एक स्वप्न साकारतंय - स्वदेश परतीचं

Submitted by sudu on 17 August, 2008 - 12:18

स्वप्न अमेरिकेचे

जून १९९७ ची एक रात्र. चेन्नईतल्या महाराष्ट्र मंडळाच्या हॉस्टेलमधून नुकताच फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो होतो. दमट, गरम, खारट हवेने हैराण होत आम्ही तिघं मित्र नवीन गाव, भाषा, "भातमय' जेवण आणि नवीन सॉफ्टवेअर कंपनी या सगळ्यांशी ऍडजस्ट करत नवीन येणाऱ्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत, एकमेकांची चेष्टा करत दिवस काढत होतो. अभी गोवेकर, विवेक दिल्लीकर आणि मी पुणेकर. घरचं भाडं जाऊन जेमतेम बचत व्हायची. तेव्हा आय.टी.मध्ये सध्यासारखे भक्कम पगार नव्हते. त्यात किचनमध्ये लाईट गेलेला आणि रॉकेलच्या स्टोव्हचा वास, त्यामुळे आमचं रात्रीचं जेवण बहुधा बाहेरच असायचं.
शेजारच्या सर्वांन्न भवन खानावळीत डोसा, सांबार, पायसम चोपून खायचं, झोपण्याआधी गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीवर बसून कधी गप्पा, कधी गाण्याच्या भेंड्या, तर कधी एकमेकांची थट्टामस्करी करत तारे बघत पडायचं, असा आमचा दिनक्रम होता. पण रात्री चेन्नई एअरपोर्टहून विमानं उडायला लागली, की डोक्‍यातली चक्रं चालू व्हायची. विमानाचे ते लुकलुकते दिवे त्या टिमटिमत्या ताऱ्यांच्या बॅकड्रॉपवर नाक उडवून ऐटीत निघून जाताना दिसली, की आमच्या रंगलेल्या गप्पा बंद व्हायच्या. तशातच शांतता भंग करत तिघांपैकी कोणीतरी ""कब जायेंगे यार यूएस को? आय कॅन नॉट वेट नाऊ!'' अशी कळ लावून जायचं. नंतर गप्पांना मूड नसायचा. मग मी जड मनाने गंजलेल्या जिन्यावरून खाली उतरून आणि अंगाला ओडोमॉस चोपडून अमेरिकेच्या स्वप्नांमध्ये रात्रभर हरवून जायचो.
उगवलेला दिवस मात्र रोजसारखाच अस्तित्वाची जाणीव करून द्यायचा आणि मी ऑफिसच्या तयारीला लागायचो.

हे यूएसला जायचं भूत माझ्या डोक्‍यात बरीच वर्षं होतं... अगदी एक्‍क्‍याण्णव मध्ये मुंबईला शिकायला आल्यापासून. तसा मी अकोल्याचा... आय मीन नागपूरचा... नाही खामगावचा... छे छे नांदेडचा... छे... आयडेंटिटी क्रायसिस झालाय राव.... बाबा बॅंकेत असल्यामुळे दर दोन-तीन वर्षांनी बदली व्हायची. नवी शाळा, नवीन घर, नवे मित्र. या चेंजचीच नंतर सवय झाली. ऍडिक्‍शन झालं म्हणाना. बारावीला अकोल्यात असताना मला मुंबईचं प्रचंड वेड होतं. अमिताभ राहतो त्या जागी इंजिनिअरिंगला जायचा मनसुबा होता. अशी स्वप्नं घेऊन ऍक्‍टर लोक मुंबईला येतात म्हणे. असो! इमानदारीत अभ्यास केला आणि मेहनतीचं फळ मिळालं. विदर्भाला मुंबईकडून सप्रेम भेट मिळालेल्या पाच ओपन सीटपैकी एक सीट मला व्हीजेटीआयमधल्या प्रॉडक्‍शन इंजिनिअरिंगकरता मिळाली... डोक्‍यातला यूएसए टायमर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षी वाजला. सीनिअर कॉम्प्युटर सायन्सच्या मित्रांकडून कळायचं, की अमेरिकेत जायचं तर फाडफाड इंग्रजी यायला हवं आणि "see' यायला हवं. त्याला "c' म्हणतात हे नंतर समजलं. मी अस्सल मराठीतून शिकलेलो. आता नवीन भाषा शिकणं आलं - बोली इंग्लिश आणि "सी'.

मी प्रॉडक्‍शन इंजिनिअरिंगच्या गरम प्रयोगशाळेत भल्या मोठ्या मशिन्सवर घाम टिपत काम करत होतो. पण मनाच्या कोपऱ्यात मात्र त्या एअरकंडिशन्ड खोलीतला छोटासा संगणक मला सारखे 'कूल कॉल' देत होता. इंजिनिअर बनलो आणि पुणेकर व्हायचं ठरवलं. प्रॉडक्‍शन इंजिनिअर्सची पंढरी - टेल्कोमध्ये चिकटलो; पण यूएस अँड आयटीचं खूळ काही डोक्‍यातून गेलं नव्हतं. तेव्हा नुकताच पुण्यात सी-डॅकचा डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग सुरू झाला होता. मी नोकरीला रामराम ठोकला आणि सी-डॅकची पायरी गाठली. माझी दुसरीच बॅच. त्या वेळी सॉफ्टवेअर ट्रेनिंगचं एवढं पेव फुटलं नव्हतं आणि पुढे नोकरीची शाश्‍वतीही नव्हती. पण मोठा भाऊ खंबीरपणे पाठीशी उभा राहिला आणि मी हिंमत केली. जो होगा देखा जाएगा!

