पाऊलवाट- वैभव जोशी- 'उडनछू!'- भाग २

Submitted by माध्यम_प्रायोजक on 11 November, 2011 - 01:41
.. उडनछू! (भाग दुसरा)

VJ.JPG
सिनेमामध्ये एका हिंदी गझलेचा अंतर्भाव केला आहे. त्याबद्दल काही सांग

सिनेमामध्ये एक पात्र आहे, उस्मान सारंगीवाला, ज्याची एक कॅन्सरग्रस्त बायको आहे, मुमताझ- जी पूर्वी हिंदी सिनेमांमध्ये नटी आणि गायिका दोन्ही असते आणि तिचं काही करियर घडत नाही म्हणून ती फ्रस्ट्रेट झालेली असते. सिनेमाचा नायक जेव्हा त्यांच्या घरी जातो तेव्हा त्याला उस्मानचा स्ट्रगल काय आहे तो कळतो. त्या पतिपत्नीमधलं कम्युनिकेशन किंवा त्यांची हिस्ट्री सांगण्यासाठी म्हणून एक गझल, वापरायची ठरली होती. मला आठवतं डिसक्शन्सच्या वेळीच मी एक गज़ल ऐकवली होती .
एक किनारेपर तुम हो और एक किनारेपर हम है
वक्त को बहता देख रहे हैं ये मंजर भी क्या कम है

पण आदित्यला अजून इन्टेन्स काहीतरी हवं होतं म्हणून

सुनसान गली में आया था गुमनामसा कोई सौदाई
इक ख्वाब खरीदा था हमने और मुफ़्त मिली थी तनहाई

घेतली गेली.ह्या गज़लचा एक किस्सा मला मायबोलीकरांशी शेअर करायला आवडेल. २००६ की ०७ साली मी मला गुरुस्थानी असलेल्या स्वाती आंबोळे यांच्याशी चॅट करायचो. तेव्हा बर्‍याचदा एकूणच कवितांविषयी चर्चा, वाद, भांडणं व्हायची. असंच एकदा तिने बोलताना "तू आशा भोसले आणि हरिहरनची सिडी ऐकली आहेस का?" असं विचारलं. म्हटलं, "नाही… कुठली?" तिने 'आबशार-ए-गज़ल' असं काहीसं नाव सांगितलं, आणि "त्यात अरे कंपोझिशन्स खूप चांगल्या आहेत आणि त्यातली एक कंपोझिशन तर सतत मी गुणगुणत असते.. पण त्यातले शब्द अजून चांगले असते तर बहार आली असती ." असंही म्हणाली. मी म्हटलं, मी शब्द लिहीतो. खरंतर तेव्हा मलाही चालीवर वगैरे लिहीण्याचा अनुभव नव्हता पण एक गंमत म्हणून तिच्याकडून चॅटवरच त्या गाण्याचं (लिखित) वजन , गाताना घेतलेले पॉझेस , साधारण कुठल्या रागात बांधलं आहे वगैरे जाणून घेतलं.

कुछ दूर हमारे सथ चलो हम दिल की कहानी कह देंगे - ही ती गज़ल .

चॅटवरच्या फीडबॅकवरून (आजवर) न ऐकलेल्या चालीवर त्या रात्री मी "सुनसान गलीमें" लिहीली. कवितेतल्या इतर बाबींप्रमाणे चालीवर गाणी लिहीण्याचं शिक्षणही एका अर्थी मला स्वातीकडूनच मिळालं असं म्हणायला हरकत नाही . २००७-०८ सालापासून ही गज़ल कार्यक्रमांमधून सादर करत होतो, लोकांचा खूप रिसपॉन्स यायचा. ती सीडी/सिनेमा मधे यायला २०११ उजाडलं. स्वतंत्र नशीब असतं प्रत्येक गाण्याचं .

गाण्यांमागची ही प्रोसेस खूप इंटेरेस्टिंग आहे. इतर गाण्यांबद्दल काय सांगशील?

