"तुमचं तुमच्या बायकोवर खरंच प्रेम आहे का हो???"

Submitted by भुंगा on 26 November, 2011 - 05:50

शनिवार तसा आरामाचाच असतो.......
ऑफिसातसुध्दा अगदी ड्रेसपासून ते कामापर्यंत सगळ्यातच सूट असते. थोडक्यात आठवड्याभराचा रिव्ह्यू आणि पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग करायचा वार म्हणजे शनिवार... अगदी सगळा स्टाफ पण अ‍ॅट इज असतो. त्यामुळे फावल्या वेळात गप्पा टप्पाच जास्त.

असाच एका शनिवारी केबिनमध्ये बसलो होतो.... आमची अकाऊंटंट जयश्री आत बाहेर करत होती. स्टाफ आणि माझ्यात अंतर फक्त एका केबिनच्या दरवाज्याचं... त्यामुळे ही वर्दळ अधूनमधून चालूच असते, आपली ईच्छा असो वा नसो. इतक्यात आमच्या सौ. चा कॉल आला. मी अगदी नेहमीच्या पध्दतीने "ओके", "हरकत नाही" "तू बघितलस ना" "काय ते ठरव की तूच" "त्यात काय विचारत बसायचं" अशी वाक्य टाकून फोन ठेवला.
जयश्री माझ्या आजुबाजुलाच होती. फोन ठेवल्यावर जयश्रीचा प्रश्न. सर एक विचारू का???
काय ग?? विचार ना?

"तुमचं वहिनींवर खरंच प्रेम आहे का हो???"

४४० व्होल्टचा झटका लागल्यासारखा मी ताडकन उडालो... कल्पनेतच वर छताला आपटलो..... एक काल्पनिक टेंगूळ डोक्याचा मधोमध आलं, अगदी टॉमला येतं तसंच.... मग उजव्या हाताच्या मधल्या बोटाने ते टेंगूळ दाबून दाबून बसवलं...... भानावर आल्यासारखं दाखवत मी प्रतिप्रश्न केला, "कोणाच्या वहिनीवर???" Proud

"अहो म्हणजे तुमची बायको हो...... किती रूड बोलता हो तुम्ही तिच्याशी फोनवर. दिवसभरात कधीही फोन आला तरी ३ वाक्याच्या वर बोलत नाही.... लगेच ठेऊन देता..... किती गोड आहेत हो त्या..... जातील तिकडे प्रसन्न वातावरण घेऊन जातात (मला क्षणभर बायको म्हणजे एअर फ्रेशनरची नळकांडीच वाटायला लागली Proud ) ...आपल्याकडे आता ३ महिने ऑफिस बघत होत्या, तेंव्हा तर आम्हाला किती मस्त वाटायचं....." जयश्रीच्या तोंडाचा पट्टा नॉनस्टॉप चालूच...

आता तिच्या जोडीला हळूच या गप्पा ऐकून आमचा प्यून सुनिल आणि प्रोजेक्ट ईंजिनिअर योगेश केबिनमध्ये घुसले.

"याया , तुम्ही पण तुमचं मत द्या आता... आज काय काम नाहिये आणि जयश्री पण सुटलीये....."

"तसं नाही सर......" जयश्रीची बॅटिंग पुन्हा सुरू झाली.....

"सर, तुम्ही पण सगळ्यांशी मस्त मिळून मिसळून वागता, आम्हाला कधी वाटत नाही इथे जॉब करतोय... इतके बिनधास्त आम्ही बोलू शकतो..... आमच्याशी , सप्लायरशी, क्लायंटशी आणि सगळ्या मित्र मैत्रीणींशी तुम्ही किती दिलखुलास बोलता.... आणि वहिनींचा फोन आला की दोन वाक्यात संपवून टाकता..... हे बरोबर नाही."

आईशप्पथ..!!!! आज तर माझ्याच ऑफिसात माझी शाळा घेणं चालू झालं होतं..... मी गम्मत बघायचं ठरवलं.

