"तुमचं तुमच्या बायकोवर खरंच प्रेम आहे का हो???"

Submitted by भुंगा on 26 November, 2011 - 05:50

शनिवार तसा आरामाचाच असतो.......
ऑफिसातसुध्दा अगदी ड्रेसपासून ते कामापर्यंत सगळ्यातच सूट असते. थोडक्यात आठवड्याभराचा रिव्ह्यू आणि पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग करायचा वार म्हणजे शनिवार... अगदी सगळा स्टाफ पण अ‍ॅट इज असतो. त्यामुळे फावल्या वेळात गप्पा टप्पाच जास्त.

असाच एका शनिवारी केबिनमध्ये बसलो होतो.... आमची अकाऊंटंट जयश्री आत बाहेर करत होती. स्टाफ आणि माझ्यात अंतर फक्त एका केबिनच्या दरवाज्याचं... त्यामुळे ही वर्दळ अधूनमधून चालूच असते, आपली ईच्छा असो वा नसो. इतक्यात आमच्या सौ. चा कॉल आला. मी अगदी नेहमीच्या पध्दतीने "ओके", "हरकत नाही" "तू बघितलस ना" "काय ते ठरव की तूच" "त्यात काय विचारत बसायचं" अशी वाक्य टाकून फोन ठेवला.
जयश्री माझ्या आजुबाजुलाच होती. फोन ठेवल्यावर जयश्रीचा प्रश्न. सर एक विचारू का???
काय ग?? विचार ना?

"तुमचं वहिनींवर खरंच प्रेम आहे का हो???"

४४० व्होल्टचा झटका लागल्यासारखा मी ताडकन उडालो... कल्पनेतच वर छताला आपटलो..... एक काल्पनिक टेंगूळ डोक्याचा मधोमध आलं, अगदी टॉमला येतं तसंच.... मग उजव्या हाताच्या मधल्या बोटाने ते टेंगूळ दाबून दाबून बसवलं...... भानावर आल्यासारखं दाखवत मी प्रतिप्रश्न केला, "कोणाच्या वहिनीवर???" Proud

"अहो म्हणजे तुमची बायको हो...... किती रूड बोलता हो तुम्ही तिच्याशी फोनवर. दिवसभरात कधीही फोन आला तरी ३ वाक्याच्या वर बोलत नाही.... लगेच ठेऊन देता..... किती गोड आहेत हो त्या..... जातील तिकडे प्रसन्न वातावरण घेऊन जातात (मला क्षणभर बायको म्हणजे एअर फ्रेशनरची नळकांडीच वाटायला लागली Proud ) ...आपल्याकडे आता ३ महिने ऑफिस बघत होत्या, तेंव्हा तर आम्हाला किती मस्त वाटायचं....." जयश्रीच्या तोंडाचा पट्टा नॉनस्टॉप चालूच...

आता तिच्या जोडीला हळूच या गप्पा ऐकून आमचा प्यून सुनिल आणि प्रोजेक्ट ईंजिनिअर योगेश केबिनमध्ये घुसले.

"याया , तुम्ही पण तुमचं मत द्या आता... आज काय काम नाहिये आणि जयश्री पण सुटलीये....."

"तसं नाही सर......" जयश्रीची बॅटिंग पुन्हा सुरू झाली.....

"सर, तुम्ही पण सगळ्यांशी मस्त मिळून मिसळून वागता, आम्हाला कधी वाटत नाही इथे जॉब करतोय... इतके बिनधास्त आम्ही बोलू शकतो..... आमच्याशी , सप्लायरशी, क्लायंटशी आणि सगळ्या मित्र मैत्रीणींशी तुम्ही किती दिलखुलास बोलता.... आणि वहिनींचा फोन आला की दोन वाक्यात संपवून टाकता..... हे बरोबर नाही."

आईशप्पथ..!!!! आज तर माझ्याच ऑफिसात माझी शाळा घेणं चालू झालं होतं..... मी गम्मत बघायचं ठरवलं.

