पाऊलवाट - मधुरा वेलणकर

Submitted by माध्यम_प्रायोजक on 14 November, 2011 - 06:29

'पाऊलवाट - एक संगीतप्रधान चित्रपट' अशी ओळख आत्तापर्यंत सादर केलेल्या मुलाखतींमधून आपल्याला एव्हाना झालेली आहे. आपल्या अस्तित्वाच्या शोधात सांगलीहून मुंबईला आलेल्या गायकाचा संघर्ष या चित्रपटात दाखवलेला आहे. आपले स्वप्न साकारायची त्याची धडपड, त्या दरम्यान त्याला भेटत गेलेल्या व्यक्ती आणि त्यांचा संघर्ष या सर्वांची वास्तववादी कथा म्हणजे 'पाऊलवाट' हा चित्रपट.

या चित्रपटात नायकाच्या मैत्रिणीची भूमिका साकारणार्‍या मधुरा वेलणकरचं मनोगत खास मायबोलीकरांसाठी :

MV1.jpg

मी या चित्रपटात रेवतीची भूमिका करतेय. रेवती ही एक साधीसरळ, चाकोरीबद्ध पण ठाम विचारांची मुलगी. हा नायकप्रधान चित्रपट आहे, एका कलाकाराच्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासाचं चित्रण यात केलेलं आहे. रेवती ही नायकाची जवळची मैत्रीण; कदाचित त्यांच्यात पुढे काही घडेलही, पण त्या मैत्रीला चित्रपटात कोणत्याही व्याख्येत बसवलेलं नाही. चित्रपटाचं ते ध्येयच नाही. चित्रपटात रोमँटिक अँगल नाही, पण घट्ट मैत्री मात्र रंगवलेली आहे.

तसं बघायला गेलं तर माझा सुबोधबरोबरचा पाचवा चित्रपट, पण एकमेकांचे नायक - नायिका असलेला आमचा हा पहिलाच चित्रपट आहे. आधीच्या सर्व चित्रपटांत भाऊ, शेजारी असे रोल होते. आम्ही दोघेही एकमेकांना व्यवस्थित ओळखत असल्यामुळे एकत्र काम करताना आमच्यात सहजपणा असतो. बर्‍याच गोष्टी, रीअ‍ॅक्शन्स ह्या न सांगता समजतात, जाणवतात. मोकळेपणाने एकमेकांना काही सुचवलं जातं. खरंतर सगळेच तसे प्रोफेशनल असल्यामुळे एकमेकांना ओळखत नसले, तरी काम हे व्यवस्थित होतंच, पण मैत्री असली की वातावरण सहजसुंदर असते. एकूणच मराठी चित्रपटसृष्टीत एक टीम म्हणूनच प्रत्येक चित्रपटाकडे पाहिले जाते. टीमवर्क, आपलेपणा हे इथे जास्त आहे.

PA1.jpg

'पाऊलवाट'चा दिग्दर्शक आदित्य इंगळेबरोबर माझी गेली जवळपास दहा वर्षं मैत्री आहे. तो जेव्हाकेव्हा पहिला चित्रपट करेल, तेव्हा त्यात मी काम करणार हे आमचं आधीच ठरलेलं होतं. कधीकधी मैत्रीत आम्ही एकमेकांना अधूनमधून आठवण करून द्यायचो, पण ह्या चित्रपटात 'माझ्यासाठी' काहीतरी आहे, म्हणूनच त्याने ही रेवतीची व्यक्तीरेखा माझ्याकडे सोपवली असणार हे निश्चित. आदित्यला संपूर्ण चित्रपट, त्यातल्या प्रत्येक व्यक्तीरेखेसकट स्पष्टपणे उलगडलेला आहे. संपूर्ण सिनेमा कसा दिसणार हे त्याच्या डोळ्यांपुढे लख्ख उभं राहिलेलं आहे. सर्वसाधारणपणे पहिलाच सिनेमा असला की जो नवखेपणा जाणवतो, तो त्याच्या कामात दिसत नाही. कारण ’काय हवं आहे’ हे त्याला पक्कं ठाऊक आहे. तो अत्यंत बारकाईने काम करतो. सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे आणि ते त्याला उत्तम समजलं आहे.
आजकाल भावना लोप पावत आहेत. ह्या जमान्यात भावनांना प्राधान्य देऊन एक तरल विषय त्याने सगळ्यांसमोर आणला आहे.

आदित्यचा भाऊ, आनंद इंगळे हा सुद्धा या चित्रपटात आहे. आनंद एक उत्तम अभिनेता आहे. सध्या विनोदी मालिकांमुळे त्याच्याकडे ’विनोदी अभिनेता’ म्हणून बघितले जाते, पण तो सर्वच प्रकारच्या भूमिका उत्तम करतो. आदित्यपेक्षा तो जास्त बोलतो, इतकंच. तसंही अभिनेते हे नेहेमीच दिग्दर्शकापेक्षा जास्त बोलतात. आदित्य हा सिनेमातून बोलतो आणि आनंद सिनेमात बोलतो असं म्हणता येईल.

सुबोध भावे, आनंद इंगळे, किशोर कदम, हृषिकेश जोशी, ज्योती चांदेकर, आदित्य इंगळे, सर्व निर्माते, ही पाऊलवाटची आमची अख्खी टीम फारच मस्त होती. अलिबागला शूट होतं तेव्हा आम्ही खूप धमाल केली. सगळेच मराठी असल्यामुळे वातावरणात छान मोकळेपणा होता. एकमेकांतली हीच सहजता, आनंद एका उत्तम चित्रपटात परावर्तित झाले आहेत.

--

मुलाखत : पूनम छत्रे
शब्दांकन : मंजूडी

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळेच मराठी असल्यामुळे वातावरणात छान मोकळेपणा होता>> मराठी चित्रपटच आहे ना हा? बाकीच्या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी बा़किचे सगळे अमराठी असतात का? येक भो.भा.प्र.

छान! Happy

सांगलीहून मुंबईला आलेल्या गायकाचा संघर्ष

रॉक स्टार, चला मुरारी हिरो बनने, रंगीला, मै माधुरी दिक्षीत.... या पठडीतला चित्रपट वाटतो आहे.. शुभेच्छा.. गाणी चांगली असतील तर चालेल.. अन्यथा कथानक फारसे नवे नाही.