सुनील हा आमच्याच गावचा मुलगा. मी लहान असल्यापासून त्याची आई आमच्या आजोळी काम करत असे, वडील बँकेत प्यून होते. ते "पिऊन पिऊन" गेले आणि मग त्याच्याजागी हा नोकरीला आला.... नोकरी काही मिळाली नाही, म्हणून मग आमच्याकडे ऑफिसात आला कामाला. पण त्याला माझी ईथ्थंबूत माहिती, त्याने तोंड उघडलंच....

"जयश्री, सर घरी पण असेच बोलतात...."
आज माझं राशीभविष्य बघायला हवंच होतं...... सगळे मिळून अब्रू वेशीला टांगतील असं काही लिहिलंय की काय, शंकाच आली मला.

काय योगेशराव, तुमचं काय निरिक्षण?????
योगेश हे तसे वयाने ४० कडे झुकलेले. त्यातल्या त्यात आमच्यातले वयस्क.... बाकी सगळी आमची यंग ब्रिगेड.

"सर, मला नेहमी वाटतं की मला तुमच्यासारखं बोलता आलं पाहिजे माझ्या बायकोशी."

मला हसू आवरेना..... कोणाचं काय काय दुखणं असतं देव जाणे.

"दिवसातून २० कॉल्स येतात, डोकं पिकतं... आपण कामात असताना काय उत्तरं देणार??? पण आता १५ वर्षं सवय झालीये तिलाही आणि मलाही. म्हणून हेवा वाटतो तुमचा.... बरं करता तुम्ही"

चला, एक गडी थोडा आपल्या बाजुने झुकलेला मिळाला.... बुडत्याला काठीचा आधार.

जयश्रीने पुन्हा सुरुवात केली, "तुम्ही इतरांशी हसून बोलता आणि ऑफिसात वहिनींचा फोन आला की लगेच गुंडाळता म्हणून तुम्हाला विचारलं मी. त्या मायबोली साईटवर असलात की पण कसे हसत हसत टाईप करत असता, आणि फोन आला की लगेच गंभीर चेहर्‍याने उत्तरं देता"

बापरे.....!!!! आजुबाजुला फिरताना लोक आपल्या डोळ्यांनी आणि कानांनी काय काय टिपत असतात??? मी कोणाशी काय बोलतो, माझ्या स्क्रीनवर काय चालू असतं.... मी कसा रिअ‍ॅक्ट होतो.....
माझ्यासाठी अलार्मिंग सिच्युएशनच होती ही. पण मूळ प्रश्न सोडवणं महत्वाचं होतंच.... तशातच जमलं तर एका दगडात काही पक्षी मारयचे होतेच. Wink

"बरं.. आता मी बोलू......" सगळे शांत झाले... जयश्री थोडीशी कावरीबावरी झाली होती. तिला खूणेने रिलॅक्स व्हायला सांगितलं.

"जयश्री, तू दिवसातून किमान २० कॉल्स करतेस घरी सासुबाईना. मुलगी कशी आहे, शी शू केली का, कामवाली येऊन गेली का वगैरे वगैरे... नवर्‍याला पण करतेस..... डब्यातलं खाल्लेस??? तूपसाखर गुंडाळून दिली होती ती तुकडे करून खाल्लीस की तशीच??? " यावर माझ्यासकट सगळेच मिनिटभर हसलो. "आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर जाऊया ना रे" ....... आता जयश्री हैराण होती की हे सगळे डिटेल्स ह्यांना काय माहित??? Rofl

"तर सांगायचं असं की, बायकांची जनरल टेंडंसी असते अशी, मग त्या कुठेही काम करत असोत, किंवा दिवसभर घरी बसणार्‍या असोत किंवा अगदी तान्ह्या मुलाला घरी सांभाळणार्‍या. त्यांना कुठलेही एक काम करताना अचानक दुसरं काहीही सुचू शकतं...... "

