अटलांटा आणि आसपास २ : "पटेल" स्पॉट्स (नवीन फोटोंसह)

Submitted by Adm on 6 December, 2011 - 00:09

अटलांटा आणि आसपास (१) : नॉर्थ जॉर्जियन 'हेलन'च्या मोहक अदा!
----------------------------------------------------------------------------------------------------------------
बरेच जण एखाद्या सप्ताहांतापुरते अटलांटाला चक्कर टाकतात आणि हातात असलेल्या पाऊण, एक किंवा दिड दिवसात इथलं काय बघता येईल असा त्यांना प्रश्न पडतो. जर अटलांटा शहराबाहेर जायचं नसेल आणि हातात दिड-दोन दिवस असतील तर शहरातले सगळे "पटेल पॉईंट्स" बघणे (आणि तिथे फोटो काढून ते फेसबूकवर डकवणे!) सहज शक्य आहे.

अटलांटामध्ये अनेक कंपन्यांची मुख्यालयं आहेत. उदाहरणं द्यायची झाली तर कोकाकोला, सिएनएन, डेल्टा / एअरट्रॅन एअरलाईन्स / कॉक्स कम्युनिकेशन, अर्थलिंक, युनायटेड पार्सल सव्हिसेस (UPS), वॉफल हाऊस आणि चिकफिले ह्या रेस्तराँ चेन्स. ह्यातल्या काही मुख्यालयांमध्ये म्युझियम्स, टूर्स आहेत आणि ती डाऊनटाऊन परिसरात आहेत.

१. वर्ल्ड ऑफ कोकाकोला : जगप्रसिद्ध कोकाकोला उत्पादनं तयार करणार्‍या कंपनीचं मुख्यालय अटलांटा डाऊनटाऊनमध्ये आहे. तसचं "वर्ल्ड ऑफ कोकाकोला" नावाचं त्यांचं म्युझियमसुद्धा ह्याच परिसरात आहे.

सुरूवातीला कोक जेव्हा पहिल्यांदा विकायला सुरूवात झाली तेव्हापासूनची सगळी मोठमोठी बॅनर्स इथे लावलेली आहेत. तसेच अगदी सुरूवातीपासूनच्या कोकच्या बाटल्या बघायला मिळतात. जुन्या बाटल्यांचे आकार आत्ताच्या काचेच्या बाटल्यांपेक्षा बरेच वेगळे होते.

कोकाकोलाच्या सिक्रेट फॉर्म्युलाबद्दल माहिती देणारी (?) फिल्म तिथे सुरुवातीलाच दाखवतात. इथे एक ४-डी शो आहे. कोक म्हणजे नक्की काय हे सांगणारा हा शो मनोरंजक आहे. पुढच्या एका विभागात जगभरात कोकाकोलासाठी बनवल्या गेलेल्या जाहिराती इथल्या थिएटरमध्ये सतत सुरू असतात. आपल्या इथली अमिर खान आणि ऐश्वर्या रायची जाहिरात इथे बघायला मिळते.
इथे कोकच्या बाटल्यांचं उत्पादनसुध्दा थोड्याप्रमाणात होतं आणि त्याची असेंब्ली लाईन बघायला मिळते. मोठमोठ्या बॉयलरमध्ये भरलेल्या डिस्टील्ड वॉटर पासून कोकच्या सिलबंद बाटली पर्यंतचे मधले सगळे टप्पे इथे बघता येतात.

आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे विविध देशांमधल्या कोकाकोला पेयांची चव ह्या टूरच्या शेवटच्या टप्प्यात चाखता येते. क्लासिक कोक पण हवं तेव्हढं पिता येतं. प्रत्येक खंडाचा वेगवेगळा भाग करून त्यात देशानुसार डिस्पेंसर आहेत. भारतामधून 'माझा' असेल असं वाटलं होतं, पण तिथे भारतातर्फे स्प्राईट आहे. दक्षिण अमेरिकन देशांमधली सगळी पेयं छान आहेत.