आपण ’एक अनोळखी फूल’ आणि ’सुनसान गली में’बद्दल बोललो आहोतच. आधी बोलल्याप्रमाणे नरेंद्रने शक्यतो निराळ्या जॉनर्सची गाणी करु म्हटलं होत पण अदरवाईजसुध्दा कुठे ना कुठे ते तुमच्या मनात असतंच की फॉर्म बदलून बघू, म्हणजे कल्पनेपासून मीटरपर्यंत, लिहीतानाच जरा वेगळं काही करता येईल का जेणेकरून संगीतकाराला रीदममध्ये काही experimentation करता येईल. उदा.:- आपण अष्टाक्षरीमध्ये गाणं लिहीलं की त्याचा एक ताल , एक लय तयार होत जाते. म्हणजे वाचतानाच तुमच्या लक्षात येतं की हे कुठल्या रीदममध्ये जाईल, वेस्टर्न होऊ शकेल की इंडियन. आणि मग त्याच्यामध्ये experimentationला खूप तसा वाव उरत नाही. तेच जर तुम्ही अधेमधे तोडून कन्सेप्टवाइज जातानाच पण थोडंस सावध राहून नवीन मीटर्स गाण्यांमध्ये वापरले तर संगीतकाराला बर्‍यापैकी फ्री हँड मिळतो.

एक सिच्युएशन अशी होती की एका अनाथाश्रमात जेव्हा सुबोध भावे- अनंत देवचा पहिला performance होतो आणि स्वत:ला समाधान देणारं पहिलं गाणं तो गातो. ते perform करताना लहान मुलांसोबत गंमत म्हणून सुरु केलेल गाणं त्याला बरंच आत्मिक समाधान आणि पुढील आणखीन त्याचा जो काही स्ट्रगल आहे सिनेमामध्ये त्यासाठी त्याला उभारी मिळवून देणार ठरतं.

सुरुवात थोडीशी शांत होऊन नंतर ते गाणे अपबीट होत जात अशा पद्धतीचे visuals माझ्या डोळ्यासमोर किंवा साऊंड कानात तयार होत होता. लहान मुलांची इनव्हॉल्व्हमेन्ट आहे, अनाथ मुलांचा आणि महिलांचा आश्रम आहे. तिथे तो स्टेजवरती जातो खरंतर काही भाषण करायला. तेवढ्यात त्याला समोर दोन मुलं दिसतात अगदी कंटाळलेली अशी. ते एकमेकांशी दंगा करत असताना एका मुलाला लागतं असं आपण काहीतरी दाखवू- अशी थीम दिली गेली होती. त्याची आणि मग मुलांची इनव्हॉल्व्हमेन्ट सायलेंटली सुरु होऊन पुढे अपबीट होत जाणारं गाणं असं करता करता मी प्रथम पोचलो, ते त्या मुलांच्या मारामारीपर्यंत. तिथून ज्या मुलाला लागलेलं असतं त्याची समजूत घालताना सुबोध ऍडलिबमध्ये म्हणतो-

"अल्ला मंतर कोल्ला मंतर
चल मारु प्रेमाने फुंकरSS"

आपण प्रेमाने फुंकर मारली की सगळी दु:ख दूर होतात- ह्या अर्थाचं काहीतरी लिहायचं होतं, पण म्हणावं तसं काही जमत नव्हतं. मग अचानक टीव्हीवरती कुठलातरी मॅजीक शो बघत असताना 'उडन छू' शब्द असा कोणीतरी सुचवल्यासारखा येऊन बसला आणि त्याच्यानंतर गाणं मग फारच मजेशीर आणि धमाल होत गेलं. फार सुंदर केलयं नरेंद्रने. त्याचा टेंपो, रीदम, लहान मुलं- पडद्यावर पाहण्यात वेगळीच मजा आहे. त्यामुळे सिनेमातलं हे सुद्धा एक हायलाईट ठरू शकेल असं गाणं आम्हाला मिळून गेलं."वन टेक ओके" म्हणून एक रॉक गाणं आहे . सुबोधच्या स्ट्रगलच्या मोन्टाजेसवर वापरलेलं. टायटल स्क्रोलला "एक आभाळ हवे, एक आभाळ नवे" हे गाणं आहे. सुबोध-मधुरावर अमेझिंगली पिक्चराईज झालेलं "कधी हसत खेळत" हे गाणं आहे. सिनेमात नसलेलं, पण ऑडिओ सीडीमध्ये असलेलं "सुर के पंख लगाए दियो रे, मोरा बेडा पार कराए दियो रे" हे सुफ़ी गाणं आहे. तूफान व्हरायटी दिली आहे नरेंद्रने. कलेक्शन म्हणावा असा एक परिपूर्ण अल्बम तयार केला आहे.


