शनिवार तसा आरामाचाच असतो.......
ऑफिसातसुध्दा अगदी ड्रेसपासून ते कामापर्यंत सगळ्यातच सूट असते. थोडक्यात आठवड्याभराचा रिव्ह्यू आणि पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग करायचा वार म्हणजे शनिवार... अगदी सगळा स्टाफ पण अॅट इज असतो. त्यामुळे फावल्या वेळात गप्पा टप्पाच जास्त.
असाच एका शनिवारी केबिनमध्ये बसलो होतो.... आमची अकाऊंटंट जयश्री आत बाहेर करत होती. स्टाफ आणि माझ्यात अंतर फक्त एका केबिनच्या दरवाज्याचं... त्यामुळे ही वर्दळ अधूनमधून चालूच असते, आपली ईच्छा असो वा नसो. इतक्यात आमच्या सौ. चा कॉल आला. मी अगदी नेहमीच्या पध्दतीने "ओके", "हरकत नाही" "तू बघितलस ना" "काय ते ठरव की तूच" "त्यात काय विचारत बसायचं" अशी वाक्य टाकून फोन ठेवला.
जयश्री माझ्या आजुबाजुलाच होती. फोन ठेवल्यावर जयश्रीचा प्रश्न. सर एक विचारू का???
काय ग?? विचार ना?
"तुमचं वहिनींवर खरंच प्रेम आहे का हो???"
४४० व्होल्टचा झटका लागल्यासारखा मी ताडकन उडालो... कल्पनेतच वर छताला आपटलो..... एक काल्पनिक टेंगूळ डोक्याचा मधोमध आलं, अगदी टॉमला येतं तसंच.... मग उजव्या हाताच्या मधल्या बोटाने ते टेंगूळ दाबून दाबून बसवलं...... भानावर आल्यासारखं दाखवत मी प्रतिप्रश्न केला, "कोणाच्या वहिनीवर???" 
"अहो म्हणजे तुमची बायको हो...... किती रूड बोलता हो तुम्ही तिच्याशी फोनवर. दिवसभरात कधीही फोन आला तरी ३ वाक्याच्या वर बोलत नाही.... लगेच ठेऊन देता..... किती गोड आहेत हो त्या..... जातील तिकडे प्रसन्न वातावरण घेऊन जातात (मला क्षणभर बायको म्हणजे एअर फ्रेशनरची नळकांडीच वाटायला लागली
) ...आपल्याकडे आता ३ महिने ऑफिस बघत होत्या, तेंव्हा तर आम्हाला किती मस्त वाटायचं....." जयश्रीच्या तोंडाचा पट्टा नॉनस्टॉप चालूच...
आता तिच्या जोडीला हळूच या गप्पा ऐकून आमचा प्यून सुनिल आणि प्रोजेक्ट ईंजिनिअर योगेश केबिनमध्ये घुसले.
"याया , तुम्ही पण तुमचं मत द्या आता... आज काय काम नाहिये आणि जयश्री पण सुटलीये....."
"तसं नाही सर......" जयश्रीची बॅटिंग पुन्हा सुरू झाली.....
"सर, तुम्ही पण सगळ्यांशी मस्त मिळून मिसळून वागता, आम्हाला कधी वाटत नाही इथे जॉब करतोय... इतके बिनधास्त आम्ही बोलू शकतो..... आमच्याशी , सप्लायरशी, क्लायंटशी आणि सगळ्या मित्र मैत्रीणींशी तुम्ही किती दिलखुलास बोलता.... आणि वहिनींचा फोन आला की दोन वाक्यात संपवून टाकता..... हे बरोबर नाही."
आईशप्पथ..!!!! आज तर माझ्याच ऑफिसात माझी शाळा घेणं चालू झालं होतं..... मी गम्मत बघायचं ठरवलं.
सुनील हा आमच्याच गावचा मुलगा. मी लहान असल्यापासून त्याची आई आमच्या आजोळी काम करत असे, वडील बँकेत प्यून होते. ते "पिऊन पिऊन" गेले आणि मग त्याच्याजागी हा नोकरीला आला.... नोकरी काही मिळाली नाही, म्हणून मग आमच्याकडे ऑफिसात आला कामाला. पण त्याला माझी ईथ्थंबूत माहिती, त्याने तोंड उघडलंच....
"जयश्री, सर घरी पण असेच बोलतात...."
आज माझं राशीभविष्य बघायला हवंच होतं...... सगळे मिळून अब्रू वेशीला टांगतील असं काही लिहिलंय की काय, शंकाच आली मला.
काय योगेशराव, तुमचं काय निरिक्षण?????