बाहेर पडताना प्रत्येकाला तिथेच तयार झालेल्या (पहिल्या धारेच्या) कोकची एक बाटली भेट म्हणून देतात. पुढे एक मोठं गिफ्ट शॉप आहे. तिथे बर्‍याच प्रकारची सुव्हिनीयर्स मिळतात.
जरा वेगळ्या प्रकारचं म्युझियम म्हणून वर्ल्ड ऑफ कोकाकोलाला नक्की भेट द्यावी. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी कोक कधी ना कधी प्यायलेलं असल्याने प्रत्येकाला थोडीफार उत्सुकता असतेच आणि प्रत्येक वयोगटातल्या लोकांचे मनोरंजन होईल ह्याची पुरेपुर काळजी इथे घेतलेली आहे.
हल्लीच्या काळातल्या ख्रिसमसचं महत्त्वाचं आकर्षण असलेला "भेटवस्तू वाटणारा सांताक्लॉज" ही कल्पना पुढे रेटण्यात कोकाकोला कंपनीच्या जाहिरात विभागाचाही बराच हात आहे ही माहीती इथे मिळते.

२. सिएनएन सेंटर : अमेरिकेतली २४ तास वृत्तसेवा पुरवणारी पहिली वाहिनी असलेल्या CNN चं मुख्यालय अटलांटा डाऊनटाऊन परिसरात आहे. ह्या वाहिनीवर प्रसारीत होणार्‍या दिवसभरातल्या राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय बातमीपत्रांमधली बरीच बातमीपत्र ह्या इमारतीतल्या स्टुडीयोंमधून प्रसारीत होतात.

कोकाकोलाप्रमाणेच सिएनएन सेंटरमध्येही टुर्स असतात. इथे इमारतीच्या मध्यभागी भलेमोठे फूडकोर्ट आहे. डाऊनटाऊनमध्ये काम करणारी बरीच मंडळी लंचसाठी ह्या फूडकोर्टमध्ये येतात. ह्या फूडकोर्टच्या एका बाजूला गिफ्टशॉप तसेच माहिती केंद्र आहे. फूडकोर्टमध्ये भल्यामोठ्या स्क्रीनवर सिएनएन वाहिनीवरची वृत्तपत्रे प्रसारित होत असतात. सिएनएन सेंटरच्या टुरवर जाणार्‍या लोकांसाठी फूडकोर्टच्या मध्यातून एक भलामोठा सरकता जीना थेट पाचव्या मजल्यापर्यंत जातो. ह्या जीन्याची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे.

टुरदरम्यान CNN आणि CNN international, HLN (Head line news) तसेच CNN en Español ह्यांचे स्टुडीयो पहायला मिळतात. काही ठिकाणी सुरू असलेलं बातमीपत्र सादरीकरणही पहायला मिळतं. ह्या टुरदरम्यान ते बातमीपत्र प्रसारीत होणार्‍या स्टुडियोची संपूर्ण माहिती देतात. निवेदकाला बातम्या कुठे दिसतात, बातमीपत्र वाचन करत असताना त्याला सूचना कशा दिल्या जातात, हवामानाचा अंदाज दाखवणारे नकाशे कुठे आणि कसे असतात ह्या सगळ्या गोष्टी तिथे समजतात. टुरमधल्या एकाला बोलावून ते मॉक बातम्या द्यायला सांगतात. तो भाग मनोरंजक असतो!
२००८ साली मार्च महिन्यात झालेल्या वादळात सिएनएन सेंटरच्या ह्या इमारतीचे खूप नुकसान झाले होते. त्याची माहिती तसेच फोटो टुर संपता संपता असलेल्या फोटो गॅलरीत मिळतात. अनेक महत्त्वाच्या घटनांचे सिएनएनवर दाखवले गेलेले फोटोही इथे पहायला मिळतात.

