Submitted by आनंदयात्री on 3 December, 2011 - 00:59
(एक जुनी गझल. माबोवर टाकायची राहिली असावी)
दाटुनी आलो जरी नव्हतो मुळी बरसायला
उगवलो होतो तरी होतो कुठे बहरायला?
वेदनेची जाणुनी घ्यावी खुशाली एकदा
सोबती कोणीच नसता जीव हा रमवायला
शब्द माझे अधिक तुजला खातरीचे वाटले
त्याहुनी मी योग्य होतो भरवसा ठेवायला
मी कसा समजून घेऊ सारवासारव तुझी?
कोण आठवले तुला - इतके मला विसरायला?
लोक डोकावून माझा भावही ठरवायचे
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला?
सोंग आहे रोजचे - सार्यांस ऐसे वाटले
फक्त तू उठलीस माझा चेहरा निरखायला
भेटलो बागेत अवचित, चार होत्या चांदण्या
बातमी झाली चवीची - लागली पसरायला!
वार तू करताक्षणी मी दरवळाया लागलो
श्वास मागाहून माझे लागले उसवायला
- नचिकेत जोशी (२१/३/२००९)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
कॉफी हाऊसवर आत्ता दिलेलाच
कॉफी हाऊसवर आत्ता दिलेलाच प्रतिसाद येथे डकवत आहे.
वेदनेची जाणुनी घ्यावी खुशाली एकदा>> मस्तच
त्याहुनी मी योग्य होतो भरवसा ठेवायला>> मस्तच्घ
मी कसा समजून घेऊ सारवासारव तुझी?
कोण आठवले तुला - इतके मला विसरायला?>>>. व्व्व्वा! हा वाचलेला व तेथेच सर्वात आवडल्याचा प्रतिसाद दिलेला शेर होता हे आठवले.
लोक काठी बसुन माझा भावही ठरवायचे
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला?>> माझं बरोबर निघालं! मस्त शेर!
बातमी झाली चवीची - लागली पसरायला!>> मस्त
वार तू करताक्षणी मी दरवळाया लागलो
श्वास मागाहून माझे लागले उसवायला>> वा वा
-'बेफिकीर'!
अतिशय सुंदर गझल ! अभिनंदन
अतिशय सुंदर गझल !
अभिनंदन आनंदयात्री..
शेवटचा शेर विसंगत आहे असं वाटलं..
नचिकेत, वार, दरवळ ...
नचिकेत,
वार, दरवळ ... क्लास!
जियो
शिवाय, त्याहुनी मी योग्य होतो
शिवाय,
त्याहुनी मी योग्य होतो भरवसा ठेवायला>> मस्त!
बातमी झाली चवीची - लागली पसरायला!>> वास्तव, उपरोध.. छान
लोक काठी बसुन माझा भावही ठरवायचे
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला?>> हा शेर आणि तू नकळत आत्ता कॉफी हाऊसमधे टाकलेला शेर- तूच वाच एकदा. इथे कवीच्या आस्तित्वाचा उथळपणा जाणवलाय आणि कॉहा वरिल शेरात त्या अस्तित्वाचा रिस्पेक्टेबल खोलपणा. दोन्हीही तुझेच शेर, त्यामुळे दाद तुलाच
पण काहीही म्हण- 'दरवळ' अफलातूनच!!
आंद्या, थेट आतपर्यंत पोहोचली
आंद्या, थेट आतपर्यंत पोहोचली रे, जबरदस्त आवडली
>>शब्द माझे अधिक तुजला खातरीचे वाटले
त्याहुनी मी योग्य होतो भरवसा ठेवायला
बोचलं!!!
के एच वर चर्चा झाली म्हणून
के एच वर चर्चा झाली म्हणून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो बागेश्री
====================
लोक काठी बसुन माझा भावही ठरवायचे
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला?>> हा शेर आणि तू नकळत आत्ता कॉफी हाऊसमधे टाकलेला शेर- तूच वाच एकदा. इथे कवीच्या आस्तित्वाचा उथळपणा जाणवलाय आणि कॉहा वरिल शेरात त्या अस्तित्वाचा रिस्पेक्टेबल खोलपणा. दोन्हीही तुझेच शेर, त्यामुळे दाद तुलाच
====================
गझलेत अर्थाची चूक करत नसतात.
खोल असल्यास कोणी उतरणार नाही आणि खोल नसला तर उतरतील हे समर्थनीय आहे. येथे कवीला तो स्वतः उथळ आहे की नाही याबाबत भाष्य करायचा हेतू नाही. हेतू आहे की काठावरच्या लोकांनी काहीही अभ्यास न करता एखाद्याचे मोल का ठरवावे (किंवा ठरवले). येथे कवी खोल असता तर कवीलाही पटले असते की काठावर बसूनच हे लोक भाव करणार कारण खोल कोण उतरत बसणार? त्यामुळे 'खोल होतो कितीसा' म्हणजेच 'खोल नव्हतो' हेच योग्य ठरते. (सहसा गझलेत भाव ठरवणे या ऐवजी मोल ठरवणे असा अधिक सौम्य / सभ्य इत्यादी उल्लेख करतात असेही ऐकून आहे).