योगेश हे तसे वयाने ४० कडे झुकलेले. त्यातल्या त्यात आमच्यातले वयस्क.... बाकी सगळी आमची यंग ब्रिगेड.
"सर, मला नेहमी वाटतं की मला तुमच्यासारखं बोलता आलं पाहिजे माझ्या बायकोशी."
मला हसू आवरेना..... कोणाचं काय काय दुखणं असतं देव जाणे.
"दिवसातून २० कॉल्स येतात, डोकं पिकतं... आपण कामात असताना काय उत्तरं देणार??? पण आता १५ वर्षं सवय झालीये तिलाही आणि मलाही. म्हणून हेवा वाटतो तुमचा.... बरं करता तुम्ही"
चला, एक गडी थोडा आपल्या बाजुने झुकलेला मिळाला.... बुडत्याला काठीचा आधार.
जयश्रीने पुन्हा सुरुवात केली, "तुम्ही इतरांशी हसून बोलता आणि ऑफिसात वहिनींचा फोन आला की लगेच गुंडाळता म्हणून तुम्हाला विचारलं मी. त्या मायबोली साईटवर असलात की पण कसे हसत हसत टाईप करत असता, आणि फोन आला की लगेच गंभीर चेहर्याने उत्तरं देता"
बापरे.....!!!! आजुबाजुला फिरताना लोक आपल्या डोळ्यांनी आणि कानांनी काय काय टिपत असतात??? मी कोणाशी काय बोलतो, माझ्या स्क्रीनवर काय चालू असतं.... मी कसा रिअॅक्ट होतो.....
माझ्यासाठी अलार्मिंग सिच्युएशनच होती ही. पण मूळ प्रश्न सोडवणं महत्वाचं होतंच.... तशातच जमलं तर एका दगडात काही पक्षी मारयचे होतेच. 
"बरं.. आता मी बोलू......" सगळे शांत झाले... जयश्री थोडीशी कावरीबावरी झाली होती. तिला खूणेने रिलॅक्स व्हायला सांगितलं.
"जयश्री, तू दिवसातून किमान २० कॉल्स करतेस घरी सासुबाईना. मुलगी कशी आहे, शी शू केली का, कामवाली येऊन गेली का वगैरे वगैरे... नवर्याला पण करतेस..... डब्यातलं खाल्लेस??? तूपसाखर गुंडाळून दिली होती ती तुकडे करून खाल्लीस की तशीच??? " यावर माझ्यासकट सगळेच मिनिटभर हसलो. "आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर जाऊया ना रे" ....... आता जयश्री हैराण होती की हे सगळे डिटेल्स ह्यांना काय माहित??? 
"तर सांगायचं असं की, बायकांची जनरल टेंडंसी असते अशी, मग त्या कुठेही काम करत असोत, किंवा दिवसभर घरी बसणार्या असोत किंवा अगदी तान्ह्या मुलाला घरी सांभाळणार्या. त्यांना कुठलेही एक काम करताना अचानक दुसरं काहीही सुचू शकतं...... "
"मी एखादी ऑफर तयार करतोय अचानक बायकोचा फोन आला की "आज संध्याकाळी सँडविचेस करते हां" किंवा मी क्लायंटकडे बसलोय आणि बायको फोन करून सांगतेय, "अरे रविवारी सायलीच्या लग्नाला ती नवी हिरवी साडी नेसू ना" आता यावर मी काय उत्तर देणार?????
तुझा नवरा जीन्पीटी मध्ये एजंट आहे, तो एखादं काम करताना तू त्याला आज गुंडाळी तशीच खाल्लीस की तुकडे करून असं विचारलंस तर काय उत्तर देईल तो बिचारा????? "
पुन्हा एकदा केबिनमध्ये खसखस पिकली...... हळूहळू परिस्थिती माझ्या कंट्रोलमध्ये यायला लागली.
"योगेशची तर कसरतच असते..... त्याचं दु:ख तोच जाणे."
आता आमची मायबोली.... तू म्हणालीस ना, मी असतो त्या साईटवर हसत म्हणून... त्यावर गप्पांचे धागे आहेत.... त्यातल्या काही धागयांवर "रविवारी नेसलेल्या पैठणीपासून शनिवारी रात्री घातलेल्या नाईट गाऊनपर्यंत असंख्य गप्पा चालू असतात.... वर डिझाईन सुचवल्याबद्दल धन्यवाद हं, नवर्याला खूपच आवडलं ... असं एकमेकींसाठी लिहिलेलं असतं...
आणि ह्या गप्पांचे धागे ऑफिस सुरू झाल्यावर वाहू लागतात आणि ऑफिस संपल्यावर ओस पडतात..." 