आणि मग आले ते मंतरलेले दिवस, प्रोग्रॅमिंग करताना मी हरवून जायचो. एखाद्या लहान मुलाला जर त्याचं खूप आवडीचं खेळणं दिलं तर तो कसा हरवून जातो तस्सच. मॅजिकल... फंडू. ट् रेनिंगचे सहा महिने कसे गेले कळालं पण नाही. कोर्स संपल्यावर पुढील दोन वर्षं भारतीय आयटी कंपनीतून अनुभव घेत चेन्नईला पोचलो. पाण्याच्या टाकीवर, यार दोस्तांबरोबर, घिरघिरणारी विमानं आणि अमेरिकेची स्वप्नं पाहत.

स्वप्नातल्या देशात, यूएसमध्ये अखेरीस डॉट कॉम बूम झाला आणि आमची स्वप्नपूर्ती झाली. एकापाठोपाठ एच १ बी व्हिसा घेत आम्ही तिघंही कॅलिफोर्नियाला पोचलो... स्वप्नातल्या जागी. आमची चेन्नईची गॅंग आता सनिवेलात जमली. आता नवीन घरी रॉकेल स्टोव्हच्या जागी कुकिंग रेंज आली, पायी-गाडीच्या ऐवजी मोटारगाडी आली. व्हॅक्‍युम क्‍लिनर, डिशवॉशर आले. सगळ्या अद्ययावत सोयी होत्या. भांडी कोणी घासायची आणि घर कोणी झाडायचं हे वाद आता कमी व्हायचे. आता स्वीमिंग, टेनिस, हायकिंग, मूव्हीजला बराच वेळ मिळायला लागला. आमची मैत्री पण अजून दृढ झाली. खरंतर आमच्यात बरेच फरक... अगदी भाषेपासून ते खाण्याच्या सवयीपर्यंत. पण एक धागा आम्हाला धरून होता- स्वप्नांच्या क्षणी एकमेकांकडून मिळालेल्या साथीचा आणि त्यातून निर्माण झालेल्या स्नेहाचा, आठवणींचा.

काळ बदलत होता.
"तुम्हाला गव्हर्न्मेंट कॉलेजमधून शिकून यूएसला नोकरी करताना लाज कशी वाटत नाही?" असा युक्तिवाद करणारे "जीवलग' स्वतःचा बायोडाटा देऊन यूएसमध्ये नोकरी शोध म्हणायला लागले होते. इकडे मंडळी फटाफट लग्नाचे बार उडवून आमचं अपार्टमेंट रिकामं करत होती. मलासुद्धा अमेरिकेतल्या एकटं जगण्याचा कंटाळा आला होता. आपलंस, ज्याच्याकरिता ऑफिसमधून घरी जायची ओढ लागेल असं कोणीतरी मलाही हवं होतं. शेवटी मी खडा टाकला.

आई, मी "स्पेसिफिकेशन्स' पाठवतो तश्‍शी बायको शोधून दे. माझी स्पेसिफिकेशन्स पण काय हो... टिपिकल... सुंदर, सोज्वळ, सुशिक्षित, मनमिळाऊ, लांब केस... वगैरे. डॉक्‍टर आणि त्यात आर्टिस्टिक असेल तर काय... सोने पे सुहागा आणि कमाल म्हणजे मिळाली... अगदी हवी तश्‍शी... आणि त्यात मुंबईकरीण... डॅशिंग. म्हणजे मी अभिमानानं म्हणतोय हो. उगाच गैरसमजुती नकोयत.

संसार सनिवेलात सुखात सुरू झाला. एकमेका साह्य करू दोघे करू "मार्स्टस' धर्तीवर, सौ आणि मी एमएस आणि एमबीए केलं. दोघांची शिक्षण संपली आणि तोवर आम्ही "हम दो हमारे दो' झालो होतो.

एव्हाना नोकरीत स्थैर्य आलं, कॉन्फिडन्स आला, जिवाची अमेरिका करून घेतली, चार गाड्या बदलल्या, सॉफ्टवेअरमधून बिझनेस मॅनेजर म्हणून उडी घेतली. सौं'नी सक्‍सेसफुल योगा बिझनेस सुरू केला. छान हवा, पाणी, निसर्गरम्य देखावे, जगभरातले क्‍युझइन्स, मुलांसाठी बेस्ट शाळा, खूप जीवलग मित्र, मोठाल्ले पब्लिक पार्क्‍स, पब्लिक लायब्ररीज, झक्कास जॉब, दिमतीला वर्ल्डक्‍लास गाड्या... सगळं छान होतं. नथिंग टू कम्प्लेन अबाऊट. बट...

इंडियन ड्रीम

हे सगळं असतानादेखील काही तरी मिसिंग आहे, असं सारखं वाटायचं. आपलं शब्दकोडं सुटलं नाही की चुकचुकल्यासारखं वाटत राहतं ना तसंच काहीसं. खरं तर आयुष्याच्या कोड्याची बरीच उत्तरं सापडलेली होती. बायको, मुलं, घर, नोकरी, स्टॅबिलिटी, मॅच्युरिटी, कॉन्फिडन्स वगैरे. पण मन मात्र भारतातच राहिलं होतं.

