पक्षी

Submitted by उमेश वैद्य on 8 December, 2011 - 10:44

पक्षी

जीर्ण शीर्ण फ़ांदीवरचा
तो कोवळा पक्षी
अखेर उडालाच............

आम्ही त्याला
परत बोलावण्यासाठी
गाईलेली
आमच्या दृष्टीनं सुरेल
गाणी
त्यानं ऐकलीच नाहीत

त्याचे चकचकीत पंख
एकदोनदा हलले
आणि हलकेच तो
उडून गेला...........

या झाडावर
तशीही नव्हतीच
हिरवी पाने
आश्वासक फ़ांद्या.....

उमेश वैद्य २०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

उमेशः किती सुंदर भावना व्यक्त केली आहे आपण!! इतक्या थोड्या शब्दांत इतका भरगच्च आशय. मन भाराउन गेलं. कविता फार म्हणजे फार आवडली.

कोवळा पक्षी- चकचकीत पंख-हिरवी पाने आश्वासक फ़ांद्या...फार छान सांगितलाय आपण हा विषय (मला वाटत या कवितेत आपण आत्मा आणि शरीर या विषयी लिहिले आहे , बरोबर ना ?)

मलाही ही कविता 'रूपक' असावी असं वाटतंय.

वर वैभव कुलकर्णी म्हणतायत त्याप्रमाणे आत्मा आणि शरीर किंवा अन्य कशाविषयी असेल तर छानच आहे.

प्रद्युम्न, तुम्ही म्हटलंत ते अधिक बरोबर वाटतं. कारण कोवळा पक्षी, चकचकीत पंख हे तुम्ही सुचविलेल्या
गोष्टीला लागू पडतात. (तुमचा प्रतिसाद आल्यानंतर मी माझा प्रतिसाद काहीसा संपादित केला.)

वैभव व उल्हासजी, तुमचे निरिक्षण सही आहे. मी या कवितेवर विचार केला तेव्हा वृध्द माता-पित्यांना सोडून प्रगतीकरिता दूरदेशी निघालेल्या तरुणाबद्दल ती असावी असे वाटले होते.

मित्रांनो तुमच्या प्रतिसादाबद्द्ल आभार.
@वैभव
या कवितेत आपण आत्मा आणि शरीर या विषयी लिहिले आहे , बरोबर ना ?)>>
माझ्याच कवितेविषयी मी सांगणे योग्य होणार नाही. पण ही कविता एका नुकत्याच आलेल्या ख-या़खु-या
अनुभवा संबंधाने स्फुरली आहे. आपण म्हणता ते बरोबर आहे. खर तर यात वापरलेल्या प्रत्येक रूपकाला एक निश्चित अर्थ आहे. हा अनुभव अगदी ताजा असल्याने, पुन्हा पुन्हा वाचताना मी ही भारावतो.

कवींची भावविश्व अशीच हळवी, ओलावलेल्या पापण्यांची असतात याची आपणा सर्वांना कल्पना आहेच.