३. जॉर्जिया अक्वेरियम : अमेरीकेतलं प्रत्येक ठिकाणं हे कुठल्या का होईना क्रायटेरियाने "जगातलं सगळ्यांत मोठं" असतं! तश्याच प्रकारचं "इनडोर वॉटर कंटेट" ह्या क्रायटेरियानुसार जगातलं सगळ्यांत मोठं असलेलं बोटीच्या आकाराच्या इमारतीत वसलेलं जॉर्जिया अक्वेरियम अटलांटा डाऊन टाऊनमध्ये वर्ल्ड ऑफ कोकाकोलाच्या अगदी शेजारी आहे.

लहान मुलं बरोबर असतील तर ह्या अक्वेरियम मध्ये जरूर जावं अन्यथा ते बर्‍यापैकी कंटाळवाणं आहे. बाकी ठिकाणी नसलेलं असं वेगळं काहीही इथे नाहीये. त्यामुळे सी-वर्ल्ड, शिकागोचं शेड अक्वेरियम वगैरे पाहिलेलं असल्यास इथे नाही गेलात तर फार काही फरक पडणार नाही. आत मधल्या बर्‍याच शोज ना वेगळे पैसे पडतात. बर्‍याच ठिकाणी भल्यामोठ्या काचेच्या भिंतीमागे बहुरंगी मासे दिसतात. ह्या भिंतींवर असलेल्या दिव्यांची रंगसंगती छान आहे. लहान मुलं हे पाहून खुष होतात.

वर्ल्ड ऑफ कोकाकोला, सिएनएन सेंटर आणि अक्वेरियम ह्यांचा मिळून काँबो पास मिळतो. आणि सकाळी लवकर सुरुवात केली तर ह्या तीनही गोष्टी एका दिवसात बघणे शक्य आहे.

४. सेंटेनीयल ऑलिंपीक पार्क : अटलांटा शहराने १९९६च्या ऑलिंपीक स्पर्धेचं यजमानपद भूषवलं होतं. ह्या स्पर्धेनिमित्ताने अटलांटा डाऊनटाऊनमध्ये ही बाग उभारली गेली. ह्या बागेच्या मध्यभागी ऑलिंपीक रिंगच्या आकारात कारंजी आहेत आणि इथे लाईट अँड साऊंड शो होतो. चारही कोपर्‍यांत ऑलिंपीक टॉर्चच्या आकारातल्या मशाली आहेत.

इथल्या पदपथांच्या विटांवर ऑलिंपीकसाठी देणगी देणार्‍यांची नावे आणि त्यांनी दिलेले संदेश कोरलेले आहेत. ह्या बागेत एका बाजूला कार्यक्रमांसाठी मंच आहे. तिथे दर शनिवारी वेगवेगळे कार्यक्रम सुरू असतात. इथे विश्व हिंदू परिषदेतर्फे दिवाळीच्या दरम्यान कार्यक्रम असतो. हिवाळ्यात एखाद्या दिवशी चांगली हवा असेल तर अनेक लोक इथल्या लॉनवर उन्हं खात बसलेली असतात किंवा चक्कर मारत असतात.