दर वेळी भारतात गेलो, की वाटायचं, की परत येऊच नये. खरं तर सिलिकॉन व्हॅलीत राहणं म्हणजे स्वच्छ सुंदर पुण्यात राहण्यासारखंच आहे. पण एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहूनदेखील जशी 'घरी' जायची ओढ लागते ना तसं वाटायचं. भारतातील धूळ, गर्दी, अस्वच्छता, ध्वनिप्रदूषण हे जाणवायचं. पण इथं खूप आपलेपण, आपुलकी, प्रेम, जिव्हाळादेखील जाणवायचा.

अमेरिकेत माणसं दिसायची खोटी! सगळीकडे गाड्या पाहून जीव उबायचा - छोट्या, मोठ्या, स्वस्त, महाग, जॅपनीज, जर्मन, हम्मर, हायब्रीड. कोणाला भेटायचं म्हणजे अपॉइंटमेंट घेणं आलं. तसा मी काही फार लोकंवेडा आहे अशातला प्रकार नाहीये; पण आपल्या 'स्पीसीज' मध्ये राहायला आवडतं. कार्सच्या इंडिव्हिज्युअलिस्टिक कृत्रिम जगात विचित्र वाटायचं. इथून आई-बाबा "तुमचं करिअर सांभाळा, आमच्याकरता कॉम्परमाईज करून भारतात येऊ नका" असा प्रेमापोटी (पण माझ्या दृष्टीने रुक्ष) सल्ला द्यायचे. तसं करिअरचं म्हणाल तर आम्हा दोघांना भारतातही जबरी स्कोप आहे. "आफ्टर ऑल वुई आर द सेकंड फास्टेस्ट ग्रोईंग नेशन इन द वर्ल्ड!' एक महासत्ता बनण्याच्या मार्गावर.

मी परदेशी गेलो तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आता आम्हा परतणाऱ्या भारतियांवर ऑपॉर्च्युनिस्ट हा शिक्का मारणं सोपं आहे. मात्र, परदेशस्थ भारतीयांनीही भारताच्या प्रगतीला फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि क्रॉस पॉलिनेशन ऑफ आयडियाजतून हातभार लावलेला आहे, ही विचाराची बाब आहे.

मार्च २००८ - आम्ही अमेरिका सोडली

शेवटी आम्ही ठरवलं - फॉलो द हार्ट. भारतात परतायलाच हवं. नाऊ ऑर नेव्हर. जोवर मुलं लहान आहेत तोवर ते शक्‍य होतं. मोठी झाली, की त्यांची ओपिनियन्स फर्म होतात, अमेरिकन कम्फर्ट झोनमध्ये जातात. पालकांना धमकावतात, की अमेरिकेतच राहायचंय आणि नंतर रुखरुख लागून राहते, की लवकर जायला हवं होतं. (मित्रांच्या अनुभवाचे बोल). डोकं अमेरिकेत, तर हृदय भारतात अशा त्रिशंकू राहण्याचा पण कंटाळा आला होता. तर फायनल एका वर्षाचं प्लॅनिंग आणि एका दशकानंतर मार्च २००८ ला परतलो. फॉर गुड.

आम्ही अमेरिकेतलं समृद्ध आयुष्य सोडून काय मिळवलं...

दोन महिने भारतात रुळल्यावर मुलांनी परवा चक्क मराठीत माझ्याशी बोलायला सुरवात केली आणि मला चक्कर आली. संस्कृत श्‍लोक म्हणून दाखवले तेव्हा भरून आलं. खरं तर मी जसा मराठी "ओन्ली' शाळेत शिकलो तसंच माझ्या मुलांनीही शिकलं पाहिजे अशा मताचा मी नाहीये. त्यांनी 'वर्ल्ड सिटिझन' व्हायला हवं आणि 'सुसंस्कृत' होण्याकरिता संस्कृत श्‍लोकच म्हटले पाहिजेत या विचारांचा तर अजिबात नाहीये. पण आपण ज्या भाषेत, ज्या लोकांत, ज्या विचारात, ज्या वातावरणात वाढलो तेच अनुभव जर मुलांना मिळाले तर छान वाटतं. हा आमच्या 'कम्फर्ट'चा प्रश्‍न आहे. इतर एनआरआयइजला असाच अनुभव यायला हवा, असा हट्ट तर मुळीच नाही. जर कोणी म्हटलं, "आम्हाला काही परत जायचं नाहीये भारतात" तर वुई कम्प्लिटली अंडरस्टॅंड देअर पर्स्पेक्‍टिव्ह.

मुलं मात्र खूप खूष आहेत. नातेवाइकांत राहून, खूप मित्रांमध्ये खेळून आणि आजी-आजोबांच्या अटेन्शनमध्ये ती 'ऐष' करतायत. त्यांना घरबसल्या आजी-आजोबा मिळाले आहेत आणि आई-बाबांना नातवंडं. घर आता भरून गेलंय. आणि त्यात हापूसचे आंबे, मॉन्सूनचा पाऊस, सिंहगडावर हाईक आणि नंतर झुणका-भाकरी, घरकामाला मदतीचा हात, बादशाहीचं जेवण (हो मला आवडतं!) पहिल्या पावसानंतरचा आपलासा वाटणारा सुवास, भाजी बाजारात जाऊन भाव करण्याची इच्छापूर्ती (सौंची, माझी नव्हे.) हे सगळं अमूल्य. प्राईसलेस.