"मी एखादी ऑफर तयार करतोय अचानक बायकोचा फोन आला की "आज संध्याकाळी सँडविचेस करते हां" किंवा मी क्लायंटकडे बसलोय आणि बायको फोन करून सांगतेय, "अरे रविवारी सायलीच्या लग्नाला ती नवी हिरवी साडी नेसू ना" आता यावर मी काय उत्तर देणार?????
तुझा नवरा जीन्पीटी मध्ये एजंट आहे, तो एखादं काम करताना तू त्याला आज गुंडाळी तशीच खाल्लीस की तुकडे करून असं विचारलंस तर काय उत्तर देईल तो बिचारा????? "
पुन्हा एकदा केबिनमध्ये खसखस पिकली...... हळूहळू परिस्थिती माझ्या कंट्रोलमध्ये यायला लागली.

"योगेशची तर कसरतच असते..... त्याचं दु:ख तोच जाणे."

आता आमची मायबोली.... तू म्हणालीस ना, मी असतो त्या साईटवर हसत म्हणून... त्यावर गप्पांचे धागे आहेत.... त्यातल्या काही धागयांवर "रविवारी नेसलेल्या पैठणीपासून शनिवारी रात्री घातलेल्या नाईट गाऊनपर्यंत असंख्य गप्पा चालू असतात.... वर डिझाईन सुचवल्याबद्दल धन्यवाद हं, नवर्‍याला खूपच आवडलं ... असं एकमेकींसाठी लिहिलेलं असतं... Wink आणि ह्या गप्पांचे धागे ऑफिस सुरू झाल्यावर वाहू लागतात आणि ऑफिस संपल्यावर ओस पडतात..." Proud

एकूण काय तर तुमचं असं वागणं हे नैसर्गिक आहे.. त्यात काहीही चूक नाही..... पण आपण एखादा विचार करताना आपला नवरा काय काम करतोय, तो पण त्याच मनःस्थितीत आहे का समजून घ्यायच्या याचा विचार सहसा बायका करताना दिसत नाहीत..... Sad तुझ्या मनात आलं की आज शिवाजी पार्कवर जायचं की तू लगेच लावतेस चेतनला फोन.... पण तो कामात असेल तर...!!!!

म्हणून मी सहसा ऑफिसात घरचे कॉल्स अटेंड करत नाही...... सगळं काय ते घरी गेल्यावर.

आता अजून काही शंका आहे का "माझं बायकोवर खरं प्रेम आहे का" यावर???

"बरं झालं मी लग्नच नाय केलेय ते...." सुनीलने मधेच आपटीबार टाकला..... त्यावर जयश्रीने "लग्न नाय झालय तर त्या कविताचे ५० कॉल्स येतात"... असा सुरूंग लावून सुनीलची बोबडीच वळवली. सुनील हळूच केबिनमधून पसार झाला....

आता सगळेच हळूहळू उठायला लागले. जाताजाता जयश्री म्हणाली, "सर तुमचं म्हणणं पटलय मला, आता मी कधीही कॉल करताना चेतनला विचारेन की तू बिझी आहेस का, की बोलू नंतर"
योगेशसुद्ध्हा "मी पण या सवयी बदलणार आहे. अधेमधे फोन आले की कामावरचं लक्ष्य उडतं कधी कधी चुका पण होतात..... मी पण आता कामाच्या वेळेत शक्यतो घरघुती कॉल घेणारच नाही.... तुमच्यासारखंच सांगणार, आपण घरी आल्यावर बोलूया"

केबिन रिकामं झालं तेंव्हा माझं मन मात्र भरलेलं होतं....... एका दगडात काही पक्षी नक्कीच मेले होते.

सततच्या कॉल्सनी डिस्टर्ब होऊन छोट्या छोट्या चुका करणार्‍या योगेशना चूक लक्षात आली होती, जयश्री आता फोन करताना विचारपूर्वक करणार होती... तिच्याही कामातल्या चुका नक्कीच कमी होणार होत्या....
माझं माझ्याच बायकोवर प्रेम आहे हे जयश्रीच्या डोक्यात फिट्ट बसलं होतं Proud
घरगुती वातावरण असलं तरी किती डिस्टन्स ठेवायला हवा हे नकळत का होइना माझ्ह्याही लक्षात आलं होतंच.

