एक स्वप्न साकारतंय - स्वदेश परतीचं

Submitted by sudu on 17 August, 2008 - 12:18

स्वप्न अमेरिकेचे

जून १९९७ ची एक रात्र. चेन्नईतल्या महाराष्ट्र मंडळाच्या हॉस्टेलमधून नुकताच फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो होतो. दमट, गरम, खारट हवेने हैराण होत आम्ही तिघं मित्र नवीन गाव, भाषा, "भातमय' जेवण आणि नवीन सॉफ्टवेअर कंपनी या सगळ्यांशी ऍडजस्ट करत नवीन येणाऱ्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत, एकमेकांची चेष्टा करत दिवस काढत होतो. अभी गोवेकर, विवेक दिल्लीकर आणि मी पुणेकर. घरचं भाडं जाऊन जेमतेम बचत व्हायची. तेव्हा आय.टी.मध्ये सध्यासारखे भक्कम पगार नव्हते. त्यात किचनमध्ये लाईट गेलेला आणि रॉकेलच्या स्टोव्हचा वास, त्यामुळे आमचं रात्रीचं जेवण बहुधा बाहेरच असायचं.
शेजारच्या सर्वांन्न भवन खानावळीत डोसा, सांबार, पायसम चोपून खायचं, झोपण्याआधी गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीवर बसून कधी गप्पा, कधी गाण्याच्या भेंड्या, तर कधी एकमेकांची थट्टामस्करी करत तारे बघत पडायचं, असा आमचा दिनक्रम होता. पण रात्री चेन्नई एअरपोर्टहून विमानं उडायला लागली, की डोक्‍यातली चक्रं चालू व्हायची. विमानाचे ते लुकलुकते दिवे त्या टिमटिमत्या ताऱ्यांच्या बॅकड्रॉपवर नाक उडवून ऐटीत निघून जाताना दिसली, की आमच्या रंगलेल्या गप्पा बंद व्हायच्या. तशातच शांतता भंग करत तिघांपैकी कोणीतरी ""कब जायेंगे यार यूएस को? आय कॅन नॉट वेट नाऊ!'' अशी कळ लावून जायचं. नंतर गप्पांना मूड नसायचा. मग मी जड मनाने गंजलेल्या जिन्यावरून खाली उतरून आणि अंगाला ओडोमॉस चोपडून अमेरिकेच्या स्वप्नांमध्ये रात्रभर हरवून जायचो.
उगवलेला दिवस मात्र रोजसारखाच अस्तित्वाची जाणीव करून द्यायचा आणि मी ऑफिसच्या तयारीला लागायचो.

हे यूएसला जायचं भूत माझ्या डोक्‍यात बरीच वर्षं होतं... अगदी एक्‍क्‍याण्णव मध्ये मुंबईला शिकायला आल्यापासून. तसा मी अकोल्याचा... आय मीन नागपूरचा... नाही खामगावचा... छे छे नांदेडचा... छे... आयडेंटिटी क्रायसिस झालाय राव.... बाबा बॅंकेत असल्यामुळे दर दोन-तीन वर्षांनी बदली व्हायची. नवी शाळा, नवीन घर, नवे मित्र. या चेंजचीच नंतर सवय झाली. ऍडिक्‍शन झालं म्हणाना. बारावीला अकोल्यात असताना मला मुंबईचं प्रचंड वेड होतं. अमिताभ राहतो त्या जागी इंजिनिअरिंगला जायचा मनसुबा होता. अशी स्वप्नं घेऊन ऍक्‍टर लोक मुंबईला येतात म्हणे. असो! इमानदारीत अभ्यास केला आणि मेहनतीचं फळ मिळालं. विदर्भाला मुंबईकडून सप्रेम भेट मिळालेल्या पाच ओपन सीटपैकी एक सीट मला व्हीजेटीआयमधल्या प्रॉडक्‍शन इंजिनिअरिंगकरता मिळाली... डोक्‍यातला यूएसए टायमर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षी वाजला. सीनिअर कॉम्प्युटर सायन्सच्या मित्रांकडून कळायचं, की अमेरिकेत जायचं तर फाडफाड इंग्रजी यायला हवं आणि "see' यायला हवं. त्याला "c' म्हणतात हे नंतर समजलं. मी अस्सल मराठीतून शिकलेलो. आता नवीन भाषा शिकणं आलं - बोली इंग्लिश आणि "सी'.