नरेन्द्र आणि आदित्य ह्या दोघांच्या आणि तुझ्या ट्युनिंगबद्दल सांग

ट्युनिंग जमलंच तर दोन पध्दतीने जमतं (क्षणांत अथवा कालांतराने) आणि ते दोन व्यक्तींच्या स्वभावावरही अवलंबून असतं. माझं असं ऑब्झर्व्हेशन आहे की माझी कमालीचा एक्स्ट्रोव्हर्ट आणि पराकोटीचा इंट्रोव्हर्ट अशी स्प्लिट पर्सनॅलिटी आहे. (लोकांना कधी कधी ह्याचा खूप त्रासही होतो). ह्या टीमच्या बाबतीत सांगायचं तर नरेंद्र एकदम मस्तमौला आहे. कामाचं प्रेशर त्याच्या चेहर्‍यावर दिसत नाही. तो जाईल तिथे काम कॅरी करत नाही. आणि आदित्य डीप थिंकर आहे. त्याच्या कृतीमागचा विचारही त्याच्यासोबत हजर असतो. नेहेमीच्या हॉटेलमधे नेहमीची ऑर्डर प्लेस करायलाही खूप वेळ लागणार असा. नरेंद्रशी माझं ट्युनिंग आम्ही केलेल्या पहिल्या गाण्यापासून थेट जमलं. धमाल करत काम करणे, एकदम फ्लेक्सिबल ऍप्रोच, आधी शब्द मगच चाल असं गीतकाराला खास सुटेबल वातावरण. आदित्य विरामचिन्हांपासून ते स्क्रीनवर कविता कशी दिसेल इथपर्यंत विचार करून बोलणार. त्यामुळे माझ्या स्प्लिट पर्सनॅलिटीमधे दोघेही सहज मिसळून गेले. नरेंद्रसोबत कल्ला करता करता मी शेलमधे जायचो आणि शेलमधे आदित्यशी चर्चा करत करत पुन्हा नरेंद्रला येऊन भेटायचो असं काहीसं. अर्थात कामाचा सिरियसनेस आणि ग्रुप स्पिरिट मेन्टेन करण्यासाठी हे दोघेही आपल्यात बदल करू शकतातच. त्यामुळे आमची भन्नाट मैत्री आहे. "उडन छू", "वन टेक ओके" असलं काही लिहीतोय म्हटलं, की नरेंद्र दोन्ही हात पसरून त्याचं स्वागत करणार आणि आदित्य "लिही ना, झाल्यावर बघू " असं शांत उत्तर देणार. त्यामुळे नरेंद्रकडून हुरुप मिळायचा आणि आदित्यकडून सावधानतेचा इशारा. पाऊलवाटमध्ये मी जे काही लिहू शकलो आहे त्यात ह्या दोघांचा फार मोठा हातभार आहे. जनरली हे वाक्य म्हणायचं म्हणून म्हटलं जातं पण ह्या उत्तरात वर नमूद केलेले डिटेल्स पाहता ह्यातलं तथ्य दिसून येईल.

तू एक छोटीशी भूमिकाही केली आहेस. ती तुला कशी मिळाली आणि का करावीशी वाटली?