आणि सरतेशेवटी, यातून खरंच काही बोध घेऊन जयश्री आणि योगेशची बायको वागली तर दोन पुरुषांना सुखनैव काम करता येणार होतं...... Happy

गुलमोहर: 

...... एका दगडात काही पक्षी नक्कीच मेले होते.

भरपूर पक्षी मेले असणार! आम्ही मेलो आहोत , असे कार्यालयीन वेळेत कुणी सांगणार नाहीत , भुंग्याला आता !

पण फोन उचलल्याबरोबर प्रत्येक वेळी बायकोने 'बिझी आहेस का? नंतर पुन्हा करू का फोन?' असं विचारणं किती इरिटेटिंग असतं माहिती आहे का? 'हो, कर थोड्या वेळात' असं म्हणलं तरी थोड्या वेळानंतरच्या पुढल्या वेळीही तेच 'बिझी आहेस का? नंतर पुन्हा करू का फोन?'!!!!

अशा असो, की तशा; पण या फोनांचा नि प्रेमाचा फारसा संबंध नाही रे भाऊ. Happy

अशा असो, की तशा; पण या फोनांचा नि प्रेमाचा फारसा संबंध नाही रे भाऊ.
>>>>>>

साजिर्‍या, मी तेच जयश्रीला समजवत होतो Proud

विजय, मला स्वतःलाही नेहमीसारखा विनोद नाही यात, हे लक्षात आलं होतं... पण विषय मांडायचा होता, आणि अधिक मसाला भरायला वेळ काढला असता तर नॅचरल झाला नसता.. म्हणून तसाच शुट केला... Proud

सर्वांचे मनापासून आभार...!!!!

भुंगा, हे बहुतेक तुम्ही जयश्रीकडून लिहून घेतलं असावत असे गृहीत धरून जयश्री यांचे कौतुक करतो.

विषय फार आवडला, पण मला माहीतच करून घ्यायचं नाही आहे की हे तुमचं लेखन आहे.

चुभुद्याघ्या

सॉरी भुंगा, मी बहुधा अधिकच तीव्र बोललो की काय! माफ करा. पण तुमचं लेखन खूपच रसरशीत आणि उत्स्फुर्त असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे.

साजिर्‍या म्हणिंग द राईट. प्रेमाचा फोनशी ताल्लुक नाही, केल्याने सिद्ध होत नाही आणि न-केल्यानेही..
अति फोन्-फोन करु नये हे खरे असले तरी करावा की एखादवेळेस उत्स्फुर्त फोन. काय बिघडले.
आणि खरं म्हणजे घरी बोलायला वेळ असतो कुठे एकतर? Happy

रच्याकने- बोलायची गरजच पडत नाही वगैरे तर अजिबात पटले नाही लिंबु.

रैनाला अनुमोदन . खरेतर नवरा बायको फोनवरच जास्त बोलतात असा अनुभव आहे, प्रत्यक्षात घरी आल्यावर मुले, टिव्ही आणि इतर कामे यातुन नवरा बायकोला बोलायला फारसा वेळच मिळत नाही.
बाकी अती करु नये हेही तितकंच खरे.