सुनील हा आमच्याच गावचा मुलगा. मी लहान असल्यापासून त्याची आई आमच्या आजोळी काम करत असे, वडील बँकेत प्यून होते. ते "पिऊन पिऊन" गेले आणि मग त्याच्याजागी हा नोकरीला आला.... नोकरी काही मिळाली नाही, म्हणून मग आमच्याकडे ऑफिसात आला कामाला. पण त्याला माझी ईथ्थंबूत माहिती, त्याने तोंड उघडलंच....

"जयश्री, सर घरी पण असेच बोलतात...."
आज माझं राशीभविष्य बघायला हवंच होतं...... सगळे मिळून अब्रू वेशीला टांगतील असं काही लिहिलंय की काय, शंकाच आली मला.

काय योगेशराव, तुमचं काय निरिक्षण?????
योगेश हे तसे वयाने ४० कडे झुकलेले. त्यातल्या त्यात आमच्यातले वयस्क.... बाकी सगळी आमची यंग ब्रिगेड.

"सर, मला नेहमी वाटतं की मला तुमच्यासारखं बोलता आलं पाहिजे माझ्या बायकोशी."

मला हसू आवरेना..... कोणाचं काय काय दुखणं असतं देव जाणे.

"दिवसातून २० कॉल्स येतात, डोकं पिकतं... आपण कामात असताना काय उत्तरं देणार??? पण आता १५ वर्षं सवय झालीये तिलाही आणि मलाही. म्हणून हेवा वाटतो तुमचा.... बरं करता तुम्ही"

चला, एक गडी थोडा आपल्या बाजुने झुकलेला मिळाला.... बुडत्याला काठीचा आधार.

जयश्रीने पुन्हा सुरुवात केली, "तुम्ही इतरांशी हसून बोलता आणि ऑफिसात वहिनींचा फोन आला की लगेच गुंडाळता म्हणून तुम्हाला विचारलं मी. त्या मायबोली साईटवर असलात की पण कसे हसत हसत टाईप करत असता, आणि फोन आला की लगेच गंभीर चेहर्‍याने उत्तरं देता"

बापरे.....!!!! आजुबाजुला फिरताना लोक आपल्या डोळ्यांनी आणि कानांनी काय काय टिपत असतात??? मी कोणाशी काय बोलतो, माझ्या स्क्रीनवर काय चालू असतं.... मी कसा रिअ‍ॅक्ट होतो.....
माझ्यासाठी अलार्मिंग सिच्युएशनच होती ही. पण मूळ प्रश्न सोडवणं महत्वाचं होतंच.... तशातच जमलं तर एका दगडात काही पक्षी मारयचे होतेच. Wink

"बरं.. आता मी बोलू......" सगळे शांत झाले... जयश्री थोडीशी कावरीबावरी झाली होती. तिला खूणेने रिलॅक्स व्हायला सांगितलं.

"जयश्री, तू दिवसातून किमान २० कॉल्स करतेस घरी सासुबाईना. मुलगी कशी आहे, शी शू केली का, कामवाली येऊन गेली का वगैरे वगैरे... नवर्‍याला पण करतेस..... डब्यातलं खाल्लेस??? तूपसाखर गुंडाळून दिली होती ती तुकडे करून खाल्लीस की तशीच??? " यावर माझ्यासकट सगळेच मिनिटभर हसलो. "आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर जाऊया ना रे" ....... आता जयश्री हैराण होती की हे सगळे डिटेल्स ह्यांना काय माहित??? Rofl

"तर सांगायचं असं की, बायकांची जनरल टेंडंसी असते अशी, मग त्या कुठेही काम करत असोत, किंवा दिवसभर घरी बसणार्‍या असोत किंवा अगदी तान्ह्या मुलाला घरी सांभाळणार्‍या. त्यांना कुठलेही एक काम करताना अचानक दुसरं काहीही सुचू शकतं...... "