कळत-नकळत मन मात्र तुलना करत असतं. "मै और मेरी तनहाई, अक्‍सर ये बातें करते है, यूएस मे होता तो कैसा होता?". सिग्नल बंद पडला तरीही चौक 'तुंबले' नाहीत आणि ग्रीन सिग्नल पडताच मागून हॉर्न देऊन उगाच 'हॉर्नी'पणा केला नाही, तर काय मजा येईल राव! परवा दत्तवाडीतून जाताना दुमजली इमारतीएवढ्या लाऊडस्पीकरने मी उडालो... लिटरली!
नुकताच आरटीओत एजंट न वापरता जायचा हौशी उपक्रम केला. माझ्या इंडियन लायसेन्सवरील पत्ता बदलायचा किरकोळ हट्ट होता. तीन फॉर्म्स, चार तास, पाच खिडक्‍या आणि शिव्यांची लाखोली वाहत रिकाम्या हाताने परतलो. त्यात मी विसरलेलो, की सौपण सोबत होती. "तुझा भारतात परतल्यापासून तोंडावरचा ताबा सुटलाय. जरा शिव्या कमी कर'' हा सल्लाही मिळाला. नशिबाने मुलगा सोबत नव्हता नाहीतर त्याने "व्हॉट डिड बाबा से आईऽऽऽ?'' असा सवाल करून मला प्रॉब्लेममध्ये टाकलं असतं. शेवटी सौने माझा वीक पॉइंट... उसाचा रस... बिगर बरफ, प्यायला घालून माझं डोकं आणि पोट थंड केलं.

अमेरिकेत पर्सनल लायबिलिटी, प्रॉपर्टी राइटस, राइट टू इन्फॉर्मेशन, लॅक ऑफ करप्शन (किमान सामान्य माणसाकरता तरी), वक्तशीरपणा, स्वच्छता आणि पॅडस्ट्रियअन राइट ऑफ वे (पादचाऱ्यांना आधी रस्ता द्या) याची इतकी सवय झालीय की खरं सांगतो त्याची पदोपदी आठवण होते. रस्त्यावरून चालताना तर अगदी... 'पदो...पदी.'

मी आणि सौ प्रत्येक आल्या दिवशी ऍडजस्ट होतोय. इथली माणुसकी, आपलेपण, गोडवा, जिव्हाळा यांनी बहरतोय, तर इतर काही गोष्टींनी कोमेजतोय. "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है" हा शाहरुखचा बोध मला पटलाय. पण आता एनआरआयचा मुखवटा उतरवून, नॉर्मल वावरायचं आहे. 'आपल्याकरता', 'आपल्यांकरता' जगायचं आहे. नाटकं पाहायची आहेत, सामाजिक कामात भाग घ्यायचा आहे. आई- बाबांसोबत राहायचं आहे, टोटल बीस साल बाद! परवा आम्ही हाताने आधार देत बाबांना पर्वतीवर घेऊन गेलो तर काय खूष होते. अपार्टमेंटच्या वॉकिंग ट्रॅकला प्रदक्षिणा मारायचा कंटाळा येतो म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताजेपणा पाहून आम्हाला अमेरिकी आठवणींचा विसर पडला. थोडा हारकर भी हमने बहोत कुछ पाया था.

म्हणतात ना, "इरादे नेक हो तो सपने भी साकार होते है..." आमचं पण स्वदेशपरतीचं स्वप्न हळूहळू साकारतंय. तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.

*** सध्या अमेरिकि-नोकरीतुन भारतात बदलीच्या ट्रान्झिशनमध्ये आहे. So far, so good. भारतात नोकरीच्या अनुभवावर स्वतंत्र लेख लिहायचा बेत आहे. Coming soon in theaters near you***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, बारावी किंवा high school पर्यंत फी मध्ये काहिही फरक नसतो .. पण नंतर वेगळी फी असते, ती NRI करता .. जर OCI घेऊन तिकडेच रहात असली मुलं तर NRI कशी काय? OCI किंवा dual citizenship चा उद्देश काय राहिला मग?

जाणकार काही माहिती देऊ शकतील का ह्यावर?

सुप्रिया, लिंक बद्दल धन्यवाद ..

Police registration ची गरज नाही १८० दिवसांपेक्षा जास्त रहाण्याच्या मुदतीकरता, एव्हढा एकच फायदा दिसतोय त्या OCI चा ..

पण अजून एक मुद्दा ध्यानात घ्यायला हरकत नाही ते म्हणजे, मुलांना आता भारतीय नागरीकत्व द्यायचं .. ती १८ वर्षांची झाल्यावर त्यांच्या इच्छेप्रमाणे US नागरीकत्व claim करू शकतात असं ऐकलं होतं .. तर हाही एक पर्याय असेल का?