एकूण काय तर तुमचं असं वागणं हे नैसर्गिक आहे.. त्यात काहीही चूक नाही..... पण आपण एखादा विचार करताना आपला नवरा काय काम करतोय, तो पण त्याच मनःस्थितीत आहे का समजून घ्यायच्या याचा विचार सहसा बायका करताना दिसत नाहीत.....
तुझ्या मनात आलं की आज शिवाजी पार्कवर जायचं की तू लगेच लावतेस चेतनला फोन.... पण तो कामात असेल तर...!!!!
म्हणून मी सहसा ऑफिसात घरचे कॉल्स अटेंड करत नाही...... सगळं काय ते घरी गेल्यावर.
आता अजून काही शंका आहे का "माझं बायकोवर खरं प्रेम आहे का" यावर???
"बरं झालं मी लग्नच नाय केलेय ते...." सुनीलने मधेच आपटीबार टाकला..... त्यावर जयश्रीने "लग्न नाय झालय तर त्या कविताचे ५० कॉल्स येतात"... असा सुरूंग लावून सुनीलची बोबडीच वळवली. सुनील हळूच केबिनमधून पसार झाला....
आता सगळेच हळूहळू उठायला लागले. जाताजाता जयश्री म्हणाली, "सर तुमचं म्हणणं पटलय मला, आता मी कधीही कॉल करताना चेतनला विचारेन की तू बिझी आहेस का, की बोलू नंतर"
योगेशसुद्ध्हा "मी पण या सवयी बदलणार आहे. अधेमधे फोन आले की कामावरचं लक्ष्य उडतं कधी कधी चुका पण होतात..... मी पण आता कामाच्या वेळेत शक्यतो घरघुती कॉल घेणारच नाही.... तुमच्यासारखंच सांगणार, आपण घरी आल्यावर बोलूया"
केबिन रिकामं झालं तेंव्हा माझं मन मात्र भरलेलं होतं....... एका दगडात काही पक्षी नक्कीच मेले होते.
सततच्या कॉल्सनी डिस्टर्ब होऊन छोट्या छोट्या चुका करणार्या योगेशना चूक लक्षात आली होती, जयश्री आता फोन करताना विचारपूर्वक करणार होती... तिच्याही कामातल्या चुका नक्कीच कमी होणार होत्या....
माझं माझ्याच बायकोवर प्रेम आहे हे जयश्रीच्या डोक्यात फिट्ट बसलं होतं 
घरगुती वातावरण असलं तरी किती डिस्टन्स ठेवायला हवा हे नकळत का होइना माझ्ह्याही लक्षात आलं होतंच.
आणि सरतेशेवटी, यातून खरंच काही बोध घेऊन जयश्री आणि योगेशची बायको वागली तर दोन पुरुषांना सुखनैव काम करता येणार होतं...... 
भुंग्या, लई भारी चित्र कथा
भुंग्या,

लई भारी चित्र कथा !
माणसाने हसतखेळत,किती बिनधास्तपणे कसं जगाव हे तुझ्याकडुन शिकाव.
योगेश हे तसे वयाने ४० कडे झुकलेले. त्यातल्या त्यात आमच्यातले वयस्क.... बाकी सगळी आमची यंग ब्रिगेड.

तुमच्यापासुन देखील ही ४० शी फार दुर राहिली नाही ...
जयश्री माझ्या आजुबाजुलाच
जयश्री माझ्या आजुबाजुलाच होती. फोन ठेवल्यावर जयश्रीचा प्रश्न. सर एक विचारू का???
काय ग?? विचार ना?
"तुमचं वहिनींवर खरंच प्रेम आहे का हो???"
>>>श्या: भुंग्या शेवटी तु काहीच शिकला नाहीस तर माबोवर येवुन..... २४ ची सीरीज जरा नीट मन लावुन परत एकदा वाच ,,,अभ्यास कर जरा ...अन पुढच्या वेळेला असा प्रश्न आला तर जरा वेगळी कथा येवु दे ...संधीचं सोन कर त्या
छान जमलयं...
छान जमलयं...
खतरनाक.....एकदम मूड बनला
खतरनाक.....एकदम मूड बनला माझा...
आज काहीतरी लाइट वाचायला हवं होतं आणि ते मिळालं..
धन्सं अ टन्स प्रिया (आणि अर्थात भुंगा लिहिल्याबद्दल)
हाच लेख एखाद्या स्त्री आयडीने दुसर्^ञा बाजूने लिहिला तरी वाचायला आवडेल.....आणि तोही तितकाच मजेशीर होईल...
