करवीर महालक्ष्मी

Submitted by pradyumnasantu on 26 November, 2011 - 13:00

महालक्ष्मी आणि बालाजी

विष्णूदेव वामकुक्षी घेत होते एकदा
भृगूऋषी स्वर्गात गेले भेटण्याला तदा
ठेवले तिष्ठत समजुन क्रोधिले ऋषीवर
चिडुन केला हरींच्या लत्ताप्रहार छातीवर
श्रीहरी जागे जाहले पण सौम्यतेने साहिले
भ्रुगुॠषींच्या प्रहारे मुळीच ते न क्रोधिले
पाय धरूनी उलट त्यांनी ऋषीवरां आराधिले
क्षमा ऋषिवर, हो दुखापत आपल्या पायास का?
असे म्हणुनी त्यांनी तयाना नजीक आपुल्या बसविले
भृगूऋषींचे पद तयांनी स्वहस्ताने चोळले
क्रोध विसरुन समाधाने भृगूजी मग परतले
वाटले मानापमानाचे नाट्य येथे संपले
पण असे ना जाहले
पत्नी लक्ष्मी हरीच्या हृदयी वास करुनी होती
अपमानाची तिला भासली भृगुऋषींची कृती
त्याहुनी संतापली ती पतीच्या शांततेने
विनवते श्रीहरीना लक्ष्मीदेवी आर्ततेने
जाउनी याक्षणी उन्मत्त ऋषीला द्या सजा
लाथ मजला लागली वाटे तयाला ही मजा?
विष्णूदेवांकडुन त्याक्षणी चूक ऐसी जाहली
मानसिकता लक्ष्मीदेवीची न त्यांनी ताडली
चिडुनी मग ती श्रीहरींना पुन्हा सांगू लागली
लक्ष द्या मी काय म्हणते अन्यथा मी चालली
अन्यथा मी चालली, अन्यथा मी चालली
क्रोधिता संतापिता देवी जी उठली तेथुनी
स्वर्ग सोडूनि थेट आली पृथ्वीवरती तत्क्षणी
इथे राहू की तिथे काही न समजे देवीला
नगरीने एका अचानक भुरळ घातली हो तिला
देवीच्या भेटीस सारे गाव ऐसे धावले
पंचगंगेचे मधुर जळ, लोक निर्मळ भावले
त्या गावाचे नाव होते करवीर, कोल्हापूर
महालक्ष्मीने योजिले हे हेच माझे माहेर
असे जुळले तियेचे करवीरकरांशी सूर
देवी झाली कोल्हापुरची अन देवीचे कोल्हापुर
****
पत्नीविरहात इकडे व्याकूळले श्रीहरी
लक्ष्मीला शोधित तेही पोचले पृथ्वीवरी
शोधुनी थकले परंतु ना मिळाले यश तया
देवासही ना भोग चुकले, ना तिथे कोणा दया
मीही आता राहतो जर ती असे पृथ्वीवर
निवडले त्यांनी स्वत:साठी तिरुपतीनगर
नाव-रूप सारे बदलले जाहले बालाजी ते
पण बदलले सर्व तरीही बदलत नाही नाते
प्रतिवर्षी नवरात्रीला
पती बालाजी महालक्ष्मीला
वस्त्रालंकार भेट पाठवतो
पत्नी कुठेही असली तरीही
पती कधी तिज विसरतो?

गुलमोहर: 

वाचली.
प्रद्युम्न... कविता केलीत याबद्दल अभिनंदन !!!
इशस्तवन हा एक काव्यप्रकार आहे. अनेक काव्यप्रकार आहेत. आपण व्यक्त होताय हे छानच आहे. या स्टेजला अनेकांचं लिखाण, अनेक रचना वाचणं समजून घेणं हे देखील एक खूप महत्वाचं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं..

शुभेच्छा !

किरण्यके, श्रीकांतः आभार.
किरण्यके, खरंय, माझा तितका अभ्यास नाही. तितका आता वेळही नाही. पण प्रयत्न करीन.