५. स्टोन माऊंटन : अटलांटा शहरापासून सुमारे २० मैल अंतरावर स्टोन माऊंटन नावाचा ग्रॅनाईटचा डोंगर आहे. ह्या डोंगराचे वैशिष्ट्य म्हणजे हा जमिनीवर ठेवलेल्या लंबगोलाकृती दगडासारखा दिसतो. म्हणजे आधीचे चढाव, डोंगराच्या सोंडा अशी नेहमीची रचना इथे दिसत नाही. एकदम डोंगर सुरू होतो. ह्या डोंगराची उंची साधारण १७०० फूट आहे. डोंगरमाथ्यावर जायला केबल कार घेता येते किंवा चालतही जाता येते. चालत साधारण २०-२५ मिनीटांत वरपर्यंत पोचता येतं. डोंगरावरून अटलांटा परिसराचं सुंदर दृष्य दिसतं. अटलांटा शहरात खूप झाडी आहे. त्यामुळे फॉलमध्ये गेलं की डोंगरमाथ्यावरून एकदम रंगीबेरंगी दिसतं.
डोंगरावर तयार झालेल्या नैसर्गिक भिंतीवर सिव्हील वॉरमध्ये लढलेल्या तीन प्रमुख नेत्यांचं शिल्प कोरलेलं आहे. ह्याच भिंतीवर उन्हाळ्यात प्रत्येक सप्ताहांताला संध्याकाळी अंधार पडल्यानंतर अमेरिकेच्या आणि जॉर्जियाच्या इतिहासावर आधारीत लेझर शो केला जातो आणि फटाक्यांची रोषणाई केली जाते. तसंच ह्या डोंगराच्या परिसरात स्टोन माऊंटन अम्युझमेंट पार्क आहे. सगळीकडे असतात तशी साधारण ट्रेन राईड, बोट राईड, ग्लास ब्लोईंग, थ्रीडी सिनेमा, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळ, टॅटूवाला, बुढ्ढी के बाल, फूडकोर्ट वगैरे गोष्टी इथे आहे. इथे एक वैशिष्ट्यपूर्ण डक राईड आहे. बस सारख्या वाहनात सगळ्यांना बसवतात ज्याला ते "डक" म्हणतात आणि पुढे हे डक पाण्यात शिरून होडीप्रमाणे तरंगायला लागतं! उन्हाळ्यात साधारण दुपारी इथे येऊन सगळ्या राईड करून, नंतर खादाडी करून आणि लेझर शो बघून परतणे असा एक दिवसाचा कार्यक्रम बरेच जण करतात. लेझर शो खूपच उंचावर होत असल्याने लॉनवर कुठेही बसून दिसू शकतो. त्यामुळे लोकं आपल्याबरोबर घडीच्या खूर्च्या, चटया, चादरी वगैर घेऊन निवांत बसलेले असतात. वेळ असेल आणि हवा चांगली असेल तर इथल्या एखाद्या पिकनीक एरियामध्ये निवांत ग्रील करत दिवसभराचं आऊटींग करता येतं.
हिवाळ्यात लेझर शो जिथे बसून बघतात त्या लॉनवर कृत्रिम बर्फ आणून टाकतात आणि त्यावर स्नो-ट्युबिंग करता येतं. साधारण जानेवारी फेब्रुवारी महिन्यांत हे स्नो-माऊंटन उघडतं.

विजिगीषुने काढलेले हे स्टोन माऊंटनचे काही फोटोज :

कार्व्हिंग्ज :

अटलांटा शहराचा पॅनोरमा :

स्कायलाईन :

६. स्वामी नारायण मंदीर : आता ह्याला पटेल स्पॉट म्हंटलेलं चालेल की नाही ते माहित नाही पण हे मंदिर सुद्धा अटलांटामधला मोठा टुरिस्ट स्पॉट आहे! बसच्या बस भरून देशी तसेच विदेशी लोकं मंदिर पहायला येत असतात. अमेरिकेतल्या सगळ्या स्वामी नारायण मंदिरांमधलं सगळ्यांत मोठं हे आहे असं म्हणतात. मंदिराच्या बाहेरच्या बाजूचं आणि आतलं कोरीवकाम अतिशय सुंदर आहे.

विजिगीषुने काढलेले हे काही फोटोज :

मंदिराच्या आतली दिव्यांची रचना आणि आरासही सुरेख असते. दिवाळीला ह्या मंदिरावर वेगवेगळ्या रंगाचे प्रकाशझोत सोडून रोषणाई करतात तसच फटाक्यांची आतिषबाजी होते. मंदिराच्या आत दिवाळीच्या दिवसांमध्ये पणत्या आणि साध्या, फुलांच्या आणि धान्यांच्या रांगोळ्यांची फार सुरेख आरास केलेली असते.

हि सगळी ठिकाणं अटलांटा शहराच्या जवळपास आहेत. शहराबाहेरच्या, एक दिवसात, जाऊन येता येण्याजोग्या अजून काही ठिकाणांबद्दल पुढल्या भागात...

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्या मीच पहिली का?

कोक फॅक्टरीची फिल्म मी नॅशनल जिऑग्राफिक वर बघितली. तेव्हाच ऑटोमेशनच्या करामतीने फार इंप्रेस झाले होते. कोकचे ब्रँडिंग अभ्यास करण्यासारखे आहे. फॅक्टरी खरेच बघण्यासारखी असणार.