मी प्रॉडक्‍शन इंजिनिअरिंगच्या गरम प्रयोगशाळेत भल्या मोठ्या मशिन्सवर घाम टिपत काम करत होतो. पण मनाच्या कोपऱ्यात मात्र त्या एअरकंडिशन्ड खोलीतला छोटासा संगणक मला सारखे 'कूल कॉल' देत होता. इंजिनिअर बनलो आणि पुणेकर व्हायचं ठरवलं. प्रॉडक्‍शन इंजिनिअर्सची पंढरी - टेल्कोमध्ये चिकटलो; पण यूएस अँड आयटीचं खूळ काही डोक्‍यातून गेलं नव्हतं. तेव्हा नुकताच पुण्यात सी-डॅकचा डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग सुरू झाला होता. मी नोकरीला रामराम ठोकला आणि सी-डॅकची पायरी गाठली. माझी दुसरीच बॅच. त्या वेळी सॉफ्टवेअर ट्रेनिंगचं एवढं पेव फुटलं नव्हतं आणि पुढे नोकरीची शाश्‍वतीही नव्हती. पण मोठा भाऊ खंबीरपणे पाठीशी उभा राहिला आणि मी हिंमत केली. जो होगा देखा जाएगा!

आणि मग आले ते मंतरलेले दिवस, प्रोग्रॅमिंग करताना मी हरवून जायचो. एखाद्या लहान मुलाला जर त्याचं खूप आवडीचं खेळणं दिलं तर तो कसा हरवून जातो तस्सच. मॅजिकल... फंडू. ट् रेनिंगचे सहा महिने कसे गेले कळालं पण नाही. कोर्स संपल्यावर पुढील दोन वर्षं भारतीय आयटी कंपनीतून अनुभव घेत चेन्नईला पोचलो. पाण्याच्या टाकीवर, यार दोस्तांबरोबर, घिरघिरणारी विमानं आणि अमेरिकेची स्वप्नं पाहत.

स्वप्नातल्या देशात, यूएसमध्ये अखेरीस डॉट कॉम बूम झाला आणि आमची स्वप्नपूर्ती झाली. एकापाठोपाठ एच १ बी व्हिसा घेत आम्ही तिघंही कॅलिफोर्नियाला पोचलो... स्वप्नातल्या जागी. आमची चेन्नईची गॅंग आता सनिवेलात जमली. आता नवीन घरी रॉकेल स्टोव्हच्या जागी कुकिंग रेंज आली, पायी-गाडीच्या ऐवजी मोटारगाडी आली. व्हॅक्‍युम क्‍लिनर, डिशवॉशर आले. सगळ्या अद्ययावत सोयी होत्या. भांडी कोणी घासायची आणि घर कोणी झाडायचं हे वाद आता कमी व्हायचे. आता स्वीमिंग, टेनिस, हायकिंग, मूव्हीजला बराच वेळ मिळायला लागला. आमची मैत्री पण अजून दृढ झाली. खरंतर आमच्यात बरेच फरक... अगदी भाषेपासून ते खाण्याच्या सवयीपर्यंत. पण एक धागा आम्हाला धरून होता- स्वप्नांच्या क्षणी एकमेकांकडून मिळालेल्या साथीचा आणि त्यातून निर्माण झालेल्या स्नेहाचा, आठवणींचा.

