पाऊलवाट- वैभव जोशी- 'उडनछू!'

Submitted by माध्यम_प्रायोजक on 10 November, 2011 - 01:09

काही वर्षांपूर्वी सातत्याने आणि आता सणासुदीला मायबोलीवर भेटणा-या वैभवची मुलाखत घेण्याचं जेव्हा ठरलं तेव्हा मनात बरेच प्रश्न होते. 'पाऊलवाट'मधल्या गाण्यांबद्दल बरंच काही ऐकून, वाचून झालेलंच होतं. इतर संभाषणात बरेचदा गप्प असणारा वैभव, कवितांचा (मग त्या कुणाच्याही असोत) विषय निघताच किती भरभरून बोलतो हे अनेकदा पाहण्यात आलं होतं आणि झालंही तसंच .

VJ_0805.JPGमायबोलीवर कविता लिहिता लिहिता आता एक गीतकार म्हणून मायबोलीला मुलाखत देताना कसं वाटतं ?

काहीच फरक नाही. पूर्वीही मी व्यक्त व्हायला, संवाद साधायला मायबोलीवर यायचो. आताही तेच. Happy माझ्या मनात मायबोलीबद्दल काय भावना आहेत हे मी वेळोवेळी कार्यक्रमांतून आणि लेखनातून व्यक्त करत आलो आहे. माझ्या सर्व चांगल्या गोष्टींची सुरुवात इथूनच होते. 'पाऊलवाट'शी निगडीत गाण्यांच्या इंटेरनेट कॅंपेनची सुरुवातही मायबोलीवरच होत आहे हा शुभशकुनच.

’पाऊलवाट’ सिनेमा तुला कसा मिळाला? एकंदरीतच एखाद्या सिनेमाच्या गीतलेखनाची सुरूवात कशी होते? कशी झाली?

गीतकारांना सहसा संगीतकारांकडून बोलावणं येतं. मी नरेन्द्र (भिडे)सोबत आधी काम केलं होतं. एक दिवस त्याचा फोन आला, की जरा महत्त्वाचं बोलायचं आहे, भेटायला ये. तेव्हा मला वाटलं की एखाद्या अल्बमचं काम असेल किंवा सिनेमात एखादं गाणं लिहायचं असेल. त्याला भेटायला गेल्यानंतर तिथे आदित्य (इंगळे) बसलेला दिसला. नरेन्द्रने सांगितलं, "आपण एक सिनेमा करतोय आणि हा
त्याचं दिग्दर्शन करणार आहे- आदित्य इंगळे. मी संगीत तर देतोच आहे, पण मी त्याचा निर्माताही आहे." हा तसा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता कारण नरेन्द्रने ह्याआधी सिनेमा प्रोड्यूस केलेला नव्हता. दुसरं त्याने सांगितलं ते हे, की आपल्याला एक ’म्युझिकल’ करायचा आहे. सिनेमातला नायक हा film industry मध्ये struggling singer आहे. त्यामुळे गाण्यांना बरंच महत्त्व असणार आहे. तेव्हाही मला असं वाटलं होतं की आजकालच्या ट्रेन्डनुसार एकदोन गाणी माझ्याकडून लिहून घेईल आणि इतर गाणी बाकी गीतकारांकडून (जे खरं तर बरोबर आहे). वेगळ्या प्रकारच्या अनुभूती तुम्हाला अशाने संगीतबद्ध करता येतात. पण जेव्हा तो म्हणाला की सगळी गाणी तू लिहायची आहेस तेव्हा मात्र थोडंसं टेन्शन आलं होतं, कारण माझ्या पाहण्यात वा ऐकण्यात गेल्या कित्येक वर्षात मराठीच काय, पण हिंदी सिनेमा असा झालेला नाही ज्यात सात-आठ गाणी आहेत आणि त्याहूनही विरळा, की ती एकाच गीतकाराने
लिहिली आहेत. संधी जेवढी मोठी होती तेवढीच जबाबदारीदेखील. त्यानंतर आदित्यने कथेचा सिनॉप्सिस सांगितला. साधी सरळ कथा होती. ऐकताऐकताच असं लक्षात आलं की दिग्दर्शक स्क्रीनवर ती कथा कशी मांडतोय ह्यातच खरं कौशल्य असणार आहे. किंवा कथा पुढे नेणारी गाणी कशी असणार आहेत आणि ती स्क्रीनवर कशी दिसणार आहेत ह्यावर बरंच काही अवलंबून आहे.