सुरेख लेख. लेख इथे दिल्यापासुन प्रतिसाद द्यायचा होता पण त्याआधी परत एकदा निवांत लेख वाचायचा होता. तो आज वाचला.
.
वुई कम्प्लिटली अंडरस्टॅंड देअर पर्स्पेक्‍टिव्ह >>> हे अगदी योग्य. काही दिवसांपुर्वी आमचा भारतात परत जायचा विचार बोलुन दाखवला तर माझ्या मैत्रिणीचा नवरा तुच्छतेने म्हणाला, "but why do u guys want to go back ?". मैत्रिणीचा नवरा म्हणुन तेव्हा काही बोलले नाही. पण त्याचा रागही आला आणि वाईटही वाटले. आपल्याच देशाविषयी इतके तुच्छ का वाटते ?
.
माझ्या ओळखीत गेल्या वर्षीच एक जोडपे पुण्याला परत गेले. त्यातल्या नवर्‍याला अगदी तुमच्यासारखे अनुभव येत आहेत. बायको ABCD असल्यामुळे तीचे प्रश्न थोडे वेगळे आहेत (जसे तीचा american accent कामवाल्या बाईला कळायचा नाही ;)). पण तरी सुद्धा तक्रार फारशी करत नाही. दोघेही भारतात जाऊन काय मिळते आहे ह्याचा हिशेब जास्त ठेवत आहेत. bonus म्हणुन ह्या माझ्या मैत्रिणीच्या सासुबाई त्यांचा स्वैपाकी कायमचा तीच्या घरी पाठवणार आहेत Wink आणि तीने केलेल्या reporting मुळे तीचे आई-बाबा पण ३०-३५ वर्षांनंतर भारतात परत जायचे म्हणत आहेत.

आमचाही एक मित्र गेल्या वर्षी परत गेलाय सिंगापूरहून. खूष आहेत ते आणि मुलगा. मुंबईतल्या सगळ्यात चांगल्या शाळेत मुलगा जातोय. अभ्यासात, खेळात हुषर आहेच. त्यामुळे त्याला फायदा होईल हे नक्कीच. आणखी एका मित्राची फॅमिली ह्या वर्षी परत गेलीय मुंबईला. आणि एकाची लवकरच जाऊ घातलीये. त्यांच्याकडूनही कळतीलच बाकी डिटेल्स.

भारतात परत गेलेल्या कुटुंबांकडुन जे ऐकले आहे त्यावरुन मला असे वाटते की मुलेच जास्त खूष असतात भारतात जाऊन. माझ्या मैत्रिणीच्या मुलीला प्ले डेट न घेता अपार्टमेंटमधल्या मुलांशी खेळायला जाता येते हेच खूप आवडले. शिवाय, फ्रेंडसचे आजी-आजोबा पण खाऊ देतात Happy अमेरिकेतले आजी-आजोबा पण देत असतील खाऊ तर माहिती नाही. पण बरेच लोक दुसर्‍याच्या मुलांना allergy वगैरे मुळे कचरतात असे पाहिले आहे.

तुम्ही जर स्वदेश परतिचा विचार करत असाल तर Return to India Forum http://www.r2iclubforums.com/forums/ जरूर बघा. तिथे अनेक शंका, कुशंका, अजुन न सुचलेल्या शंकांची उत्तर सापडतील.

सध्या तरी आम्हाला कोणीहि पासपोर्ट मागीतलेला नाहीये. फी जी सगळ्यांना असते तीच आहे. फी तुमच्या रेसिडंस वर असते. जर तुम्हि भारतात रहात असाल तर तुम्हाला सर्वसामान्य फी लागते.

आमच्या समोर एक उत्तम उदाहरण आहे ज्यात पालक आणी मुल १० वर्षांनपुर्वी परतले. मागल्या वर्षी मुलगा दहावि नंतर SAT देवुन अमेरिकेत ""उच्च" शिक्षणाकरता परतला. मला वाटत मुल भारतात लहानपणी वाढुन त्यांची भावनिक वाढ चांगलि होते आणी पुढिल शिक्षण अमेरिकेत (किंवा ईतर कुठे) घेवुन "Global Perspective" मिळतो. But there is a limit to which we as parents can influence. अमेरिकेतलीपण मुल Scolarships/Loans घेवुनच शिकतात.

भारतातही अलिकडे बरेच पगार आहेत अस ऍकल आहे. अमेरिके एवढच "नेट saving potential per month". १० वर्षानंतर काय होणार कोणाला माहीत. पण trends पहाता, सिंगापुर आणी भारत, दोनही देश 'affordable high class education (compared to world standards)' मध्ये आगेकुच करणार आहे अस वाटत आहे. आणि १० वर्षापुढला विचार करतांना अमेरिकेतल्या 'inflation adjusted' खर्चाचापण विचार केला पाहीजे.

इथे काय तिथे, अडचणी आणी अडथळे येणारच. मुलांना चांगल आणी वाईटातला फरक समजला, आणी योग्य संधी मीळाल्या की झाल. As long as they have their internal compass well built, they will find the north pole, from India or US.

माझे दोन आणे (my 2 cent!) Happy

लाख मोलाचे आहेत तुमचे दोन आणे! लेख एकदम मस्त आहे.
प्राजक्ता

छान लिहिलंय! आर्चने दिलेलं वाक्यच सगळं बोलून जातं! तुम्ही ज्या R2I च्या लिंक्स दिल्या आहेत त्याच मीही देणार होतो, मागे केड्याने कुठल्याश्या गूगल गृप्सच्या पण लिंक्स दिल्या होत्या.

<<<< 'Growth' opportunities are tremdendous. It demands a separate article by itself.
>>>> कधी लिहिताय मग? वाचायला जरुर आवडेल. Happy

मित्रांनो
मला एक व्यावहारिक सल्ला दिल्याशिवाय रहावत नाहीये.
ज्यांना कोणाला भारतात परत जावंस वाटतय त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आपलं ग्रीनकार्ड किंवा परदेशी नागरिकत्व, जे काय असेल ते, टिकवून ठेवा. त्याचा उपयोग मुलांच्या उच्च शिक्षणासाठी होईल. सर्वांनाच आपल्या मुलांच हित बघायचं असतं. त्या द्रुष्टीने मुलांच १० वी पर्यंतच शिक्षण भारतात करणं जास्त फायद्याच आहे. भरपूर समवयस्क मित्रमैत्रीणी आणि आजीआजोबांची लाड हे मानसिक वाढीला फार उत्तम. १० वी नंतर मात्र गाशा गुंडाळून परदेशी जा. भारतात फारच थोड्या ठिकाणी चांगलं शिक्षण मिळतं आणि तिथे प्रवेश मिळवण्यासाठी जीवघेण्या स्पर्धेला मुलांना सामोरं जावं लागतं. ते परदेशात तितकं अवघड नाही.