तो सुप्रसिद्ध जिना मला वाटायचे इमारतीत आत आहे पण तो तर बाहेर आहे. फूड कोर्टला लवकर जायला बरे.

बाकी स्पॉट्स पण छान वाट्त आहेत, खास करून मुले व फॅमिली गॅदरिंग साठी. मस्त सफर झाली.

धन्यवाद अश्विनीमामी आणि मंजूडी... Happy

अश्विनीमामी, तो जीना आतच आहे बिल्डींगच्या साधारण मध्यभागी.. तळ मजला ते पाचवा मजला... आणि त्या जीन्यावरून फूडकोर्टवर जाता नाही येणार कारण तो फूडकोर्ट मधून वर जातो. त्यावरून खाली नाही येता येत.. Happy

कोकचे ब्रँडिंग अभ्यास करण्यासारखे आहे. >>>> नक्कीच ! इथल्या बिझनेस स्कूल्समध्ये केस स्टडी असतो कोकबद्दल..

मंजू.. ही टर्म मला पण इथे आल्यावरच कळली. इथे खूप गुज्जू लोकं आहेत.. साधारण प्रत्येक शहरातल्या टीकमार्क प्लेसेसना सगळे गुज्जूभाई जमून फोटो काढत असतात... त्यामुळे अश्या जागांना पटेल स्पॉट्स म्हणतात.. कारण तिथे मोठ्या संख्येने पटेल्स सापडू शकतात... Happy

कोका कोला म्युझियम मस्तच आहे. तिथे ते वेगवेगळ्या देशातले कोक प्यायला टेस्ट करायला देत ते भारी आहे.
पराग , धाग्याच नाव बदल रे. Happy

मस्तच. Happy
सीएनएन मधली न्यूज ब्रॉडकास्टिंगची प्रक्रिया बघायला खरंच इंटरेस्टींग वाटत असेल.
मंदिराचा शेवटचा फोटो खूप छान आलाय.

वलसाडला (बलसाड) अगदी ऐन समुद्रकिनार्‍यावर असंच स्वामीनारायण मंदीर आहे. फारच सुंदर आहे. सूर्यास्ताच्या वेळेस मंदिराच्या लालसर दगडावर सूर्याचं केशरी ऊन ही रंगसंगती अप्रतिम दिसते.

पटेल स्पॉटस.. Lol
एका पटेलकडूनच ऐकलं होतं हे.
अथेन्समधे राहूनही केवळ कोक म्युझियम आणि स्टोन माउंटन एवढंच बघितलंय. बाकीचं राह्यलंच.
स्टोन माउंटनचे फोटो असतील माझ्याकडे. पण ते ११ वर्षापूर्वीचे. त्यामुळे हार्ड कॉपी. पुण्यात असतील बहुतेक. गेले की शोधून, स्कॅन करून टाकते. केबल कार मधून त्या ग्रॅनाइटमधे कोरलेल्या शिल्पांच्या बरच जवळ नेतात. मस्त दिसतं. आणि तू म्हणल्याप्रमाणे वरती गेल्यावर आजूबाजूचं अ‍ॅटलाणा (हा टायपो नव्हे! Happy ) पण सही दिसतं. मी फॉलमधेच गेले होते.
लेझर शोला पण मजा येते.