गाण्यांच्या सिच्युएशन्स माहीत झाल्यानंतर लगेच गाणी लिहून टाकता येतात ह्यावर माझा विश्वास नाही. आय मीन किमान मला तरी ते जमत नाही. गाण्यांत असणार्‍या आणि नसणार्‍या सर्व पात्रांशी गीतकाराची नीट ओळख व्हायला हवी. त्या अर्थाने आदित्यने नंतरच्या काही डिस्कशन्समध्ये वर्णनांतून जिवंत केलेलं एक अन एक पात्र ही खरी 'पाऊलवाट'च्या गीतलेखनाची सुरुवात म्हटली पाहिजे.

पहिलं गाणं कोणतं लिहिलंस?

गीतकार म्हणून एखादं 'संपूर्ण' प्रोजेक्ट स्वीकारल्यानंतर (मग तो अल्बम असो वा सिनेमा), पहिल्या ब्रीफिंगनंतरसारखी दुसरी वाईट अवस्था नाही. समोरच्या व्यक्तीने तुम्हाला फायनल चित्र दाखवलेलं नसतं तर ते फायनल चित्र पाहिल्यानंतर ’त्याची काय अवस्था व्हायला हवी’ ह्याचा फोटो दाखवलेला असतो म्हणा फारतर. त्यामुळे चित्राचा आकार, त्यातील रंगसंगती, वेगवेगळे ब्रशेस हे सगळं तुमच्यावर अवलंबून असतं. पहिलं सिटिंग झाल्यानंतर बरेच दिवस तुमच्या मनात ’अफलातून ते भुक्कड’ (त्याही तुमच्या मते) अशा शेकडो इमेजेस क्षणाक्षणाला आकार घेत असतात. तुम्ही एक ब्रश फेकून देता, एक रंग पुसून टाकता, एक कॅनव्हास फाडून टाकता, हताश होता, दुसर्‍या इमेजकडे वळता; आपल्या सब्जेक्टिव्ह होकार नकारांवर अनेको शक्यता तपासून पाहत असता पण खरंतर हा चाळा असतो. जी गोष्ट जन्माला / प्रकाशात यायची असते ना ती ऍम्फॅटिकली येते. ती तिचं अरायव्हल अनाउन्स करतेच करते. ७-८ गाण्यांच्या / सिच्युएशन्सच्या चक्रव्यूहात अनेको दिवस टाइमपास केल्यानंतर (जो की अत्यंत आवश्यकही आहे) मी 'एक अनोळखी फूल'पर्यंत आलो. आदित्यने एक सिच्युएशन सांगितली होती- आक्का- ज्योतीताईंचं जे कॅरॅक्टर आहे, आणि सुबोधमधली. अनेको लढाया हरल्यानंतर एके रात्री सुबोध आक्कांच्या कंबरेला मिठी मारून रडतो आणि त्या दोघांचं नातं एका वेगळ्याच उंचीवर जातं... इथे आदित्यला एक तरल गाणं हवं होतं. जवळपास अंगाईच. मला ती सिच्युएशन आवडली होती. एकूण कथेचा फ्लो आणि कॅरॅक्टर्स बघता, तिथे हे गाणं खूप छान जाईल असं मला स्क्रिप्ट ऐकतानाही वाटलं होतं. फक्त एक गोष्ट मला नीट समजत नव्हती, की सुबोधचं वय बघता, अंगाई कशी लिहावी? अंगाई म्हणलं की कॅरॅक्टरला एक innocence असतो. प्रेक्षकांना अंगाई कितपत रुचेल ह्याची मला शंका होती. एके दिवशी विचार करता असं लक्षात आलं की त्या दोघांचं नातं आभासी आहे, तर लिहिण्यातही तसंच जाता येईल. म्हणजे कुठल्याही गाण्यात कवी कल्पना तर असतेच परंतू त्या प्रतिमा, त्या उपमा ह्या बहुतांशी थेट असतात. उदा: चेहर्‍याऐवजी चंद्र वगैरे. त्यात आहे / नाही च्या सीमारेषेवर थांबता नाही येत. या ठिकाणी मात्र मी तिथे थांबू शकलो असं 'मला' वाटतंय. 'एक 'अनोळखी' फूल, झुले माझ्या वेलीवर...' म्हणजे फूल वेलीवर तर आहे पण ते अनोळखी आहे, नातं आहेही म्हणता येत नाही आणि नाहीही.

