ' इथे

मी कढी वा सार चाखत, पुटपुटत भंजाळतो
'येथ मीठागर असावे... सागरी खळबळ इथे'
हुंदका येतो जशी जाणीव ही होते मला
कालही होताच तो अन आजही पडवळ इथे

छान

हळू-हळू 'मालवणी' गूण दिसाक सुरुवात होताहा...>>>

विवेकदा, तुम्हाला उशीरा कळले इतकेच. कौत्याचे हे "गुण" (?) खुप दिवसापासून पाहतोय आम्ही.
मजा आली बे कौत्या. लै दिवसांनी पुन्हा बहरलास Wink Proud