सुदर्शन, खुप छान लेख. मुख्य म्हणजे मनाचा कौल ऐकुन तुम्ही परतला याचं सगळ्यात जास्त कौतुक.. अन्यथा परतायचय, परतायचय म्हणत आमचे कित्येक मित्र प्रत्यक्षात काही परतत नाही. त्याना हा लेख पाठवणार आहे... There is always a come back to our own country...

मला आधीचे काही माहीत नाही. आता शाळेत जन्माचा दाखला मागीतला जातो. आपण भारतीय नागरीक नसतानाही जन्मभर जरी भारतात राहिलो तरी आपण एन आर आय च असतो (सरकार साठी).

नमस्कार,

मला वाटते कि मी लिहिले त्यावरुन मी शंका कुशंका काढतोय असा गैरसमज झाला आहे. आम्ही २००९ मधे परत जाणार आहोत. आणि ही सगळी माहिती जमवणे मी २००७ पासुन सुरु केले आहे.

जर आपण कुठे राहतो यावर शाळांची फी असेल तर अति उत्तम. आम्हाला इतरा एवढेच फी भरताना आनंदच होइल्.(फक्त ही जनरल पॉलिसी असावी नजर्चुकीने झालेले असु नये एवढेच.)

शाळांची फी एकवेळ ठीक आहे. पण मी जे काल्कुलेशन लिहिले आहे त्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. (काल नुकतीच इसकाळ किंवा मटा मधे बातमी वाचली पुण्याच्या कुठल्याशा मेडीकल कॉलेजने फी २ लाख ची ४ लाख केली वर्शाला.) त्यात मी डोनेशन चा उल्लेखही केला नाही आहे कारण ते झेपणे अशक्यच वाटते.

माझा एक मित्राचा मुलगा इथे कॉलेज साठी रटगर्स न्यु जर्सी मधे जायचा विचार करत आहे. त्याने सान्गितले की त्याला वर्शाला खर्च २०००० डॉलर्स आहे , १५ वर्शानंतर महागाई आड्जुस्तेड किमान ५००००?

वरील सर्व सांगन्याचा उद्देश गैरसमज पसरवायचा नसुन मला असलेली माहिती शेअर करणे हा आहे (त्यात काही चुक असेल किंवा माझा स्वतःचा गैरसमज झाला असेल आणि कोणी दुरुस्त करणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे.)

मला स्वतःला दोन मुले आहेत आणि ती १५ वर्षानंतर कॉलेजसाठी जातील तेव्हा काय आर्थिक तयारी करावी लागेल यासाठी माझा हा हिशोब सुरु आहे. भारतात काय किंवा अमेरिकेत काय खर्च हा लागेलच फक्त आताच जागे झाले तर त्याची तरतुद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील इतकेच्.

(मुलाना भारतीय नागरीकत्व देउल १८ व्या वर्शी परत अमेरिकन नागरीकत्व देण्याचा विचार माझ्या तोंडातले वाक्य सम्पल्या सम्पल्या पत्नीने झटकउन टाकला)

परत जाण्याचा निर्णय घेण्यापुर्वी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा एवढेच माझे सांगणे आहे. जर माझ्या लिहिण्याने कोणी दुखावले गेले असाल तर क्षमस्व..माझा तो हेतु कधीच नव्हता.

तुम्ही हे तुमचे calculations ईथे देउन योग्यचं केले.

शाळेत NRI मुलांना बाकी मुलाएवढीचं फी भरावी लागते. वर कोणीतरी हा उल्लेख केलेला आहे.शिवाय माझ्या मैत्रीणीनेही असेचं सांगितले आहे.:)

आपली शंका रास्त आहे.

खुप मित्र आणि दोन महिन्यापुर्वीच्या स्वअनुभवावरुन असं दिसतय की फी मध्ये दहावि पर्येंत तरी फरक नसतो (परदेशिचा जन्मदाखला दाखवुनहि).
काहि शाळांनी सांगितल कि जर पालक परदेशि राहुन जर मुलं भारतात शिकणार असतिल तर जास्त फी लागेल. (ऐसा भी होता है ! पण माहीतीतल कोणि नाहीये)
पुढलं काय ते जाणकारांकडुन माहिति काढावि लागेल.
सद्यपरिस्थिती लक्षात घेता, उच्च शिक्षण महाग होणार वाटत आहे. जास्तित जास्त फी assume करुन आत्ता पासुनच गुंतवणुक केलेलि बरी. त्याचा उपयोग दहा-पंधरावर्षांनंतर त्यावेळ्च्या परिस्थितिनुसार करता येईल.

लक्षात आणुन दिल्या बद्दल आभार.

