पाऊलवाट - आदित्य इंगळे - " फक्त सव्वा दोन तास !"

Submitted by माध्यम_प्रायोजक on 17 November, 2011 - 23:13

AI1.JPGप्रिय प्रेक्षक ,

सप्रेम नमस्कार .

पाऊलवाटच्या संपूर्ण टीमची आपणां सर्वांसोबत ओळख करून दिल्याबद्दल सर्वप्रथम मायबोलीचे अनंत आभार. परंतू केवळ आभार मानणे हा ह्या पत्राचा हेतू नसून आपल्यात निर्माण झालेला जिव्हाळा अधोरेखित करण्यासाठी हा प्रपंच .

इकडे सगळं आलबेल आहे. वरकरणी आलबेल म्हणूया फारतर. प्रिमियरची तयारी धूमधडाक्यात सुरू आहे. निमंत्रणं गेली आहेत. रांगोळी , सनई , रेड कार्पेट , नंतरच्या पार्टीची तयारी .. सगळंच आलबेल. प्रश्न फक्त मधल्या सव्वा दोन तासांचा आहे.त्यासाठीची तयारी तर दिड वर्षापासून केली म्हणा ना किंवा अं.. त्याआधीचीही दहा वीस वर्षं ? अगदी नक्की सांगायचं झालं तर निलायम टॉकीजच्या दारात "दीवार"ची पोस्टर्स पाहताना चौथीतल्या एका मुलाला दिग्दर्शक व्हावसं वाटलं तेव्हापासून ! असो. तर प्रश्न त्या सव्वा दोन तासांचा आहे.

त्या सव्वा दोन तासात जेव्हा मी तुमची ओळख अक्का , अनंत देव , उस्मान , बाब्या , नेने , रेवती अशा अनेको मित्रांशी करून देईन तेव्हा माझ्याबद्दल वेगळं सांगायला वेळ उरणार नाही . वेळ नव्हे गरजच उरणार नाही बहुतेक. हे सर्व लोक तुम्हाला जेव्हा जेव्हा ,जसे जसे भेटतील तेव्हा तेव्हा , तसा तसा मी उलगडत जाणार आहे. जायला हवा. अक्कांचं सहजी न दिसणारं हळवेपण माझ्यात आहे का , अनंत देव ज्या आशा निराशेच्या झुल्यावर झुलतो त्यावर मी बसलो होतो का , उस्मानचं कलेप्रती असलेलं समर्पण माझ्यात उतरलं होतं का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं न बोलता देण्याचा प्रयत्न करणार आहे मी ... त्या सव्वा दोन तासांत.

आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत त्या ७० एम एम स्वप्नामार्फत. कॅमेरामन पुष्पांकने माझ्या स्वप्नांत कसे रंग भरले हे सांगायचं आहे. जागेपणी मला ते स्वप्न पाहता यावं म्हणून न मागता चहा पुरवणा-या मुलांपासून ते क्षणभर डोळा लागलाच तरीही तेच स्वप्न पडावं म्हणून प्रयत्न करणा-या प्रत्येकाशी असलेल्या ऋणानुबंधाबद्दल सांगायचं आहे ... न बोलता . दिवेआगरला जिथे नरेंद्रने सर्व चाली ऐकवल्या ती जागा , ते क्षण दाखवायचे आहेत .. पडद्याविना. पोलिस हटकत असताना रात्र रात्र रस्त्यावर उभे राहून वैभवशी केलेली चर्चा ऐकवायची आहे.. माईक आणि स्पीकर शिवाय.

त्या सव्वा दोन तासांतच डोळ्यांत साठवलेली लोकेशन्स , आशाताईंचा चेहरा , हरीप्रसादजींचं आश्वासक हास्य (आणि त्यात लपलेला आशिर्वाद !)दाखवायचं आहे .. तुमच्या समोर न येता ! संदीप कुलकर्णीच्या बासरीने लागलेलं वेड कसं दाखवेन कोण जाणे . वेड,न पांघरता ,कसं दाखवतात? काही कल्पना?? असल्यास मला जरूर कळवा पण आज संध्याकाळच्या आत. कारण त्यानंतर ते सव्वा दोन तास सुरू होतील आणि माझ्यातरी हातात काही उरणार नाही. दिग्दर्शक व्हायचं हे ठरवत मी बाहेर "पाऊलवाट" ची पोस्टर्स पहात उभा असणार आहे ... तुम्ही बाहेर येऊन मिठी मारेपर्यंत !

बाकी.. इकडे सगळं आलबेल आहे.

आपला

आदित्य इंगळे .

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम लिहिलंय!!!
फार फार फार आवडलं....
वैभवमुळे ओळख झालेला हा चित्रपट या वरच्या पत्रामुळे थेट तुमच्याशी जोडला गेलाय...

आता चित्रपटाची उत्सुकता अजून वाढली आहे.. नक्की पाहणार... Happy

कसलं सही लिहिलं आहे.......... तुमच्या ह्या लिखाणासाठी तरी हा सिनेमा बघायलाच हवा...... !!
शिवाय आमचा वैभव आहेच त्यात गुंतलेला Happy
तुमच्या अख्ख्या टींमला मनापासून शुभेच्छा !!

खुपच सुरेख मुलाखत.... Happy
पाऊलवाट ला भरघोस यश मिळेल याची खात्री आहे.. नक्की बघणार ...:)

आत्ताच पाहून आलो, पाउलवाट. एकदम सुरेख चित्रपट, मस्त गाणी आणि फ्रेम्स. कलाकारांची कामे तर सहीच झालीत. Happy

झक्कास!
"पत्र नव्हे मित्र.. " Happy असं काहितरी मनात आलं, वरील पत्र वाचून..

पाऊलवाट च्या सर्व टिम ला अनेक शुभेच्छा! ही पाऊलवाट व्यावहारीक याशाच्या देखिल मार्गाने जाऊ देत/जाईल अशीच प्रार्थना/शुभेच्छा. खेरीज या पाऊलवाटेशी संबंधीत सर्व मायबोलीकरांनाही यशस्वी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!

(सध्ध्या गेले दीड दोन महिने मायबोली शीर्षक गीताच्या पाऊलवाटेवर प्रवास चालू असल्याने मायबोलीवर यायला जमत नाहीये.. पण हे पत्र वाचून एकंदरीत पाऊलवाट विषयी अंदाज बांधता येतोय.. मस्त! ऊत्सुकता आहे चित्रपट बघायची. )

>> मी बाहेर "पाऊलवाट" ची पोस्टर्स पहात उभा असणार आहे ... तुम्ही बाहेर येऊन मिठी मारेपर्यंत !

बाकी.. इकडे सगळं आलबेल आहे.>> खुपच छान Happy सदीच्छा