काळ बदलत होता.
"तुम्हाला गव्हर्न्मेंट कॉलेजमधून शिकून यूएसला नोकरी करताना लाज कशी वाटत नाही?" असा युक्तिवाद करणारे "जीवलग' स्वतःचा बायोडाटा देऊन यूएसमध्ये नोकरी शोध म्हणायला लागले होते. इकडे मंडळी फटाफट लग्नाचे बार उडवून आमचं अपार्टमेंट रिकामं करत होती. मलासुद्धा अमेरिकेतल्या एकटं जगण्याचा कंटाळा आला होता. आपलंस, ज्याच्याकरिता ऑफिसमधून घरी जायची ओढ लागेल असं कोणीतरी मलाही हवं होतं. शेवटी मी खडा टाकला.

आई, मी "स्पेसिफिकेशन्स' पाठवतो तश्‍शी बायको शोधून दे. माझी स्पेसिफिकेशन्स पण काय हो... टिपिकल... सुंदर, सोज्वळ, सुशिक्षित, मनमिळाऊ, लांब केस... वगैरे. डॉक्‍टर आणि त्यात आर्टिस्टिक असेल तर काय... सोने पे सुहागा आणि कमाल म्हणजे मिळाली... अगदी हवी तश्‍शी... आणि त्यात मुंबईकरीण... डॅशिंग. म्हणजे मी अभिमानानं म्हणतोय हो. उगाच गैरसमजुती नकोयत.

संसार सनिवेलात सुखात सुरू झाला. एकमेका साह्य करू दोघे करू "मार्स्टस' धर्तीवर, सौ आणि मी एमएस आणि एमबीए केलं. दोघांची शिक्षण संपली आणि तोवर आम्ही "हम दो हमारे दो' झालो होतो.

एव्हाना नोकरीत स्थैर्य आलं, कॉन्फिडन्स आला, जिवाची अमेरिका करून घेतली, चार गाड्या बदलल्या, सॉफ्टवेअरमधून बिझनेस मॅनेजर म्हणून उडी घेतली. सौं'नी सक्‍सेसफुल योगा बिझनेस सुरू केला. छान हवा, पाणी, निसर्गरम्य देखावे, जगभरातले क्‍युझइन्स, मुलांसाठी बेस्ट शाळा, खूप जीवलग मित्र, मोठाल्ले पब्लिक पार्क्‍स, पब्लिक लायब्ररीज, झक्कास जॉब, दिमतीला वर्ल्डक्‍लास गाड्या... सगळं छान होतं. नथिंग टू कम्प्लेन अबाऊट. बट...

इंडियन ड्रीम

हे सगळं असतानादेखील काही तरी मिसिंग आहे, असं सारखं वाटायचं. आपलं शब्दकोडं सुटलं नाही की चुकचुकल्यासारखं वाटत राहतं ना तसंच काहीसं. खरं तर आयुष्याच्या कोड्याची बरीच उत्तरं सापडलेली होती. बायको, मुलं, घर, नोकरी, स्टॅबिलिटी, मॅच्युरिटी, कॉन्फिडन्स वगैरे. पण मन मात्र भारतातच राहिलं होतं.

दर वेळी भारतात गेलो, की वाटायचं, की परत येऊच नये. खरं तर सिलिकॉन व्हॅलीत राहणं म्हणजे स्वच्छ सुंदर पुण्यात राहण्यासारखंच आहे. पण एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहूनदेखील जशी 'घरी' जायची ओढ लागते ना तसं वाटायचं. भारतातील धूळ, गर्दी, अस्वच्छता, ध्वनिप्रदूषण हे जाणवायचं. पण इथं खूप आपलेपण, आपुलकी, प्रेम, जिव्हाळादेखील जाणवायचा.