मी आणि आदित्य "बालगंधर्व" च्या मुहूर्ताला जात असताना आदित्यने प्रश्न टाकला की " एक काम करशील का?" मला हा आपण नेहेमी मित्रांना म्हणतो ना, "ए एक काम करशील का रे?" तसा प्रश्न वाटला. मी कार चालवत त्याच्याकडे न बघता म्हणालो, "आता काय?!" तर म्हणे एक रोल आहे छोटासा. "चल बे! छे! येड बिड लागलंय का?" वगैरे सगळे उपाय थकल्यानंतर म्हटलं "बोला! काय करायचंय?" तर तो रोल निघाला "वैभव जोशी" ह्या कवीच्या स्ट्रगलचा. आऊट ऑफ क्वश्चन. कारण सिनेमा म्हणून स्ट्रगल कितीही एक्स्ट्रापोलेट करून दाखवावा लागत असला तरीही (फक्त सिनेमाच नाही) एकूणच आपल्या समाजात "कवी" हे जे काही कॅरॅक्टर व्हिज्युअलाईज केलं जातं ना त्याबद्दल मला कमालीची चीड आहे. एक काळ असेल झब्बा आणि शबनमचा, मी नाही म्हणत नाही पण झब्बा तर पेंटर्सही घालायचे. काही कवीही असतील ज्यांनी कवींची इतकी प्रसिद्धीला भुकेली प्रतिमा बनण्याला हातभार लावला असेल. पण म्हणून सरसकट कट्ट्यांवरून, गुत्त्यांमधून खिल्ली उडवण्याचा हा विषय नव्हे. समोर जिवंत अथवा मृत माणूस दिसला की खिशातून कागद काढायचाच हे वागणं जितकं चूक तितकंच तो कागद समोर आलेल्या प्रत्येक कवीच्या खिशातून बाहेर येईलच हा समजदेखील हीन आहे. एक कला केवळ चिटोर्‍यावर मावते (तिला कॅनव्हास किंवा स्क्रीन किंवा म्युझिक सिस्टीम लागत नाही), केवळ पोर्टेबल आहे म्हणून तिची किती अवहेलना व्हावी ह्याला काही मर्यादा?? असो. तर तो रोल करणारच नाही असं एस्टॅब्लिश्ड स्टारप्रमाणे मी आदित्यला सांगून टाकलं.

VJ-scene.jpg

मग कविता जोखणारे अनेकदा किती अडाणी असतात हे दाखण्याची उत्तम संधी असलेला रोल मिळाला. वरकरणी मी सिनेमात वैभव नावाच्या कवीला हाडहूड करताना दिसलो तरीही त्यातून ह्या धंद्यात मालक होऊन बसलेल्यांचं 'अगाध ज्ञान' दाखवण्याची संधी मिळाली. "कोण गालिब? चांगलं लिहीत असेल तर घेऊन ये, त्यालाही काम देऊ." असं म्हणणारी ही जमात. छोटासाच रोल आहे , तोही आदित्यने करवून घेतला म्हणून होऊ शकला. (आणि एडिट झाला नाही म्हणून सिनेमात उरला) :) पण आता मीही म्हणू शकतो की "बाकी सगळं मायबाप ’प्रेक्षकाच्या’ (फक्त श्रोत्याच्या नव्हे) हाती " :)

(समाप्त)

टंकलेखन सहाय्य- स्वाती, अनीशा, फारेन्ड
मुलाखत- पूनम छत्रे
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झालीय मुलाखत. वैभवने खूपच मस्त मनमोकळेपणाने व्यक्त पण केले आहे. Happy

सुनसान गली में आया था गुमनामसा कोई सौदाई
इक ख्वाब खरीदा था हमने और मुफ़्त मिली थी तनहाई

हसत खेळत

शब्द झाले मायबाप.

>>> ही ३ गाणी मला आवडली. मस्त वाटत आहे एकदम.

'सुनसान गलीं में'ची कथा अगदी मायबोली स्पेशल... खूप छान वाटलं वाचून.

मुलाखतीचे दोन्ही भाग खूपच सुंदर झालेत. इतक्या सुरेख मुलाखतीबद्दल पूनमला अनेक धन्यवाद!

वैभवला खूप खूप शुभेच्छा!

फार छान झालाय हा भाग.

स्वाती,अनीश,फारेंड,पूनम छत्रे आणी वैभवजी.... आपले आभार.

हाही भाग छानच.
एक टायपो राहिलाय

कुछ दूर हमारे सथ चलो हम दिल की कहानी कह देंगे - ही ती गज़ल .