>>>>> लिंबुकाकांचं ठीक आहे. फारच जुनं लग्न झालं आहे, पण तु ना जरा हिंदी सिनेमे कमी बघ. असल्या उच्च प्रेमाच्या कल्पना आल्या <<<<<
अहो कस्ल उच्च नि कस्ल हुच्च? प्रेम हे प्रेम अस्त, अन मनापासून केल तरच होत अस्त.
मला एक सान्गा, शाळकरी वा महाविद्यालयीन वयात अस्ताना, एखादी (/एखादा) आवडली, थोडेफार हसून, नजरेच्या इशार्‍याने सूत जुळतय असे वाटले की मग दिवस दिवसभर तिचाच विचार झाला नाही असे कितिक जण सापडतील? अन जेव्हा असा विचार होतो, त्यात काय काय नस्ते? सकाळी उठल्या उठल्या ती आत्ता काय बरे करत असेल? उठली असेल का? कामात असेल का? चहा घेतला असेल का? इथपासून ते कॉलेजवर जाईस्तोवर तिने आज काय बरे ड्रेस घातला असेल? ज्या कुठल्या बसने येते ती बस मिळाली असेल का? की स्टॉपवरच ताटकळत असेल? आपण आणायला जावे का? जावे तर बाईक कुणाची पैदा करावी? बाबान्ना थाप मारुन मिळवावी का? असेलच बाईक, तर समजा तिथे गेलो स्टॉपवर, तर न मागताच लिफ्ट बद्दल कसे विचारावे? नाही म्हणली तर काय? बरोबर मैत्रीणी अस्तील का? कोणकोण असतील? ती खडूस दोन शेपट्यावाली असेल तर कामच बोम्बलल.
नकोच ते, त्यापेक्षा कॉलेजमधेच डोळेभरुन बघुन घेऊ तिला.
अरेच्च्या? आज तिच्या हातात नेहेमीची पर्स (सदृश पिशवी Proud ) दिसत नाहीये. डबा आणला नाहीये की काय? मग कसे होणार तिचे? चहाला बोलवावे का? नको, चहा नको, कॉफि बरी पडेल, खिशाचा अन्दाज घ्यावा मात्र.
आज ती थोडी उदास दिसतिये, काय बरे झाले असेल? आजारी असेल का?
आँ? कुठे स्थळाची बोलणि वगैरे तर चालू नस्तील ना? अरे बापरे... मग माझा पत्ता कट की काय?
मण्डळी, तर समजा पत्ता कट झालाच नाही, अन असेच विचार "तिकडून" देखिल होत अस्तील, तर काय बिशाद आहे लग्नानन्तर देखिल शब्दाशिवाय सन्वाद न होण्याची.
अन याकरता झालेले प्रेम्/लन्ग जुने वा नवे असावे लागते असे काही नसते.
वरील उदाहरणे केवळ वानगी दाखल. प्रत्यक्षात यापेक्षाही "डीऽऽप्ली" विचार केला जात अस्तो. अन जेव्हा तो विचार पलिकडच्यापर्यन्त यशस्वी पणे पोचतो/पोचू शकतो/पोचविला जातो, तेव्हा ते प्रेम यशस्वी रूप (म्हणजे दोनाचे चार होणे हो) धारण करू शकते.
भुन्ग्या अवान्तर बद्दल सॉरी बर्का, पण की नै, आमच्या सन्वादक्षमतेला ही मनिमाऊ जुनेपाने म्हणाली ना, Proud म्हणून सान्गितले हो!

भुंग्या... मस्त रे.. Happy
लिंब्या.. लेका सगळ्यानाच स्वगत जमत नाहीत रे, म्हणुन हे कॉल्स ..:P