अमेरिकेत माणसं दिसायची खोटी! सगळीकडे गाड्या पाहून जीव उबायचा - छोट्या, मोठ्या, स्वस्त, महाग, जॅपनीज, जर्मन, हम्मर, हायब्रीड. कोणाला भेटायचं म्हणजे अपॉइंटमेंट घेणं आलं. तसा मी काही फार लोकंवेडा आहे अशातला प्रकार नाहीये; पण आपल्या 'स्पीसीज' मध्ये राहायला आवडतं. कार्सच्या इंडिव्हिज्युअलिस्टिक कृत्रिम जगात विचित्र वाटायचं. इथून आई-बाबा "तुमचं करिअर सांभाळा, आमच्याकरता कॉम्परमाईज करून भारतात येऊ नका" असा प्रेमापोटी (पण माझ्या दृष्टीने रुक्ष) सल्ला द्यायचे. तसं करिअरचं म्हणाल तर आम्हा दोघांना भारतातही जबरी स्कोप आहे. "आफ्टर ऑल वुई आर द सेकंड फास्टेस्ट ग्रोईंग नेशन इन द वर्ल्ड!' एक महासत्ता बनण्याच्या मार्गावर.

मी परदेशी गेलो तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आता आम्हा परतणाऱ्या भारतियांवर ऑपॉर्च्युनिस्ट हा शिक्का मारणं सोपं आहे. मात्र, परदेशस्थ भारतीयांनीही भारताच्या प्रगतीला फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि क्रॉस पॉलिनेशन ऑफ आयडियाजतून हातभार लावलेला आहे, ही विचाराची बाब आहे.

मार्च २००८ - आम्ही अमेरिका सोडली

शेवटी आम्ही ठरवलं - फॉलो द हार्ट. भारतात परतायलाच हवं. नाऊ ऑर नेव्हर. जोवर मुलं लहान आहेत तोवर ते शक्‍य होतं. मोठी झाली, की त्यांची ओपिनियन्स फर्म होतात, अमेरिकन कम्फर्ट झोनमध्ये जातात. पालकांना धमकावतात, की अमेरिकेतच राहायचंय आणि नंतर रुखरुख लागून राहते, की लवकर जायला हवं होतं. (मित्रांच्या अनुभवाचे बोल). डोकं अमेरिकेत, तर हृदय भारतात अशा त्रिशंकू राहण्याचा पण कंटाळा आला होता. तर फायनल एका वर्षाचं प्लॅनिंग आणि एका दशकानंतर मार्च २००८ ला परतलो. फॉर गुड.

आम्ही अमेरिकेतलं समृद्ध आयुष्य सोडून काय मिळवलं...

दोन महिने भारतात रुळल्यावर मुलांनी परवा चक्क मराठीत माझ्याशी बोलायला सुरवात केली आणि मला चक्कर आली. संस्कृत श्‍लोक म्हणून दाखवले तेव्हा भरून आलं. खरं तर मी जसा मराठी "ओन्ली' शाळेत शिकलो तसंच माझ्या मुलांनीही शिकलं पाहिजे अशा मताचा मी नाहीये. त्यांनी 'वर्ल्ड सिटिझन' व्हायला हवं आणि 'सुसंस्कृत' होण्याकरिता संस्कृत श्‍लोकच म्हटले पाहिजेत या विचारांचा तर अजिबात नाहीये. पण आपण ज्या भाषेत, ज्या लोकांत, ज्या विचारात, ज्या वातावरणात वाढलो तेच अनुभव जर मुलांना मिळाले तर छान वाटतं. हा आमच्या 'कम्फर्ट'चा प्रश्‍न आहे. इतर एनआरआयइजला असाच अनुभव यायला हवा, असा हट्ट तर मुळीच नाही. जर कोणी म्हटलं, "आम्हाला काही परत जायचं नाहीये भारतात" तर वुई कम्प्लिटली अंडरस्टॅंड देअर पर्स्पेक्‍टिव्ह.