मस्त मस्त मस्त्त भुंग्या...
चल तेरे वास्ते एक कॉफी... 
वेका मला हा धागा वर काढायची
वेका

मला हा धागा वर काढायची प्रचंड इच्छा होती पण नव्हते काढतं
तुलाच माझ्याकडून धन्स
रच्याकने मिलिंददादा चॉकलेट्सची संख्या वाढवायला विसरू नकोस हं अजिबात
च्यायला इथे पण परत तिचा फोन
च्यायला इथे पण परत तिचा फोन आला... लग्न झाल्यावर प्रत्येक नवर्याला हे सुचतेच वाटते..
अभिषेकदादा हा फोन आधी डायल
अभिषेकदादा हा फोन आधी डायल केलाय
तुझा नंतर लागलाय
बघ तारिख
मूक भांडण हे मुक्यानेच
मूक भांडण हे मुक्यानेच संपवावे
!! मस्तच लिहिले आहे . !!
!! मस्तच लिहिले आहे . !!
छान
छान
छान
छान
भुंग्या आज वाचलं हे... कस्लं
भुंग्या आज वाचलं हे... कस्लं लिहीलंयस!!! त्यांना कुठलेही एक काम करताना अचानक दुसरं काहीही सुचू शकतं...... ">> पर्फेक्ट!!! मस्त मस्त मस्त
आणि काय रे तुझं तुझ्याच बायकोवर प्रेम आहे ना? मग हल्ली मोर्चा त्या बिच्चार्या प्रभातच्या बायकोकडे वळतोय हळूच???
लिहीत राहा... छान लिहीतोस
dreamgirl ते बिजिनेस्मन आहेत.
dreamgirl ते बिजिनेस्मन आहेत. डायव्हर्सिफिकेशन व मल्टीटास्किंग त्यान्चा स्थायि भाव आहे

भुंगा मस्त लेख.. आजच वाचला.
भुंगा मस्त लेख.. आजच वाचला. माझ्या ओळखीच्या काही मुलींचे किस्से आठवून पटला सुद्धा. पण हे ही खरेच सगळ्या मुली अश्या नसतात . लिंबूटिंबू चे म्हणणे काही प्रमाणात पटले. काही प्रमाणात यासाठी की काही वेळा समोरच्याच्या मनातले भाव/विचार कळले तरी शब्दांचा आधार काही वेळा घ्यावा लागतो.
एकंदर मस्त लिखाण. खूप उशीरा वाचले. धागा वरती आणणाऱ्या चे आभार.
भुंगा आणि हे काय ???? तुझं तुझ्याच बायकोवर प्रेम आहे ना? मग हल्ली मोर्चा त्या बिच्चार्या प्रभातच्या बायकोकडे वळतोय हळूच???
ओहो सुमित्रा अस्सं आहे का ते
ओहो सुमित्रा अस्सं आहे का ते
patale mala sudha.. me sudha
patale mala sudha.. me sudha majya honara navryla asech satvate.. aaj pasun sarv band.. thank u.. aata ashi chuk gadnar nahi..
मस्त रे भुंग्या !
मस्त रे भुंग्या !
(No subject)
Chan aahe, pan sarvech bayka
Chan aahe, pan sarvech bayka tashya nastat. aani tya jari satat vicharat astil tari tymage kahi karne astat, ek prakarchi kalji aste.
भुंगोबा, शीर्षकातला 'तुमच्या'
भुंगोबा, शीर्षकातला 'तुमच्या' शब्द काढता येईल का प्लीज ?
बागलबुवा +१०००. भुगा छान विषय
बागलबुवा +१०००. भुगा छान विषय व तितकेच जबरदस्त लिखाण.
या लेखातल्या बायकोसारखं
या लेखातल्या बायकोसारखं घडोघडी नवर्याला फोन करणारं एक पात्र आहे "ना होणार सून मी या घरची" या मालिकेत? बॅंकेच्या व्यवस्थापकाची कधीच न दिसणारी पत्नी स्मितूडी...
असो. मी पत्नीला आधीच सांगून ठेवलंय तुझ्या फोनचा टॉकटाईम तू फक्त तुझ्या माहेरच्यांशी बोलायलाच वापरत जा, मला केवळ मिस्ड कॉल देत जा. मग मी माझ्या सोयीने फावला वेळ मिळेल तस प्रत्युत्तरादाखल फोन करत जाईल. तीही खूश आणि मीही.
घरोघरी मातीच्या चुली ...
भन्नाट..... एकदम पटेशशश....
भन्नाट..... एकदम पटेशशश.... तडका, खुसखुशीत....मजा आली वाचताना.
Pages