>>>> रच्याकने- बोलायची गरजच पडत नाही वगैरे तर अजिबात पटले नाही लिंबु. <<<<
हे ज्याच्यात्याच्या सापेक्ष आहे, पण मला जे जाणवले, अनुभवात आले ते मात्र असे अन असेच आहे.
खूप वर्षान्पूर्वी, म्हणजे ९४ च्या आधी, मी अन थोरला भाऊ एकाच ऑफिसात होतो. भाऊ घरुन उशिरा निघायचा, मी आधीच ऑफिसला पोचलेलो असायचो. एकदा एका क्रिटीकल कौटुम्बिक वादाच्या प्रसन्गात भावाने ऑफिसमधे माझे मत विचारले, मी सान्गितले. त्याने क्रॉस घेताना म्हणले की ठीके, हे तुझे मत, पण हे तुझ्या बायकोचे पण असेच असेल का? तिला न विचारताच तू कसे काय सान्गु शकतोस की असेच्/वा तसेच व्हायला हवे? मी सान्गितले की विचारायची गरजच नाही. जे मत मी माझे म्हणून सान्गितले आहे, तिचे देखिल याबाब्त तसेच मत असणारे. हव तर घरी आत्ताच्या आत्ता फोन कर अन विचार तिला.
प्रत्यक्षात फोन करण्याची गरज नव्हती, कारण भाऊ ऑफिसात निघायच्या आधीच त्या विषयावर लिम्बीशी बोलला होता, व त्यास त्याच शब्दात तेच उत्तर मिळाले होते, जे मी ऑफिसमधे सान्गितले होते.
यावर वाद म्हणून केवळ असे म्हणता येईल की तुमचे वैचारिक्/बौद्धिक दृष्ट्या "एकमत" असेल. पण हा विषय तसा नव्हता. वैचारिक्/बौद्धिक दृष्ट्या "एकमत" होण्याइतपत आमचे वय जवळपास नाही, शिक्षणही नाही, व लहानपण ज्या परिस्थितीत गेले दोघान्चे त्या पूर्णतः भिन्न होत्या. मग कशाच्या आधारावर हे उदाहरण मी देतोय?
तर बायकोने जेव्हा भावाला उत्तर दिले, कदाचित तेव्हा ती मनापासून विचार करीत होती, की या परिस्थितीत लिम्ब्या काय विचार करुन निर्णय घेईल, अन मी त्यास कसा फॉलो करीन, इकडे ऑफिसात देखिल लिम्बी काय म्हणेल यावर विचार करता, प्रथम जे होणे योग्य ते उत्तर, अन त्यास लिम्बी पाठीम्बा देईल याची खात्री, मला तिच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचि गरज भासू देत नव्हती. ही खात्री, हा विश्वास, हेच तर यशस्वी प्रेमाचे फलितस्वरुप वा प्रेमाचे निदर्शक असत नाही का?
भावाने मला तत्काळ ते सर्टीफिकेट बोलुन दिले की एकमेकान्शी एकही शब्द न बोलता, आमनधपक्या समोर आलेल्या विषयावर एकमेकान्च्या अपरोक्षही तुमचे इतके एकमत होत असेल, तर भविष्यात तुमचे आयुष्यात तुमचे एकेमेकान्शी खूप चान्गले जमेल, पटेल. (याबरोबर हेही सान्गायला तो विसरला नाही की अशी उदाहरणे कमी असतात, व जे आहे ते टिकवून ठेवा)

मिलिंदा टवळ्या Proud
बागु म्हणते तसच मीही म्हणेन की सगळ्याच बायका काय नवर्‍याला फोन करून पिडत नै :P....अ‍ॅटलिस्ट मी तरी आमच्या अहोंना आधी विचारतेच '' बिझी आहात का? नंतर करू का फोन??'' Happy
त्यामुळे तोही मोकळेपणाने सांगु शकतो की बिझी आहे, अन नंतर आवर्जून न चुकता कॉलबॅक करतो. Wink फ्री असेल तरच बोलतो......:)

लिंब्या +१.
स्वभावानं येतं कि सवयीनं हे ठरवणं फारच कठीण. कारण स्वभाव आणि सवय हे सतत जुळवत राहणारा तमाम 'स्त्रीवर्ग' काळजीनं म्हणा किंवा संशयानं म्हणा आपल्या घनिष्ठ नातेसंबंधाला एका विशिष्ट वर्तूळात ठेवण्याचा प्रयत्न करते किंवा तो आपसुक होतोच. त्यात दिलासा मात्र स्त्री वर्गालाच जास्त मिळतो. मी काळजी करते ह्यात माझं काय चुकलं? असंच बर्‍याचदा ऐकावं लागतं आणि संभाव्य वादावर संगनमताने पडदा पडतो.