मुलं मात्र खूप खूष आहेत. नातेवाइकांत राहून, खूप मित्रांमध्ये खेळून आणि आजी-आजोबांच्या अटेन्शनमध्ये ती 'ऐष' करतायत. त्यांना घरबसल्या आजी-आजोबा मिळाले आहेत आणि आई-बाबांना नातवंडं. घर आता भरून गेलंय. आणि त्यात हापूसचे आंबे, मॉन्सूनचा पाऊस, सिंहगडावर हाईक आणि नंतर झुणका-भाकरी, घरकामाला मदतीचा हात, बादशाहीचं जेवण (हो मला आवडतं!) पहिल्या पावसानंतरचा आपलासा वाटणारा सुवास, भाजी बाजारात जाऊन भाव करण्याची इच्छापूर्ती (सौंची, माझी नव्हे.) हे सगळं अमूल्य. प्राईसलेस.

कळत-नकळत मन मात्र तुलना करत असतं. "मै और मेरी तनहाई, अक्‍सर ये बातें करते है, यूएस मे होता तो कैसा होता?". सिग्नल बंद पडला तरीही चौक 'तुंबले' नाहीत आणि ग्रीन सिग्नल पडताच मागून हॉर्न देऊन उगाच 'हॉर्नी'पणा केला नाही, तर काय मजा येईल राव! परवा दत्तवाडीतून जाताना दुमजली इमारतीएवढ्या लाऊडस्पीकरने मी उडालो... लिटरली!
नुकताच आरटीओत एजंट न वापरता जायचा हौशी उपक्रम केला. माझ्या इंडियन लायसेन्सवरील पत्ता बदलायचा किरकोळ हट्ट होता. तीन फॉर्म्स, चार तास, पाच खिडक्‍या आणि शिव्यांची लाखोली वाहत रिकाम्या हाताने परतलो. त्यात मी विसरलेलो, की सौपण सोबत होती. "तुझा भारतात परतल्यापासून तोंडावरचा ताबा सुटलाय. जरा शिव्या कमी कर'' हा सल्लाही मिळाला. नशिबाने मुलगा सोबत नव्हता नाहीतर त्याने "व्हॉट डिड बाबा से आईऽऽऽ?'' असा सवाल करून मला प्रॉब्लेममध्ये टाकलं असतं. शेवटी सौने माझा वीक पॉइंट... उसाचा रस... बिगर बरफ, प्यायला घालून माझं डोकं आणि पोट थंड केलं.

अमेरिकेत पर्सनल लायबिलिटी, प्रॉपर्टी राइटस, राइट टू इन्फॉर्मेशन, लॅक ऑफ करप्शन (किमान सामान्य माणसाकरता तरी), वक्तशीरपणा, स्वच्छता आणि पॅडस्ट्रियअन राइट ऑफ वे (पादचाऱ्यांना आधी रस्ता द्या) याची इतकी सवय झालीय की खरं सांगतो त्याची पदोपदी आठवण होते. रस्त्यावरून चालताना तर अगदी... 'पदो...पदी.'

मी आणि सौ प्रत्येक आल्या दिवशी ऍडजस्ट होतोय. इथली माणुसकी, आपलेपण, गोडवा, जिव्हाळा यांनी बहरतोय, तर इतर काही गोष्टींनी कोमेजतोय. "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है" हा शाहरुखचा बोध मला पटलाय. पण आता एनआरआयचा मुखवटा उतरवून, नॉर्मल वावरायचं आहे. 'आपल्याकरता', 'आपल्यांकरता' जगायचं आहे. नाटकं पाहायची आहेत, सामाजिक कामात भाग घ्यायचा आहे. आई- बाबांसोबत राहायचं आहे, टोटल बीस साल बाद! परवा आम्ही हाताने आधार देत बाबांना पर्वतीवर घेऊन गेलो तर काय खूष होते. अपार्टमेंटच्या वॉकिंग ट्रॅकला प्रदक्षिणा मारायचा कंटाळा येतो म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताजेपणा पाहून आम्हाला अमेरिकी आठवणींचा विसर पडला. थोडा हारकर भी हमने बहोत कुछ पाया था.