माझी मुलगी इथे ज्युनिअर कालेजात जाते, तिथेतरी मला ५ पट फी भरावी लागलेली नाही (कालेज खाजगी आहे) आणि मुलगा अमेरिकन सिटिझन असुनही भारतीय विद्याभवन सारख्या शाळेत मला प्रवेशाला काहीही त्रास झाला नाही आणि त्यांची फी फक्त वर्षाला ८,०००/- आहे. मी गेली ८ वर्ष भारतात सुखासमाधानाने राहते आहे. मधुनच तिकडुन इकडे आल्यामुळे माझ्या मुलांच नुकसान किंवा त्याना फार त्रास झाला नाही, तो मोठ्याना होतो कारण आपल्या अपेक्षा खूप असतात किंवा वयानुसार आपण थोडे रिजिड झालेले असतो. मी अगदी अभिमानाने सांगु शकते की या वर्षी माझ्या मुलीने ९३.२% सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेत मिळवले. त्यामुळे परत येणार्‍यानो निर्धास्तपणे या, आपले स्वागत आहे!

५ पट फी फक्त उच्च शिक्षण म्हणजे अभियांत्रिकी, वैद्यकीय मधे लागते.
१२ वी पर्यंत लागत नाही.
(चला १२ वी पर्यंत ठीक आहे म्हणजे:)
आणि त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे एन आर आय मुलांच्या जागा राखीव असतात आणि त्याना सी ई टी द्यावी लागत नाही. १२ वी च्या मार्कावर प्रवेश मिळतो.
(हे १५ वर्षानी बदलले तर माहीत नाहि)

एक स्वप्न बघितलेल,
एक स्वप्न जिद्दीने साकारलेल, अनुभवलेल
अन त्या एका स्वप्नातुन बाहेर पडल्यावर जाणवलेले अजुन एका नव्या स्वप्नातील विश्व

अतिशय सुन्दर माहितीपुर्ण लिखाण Happy ग्रेट!
बाकी मनस्मी वगैरेन्ना पडलेले प्रश्ण देखिल डोळ्यात अन्जन घालणारे
अशासाठी की, वर वर पहाता डॉलर रुपयाच्या हिशेबात, परत आलेले एनाआराय म्हणजे बरच मोठ डबोल, जस काही सात पिढ्या बसून खातील वगैरे वाटणे म्हणजे काही खर नाही, शेवटी जावे त्याच्या वन्शा, तेव्हाच कळे
अर्थात फियान्चा प्रश्ण देशी लोकान्ना देखिल हे, कम्बरडे मोडणारा, इतका की बर झाल, लिम्बोटल्याला जास्त मार्क पडले नाहीत असे म्हणुन नि:श्वास सोडायला लावणारा,... पण तो वेगळा विषय!
तोच प्रश्ण परत आलेल्यान्ना देखिल पडू शकतो हे वास्तव! Happy
एनिवे,
सुन्दर लेख!
आता वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे आजवरचे तिकडचे इतरही बारीकसारीक अनुभव जरुर शब्दबद्ध होऊद्यात! तेवढेच आम्हालाही (अस कुठे जाऊ न शकलेल्यान्ना) कळेल की वास्तव काय अस्ते ते! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

दोन स्वप्नं पाहिलीत आणि दोन्ही पुर्ण करण्यात यशस्वी ठरलात. Happy
अभिनंदन.
लेख तर उत्तम जमलेलाच आहे.

.............................................................
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband! Sad Proud

परत आलेले एनाआराय म्हणजे बरच मोठ डबोल, जस काही सात पिढ्या बसून खातील वगैरे वाटणे म्हणजे काही खर नाही, शेवटी जावे त्याच्या वन्शा, तेव्हाच कळे
----------------------------------------------
जरा समजवा हो त्या शिक्षण सम्राटाना:)

अभिश्रुती, तुझ्या मुलीच आणि त्याबरोबर तुझही अभिनंदन. मुलं पूर्णपणे रुळण्यात आणि यश्स्वी होण्यामागे आइइवडिलांचे प्रयत्न आणि कष्ट असतातच.

हे पोस्ट इथे योग्य नसेलही.

सुदर्शन, लेख अतिशय सुंदर आहे.. फार समर्पक. वैभवीची इथे पण मदत झालेली दिसतेयः) तुम्ही पुण्याला कायमचे जाताय ऐकल्यावर अनुला माझा पहिला प्रश्ण हाच होता.. कि बरेच वर्ष आहेत ना ते इथे मग भारतात कस काय जमेल राहायला.. ?? पण एकुण तुम्ही छान रुळलायत अस दिसताय..
तु जो 'काहीतरी मिस करण्याचा मुद्दा मांडला आहेस ना' तो सगळ्या जास्त पटला.

सुडो, लेख पून्हा एकदा वाचला.. खूप छान. आम्ही पण परत जाणार आहे म्हणून अजूनच नीट वाचला. मला भिती फक्त अर्ध्या-अर्ध्या मार्कासाठी चालणार्‍या स्पर्धेची (ज्यात मी मुलीला जितके जमेल तितके ढकलणार नाही हे आधीच ठरवले आहे.. माझी एक मैत्रीण म्हणाली.. अगं जाऊन काय फायदा, मुले तर एम्.एस. करायला परत इथेच येणार. त्यावर मी काही बोलले नाही कारण मी एवढा विचार केला नाही बुवा.. मुले किती हुशार निघतील, त्यांना काय करावेसे वाटेल ते १५ वर्ष आधी मला तरी सांगता येत नाही. ) आणि सरकारी कामाला लागणार्‍या वेळाची वाटतेय. पण ते काही फार वेळा करावे लागणार नसेल त्या मुळे तयारी आहे.
मनस्मी, तुम्ही गोळ केलेली माहिती तुमची हरकत नसेल तर कधीतरी ईमेल वरून विचारू शकते का? बाकी उच्च शिक्षणासाठी लागणारा खर्च तुम्ही जो सांगितलात त्याचा विचार करावाच लागेल. आणि ते १८ पर्यंतचे नागरीकत्वाबद्दल अजून कोणाला माहीत असेल तरी सांगावे.