हा धागा बघून जुन्या आठवणी जागृत झाल्या. १९९५-१९९८ या काळात मी अ‍ॅटलांटाच्या रोझवेल नावाच्या उपनगरात रहात होतो. वर उल्लेख केलेल्यांपैकी स्टोन माऊंटन, सेंटेनिअल ऑलिम्पिक पार्क ही २ ठिकाणे व इतर काही ठिकाणे पाहिली आहेत. १९९६ साली अ‍ॅटलांटात ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या. भारत-पाकिस्तान व स्पेन्-अमेरिका हे २ हॉकीचे सामने बघून रात्री १०:३० च्या सुमाराला परत येताना वाटेत सेंटेनिअल पार्क लागले. खूप उशीर झाल्याने नंतर भेट देऊ असा विचार करून पार्कला भेट न देताच आम्ही (एकूण १० जण) घरी परत आलो. त्याच पार्कमध्ये अर्ध्या तासाने अंदाजे ११ च्या सुमाराला बॉम्बस्फोट झाल्याचे दुसर्‍या दिवशी सकाळीच समजले. त्यात २ व्यक्तींचा मृत्यु झाला होता व इतर काहीजण जखमी झाले होते. कदाचित हॉकीचे सामने पाहून परत येताना पार्कला भेट न देण्याची देवानेच सुबुद्धी दिली असणार. स्फोटानंतर ४ दिवस पार्क बंद होती व नंतर परत उघडली. लगेचच आम्ही ती पाहून आलो.

>>> मंजू.. ही टर्म मला पण इथे आल्यावरच कळली. इथे खूप गुज्जू लोकं आहेत.. साधारण प्रत्येक शहरातल्या टीकमार्क प्लेसेसना सगळे गुज्जूभाई जमून फोटो काढत असतात... त्यामुळे अश्या जागांना पटेल स्पॉट्स म्हणतात.. कारण तिथे मोठ्या संख्येने पटेल्स सापडू शकतात...

पटेल स्पॉट्सचा अजून एक फंडा आहे. अमेरिकेत पूर्वी ३-६ महिने कामासाठी B1 व्हिसावर लोक जायचे. इतक्या कमी वेळात अमेरिकेतले जेवढे शक्य होईल तेवढे स्पॉट्स पाहणे आवश्यक होते. त्यामुळे सर्वजण आपल्या गावातली जवळपासची चांगली ठिकाणे बघण्यापेक्षा डिझ्निलँड, नायगरा, इ. जगप्रसिद्ध ठिकाणीच जायचे. त्यामागे असा उद्देश होता की भारतात परत गेल्यावर आपण काय भारी ठिकाणे पाहून आलो ते सांगावे व त्यायोगे आपले इतरांत वजन वाढावे. थोडक्यात मुलींना इम्प्रेस करण्यासाठी, मी स्टोन माऊंटन पाहून आलो किंवा झू पाहून आलो हे सांगण्यापेक्षा, मी नायगरा पाहिला, डिझ्निलँड बघितले असे सांगितल्यावर मुली पटण्याची/इम्प्रेस होण्याची जास्त शक्यता आहे अशी समजूत होती. थोडक्यात या जगप्रसिद्ध ठिकाणांची "पटेल" व्हॅल्यू जास्त होती. म्हणून हे "पटेल" स्पॉट्स. Happy

पूर्वा, सीमा, ललिता धन्यवाद. Happy

नी.. फोटो अगदी नक्की टाक..

मास्तुरे.. रॉझवेल म्हण्जे तुम्ही तर अगदी जवळचे निघालात की ! ऑलिंपीक पाहिलं आहे म्हणजे ग्रेटच!

पराग,

तुम्ही अ‍ॅटलांटातल्या कोणत्या गावात राहता? मी रॉझवेलमध्ये हेमिंग्वे लेन इथे राहत होतो (४०० फ्रीवेच्या एक्झिट ७ च्या जवळ) व अ‍ॅल्फारेटामध्ये ए टी अ‍ॅण्ड टी मध्ये काम करत होतो. काही दिवस मी ए टी अ‍ॅण्ड टी च्या डाउनटाऊन मधल्या ऑफिसमध्ये पण जात होतो. तिथल्या मेरीएट्टा, स्मॅरना, नॉरक्रॉस, डुलुथ, सॅन्डी स्प्रिन्ग्ज अशा आजूबाजूच्या उपनगरातून अनेक मित्र राहत होते. त्यांच्याकडे अनेकवेळा जाणे व्हायचे. इतर भारतीयांप्रमाणे आम्ही अ‍ॅटलांटातली स्थानिक स्थळे बघण्यापेक्षा "पटेल" व्हॅल्यू असलेल्या ओरलँडो, स्मोकी माऊंटन्स, पनामा बीच अशाच ठिकाणांना जास्त वेळा जायचो.