म्हणतात ना, "इरादे नेक हो तो सपने भी साकार होते है..." आमचं पण स्वदेशपरतीचं स्वप्न हळूहळू साकारतंय. तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.

*** सध्या अमेरिकि-नोकरीतुन भारतात बदलीच्या ट्रान्झिशनमध्ये आहे. So far, so good. भारतात नोकरीच्या अनुभवावर स्वतंत्र लेख लिहायचा बेत आहे. Coming soon in theaters near you***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नविन थ्रेड चालु करायचि कल्पना छान आहे. तीथे देवाण-घेवाण निक्किच सोपी पडेल.

नुकतच एका Return to India forum वर http://epaper.timesofindia.com/Repository/ml.asp?Ref=VE9JUFUvMjAwOC8wOC8... ह्या लेखा बद्दल छान चर्चा झाली. त्यावरील माझा अभिप्राय, इंग्रजितुनच खालि देतो आहे. (ट्रान्सलेशनचा कंटाळा !)
--------
Read this first - http://epaper.timesofindia.com/Repository/ml.asp?Ref=VE9JUFUvMjAwOC8wOC8... ----
Good discussion and a very real article. In my opinion, if you are looking for a "Utopia" in your expectation of moving back to India, you are mistakening.
If your expectation is you will get US work culture, time ethics, cleanliness, discipline ALONG with going back to your roots near your parents/family, that may not be very real.

Moving to India is a balancing act. You loose some..... you gain some. So keep right (even lower than right) expectations. You put together your priorities to check what is important for you. Supporting parents, kids Indian-ness, Living at "Home" etc. Vs "$", Cleanliness, no-corruption, peace of mind in government work etc.

Putting this realization on paper will make it easier for you to take right decision. That will save on lots of hassle packing, unpacking and repacking.

Every person has an internal balance scale to determine what is important. My internal balance scale was leaning towards returning back, in my case it was 70%-30% in favor of Retun-2-India. So check your Return to India (R2I) decision from the angle of ROI (return on invesetment) or in other words, in my case, suffering on 30% of your happiness/peace of mind that I left in US....... or 70% of other important winnings/happiness I may gain by moving to India). Its not 100% either of the places. BTW - we grownups have these split mindsets emerging from our nostaliga, memories and sense of duty towards parental care (may vary based on your individual situation). For kids, they go with the flow and can get 100% in either of the place.

I am still in transition from US job to Indian job (shuttling back and forth between India,US), so its too early for me to say if my 70%-30% will become 30%-70% once I start working fulltime in India. But from my "Trial" work visits in the past, that balance scale shift has low probability in same given circumstances.

Eager to read "indicators" on your balance scale !

धन्यवाद मनस्मि,

तुमचा मुद्दा लक्षात आला. कुठल्याहि सरकारि कचेरितुन स्वतःच काम करवुन घेण हा सर्वार्थाने कसोटि बघणारा अनुभव असतो. तुमच्या पुढच्या वाटचालि साठि शुभेछ्छा.

अभिनंदन !!! परतीचा विचार परदेशात पाय ठेवल्या पासुनच सुरु असतो. तो तडीस नेणे कठिण. पण तुम्ही परतलात आणि यशस्वी झालात याबद्दल तुमचे अभिनंदन.
-प्रिन्सेस...

"इरादे नेक हो तो सपने भी साकार होते है..."
क्या बात है!!
अगदी सर्व मानतल लिहील आहेत... अजून आम्हाला तुमच्याईतपत गडावर चढून जाणे जमले नाहीये (म्हणजे स्वदेशात कायम) पण जवळ येवून ठेपलो आहोत.. नुकतेच दुबई मधे आलो. आता इथून पुढील प्रवास स्वदेशाकडेच करायचे planning आहे (दुबई हा त्यातलाच एक "धाडसी" टप्पा).. तेव्हा लवकरच तो सुदीन येईल असे वाटते. सद्ध्या तरी २० CELCIUS तून एकदम 41 CELCIUS शी लढाई चालू आहे...:)
तुमच्या लेखातील कितीतरी सन्दर्भ बारकावे अगदी मलाही "पदोपदी" जाणवले... अन पटले "some things are priceless"..
पुन्हा एकदा अभिनन्दन आणि शुभेच्छा!
(आमच्या दुबई वास्तव्यावर अन अनुभवावर नक्कीच काहीतरी खरडीन म्हणतो...तूर्तास "घाम" गाळणे आहे) Happy