प्रोजेक्टमधलं मी लिहीलेलं हे पहिलं गाणं. मी जसं जसं एकेक गाणं होईल तसतसं देतो म्हणजे संगीतकाराचे, दिग्दर्शकाचे फीडबॅक कळत जातात. आपण वापरलेली भाषा आणि सिनेमातली भाषा ह्यांचा ताळमेळ बसतोय की नाही वगैरे कळत जातं आणि पुढच्या गाण्यांचा मार्ग सुकर होत जातो. त्याप्रमाणे मी हे गाणं पाठवून दिलं आणि नंतर वाट बघत बसलो.

आशाताईंनी गायलेल्या ह्या गाण्याबद्दल तू अतिशय मनस्वी मनोगत ह्या आधी लिहीलं आहेसंच. आता इतक्या दिवसांनंतर त्या गाण्याकडे, त्या अनुभवाकडे तटस्थपणे पाहता येतं का?

नाही जमत. तुम्ही तुमच्या हातून घडून गेलेल्या अतिशय चांगल्या आणि अतिशय वाईट अशा दोन गोष्टी कधी विसरूच शकत नाही. मी आशाताईंनी सही केलेलं हे गीत घरात फ्रेम करून लावलं आहे. ती सही मला जबाबदारीची सतत जाणीव करून देते. गीतलेखनाच्या माझ्या प्रवासात एक गाणं आशाताईंनी गायलं ही सात पिढ्या पुरून उरणारी कमाई आहे. आणि ते गाणंही असं झालंय की दिवसाच्या कुठल्याही प्रहरी ऐकावं. चांगल्या गाण्याची माझी ही व्याख्या आहे. त्याला वेळ , ऍंबियन्स, कंपनी , मूड अशा कुबड्या लागत नाहीत. हा तसा दुर्मिळ योग असतो. मी माझ्या प्रवासात आत्तापर्यंत लिहीलेल्यापैकी (माझ्यामते) तीन वाईट गाण्यांच्या आठवणीने जेव्हा अस्वस्थ होतो तेव्हा हे गाणं ऐकतो. वेळेचं, प्रोड्यूसरचं, संगीतकाराचं कितीही प्रेशर असलं तरीही पुन्हा तशा चुका न करण्यासाठी. दोनशेच्या वर रेकॉर्डेड गाण्यांपैकी तीन वाईट (लेखनात) हा रेशो चांगला/ वाईट मला कळत नाही. मला एवढंच माहीत आहे की मी माझे तीनही चान्सेस वापरले आहेत.

सिनेमातला नायक हा एक स्ट्रगलर आहे. तू ह्या इन्डस्ट्रीत आहेस.. तुला ह्या ’स्ट्रगलिंग गायक’ असलेल्या नायकाशी रिलेट होणं सोपं गेलं का?