ही जुनी गझल आहे, त्यातील 'कोण आठवले तुला इतके मला विसरायला' हा गौरवला गेलेला शेर आहे. पण तुजला वगैरे बाबी आढळतात कारण जुनी आहे. हे सांगायचे कारण म्हणजे या विशिष्ट गझलेत त्यांची सफाई त्यांच्याच नेहमीच्या गझलेच्या (केवळ काळ लोटल्याने व जे सगळ्यांचेच होते) तुलनेत काहीशी कमी वाटत असली तरी अर्थाच्या दृष्टीने मात्र त्यांनी तेव्हही काही चूक होऊच दिली नाही आहे.
डुंबणे कंटाळवाणे पण
वाटले बसशील काठावर
हा माझा शेर तुम्हाला!
-'बेफिकीर'!
बेफी, गझलेबद्दल माझं ज्ञान
बेफी, गझलेबद्दल माझं ज्ञान अति तोकडं आहे.
फक्त जे रसग्रहण मी कलं त्यावर मुद्दा लिहीला.
मी जे समजले होते, सीएच वर ते असं,
लोकांनी काठावर बसून भाव ठरवून टाकला माझा (वरवर पाहूनच), आत जरा उतरून पाहिलं असतं (कारण मी पुरेसा खोल होतो), कळालं असतं मी मोल करता येण्याजोगा नाही.
चुभूद्याघ्या
डुंबणे कंटाळवाणे
मी कसा समजून घेऊ सारवासारव
मी कसा समजून घेऊ सारवासारव तुझी?
कोण आठवले तुला - इतके मला विसरायला?
लोक डोकावून माझा भावही ठरवायचे
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला?
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
क्लास...... आणि शेवटचा पण.....!
शब्द, सोंग, बातमी, श्वास...
शब्द, सोंग, बातमी, श्वास... खासच!
सर्वांचे आभार! चिन्नु,
सर्वांचे आभार!

चिन्नु,
लोक डोकावून माझा भावही ठरवायचे
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला?
>>>
लोक डोकावून माझा भावही ठरवायचे
१. खोल मी नव्हतो जणू की आतवर उतरायला
२. खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला?
३. तिसरा कॉहा वर लिहिला होता. विसरलो.
तेव्हाही, आणि आत्ताही, मी जणू आत उतरून बघण्याइतका खोल नव्हतो म्हणून लोक काठावरूनच "भाव ठरवायचे" असंच म्हणायचं होतं. भाव ठरवणे हे किंमत करणे या अर्थी म्हणायचं होतं.. मोल इ शब्द तिथे नकोच होता. याच "होतो" की "नव्हतो" च्या निर्णयामुळे बाकीच्या शेरांच्या तुलनेत सर्वात जास्त वेळ घेतलेला हा शेर होता, हे नक्की आठवतंय..
बाकी, बेफिकीर म्हणतात तसं, जुनी गझल असल्यामुळे सफाई काहीशी कमी (हा त्यांनी वापरलेला सौम्य शब्द, कदाचित सफाई बरीच कमीही असेल :)) असेलही... but that's what the most beautiful and interesting part of the journey - the learning process...
असो.
डुंबणे कंटाळवाणे पण
वाटले बसशील काठावर >>> सुंदर शेर!
(अवांतर: आपण कधी कुणाला गझल भेट दिली आहे का? :P)
मस्तच अप्रतिम
मस्तच अप्रतिम
सुंदरच....खूप आवडले सगळेच
सुंदरच....खूप आवडले सगळेच शेर
त्यातही
वेदनेची जाणुनी घ्यावी खुशाली एकदा
सोबती कोणीच नसता जीव हा रमवायला...क्या ब्बात
शुभेच्छा
मी कसा समजून घेऊ सारवासारव
मी कसा समजून घेऊ सारवासारव तुझी?
कोण आठवले तुला - इतके मला विसरायला?.................व्वा !!!
सुंदर गजल.आवडली.
शब्द माझे अधिक तुजला खातरीचे
शब्द माझे अधिक तुजला खातरीचे वाटले
त्याहुनी मी योग्य होतो भरवसा ठेवायला....व्वा व्वा व्वा....
लोक डोकावून माझा भावही ठरवायचे
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला?.....काय खोलीय शेराची....वा वा
नचिकेत मला गझल आवडली. खूपच
नचिकेत
मला गझल आवडली. खूपच दिवसांनी नजाकतदार शेर पहायला मिळाले. प्रतिक्रिया वाचल्या.
बाकिचं आपण विपु विपु खेळूयात..;)
मी कसा समजून घेऊ सारवासारव
मी कसा समजून घेऊ सारवासारव तुझी?
कोण आठवले तुला - इतके मला विसरायला?
लोक डोकावून माझा भावही ठरवायचे
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला?
वार तू करताक्षणी मी दरवळाया लागलो
श्वास मागाहून माझे लागले उसवायला
झक्कास!!
but that's what the most beautiful and interesting part of the journey - the learning process... >>> हजार वेळा सहमत.
मस्त नची
मस्त नची
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार!
किरण्यके,
(No subject)
:-)
(No subject)
क्या बात है! सुरेख! प्रत्येक
क्या बात है! सुरेख! प्रत्येक शेर आवडला. कसे काय सुचते रे तुला नचिकेत!