लै भारी रे........
तुझ्याकडून नेहमीच विनोदापेक्षा काही जास्त अपेक्षित असतं आणि ते तू न मागता देतोस...
इथेही दिलय आहेसच. एकदम आवडेश Happy

मिलिन्द ...सहि लिहिलयस्....एक्दम सहि ...एकदम आवड्याच .....:)

भुंग्या मस्तच! हं.....पण बायकांबद्दलच्या सगळ्या समजुतींना अनुमोदन आहे असं समजू नको हं!
बागुलबुवा तुला मात्र १०० मोदक .. बायका मल्टीटास्किंग च करत असतात.
मनीमाऊ........"जुन्या लग्ना"वरून आठवलं......पुलंचा एक किस्सा, जो माझा नवरा वारंवार उद्हृत करण्याची लिबर्टी घेतो(काय करणार...जुनं लग्न!)
बायको बाहेर पडताना विचारते(अर्थातच नव़ऱ्याला) ही साडी/ड्रेस नेसू की ती?
नवरा: कोणतीही नेस गं!
पुढील वाक्य मनातल्या मनात.... कोणतीही नेस गं.......कोण बघणारे तुझ्याकडे?

बरोबर आणि छान लिहिलं आहे. Happy मी पण बिझी आहेस का असं नवर्याला विचारण्याची नेहमी खबरदारी घेते. पण कधी कधी विसरतंच Happy मग वर लिहिल्याप्रमाणे उत्तरे मिळ्तात. Happy

मानु, Lol

आमच्या सन्वादक्षमतेला ही मनिमाऊ जुनेपाने म्हणाली ना, >>> ओ लिंबुकाका, कैपण बोलु नका. Happy अहो तुम्ही विनोद करताहात का खरंच चुकीचा अर्थ लावलात माझ्या वाक्याचा? वाक्य लिहिताना चुकलं का माझं? मला एवढंच म्हणायचं होतं कि तुमचं लग्न इतकी वर्ष झाल्यामुळे नात्यात तेवढी maturity आली आहे कि शब्दांवाचुन सगळ्या भावना पोचतात. पण नविन लग्न झाल्या झाल्या त्याने/तिने लगेच अंतर्ज्ञानी व्हावं आणि मला काय वाटतं ते समजुन घ्यावं अशी अपेक्षा करणं चुक आहे. स्वानुभव हो. मला आता हे वाटतं आहे किंवा माझी आता कुठली अपेक्षा आहे हे न सांगताच कळावं अशी जर अपेक्षा केली तर तो/ती अगदीच बिचारे होवुन जातात. मग दोघांना मनस्ताप. त्यापेक्षा तोंड उघडुन घडाघडा बोला किंवा फडाफडा भांडा हे जास्त बरं. समजुन घेतलं नाही म्हणुन नुसतंच धुमसण्यापेक्षा. मग हळुहळु अशा अनेक प्रसंगातुन एकमेकांच्या आवडी आणि इच्छा समजत जातात आणि मग ते 'शब्दांवाचुन कळले सारे' गाणं म्हणायचे दिवस येतात. हुश्श ! एवढ्संच तर म्हणायचं होतं मला. Happy

>>>>ओ लिंबुकाका, कैपण बोलु नका. अहो तुम्ही विनोद करताहात का खरंच चुकीचा अर्थ लावलात माझ्या वाक्याचा? वाक्य लिहिताना चुकलं का माझं? <<<< छ्या छ्या छ्या, तुझ नै चुकलं. अन मी विनोदही नै करत अन चूकीचा अर्थही नै लावत, मी फक्त तुझ्या वाक्याच "निमित्त" उचललं! आता येवढी उचलेगिरी जमायलाच हवी नाही का? Wink