"मी एखादी ऑफर तयार करतोय अचानक बायकोचा फोन आला की "आज संध्याकाळी सँडविचेस करते हां" किंवा मी क्लायंटकडे बसलोय आणि बायको फोन करून सांगतेय, "अरे रविवारी सायलीच्या लग्नाला ती नवी हिरवी साडी नेसू ना" आता यावर मी काय उत्तर देणार?????
तुझा नवरा जीन्पीटी मध्ये एजंट आहे, तो एखादं काम करताना तू त्याला आज गुंडाळी तशीच खाल्लीस की तुकडे करून असं विचारलंस तर काय उत्तर देईल तो बिचारा????? "
पुन्हा एकदा केबिनमध्ये खसखस पिकली...... हळूहळू परिस्थिती माझ्या कंट्रोलमध्ये यायला लागली.

"योगेशची तर कसरतच असते..... त्याचं दु:ख तोच जाणे."

आता आमची मायबोली.... तू म्हणालीस ना, मी असतो त्या साईटवर हसत म्हणून... त्यावर गप्पांचे धागे आहेत.... त्यातल्या काही धागयांवर "रविवारी नेसलेल्या पैठणीपासून शनिवारी रात्री घातलेल्या नाईट गाऊनपर्यंत असंख्य गप्पा चालू असतात.... वर डिझाईन सुचवल्याबद्दल धन्यवाद हं, नवर्‍याला खूपच आवडलं ... असं एकमेकींसाठी लिहिलेलं असतं... Wink आणि ह्या गप्पांचे धागे ऑफिस सुरू झाल्यावर वाहू लागतात आणि ऑफिस संपल्यावर ओस पडतात..." Proud

एकूण काय तर तुमचं असं वागणं हे नैसर्गिक आहे.. त्यात काहीही चूक नाही..... पण आपण एखादा विचार करताना आपला नवरा काय काम करतोय, तो पण त्याच मनःस्थितीत आहे का समजून घ्यायच्या याचा विचार सहसा बायका करताना दिसत नाहीत..... Sad तुझ्या मनात आलं की आज शिवाजी पार्कवर जायचं की तू लगेच लावतेस चेतनला फोन.... पण तो कामात असेल तर...!!!!

म्हणून मी सहसा ऑफिसात घरचे कॉल्स अटेंड करत नाही...... सगळं काय ते घरी गेल्यावर.

आता अजून काही शंका आहे का "माझं बायकोवर खरं प्रेम आहे का" यावर???

"बरं झालं मी लग्नच नाय केलेय ते...." सुनीलने मधेच आपटीबार टाकला..... त्यावर जयश्रीने "लग्न नाय झालय तर त्या कविताचे ५० कॉल्स येतात"... असा सुरूंग लावून सुनीलची बोबडीच वळवली. सुनील हळूच केबिनमधून पसार झाला....

आता सगळेच हळूहळू उठायला लागले. जाताजाता जयश्री म्हणाली, "सर तुमचं म्हणणं पटलय मला, आता मी कधीही कॉल करताना चेतनला विचारेन की तू बिझी आहेस का, की बोलू नंतर"
योगेशसुद्ध्हा "मी पण या सवयी बदलणार आहे. अधेमधे फोन आले की कामावरचं लक्ष्य उडतं कधी कधी चुका पण होतात..... मी पण आता कामाच्या वेळेत शक्यतो घरघुती कॉल घेणारच नाही.... तुमच्यासारखंच सांगणार, आपण घरी आल्यावर बोलूया"

केबिन रिकामं झालं तेंव्हा माझं मन मात्र भरलेलं होतं....... एका दगडात काही पक्षी नक्कीच मेले होते.

सततच्या कॉल्सनी डिस्टर्ब होऊन छोट्या छोट्या चुका करणार्‍या योगेशना चूक लक्षात आली होती, जयश्री आता फोन करताना विचारपूर्वक करणार होती... तिच्याही कामातल्या चुका नक्कीच कमी होणार होत्या....
माझं माझ्याच बायकोवर प्रेम आहे हे जयश्रीच्या डोक्यात फिट्ट बसलं होतं Proud
घरगुती वातावरण असलं तरी किती डिस्टन्स ठेवायला हवा हे नकळत का होइना माझ्ह्याही लक्षात आलं होतंच.