खूपच छान झाली आहे मुलाखत. पूनमने प्रश्नही छान विचारलेत आणि वैभवची उत्तरेही दिलखुलास आहेत. आवडला हा भाग. Happy

अगो, अल्बममध्ये शोभा जोशी आणि विभावरी आपटे-जोशी ह्या दोघींच्याही आवाजातली गझल आहे. चित्रपटात विभावरीने गायलेली आहे.
वन टेक ओके- हे गाणं प्रामुख्याने जसराज जोशी ह्याने गायलं आहे.
उडनछू- अवधूत गुप्ते
सुर के पंख- अमोल निसळ (हे पं. अजय चक्रवर्ती ह्यांचा शिष्य आहेत)
चालले गाणे आणि चल उचल पाऊल- स्वप्नील बांदोडकर
आणि एक अनोळखी फूल- अर्थातच आशाताई Happy

प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी. खरे तर माझे आभार कशाला? Happy समोरचा मनमोकळेपणाने बोलणारा असला, की प्रश्न आपोआप उलगडत जातात. वैभव कविता/ गाणी ह्यावर इतका भरभरून बोलतो, की मुलाखत आपोआप रंगली.

अतिशय उत्तम, मनमोकळी मुलाखत खूप आवडली. प्रश्नही नेहमीच्या पठडीतले नाहीत आणि उत्तरंही. सहज गप्पा माराव्यात, तशी खुलली आहे मुलाखत. [खरं तर तिला मुलाखत म्हणावं की नाही, असं वाटतंय. Happy ]
वैभवच्या हिन्दी, मराठी दोन्ही रचना नेहमीच भुरळ घालत आलेल्या आहेत. सगळी गाणी अतिशय सुरेख आहेत्त. गझल खूप जास्त आवडली.
वैभवच्या पुढील यशस्वी प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा! Happy

मा_प्रा, इथे प्लीज मुलाखतीच्या आधीच्या भागाची लिंक देता येईल का? टायपो दुरुस्त करता आल्या तर अधिक उत्तम. Happy

नितांत सुंदर, सुश्राव्य मुलाखत...... वैभवजींना खूप शुभेच्छा.
पूनम छत्रे, स्वाती, अनीशा, फारेन्ड - सर्वांना मनापासून धन्यवाद....

वैभव कविता/ गाणी ह्यावर इतका भरभरून बोलतो, की मुलाखत आपोआप रंगली... ह्या ओळीतच सारं काही आलं. वैभवला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!!

पूनम....वैभवशी असलेली मैत्री तुझ्या प्रश्नातून खूप छान उतरलीये. म्हणजे तू त्याला फार छान बोलतं केलं आहेस Happy
वैभवा...... तुझा हा जो काही ग्राफ पुढे धावतो आहे ना..... तो बघणं इतकं आनंद दायक आहे ना.....!! आगे बढो दोस्त !!

सॉलिड प्रकार एकदम ! Happy

मुलाखत देणार्‍या आणि घेणार्‍याचेही मनःपूर्वक अभिनंदन !
सिनेमा नक्कीच पाहणार.

एक कला केवळ चिटोर्‍यावर मावते (तिला कॅनव्हास किंवा स्क्रीन किंवा म्युझिक सिस्टीम लागत नाही), केवळ पोर्टेबल आहे म्हणून तिची किती अवहेलना व्हावी ह्याला काही मर्यादा??

(अगदी खरं आहे हे !
कविता करायलासुद्धा फोटोग्राफी /चित्रकलेसारखा खर्च किंवा शिल्पकलेसारखा सायास करावा लागला असता तर फार मोजके कवी निपजले असते असे वाटते.)

इथे प्लसवन करायची सोय असायला हवी होती, सगळ्याच प्रतिक्रियांना करुन टाकल असतं. Happy
पूनम, खूप खूप धन्यवाद. समोर बसून आम्ही सगळे या गप्पा ऐकतोय असं वाटल.

इथे प्लसवन करायची सोय असायला हवी होती, सगळ्याच प्रतिक्रियांना करुन टाकल असतं.
पूनम, खूप खूप धन्यवाद. समोर बसून आम्ही सगळे या गप्पा ऐकतोय असं वाटल.>>> अगदी अगदी Happy