सर्व जाणारे हे 'संधी' साठी जात नाहीत (काहींना घालवले जाते... आता कुठला गुन्हा केला? हा प्रश्न नको यायला). मी पण परत जायचा केवळ 'विचार'(च) करतोय, अमलात आणायचे धाडस कमी पडते. माझ्या या गावाला 'आम्ही या किंवा पुढल्या वर्षी तर नक्कीच भारतात परतणार, येथे रहायचे तर नाहीच आहे '... हा जप गेली पस्तिस वर्ष जपणारे महाभाग आहेत.

परत आलेले एनाआराय म्हणजे बरच मोठ डबोल, जस काही सात पिढ्या बसून खातील
---- साताचे सोडा... ह्या (म्हणजे एका) जरी पिढीला भरवता आले तरी खुप मिळवली. सात पिढ्यांचा विचार फक्त दुर-दर्शी पुढारीच करु शकता.

सुनिधी,

मला वाटते आपण मुलांसाठी तरतुद करुन करुन ठेवायची. नाही निघाली तेवढी हुशार तर ते त्यांच्या लग्नात आंदण म्हणुन द्यायचे:)

तुम्हाला हवी असलेली माहिती मेल द्वारे विचारु शकता. मला माहित असेल तेवढी मी जरुर शेअर करेन.

तुमचे अभिनंदन ! फारच गट्स लागतात असे निर्णय घ्यायला .... !

सुदर्शन, मी पण इथे येऊन आता आठ वर्ष होत आली, आम्हीही मस्त आनंदात आहोत. त्यामुळे आपले स्वागत आहे. तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल मी पुण्यातच राहते.
कोणीतरी ५ पट फी बद्दल काहीतरी वरती लिहिलय मला तरी तसा अद्याप अनुभव नाही माझी मुलगी नुकतीच अकरावीत गेली. मला कोणत्याही प्रकारचा असा अनुभव आला नाही. मुलगा पण अमेरिकन सिटिझन आहे तो प्राथमिक शाळेत शिकतो त्याच्याही प्रवेशाच्यावेळी कुठलाही वेगळा अनुभव नाही. भारतीय विद्या भवन, अभिनव सारख्या शाळेत वर्षाची फी ८,००० रु पर्यंतच असते आणि डे बोर्डिंग स्कूलचा खर्च ३० ते ४०,००० पर्यंत असतो. तुम्ही एनआराय असा अगर असु नका एव्हढा खर्च आहे. सरकारी महाविद्यालयात आजकाल कमीत कमी लोक स्वताच्या मर्जीने प्रवेश घेतात. अभ्यासाच्या बाबतीत मुलं तयार होतात. माझ्या मुलीचं प्राथमिक शिक्षण अमेरिकेत झाल असलं तरी ती इथे व्यवस्थित रुळली आणि मला अभिमानाने सांगावस वाटत की तिने सेंट्रल बोर्डच्या दहावीच्या परिक्षेत ९३.२% मार्क मिळवले आणि इंगलिश बरोबरच संस्कृत विषयातही ती हायेस्ट आली.
सांगायचं कारण घाबरण्यासारख काहीच नाही घर आपलच आहे, निर्धास्तपणे या.

या विषयावर एक स्वतंत्र चर्चा फलक सुरु करुयात का? बरेच झणांना (माझ्यासकट) फायदा होइल.

मनस्मि,

>>मुलाना भारतीय नागरीकत्व देउल १८ व्या वर्शी परत अमेरिकन नागरीकत्व देण्याचा विचार माझ्या तोंडातले वाक्य सम्पल्या सम्पल्या पत्नीने झटकउन टाकला>>>>

मला याच कारण नीटस कळल नाहि. याचा थोडा अजुन उहापोह करणार का?

http://indiaedunews.net/Maharashtra/Private_medical_students_to_bear_hig...

कृपया वरील लिन्क पहा (डिसेम्बर २००७ ची बातमी आहे).

नेमस्तक,
कृपया या विषयासाठी वेगळा बा फ तयार कराल का?(मला सुदर्शन चे पोस्ट हाय्जाक करायचे नाही..सुदर्शन क्षमस्व).

मर्‍हाट्मोळी,
तुमच्या प्रश्नाचे दुसर्‍या पोस्ट मधे उत्तर देतो.

मर्‍हाट्मोळी,

http://groups.msn.com/R2IClub/liaissues.msnw?action=get_message&ID_Messa...
(या पोस्ट मधील मेसेज २७ पहा).

या सगळ्यात फार सव्य अपसव्य करावे लागेल आणि भारतीय वकिलातीचा आणि सावळ्या गोंधळाचा ओ सी आय मधे अनुभव घेतल्यामुळे आम्ही एन आर आय स्टेटस ठेवणे पसंत केले आहे.

भारतात गेल्यानंतर पुढील विचार करु असे सध्या तरी ठरवले आहे.

नेमस्तक,
कृपया माझ्या आजच्या पोस्ट नवीन बा फ वर हलवाल का?

आगाउ धन्यवाद.

Pages