सिनेमातल्या नायकाच्या रोलशी मी स्वत: नाही झालो रिलेट. सुदैवानं म्हणा की दुर्दैवानं म्हणा, मी ह्या क्षेत्रात फारसा संघर्ष पाहिलेला नाही. मला संधी मिळत गेली आणि मी काम करत गेलो. पण रिलेट अशा पद्धतीने होऊ शकलो की ह्या क्षेत्रात बरेचसे माझे गायक मित्र भेटतात- त्यांची धडपड, त्यांचा स्ट्रगल जवळून पाहिलेला आहे. सध्या रिअ‍ॅलिटी शोजमध्ये बरेचदा आश्चर्य वाटतील असे निर्णय लागतात. आपल्याला जो गायक जिंकेल असं वाटतं, तो मतांनुसार सर्वोत्कृष्ट गायक ठरत नाही. मग त्याला आलेलं नैराश्य किंवा आपल्याला वाटलेली खंत ह्यातून आपल्याला ह्या फ़ील्डमध्ये असलेल्या संघर्षाची कल्पना येतेच. एका गाण्यासाठी ताटकळलेले गायक, किंवा ज्यांना one song wonder म्हणतात असे गायक, किंवा एकही चांगली संधी न मिळाल्यामुळे छोट्या-मोठया कार्यक्रमांमध्ये गाणारे गायक आणि त्यांच्यापेक्षा inferior असूनही popular झालेले लोक हा संघर्ष मी पाहिलेला आहे. शिवाय आदित्यने सुरूवातीलाच हे कॅरॅक्टर कसं आहे, त्याच्या शेड्स काय आहेत हे स्पष्टपणे सांगितलं होतं. त्याच्या आयुष्यात येणारे लोक, त्यांच्यातली संभाषणं आणि त्यांच्यामधले संघर्ष हे त्याने व्यवस्थित सांगितलं होतं. ह्याही गोष्टीमुळे मला कॅरॅक्टरशी रिलेट व्हायला मदत झाली.

सिनेमामध्ये वेगवेगळ्या जॉनरची गाणी आहेत. जी सातही गाणी आहेत त्यातलं जवळपास प्रत्येक गाणं वेगळ्या जॉन्रचं आहे, एक पॉप आहे, थोडं क्लासिकल आहे, हिंदी गज़ल आहे, भावगीत आहे, एक अंगाईगीत आहे हे सगळं मुद्दामहून असं संगीतकाराने एक संगीतिका म्हणून वैविध्य ठेवलेलं होतं की आपोआप होत गेल्या अशा चाली?

सिनेमामधे गाणे हा विषय असेल आणि त्यातही संगीतकार एक निर्माता असेल तर साहजिक आहे की त्याला स्वत:चं अष्टपैलुत्व शोकेस करायला आवडेल. तसेच वेगवेगळ्या जॉन्रची गाणी असल्याने मोनोटनी टाळता येतेच शिवाय ऑडियन्स साईझ वाढतो. अर्थात ह्या सगळ्या आधी ह्याला कथेची संमती असणं महत्त्वाचं. मला वाटतं गाण्याच्या आधी आणि नंतर घडणारा जो इमिजिएट सीन असतो तो खरंतर हे वैविध्य वगैरे ठरवतो. आमच्या बोलण्यातही आलं होतं की यात एक गझल असेल आणि एक अंगाई स्वरुपाचं गाणं असेल किंवा एखादं रॉकस्टाईल गाणं आपण करु. एक सॉफ्ट रोमँटिक असं वगैरे. पण हे काही हार्ड अँड फास्ट असं काही ठरलेलं नव्हतं की आता हे गाणं झालं आता बास, आता दुसरं असं गाणं नाही वगैरे (ठरवता येतही नाही). पण फॉर्च्यूनेटली म्हणा वा त्यांचा फीडबॅक माझ्या डोक्यात असल्यामुळे म्हणा, नवीन नवीन प्रयोग करुन बघण्यासाठी म्हणून का होईना मीच वेगवेगळ्या पद्धतीने लिहीत गेलो असण्याची शक्यता आहे. एका गाण्यातून (लेखनात) बाहेर पडून दुस-यात शिरताना जॉनर बदलासारखा उत्तम पर्याय नाही. मी आधी स्वांत:सुखाय लिहायचो तेव्हाही काव्यप्रकारांचा वापर करून घ्यायचो. नाहीतर होतं काय की तुम्ही एखाद्या वृत्तात / छंदात लिहिलं की बरेच दिवस तुमच्या डोक्यात नवीन विचारही त्याच छंदाची चौकट घेऊन येतात त्यामुळे ही चौकट सतत मोडत राहणं महत्त्वाचं असतं. कमीअधिक प्रमाणात संगीतकारांच्या बाबतीत पण असंच म्हणता येईल. एक फेवरिट राग असतोच कितीही नाही म्हटलं तरीही. ती सुरावट सरसकट कामात जाणवू नये ह्यासाठी जॉन्र चेंज खूप रिफ्रेशिंग आहे. जॉनर्स हे फक्त त्या सिनेमासाठी वेगळे करायचे म्हणून ठरवून केलेलं नाही.पण हे खरं आहे की समोर हा प्रोजेक्ट असल्यामुळे खूप जॉनर्समध्ये लिहून बघता आलं. आणि आनंदाची बाब ही की ते सगळं अ‍ॅक्सेप्ट होऊन सिनेमामध्ये आणि अल्बममध्ये घेतलं गेलेलं आहे. सिनेमाच्या सुरुवातीला पडद्यावर एक रुबाई आहे ती लिहीण्याआधी, रादर एक फायनल रुबाई देण्याआधी, मला रुबायांचं आख्खं पुस्तक छापता येईल इतक्या लिहायला मिळाल्या. हिंदी गजलच्या आधी ऑडिओ सीडी मधे त्रिवेणी सादर केल्या आहेत तेव्हा कित्येको त्रिवेणी लिहून झाल्या. हे सर्व ऍडिशनल मानधन म्हणू शकतो आपण किंवा त्याहीपेक्षा खूप जास्त असं काहीतरी.