अरेवा, रैना प्रमाणे सुडू यांनी २ वर्षांपुर्वीच असा बोर्ड चालू केला होता की ...
सुडू यांना परतल्यापासुन २ वर्षात काय काय अनुभव आले,
अपेक्षेप्रमाणे होते की फार वेगळे होते, हे समजुन घ्यायला आवडेल.
खालील बोर्डवर लिहिलेत तर ताज्या चर्चेत सर्वांनाच समजेल.
http://www.maayboli.com/node/13117

अप्रतिम !
# स्वदेशी परतलेल्या॑चा अनुभव वाचण्याची ही माझी पहिलीच वेळ. हा लेख वाचताना मला एक गाण॑ सारख॑ आठवत॑य :
"या चिमण्या॑नो परत फिरा रे"
या गाण्याला तुमच्या अ॑तर्मनाने प्रतिसाद दिलाय (स्वदेशी परतून).

# आपल्या एखाद्या निर्णयाने आपल्या आई - वडिला॑च्या डोळ्या॑त आन॑दाश्रु येणे कि॑वा त्या॑ना जगण्याची नवी उमेद येणे यापेक्षा लाखमोलाची जगात कुठलीही गोष्ट नसेल.
खरोखर वाचून खुप बर॑ वाटल॑.

छान लिहिलयं .
मनस्मी , सुदर्शन तुमचे परतीचे अनुभव शेअर कराल का ?
मनस्मी अमेरिकन सिटीझन्शीपचे भारतात राहण्याचे फायदे तोटे ( उदा. सरकारी प्रॉब्लेम इत्यादी) अनुभव शेअर करु शकाल का ?

आपल्या एखाद्या निर्णयाने आपल्या आई - वडिला॑च्या डोळ्या॑त आन॑दाश्रु येणे कि॑वा त्या॑ना जगण्याची नवी उमेद येणे यापेक्षा लाखमोलाची जगात कुठलीही गोष्ट नसेल. हे अगदी खरे आहे... Sad

मुले भारताबाहेर जन्मली तर एन आर आय असतात. तो आपला चॉइस नाही.

नुस्तं जन्मून एन आर आय नाही होत. त्यासाठी अमुक इत्के दिवस देशाबाहेर असावे अशीही अट असते. मूल बाहेर जन्मले आणि नंतर ते कायमचे भारतातच आले, तर ते एन आर आय ठरत नसावे बहुतेक

मुले भारताबाहेर जन्मली तर एन आर आय असतात. तो आपला चॉइस नाही.

नुस्तं जन्मून एन आर आय नाही होत. त्यासाठी अमुक इत्के दिवस देशाबाहेर असावे अशीही अट असते. मूल बाहेर जन्मले आणि नंतर ते कायमचे भारतातच आले, तर ते एन आर आय ठरत नसावे बहुतेक

मुले भारताबाहेर जन्मली तर एन आर आय असतात. तो आपला चॉइस नाही.>>>>>>>>>

असं कसं. इथे कोरियात जन्माने नागरिकत्व मिळत नाही. त्यामुळे मला माझ्या मुलांचा भारतीय दुतावासातुन जन्माचा दाखला तसेच पासपोर्टही मिळाला आहे. अमेरिकेत काय नियम आहे माहिती नाही, पण बहुदा चॉईस असावी.