हे स्वामीनारायण मंदीर नवीन झालेलं दिसंतय. मी होतो तेव्हा फक्त २ मंदिरे होती (डाऊनटाऊन ओलांडल्यावर असलेले वेंकटेश्वर बालाजीचे मंदीर व मेरीएट्टातील इंडिअन असोसिएशनचे कार्यालय आहे तिथे पण एक मंदीर आहे). माझ्या ओळखीचे बरेच जण अजून अ‍ॅटलांटा परिसरातच आहेत, पण आता त्यांच्याशी फारसा संपर्क राहिलेला नाही.

काल हा धागा बघून आम्ही (मी आणि सौ.) एकदम नॉस्टॅल्जिक झालो. आता जुने फोटो काढून पुन्हा एकदा जुन्या आठवणी जागृत करतो.

सिंडी.. तुम्हाला आता पत्रिका आणि अक्षताच पाठवायच्या राहिल्या आहेत फक्त !
मिनी, मामी धन्यवाद.. Happy

मास्तुरे... मी अल्फारेटात असतो. स्वामीनारायण मंदिर २००७ साली झालं.. आता ३/४ मंदिरं आहेत आसपास. मॅरिएटा परिसरात आमचं फारसं जाणं होतं नाही.. एकतर ओळखीचं कोणी रहात नाही आणि दूरपण आहे. पण त्या भागातली घरं फार भारी आहेत !! मी एकदा टेनीस खेळायला तिथल्या एका सबडीव्हीजनमध्ये गेलो होतो.. कोर्टचा रस्ता चुकलो आणि मग रस्ता शोधायचा सोडून घरचं बघत बसतो बराच वेळ. Happy
ओरलँडो, स्मोकी हे दोन्ही भारी आहेत एकदम.. ! परत चक्कर मारा आता अटलांटाला.. आपण गटग करू.. Proud

पराग,

मेरिएटाप्रमाणे अ‍ॅल्फारेटसुद्धा महागडा परिसर समजला जातो. आता मी परत अटलांटाला येणे अशक्य आहे. मी आयटी क्षेत्र सोडून ३ वर्षे होऊन गेली. आता त्या क्षेत्रात परत जाणे किंवा नवीन जॉब घेऊन परदेशात जाणे शक्य वाटत नाही. असो. निमंत्रणाबद्दल धन्यवाद! जमल्यास १९९६ सालातले अटलांटाचे व ऑलिंपिकचे फोटो टाकीन. त्याऐवजी तुम्हीच पुण्याला या. तुम्ही आलात की आपण गटग करू.

मेरिएटाला एका 'पटेल' रूममेटचे घर होते. तिच्याबरोबर बर्‍याचदा तिच्या घरी जाऊन राह्यलो होतो. जलेबी अने फाफडा हादडलेले आहे तिच्या घरी थँक्सगिव्हिंगला.. Happy

अ‍ॅडमा : २००२ मध्ये महिनाभर मी अल्फारेट्टा मध्ये होतो. तेंव्हा सीएनएन सेंटर आणि कोक म्युझियम बघण्याचा योग आला होता. त्याच्या आठवणी जाग्या झाल्या ................ Happy