आणि सरतेशेवटी, यातून खरंच काही बोध घेऊन जयश्री आणि योगेशची बायको वागली तर दोन पुरुषांना सुखनैव काम करता येणार होतं...... Happy

गुलमोहर: 

मजा आली वाचताना, विनोदातून मोठ्ठा उपदेश दिलास हो! Wink
ए सगळ्याच बायका नसतात हं अशा, उचल फोन की लाव नवर्‍याला, त्यात अर्जंट कामासाठी लावलाच तर "अरे, बिझी आहेस का की बोलू शकतो?" हा प्रश्न साहाजिक विचारल्या जातो... (आयमीन मी तरी घेत्ये ती काळजी Proud )
बादवे लेख एन्जॉय केला... Happy

"तर सांगायचं असं की, बायकांची जनरल टेंडंसी असते अशी, मग त्या कुठेही काम करत असोत, किंवा दिवसभर घरी बसणार्‍या असोत किंवा अगदी तान्ह्या मुलाला घरी सांभाळणार्‍या. त्यांना कुठलेही एक काम करताना अचानक दुसरं काहीही सुचू शकतं...... " भुंग्या ह्याला अनुमोदन नाही!!!!!!!!!

मला सुद्धा.. एकदा खुप कामात अस्तांना नवर्‍याचा फोन आला होता... काय चालु आहे?...असा राग आला होता मी जरा ठणक्यात्च म्हटले...... काय चालणार? कामं ..... समोर उभा असलेला एक एम्प्लोयी म्हणाला किती ...रुडली बोलता मॅडम तुम्ही..... Rofl

हे भुंग्या, आवडलं. एकदमच फनी हं !
पण माबोवरच्या बायांना आपण उपदेश केला आहे आणि पुरुषांचं भलं केलं आहे असं काही समजु नकोस. Light 1 सगळ्याच बायका काही अशा नसतात. नोकरी करणार्‍या बायकांना घरुन पोराने केलेला फोन "मॉम कामवाल्या मावशींना मला मॅगी करुन द्यायला सांग" किंवा सासुनी 'उद्या इडली करायला डाळ-तांदुळ भिजवायचे का' हे विचारायला केलेले फोन फेस करावेच लागतात. अगदी CFO/MD बरोबर बसलेलं असताना सुद्धा. त्यामुळे त्यांनाही सवय लागतेच नवर्‍याला फोन करताना विचारायची कि बोलु याता का बिझी आहेस? आणि असा फोन आला तर embarassing का बरं वाटावं. त्यांनाही घरं असतातच कि आणि ते पण इडली खातात ना. Wink हां फारच फोन आले तर घरी जावुन झापावं सरळ.

हे, मला लिखाण अगदीच आवडलंच. आणि अशा बायका खरंच असतात हे ही माहित आहे. ( मी जरा स्मायलीज कमीच टाकल्यात माझ्या पोस्टीत, म्हणुन परत हे स्पष्टिकरण. Wink )

माझ्या ऑफिसमधे एक प्रोजेक्ट मॅनेजर आहे त्याची बायको इतके फोन करते त्याला कि कधी तो ऑनलाइन नसेल आणि सेलवर पण भेटला नाही तर आम्ही म्हणतो कि त्याच्या घरी फोन करुन विचारा कि तो कुठल्या मिटींगमधे आहे. त्याची बायको रोज ( अगदी रोज) त्याला १/१.१५ ला फोन करते. का काय माहित? त्यावर लोकांचा गेस हा कि ती त्याला सांगत असेल कि 'जेवायची वेळ झाली. हात धुवुन जेवायला बस रे.'

भुन्ग्या, तू आता बहुतेक लु.ब्रिगेडकडुन मार खाणार! Proud पैठणीच्या गप्प्पा काय बच्चमजी!