या ऑडियो रिसायटेशनबद्दल थोडं विस्तारानं सांगशील का?

'पाऊलवाट'चं माझं काम सगळ्यांत आधी संपलं असं म्हणायला हरकत नाही. कारण सर्वात आधी गाणी करायची ठरली होती. त्याचा पहिला टप्पा गीतलेखनाचा. नरेन्द्र चालींवर शब्द लिहून घेत नाही. त्याचा ९९.९९% प्रेफरन्स असतो की शब्द आधी लिहायला पाहिजेत. त्यामुळे सिनेमा फ्लोअरवर जाण्याच्या खूप आधी गाणी लिहून झाली होती. त्यांच्या चालींवर आणि स्केलेटनवर बर्‍यापैकी काम झालं होतं. तरी मी आदित्यला आणि नरेंद्रला असा शब्द दिला होता की जोपर्यंत सिनेमा थिएटरला लागत नाही तोपर्यंत या प्रोजेक्टमधून बाहेर पडणार नाहीये तुला कुठल्याही क्षणी काही अदलबदल करायचे असतील, काही नवीन लिहून हवं असेल, जे काही लागेल ते करण्यासाठी मी सातत्याने त्यांच्याबरोबर इनव्हॉल्व्ड होतो त्यांच्या शूटींग प्रोसेसमध्ये. मला जसा कामातून वेळ मिळायचा तसा रेकॉर्डींग्जना जात होतो, चर्चांना हजर राहण्याचा प्रयत्न करत होतो. आणि आता आता म्हणजे सिनेमा रिलीजची डेट ठरवत असताना जेव्हा ऑडियो लाँच करण्याचा विचार झाला, तेव्हा आदित्यच्या मनात असं आलं की आपण या आठ गाण्यांच्या आधी छोट्या छोट्या कविता वाचूया. आपण जनरली एखाद्या थीमसाठी गाणं लिहितो तेव्हा त्यातल्या भावविश्वाशी सिनेमा न पाहिलेल्या माणसाला संदर्भ लागेलच असं नाही. त्यामुळे त्याच्या मनात कदाचित आलं असेल की आपण छोटे छोटे पॉईंटर्स देऊयात जेणेकरुन गाणं ऐकताना लोकांना गाणं सुरू होण्याआधीच फॅमिलिअर वाटेल. हे खूप उशीरा ठरलं आणि तेव्हा आमच्याकडे कालावधीही कमी उरला होता. त्यावेळी मात्र मला जरा पटापट काम करायला लागलं आणि प्रत्येक गाण्याच्या आधी एकेक कविता लिहावी लागली.