आधी प्रॉमिस केल्याप्रमाणे स्टोन माउंटनचे काही फोटो. २००० च्या फॉल सेमिस्टरमधे काढलेले आहेत. तेव्हा फिल्लमवाले क्यामेरे होते आणि फुकट/ अगदी स्वस्तात प्रोसेसिंग व डेवलपिंग करून देणार्‍या साइटस होत्या. त्यांच्या पोस्टेज पेड पाकिटात फोटु मारलेला रोल पाठवायचा त्यांना आणि मग ते लोक तो रोल डेव्हलप करून आपल्या ऑनलाइन अकाउंटात ते सगळे फोटो लोड करायचे आणि आपल्या फोटुंची हार्ड कॉपी, निगेटिव्ह्ज, सगळ्या फोटुंची कॉन्टॅक्ट शीट असं पाठवायचे. नंतर जास्तीची कॉपी ऑर्डर करायची तर पैसे पडायचे. प्लस देशात फोटो पाठवणे सोपे असायचे. लिंक पाठवली की झाले. स्नॅपफिश, ओफोटो अश्या होत्या काही सर्व्हिसेस. फुकट सर्व्हिसेसची त्यांची काही लिमिट असायची. ती संपली की मग पैसे द्यायला लागायचे. आम्ही फुकट ते पौष्टिकवाले ग्रॅड स्टुडंटस लिमिट संपली की नवीन अकाउंट उघडायचो. Happy (१० रूपयाचा ड्रॉइंग पेपर $१० ला आणि २ रूपड्यांची पेन्सिल $२ ला मिळायची मग विद्यार्थ्यांनी फु ते पौ केले नाही तरच नवल!)
तर सांगायचा मुद्दा हा की अश्या प्रकारे त्या फोटुंची सॉफ्ट कॉपी मिळालेली असल्याने कदाचित तेवढे सुस्पष्ट नसतील फोटो. चालवून घ्या.
१. स्टोन माउंटनच्या डोस्क्यावरून अटलांटा शहर. फॉगमुळे धूसर दिसतेय.
atl-Stone-Mountain-in-atlanta.-again-from-the-top-of-the-mountain..jpg

२. स्टोन माउंटनच्या डोचक्यावर
atl-stone-mountain.-on-the-top-of-the-mountain.jpg

३. स्टोन माउंटनमधले म्युरल. या संपूर्ण म्युरलचा आकार एका फुटबॉल स्टेडियमच्या एवढा आहे.
atl-The-Sculpture-at-the-stone-mountain.-the-actual-size-is-as-big-as-a-football-stadium.jpg

मेरिएटाप्रमाणे अ‍ॅल्फारेटसुद्धा महागडा परिसर समजला जातो. >>> खरय.. आता अल्फारेटामधून जॉन्सब्रीज फोडून वेगळं शहर केलं. अ‍ॅल्फारेटा आणि जॉन्सब्रीज मधली घरं पण फार भारी आहेत. उन्हाळ्यात दाट झाडीमधून आतल्या रस्त्यांवर ड्राईव्ह करायला मस्त वाटतं एकदम. जॉन्सब्रीजमध्ये गोल्फ कोर्सपण आहे मोठ. इथे पीजीए टुर्नामेंट झाली होती मध्यंतरी. आणि हल्ली अनेक भारतीयांनी स्वतःची घरे घेतली आहेत इथे. सबडीव्हीजन्सपण सही आहेत एकदम. एकंदरीत श्रीमंत शहरं झाली आहेत!
तुम्ही आलात की आपण गटग करू. >>> नक्की.. Happy

नीरजा.. धन्यवाद फोटो टाकल्याबद्दल!!! दुसर्‍या फोटोत साधारण कल्पना येते आहे स्टोनमाऊंटनच्या आकारची.
पहिल्या फोटोत दुरवर स्कायलाईन दिसते आहे.

रैना धन्यवाद Happy

स्टोन माऊंटनचे तसेच स्वामी नारायण मंदिराचे विजिगीषु (राहूल) ने काढलेले फोटो लेखात टाकले आहेत.
धन्यवाद राहूल !

बास का, धन्यवाद कसले ... आता अजून एक टाकतो. हा म्हणजे साध्या SLR नं फार पूर्वी Happy काढला होता. ४०० ची फिल्म, ३-४ फोटोजपैकी १ चांगला येणार वगैरे अशी परिस्थिती असायची तेव्हा...

सूर्यास्त होताना कार्व्हिंग कसं सगळ्यात छान दिसेल या प्रयत्नात!

http://www.rediff.com/news/report/indian-americans-in-atlanta-pick-up-gu...

हे काहीतरी नवीनच घडतंय. मी जवळपास ३ वर्षे रॉझ्वेलमध्ये होतो. तेव्हा ते एक शांत आणि सुरक्षित उपनगर होतं. आता काहीतरी बिघडलेलं दिसतंय.