>>>त्या मायबोली साईटवर असलात की पण कसे हसत हसत टाईप करत असता, आणि फोन आला की लगेच गंभीर चेहर्‍याने उत्तरं देता <<<< हे तर सगळ्यान्चच होत असेल.

छान लिहीलय.

बाकी एक मुद्दा पटला बर का. सारखे सारखे फोन करायला कशाला लागत? मी तर पुरुषान्नाही उठसुठ फोन करताना बघितलय, अन करत नस्तील तर मी खात्रीने सान्गु शकतो की त्यावेळेत त्यान्चे "लक्ष दुसरीकडे" अस्त! Wink
आमच्या वेळेस तर फोनही नव्हते, अन जेव्हा आले तरी आजवर एकवीस वर्षात एकदाही अतिशय गरजेच्या म्हणजे "तार (टेलिग्राम) सदृष" गम्भिर परिस्थिती असेल तरच फोन केले गेले. मी तर माझा स्वतःचा मोबाइल देखिल (कम्पनीबरोबर वाकडे असल्याने) घरीच ठेऊन येतो. अन घरच्यान्ना सक्त ताकिद की तितकेच महत्वाचे काम असेल तर अन तरच मला फोन करायचा. (मला फोन आला की बॉस डोळे वटारुन समोरच्या काचेतुन माझ्याकडे रोखुन बघत बस्तो Lol त्याला नै आवडत मी फोनवर बोललेल!)
तर, असे असुनही आमचे कधी अडत नै.
इव्हन घरी गेल तरी फारस बोलायची गरज पडत नाही, मोजकेच बोलणे पुरते, वेळेला चार जण असतील तर केवळ नजरेचा इशारा देखिल पुरेसा ठरतो. फोनची गरजच कशाला पडते? तेव्हडि वेव्ह लेन्थ जुळलेली असायलाच हवी, अन प्रेमाच्या दाखल्यास ती पुरेशी ठरत असेल, नै?

CHHAN AAHE ......SAGALYAA BAAYKAA SUDHARLYA TAR KITI BARE HOIL....
AAI..BAAYKO...PREYASI...NA HONARI BAYKO..HONARI BAYKO..MAITRIN...LAMB CHYA MAITRIN..JAVAL CHYA MAITRIN... SHANT ZALYA TAR KITI CHHAN... Happy

AAI..BAAYKO...PREYASI...NA HONARI BAYKO..HONARI BAYKO..MAITRIN...LAMB CHYA MAITRIN..JAVAL CHYA MAITRIN... SHANT ZALYA TAR KITI CHHAN... >>> हे एका सायकोचं वाक्य वाटतं आहे. Light 1 एका फटक्यात सगळ्यांना सायनाइड घालतो का काय? Happy मागच्याच आठवड्यात रत्नाकर मतकरींचं पुस्तक वाचल्याचा असर आहे माझ्या मनावर. त्यामुळे एकदम असंच सुचलं वरची पोस्ट वाचल्यावर. Wink

गुड वन भुंगेश. सेम पिंच हिअर.

किती रुडली हा आहेर मलाही मिळतोच. Happy

बायका बाय नेचर मल्टिटास्किंग असतात. त्यामुळे त्यांना अचानक काहितरी आठवणं साहजिक आहे, आणि कामात गढलेलं असताना. "आज संध्याकाळी काय बनवू ?" ह्या प्रश्नावर ब्लॅन्क होणही तितकच सहाजिक आहे.

भुंगा, खरंच छान लिहिलं आहे. मी सुद्धा अगदीच गरज असेल तरच घरी किंवा मा॑झ्या नवर्‍याला फोन करते. त्याचे दोन फायदे कामातले लक्ष विचलीत होत नाही (आपले व नवर्‍याचेही) आणि मोबाईलचे बिल सुद्धा कमी येते. Proud (आणि हो गरजेपुरताच फोन केल्यामुळे आपले म्हणणे शांतपणे ऐकले जाते. Happy )

हे भुंग्या, आवडलं. एकदमच फनी हं ! >> हळुवार, सावकाश असा....अनुमोदन.