रिसायटलच्या बाबतीत सांगायचं तर कार्यक्रमांतून कविता रिसाइट करणं आणि स्टुडिओमध्ये डब करणं ह्यात खूप फरक आहे. विशेषत: वेळेचं बंधन पाळून गाण्यांच्या आधी कविता/बोलणं येणार असेल तर तुम्हांला खूप कॉन्शस व्हायला होतं. कवितांच्या मागे वाजणारं संगीत तयार असेल तर आणखीनच. कार्यक्रमात अग्रेसिव्हली टाकलेली वाक्यं, टाळ्या मिळवणारी वाक्यं स्टुडिओमधे ब्लो येतो म्हणून रिजेक्ट होऊ शकतात. आपल्या रिसायटलनंतर पुढचं जे गाणं वाजणार आहे त्याचा साधारण मूड तरी तुमच्याही रिसायटलमधे जाणवावा लागतो नाहीतर एकसंध सीडी ऐकणार्‍याला जर्क्स लक्षात येतात.

गाणी लिहून तसा बराच कालावधी लोटलेला होता. त्या रेकॉर्ड झालेल्या गाण्याला, तुझंच असलं तरीही, त्याला जोडून चार ओळी लिहिणं किंवा कविता लिहिणं हे कितपत आव्हानात्मक होतं?

आव्हानात्मक झालं खरं. म्हणजे तसं बघायला गेलं तर माझं काम ऑगस्ट २०१०मध्येच संपलं. माझा आणि पाऊलवाटचा गीतकार म्हणून संबंध ऑगस्ट २०१०लाच संपून गेला होता. प्रोजेक्टमध्ये सायकोलॉजिकली राहतो म्हणून शब्द देणं सोप्पंय. किंवा असं म्हणू की एखादं नवीन गाणंच लिहायचं असतं तर सोप्पं गेलं असतं कारण आधी म्हणल्याप्रमाणे मी त्या प्रोसेसमध्ये स्वत:ला पुन्हा पुन्हा घेऊन जात होतो. पण डिमांडनुसार कविता... मला वाटतं बरंच अवघड आहे. होतं काय की ज्यावेळेला तुम्हांला हे सांगण्यात येतं. त्या वेळेला तुम्ही काय करत असता, कुठल्या मेंटॅलिटीमध्ये आहात हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे अलीकडच्या काळात मी सातत्याने हिंदी लिखाण करत आहे. आणि हिंदी प्रोजेक्टसवर काम करत असताना अचानक अ‍ॅज अ‍ॅन असाईनमेंट म्हणून गाणं नाही, पण कविता किंवा रुबाई किंवा त्रिवेणी असं लिहायची वेळ येते तेव्हा ते निश्चितच जास्त आव्हानात्मक असतं. हिंदी प्रोजेक्ट करत असताना तुम्हाला रात्री कधीतरी निवांत बसलेले असताना किंवा ड्राईव्ह करत असताना मराठी कविता नक्कीच सुचू शकते पण आपल्याला ही कविता द्यायचीये आणि इतक्या कविता इतक्या इतक्या दिवसांत द्यायच्यात, शिवाय त्या पुढच्या गाण्याला मॅच व्हायला पाहिजेत. मघाशी म्हटल्याप्रमाणं त्यांची भाषा गाण्याच्या भाषेनुसार जायला हवी शिवाय संगीतकाराला आणि दिग्दर्शकाला जो मूड हवाय तसा यायला हवा आणि तरीही त्यातून भावार्थ प्रकट व्हायला हवा, तरीही त्यातून श्रोता पुढल्या गाण्यामध्ये आधीच इनव्हॉल्व होत जावा हे सगळं चॅलेंजिंग आहे, होतंच. आम्ही ऑल्मोस्ट आयडीआ कॅन्सल करण्यापर्यंतही आलो होतो कारण म्यूझिक कंपनीला सीडी छापायला देण्यासाठी केवळ दोन दिवस राहिले होते. पण घडून गेलं. कलेच्या बाबतीत जशा बर्‍याचशा गोष्टी अतर्क्य, तसंच हेही.
--

(क्रमश:) पाऊलवाट- वैभव जोशी- 'उडनछू!' - भाग २

टंकलेखन सहाय्य- स्वाती, अनीशा, फारेन्ड.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपटातील गीतलेखन हे एकूणच कठीण काम दिसतंय. बर्‍याच मर्यादा येतात........... पण तरीही खूपश्या बैठका ,ब्रिफिंग अन नायक वा कथेशी रिलेट न होता समर्पक व म्युझिकल फिल्मसाठी चांगली गाणी लिहिणे यातून वैभवजींचा प्रचंड मोठा व्यासंग दिसून येतो आणि हेच वैभवजी माबोकर आहेत याचा सार्थ अभिमानही वाटतो.