>>>> मला एवढंच म्हणायचं होतं कि तुमचं लग्न इतकी वर्ष झाल्यामुळे नात्यात तेवढी maturity आली आहे कि शब्दांवाचुन सगळ्या भावना पोचतात. <<<<<
नॉट नेसेसरी, किती वर्षे लग्नाला झाली की नाही झाली, याच्याशी संवाद जुळण्याचा संबन्ध नाही. तर प्रत्येकाच्या "मनोवृत्तीशी" आहे. माझ्याहूनही जुनी लग्ने झालेली पण विसंवादी अशी असंख्य कुटुंबे माझ्या तरी पहाण्यात आहेतच, तुम्हालाही दिसू शकतील. शिवाय, संवाद जुळण्याचा अन "तथाकथित म्याच्युरिटीचा" देखिल काही संबंध आहे असे मला वाटत नाही.
गरज अस्ते ती तुम्ही जोडीदाराचा जोडीदाराकरताच (त्याच्याच भुमिकेतून) किती विचार करताय. बहुधा बहुतेक जण जोडीदाराचा विचार करतात तो स्वतःकरता, स्वतःबद्दलच्या आत्मप्रौढीला/अस्मितेला जोजवत!
असो. इत्क्या विनोदी धाग्यावर गम्भिर लेखन नकोच कस!

मनेमावशे मी तुझ्यावर कधी रागावु शकतो का? एवढी माझी हिम्मत??? Uhoh

तु दिलेला 'सल्ला' कळला आहे...धन्स.

पण,
जसं तुला माहीतच असावं, 'निखळ प्रेमात असलेल्या दोन जिवातले संवाद एका सिमेवर 'शब्द' पुर्ण करु शक्त नाहीत... शब्द अपुरे पडतात. किंवा शब्दांची गरजच लागत नाही. एखादा 'प्रेमळ कटाक्ष' सुध्द्दा जन्माचं सार्थक करु शकतं.

पण,
जर वाटत असेल आज ''रसगुल्ले' खायला मन होत आहे' आणि रसगुल्ले समोर नाहीयत, तर मात्र संवाद शब्दांतच साधलेला बरा....नाही तर फक्त 'कटाक्षाने' रसगुल्ले सात जन्मातही मिळायचे नाहीत... Proud हो की नय गं......????

लिंबुनाना तुमच्या प्रेमाच्या व्याख्या पटल्या.....हे सां.न.ल.

भुंग्या, या अवाच्यासवा प्रतिसादासाठी माफ नको करुस.....फिदीफिदी.

<<<वारंवार फोन केल्याने बिल येण्याचा तोटा असला तरी काही वेळा आजूबाजूच्यांचे बोलणे ऐकू येणे हा फायदा नजरेआड करून चालणार नाही>>>> Proud

हे बघा, उगा लिम्बूनाना अन लिम्बूकाका अन लिम्बुदा अस म्हणत भारावुन वगैरे जावू नका
आम्हाला जेव्हा संवाद (सुसंवाद) साधायचा अस्तो तेव्हा आम्हाला शब्दाची गरज पडतेच असे नाही हे शब्दशः खरे आहे.
मात्र......
जेव्हा आम्हाला दोघान्नाही "कडाकडा" भाण्डायची हुक्की येते तेव्हा मात्र आम्ही शब्दान्चे सहाय्य घेतोच घेतो. Proud नुस्ते शब्दान्चेच नै तर नाना सूरसुरावटिसहित उपमाउत्प्रेक्षाउपहासादिक धारदार अलन्काराचेही! नि:शब्दपणे भाण्डण्यावर आम्हा दोघान्चाही विश्वास नाही.
एकतर मुक्याने भाण्डण म्हणजे शिन्च ते सुरु केव्हा झाल अन सम्पल केव्हा अन पुन्हा नव्याने सुरु केव्हा तेच कळत नाही. अन तेच कळल नाही तर आयुष्यभर "मौनं सर्वार्थ साधनम" करीत बसायचे काय?
[सुरसुरावटीस हाती लागेल त्या भान्डीकुन्डीन्चेही सहाय्य होते, बहुधा म्हणूनच पूर्वीच्या काळी युद्धात वापरल्याजाणार्‍या तोफाबन्दुकान्ना "भाण्डीकुण्डी" म्हणले जात असावे असा कयास आहे Wink ]

Pages