भुनग्या जर हा विनोद लेखात टाकला असतास तर जरुर विनोद झाला असता.. Wink

(असाच अधुन अधुन झलक दाखवत जा लेका... बरं बरं वाटतं Proud )

इव्हन घरी गेल तरी फारस बोलायची गरज पडत नाही, मोजकेच बोलणे पुरते, वेळेला चार जण असतील तर केवळ नजरेचा इशारा देखिल पुरेसा ठरतो. फोनची गरजच कशाला पडते? तेव्हडि वेव्ह लेन्थ जुळलेली असायलाच हवी, अन प्रेमाच्या दाखल्यास ती पुरेशी ठरत असेल, नै? >> लिंबुनाना, पाया पडतो....अशिर्वाद द्या... लै झ्याक बोल्लात बघा... Happy

वा वा भुंग्या !

दुस-याला उपदेश करायचा तर स्वतःवर लिहायला हवं हे शिकायला मिळालं Proud

( मेलास आता तू Wink )

चातु, तु ना जरा तुझ्या प्रेमाच्या कल्पना आवरत्या घे रे. तोंडावर पडशील. Happy लिंबुकाकांचं ठीक आहे. फारच जुनं लग्न झालं आहे, पण तु ना जरा हिंदी सिनेमे कमी बघ. Light 1 Happy असल्या उच्च प्रेमाच्या कल्पना आल्या ना कि तु उडायला लागतोस. तुला दुखापत होवु नये एवढीच इच्छा ! आणि आता हे सांगितलं म्हणुन रागवु नकोस लगेच.

भुंग्या, अवांतर बद्दल सॉरी,पण याला वेळच्या वेळीच वास्तवात आणलेलं चांगलं. Wink

वारंवार फोन केल्याने बिल येण्याचा तोटा असला तरी काही वेळा आजूबाजूच्यांचे बोलणे ऐकू येणे हा फायदा नजरेआड करून चालणार नाही Wink

प्रिय मित्र भुंगा,

अगदी अचूक विषय निवडला आहेस व संपूर्ण लेखाशी सहमत आहे.

परंतू हा लेख काही विनोदी झालेला नाही तेव्हा ह्याला आपण 'लळीत' म्हणूयात. भुंग्याचा विनोद ह्यापेक्षा कितीतरी खदखदा हसायला लावणारा आहे त्यामुळे विनोदी लेखनाकडून आहेत तेवढ्या अपेक्षांना न्याय मिळाला असे वाटले नाही.

माझा प्रामाणिक प्रतिसाद तू पॉझिटीव्हलीच घेशील ह्याची खात्री आहे.

धन्यवाद!!

छान अनुभव. मला आधी शीर्षकावरून वाटले प्रेशर कुकरची जाहिरात आहे की काय?

आठवते का? जो बिवी से करे प्यार वह प्रेस्टीज से कैसे करे इन्कार?

(तरी बरं त्यात फक्त बिवीसे होतं अपनी नव्हतं. तुमच्या लेखाच्या शीर्षकात मात्र तुम्ही ते आधीच स्पष्ट केल्यानं संभाव्य घोळ टळला)

तेव्हडि वेव्ह लेन्थ जुळलेली असायलाच हवी, >>>>>>>लिम्बूदा इज करेक्ट!!

उदाहरण द्यायचे झाले तर वेस्ट इंडिज ची जुन्या जमान्यातली ओपनिंग बॅट्समेन जोडी ग्रीनीज व हेन्स !! त्यांच रनिंग बिटविन विकेट्स इतक सुंदर होत की ते रन काढण्या साठी एकमेकांना अगदी क्वचितच कॉल द्यायचे. नुसते एकमेकांकडे बघत व त्यांना समजे की एक रन धावायचा कि दोन की तीन.

संसारात ही तसच हव हे जरा आदर्श झालं. पण शंभर टक्के मार्क मिळवण्या करता अभ्यास केला तर फर्स्ट क्लास ची आशा बाळगता येते नाही का?

भुंगा, बाकी लेख एकदम झकास!!

Pages