मुलाखतीच्या दुसर्‍या भागाच्या प्रतीक्षेत. Happy

ही चौकट सतत मोडत राहणं महत्त्वाचं असतं. >>> सहीच! आणि हे प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कामात महत्वाचं आहे. चौकट 'बसवायला' 'स्थिरस्थावर करायला' नेहमीच खूप महत्व मिळतं. ती मोडत राहण्याचं महत्व जाणणारे कमीच असतील. तुझ्यातल्या 'फिलॉसॉफर वैभव'ला पुन्हा एकदा भेटल्यागत वाटलं.

मला एवढंच माहीत आहे की मी माझे तीनही चान्सेस वापरले आहेत. >> क्या बात है!! Happy

व्वा! एकदम मस्त मुलाखत! बर्‍याच कालावधीनंतर इतकी छान मुलाखत वाचायला मिळाली.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही छापील डिप्लोमॅटिक उत्तरे न देता वैभवने मनापासून केलेलं हितगूजच वाटतंय. 'माध्यम-प्रायोजकांचे' आभार!

सुरेख मुलाखत !
'एक अनोळखी फूल' अप्रतिमच जमलंय. (अर्थात हे, मी सांगायला हवं असं नाही.)
सिनेमातली अन्य गाणी ऐकलेली नाहीत, पण ऐकण्यास उत्सुक आहे. तशीच उत्सुकता मुलाखतीच्या दुसर्‍या भागाबद्दलही आहे.

वैभवला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

मला एवढंच माहीत आहे की मी माझे तीनही चान्सेस वापरले आहेत. >>
हे आवडले. Happy

मुलाखत कुणी घेतली आहे ते पण लिहा की. प्रश्नही छान आहेत.

काही वर्षांपूर्वी सातत्याने आणि आता सणासुदीला मायबोलीवर भेटणा-या वैभवची मुलाखत >> Lol
नरेंद्र भिडे यांचा स्टुडीओ आमच्या पानटपरीवरच्या पाऊलवाटेवरच असल्याने खरच वैभवची सणासुदीला भेट होत होती. Happy

मुलाखतीच्या पुढला भागात वैभव जोशी 'पाऊलवाट' मधल्या इतर गीतांबद्दल तसंच या चित्रपटात त्यांनी केलेल्या एका छोट्या भुमिकेबद्दल बोलतील.

पुढील भाग लगेचच म्हणजे उद्या प्रकाशित करण्यात येईल.

सर्वांशी सहमत! वैभवरावांच्या कवीत्वाला दशदिशा आपल्या बाहू फैलावून आमंत्रीत करोत अशी प्रार्थना! Happy

-'बेफिकीर'!

वैभवची जुन्या मायबोलीवरची मुलाखत आठवली. Happy

लगे रहो दोस्त...आत्ता कुठे सुरवात आहे, तुझ्या अश्या कित्येक मुलाखती आम्हाला वाचायला मिळोत. Happy

मला एवढंच माहीत आहे की मी माझे तीनही चान्सेस वापरले आहेत >> Happy

मस्त रंगली आहे मुलाखत.
प्रश्न कुणाचे आहेत. अगदी वैभवल भरभरुन बोलायला लावणारे असेच आहेत.

मुलाखत छानच आहे आणि आम्हा सर्वांना अभिमान वाटेल असेच आहे हे सगळे.
दुसरा भाग लवकर टाका.

(जरा इंग्रजी शब्द कमी करता आले तर बघा ना, झक्की काका रागावतील !!)