तुमच्या संपूर्ण लेखातला सकारात्मक सूर सुखावह आहे. अशा लोकांची सर्वत्र गरज आहे. हा देश तुमचाच आहे, तरीही स्वागत करतो. Happy
( भारतात आल्यानंतर धक्काच बसला, फसवणूक झाली हा सूर कुठेही नाही हे पाहून खूप बरं वाटलं).

मलाही आवडतील सुडू ह्यांचे स्वदेशातील अनुभव वाचायला.
हो/नाही करता करता आम्हालापण आता अमेरिकेत येऊन १० वर्षं उलटून गेली. पण सगळं असतानादेखील काही तरी मिसिंग आहे, असं सारखं वाटतं हे अगदी खरं. भारतात जाऊन ते काय मिसिंग असतं ते सापडतं का? का परत काही वर्षांनी काहीतरी मिसिंग आहे असं वाटायला लागतं? ह्याबद्दल सुडू, पराग, नानबा, केदार ह्यांचे विचार वाचायला आवडतील.
वर सुडू ह्यांनी म्हटलच आहे. जर कोणी म्हटलं, "आम्हाला काही परत जायचं नाहीये भारतात" तर वुई कम्प्लिटली अंडरस्टॅंड देअर पर्स्पेक्‍टिव्ह. त्यामुळे कोणता निर्णय योग्य आणि कोणता अयोग्य ह्या वाटेवर चर्चा जाऊ नये येवढीच माफक अपेक्षा.

अमेरिकेत काय नियम आहे माहिती नाही, पण बहुदा चॉईस असावी.>>

अमेरिकेत जन्म झाला मग तुम्ही अमेरिकन नागरिक होता. आई वडिलांचे नागरिकत्व, immigration status याचा काही संबंध नाही.

नविन चर्चा वाचुन छान वाटल.
मायबोलिवरील प्रतिसादा नंतर मी इमिग्रेशन विषयावर कादंबरीच लिहायला घेतलि (ईन्ग्रजीत). डिसेंबर २०१७ ला जागतिक प्रकाशन आहे (अ‍ॅमझोन वर).
जरुर वाचा. ट्र्म्प पोलिसिसवर बरच काहि आहे. सगळ्या नायक नायिकांची स्ट्रगल तुम्हाला नक्किच आवडेल. विचार पसरवायला मदत करावि हि नम्र विनंति.
https://youtu.be/7k_KoJ8xxZo

@सोहा, जे मिसिंग आहे असे वाटत असते ते बर्‍यापैकी सापडते भारतात आलो कि. मला गेल्या २ वर्षात बरेच काही सापडले.
पण ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबुन असते. म्हणजे जे नावडते आहे ते स्विकारून जे सापडते आहे त्याला जास्त महत्व देता यायला पाहिजे. नावडते बरेच काही असेल याची तयारी असली पाहिजे.

We tried to come back in 2005 and 2012 but as husband was in USA it was hard for me to manage things over there. Would love to read latest experiences of all who could go back n settle down.

3 main aspects to be successful with the return to India

1. Right reasons - kids to be more global citizens, financial independence for yourself, parents aging who need you.
2. Right place to live - amongst like-minded, American returned expat families to reduce cultural shock. Big no-no for the rental place to try it out for an year mindset. It doesn't work. Close to extended family.
3. Right job - it is frustrating to work for an Indian employer, especially after you are worked in the US for many years. Find a American job that brings you in India. It will be a win-win for you and your company. Stay on US pay, India stay as much as possible.

My book on the topic is coming soon https://youtu.be/7k_KoJ8xxZo and new video blog will discuss this in more details. We finished our 9 years back home in India today. We keep traveling back to the US for vacation, for short business trips with and without family but there was never a discussion to relocate back to the US.

Infact, I came back to US for one school year with my 8 year old son to expose him to the US (while my wife continued to stay in India with my 16 year old son). We used to travel back and forth every 2-3 months. Even with that, after full one school year in the US in Cupertino School District, my son is back home and re-enjoying India with much better global exposure.

Pages