यथेच्छ खातेस ऐकतो...

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
Time to
read
1’

प्रेरणा : वैभव ची अतिशय नितांत सुंदर गझल 'सुखात आहेस ऐकतो'

मूळ गझल :

सुखात आहेस ऐकतो ! हे कसे जमवतेस सांग ना!
तुडुंब डोळ्यामधील पाणी कुठे लपवतेस सांग ना !

अजून गेली नसेल ना ती रुसावयाची सवय तुझी?
कुणी न समजावता मनाला कसे हसवतेस सांग ना!

अता तरी आणखी न कोणी तुझ्याविना आरशामधे
कुणास पाहून लाज-या पापण्या झुकवतेस सांग ना!

नव्यानव्या दागदागिन्यांची ददात नाही तुला जरी
कशास देहावरी जुने चांदणे मिरवतेस सांग ना!

मधेच दचकून जाग येता तुटे तुझी निग्रही निशा
अशा क्षणी एकसंधशी तू किती उसवतेस सांग ना!

खरोखरी जर तुला तहाचा नसेल संदेश द्यायचा
धुकेजलेल्या दिशांवरी नाव का गिरवतेस सांग ना!

खड्या पहा-यावरी असा भूतकाळ नेमून ठेवला
स्वतःस माझ्याविना जगाया कधी शिकवतेस सांग ना!

--------------

यथेच्छ खातेस ऐकतो हे कसे जमवतेस सांग ना
तुडुंब पोटामधील खाणे कुठे लपवतेस सांग ना

अजून गेली नसेल ना ती चरावयाची सवय तुझी?
म्हशींप्रमाणे रवंथ करुनी कसे पचवतेस सांग ना!

अता तरी आणखी न कोणी तुझ्याविना ह्या घरामधे
किलोकिलोने कश्यास ह्या कोंबड्या शिजवतेस सांग ना

नव्या नव्या गोड जिन्नसांची ददात नाही तुला जरी
कशास ताटामधे शिरा कालचा मिरवतेस सांग ना

परात चापून लाडवांची भरून जाते उदर तरी
अश्याच त्यावर सहस्त्र जिलब्या कश्या रिचवतेस सांग ना!

खरोखरी जर तुला न खाता उपास आहे करायचा
भुकेजले पोट, त्यावरी हात का फिरवतेस सांग ना

बका बका खाउनी तुझे हे शरीर फुगले फुग्यापरी
कशास हत्तीस त्या बिचाऱ्या उगी भिववतेस सांग ना

विषय: 
प्रकार: 

हे हे हे मिल्या जबरी आहे रे.....
Rofl

फनटॅस्टीक.....
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

जरी चालू असे मास हा सुंदर श्रावणाचा,
नाव कशास काढले कोंबड्यांचे, सांग ना!

कोंबडी कुचकूचू लागली पोटात माझ्या..
तंगडी धरून का अशी लंगडी? सांग ना!!

'कोंबड्या' तेही 'किलोकिलोने'!!!!
कु फे हे पा ?????

मस्त रे मस्त. मस्त जम्या रे मिल्या.
--
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!

काय हे मिल्या दा किलो किलो ने कोंबड्या Biggrin
****************************
Biggrin Biggrin Biggrin Biggrin

अहाहा.. मजा आ गया मिल्याभाय.. Happy

- अनिलभाई

>>परात चापून लाडवांची भरून जाते उदर तरी
अश्याच त्यावर सहस्त्र जिलब्या कश्या रिचव'तो'स सांग ना!

मी असेच वाचले Wink वरचा छान जमलाय.

वैभवाची कथाच निराळी. 'एकसंधशी तू किती उसवतेस..' आह! क्या बात है!
मिल्या ही गझल इथे लिहील्याबद्दल लई आभार!

क्या बात है । मिलिन्द भाई

एकदम मस्त Lol
.
साजिरा, हे असेच ना:-
'कोंबड्या' तेही 'किलोकिलोने'
कुठे फेडशील हे पाप, सांग ना Wink

वैभवची गझल लिहील्याबद्दल धन्यवाद !!

मिल्या - तुझे विडंबनही खतरनाक आहे. भर मिटींगमध्ये फारच गोची झाली हसू दाबता दाबता Happy Happy

मिल्या, भन्नाट रे एकदम!! Lol
गझलचा आर्त मूड तू एकदम बदलवून टाकलास..

धमाल विडंबन...मुळ गझलही खुप छान आहे...

सर्वांना खूप खूप धन्यवाद...
मूळ गझल इतकी सही आहे ना... त्यानिमित्ताने ती लोकांनी वाचावी ही एक सुप्त इच्छा होतीच ...

आता ही गझल नक्की ऐका वैभवच्या 'सोबतीचा करार' ह्या गझल अल्बम मध्ये Happy

  ================
  ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
  रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

   -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

   मिल्याभाव, वा मजा आ गया Biggrin
   विडंबनाचा अल्बम काढूयात का?
   दीपू द ग्रेट
   "आज कल पाँव जमीं पर नहीं रहते मेरे"

   मिल्या कसलं जबरा विडंबन! मी ही ऑफिसात वाचण्याचा गाढवपण केला. वैभवची गजल वाचून 'व्वा' जसं उस्फुर्तपणे गेलं ना, तसच फिस्सकन आलेलं हसू.... तुझं विडंबन वाचून.
   (त्या निमित्ताने किती दिवसांनी त्या पठ्ठ्याचं वाचल... नेहमीसारखं नितांत सुंदर. धन्स, रे.)

   मूळ गझल अतिशय निखळ आणि हळुवार. फार आवडली. धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल.
   तुमचं विडंबनही अतिशय मजेदार! एकाच साच्यात दोन विरूद्ध साहित्यरंग बघताना फारच मस्त मजा आली.
   ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
   श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
   क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

   भिन्न प्रकृतीच्या काव्यांचा मूड विसरायला लावणार्‍या
   विडंबनांचा धबधबा कसा कोसळवतोस सांग ना!

   क्या बात है मिल्या .... जब्बरी जमलय Happy
   >> अता तरी आणखी न कोणी तुझ्याविना ह्या घरामधे
   >> किलोकिलोने कश्यास ह्या कोंबड्या शिजवतेस सांग ना
   Rofl
   ---------
   वैभवची मूळ गझल दिल्याबद्दल धन्स ... खूपच छान आहे .

   मिल्या खासच..:)
   अश्विनी हे असंही चालेल बघ..
   नव्या नव्या गोड गझलांची ददात नाही तुला जरी
   विडंबनाचा असा फुलोरा कसा फुलवतोस सांग ना

   परत एकदा धन्यवाद सर्वांना

   गुरुजींची मूळ गझल आवडली ना.. मग 'सोबतीचा करार' घ्यायला विसरु नका..

   वाट पहा १ सप्टेंबरची Happy

    ================
    ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
    रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

     -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

     मूळ गझल इतकी सही आहे ना... त्यानिमित्ताने ती लोकांनी वाचावी ही एक सुप्त इच्छा होतीच ... मिल्या मनापासून धन्यवाद Happy

     मग 'सोबतीचा करार' घ्यायला विसरु नका.. ऑनलाईन बुकिंग आहे का?

     वैभव लाजवाब, मिल्या तुला सहस्त्र जिलब्यां (की कोंबड्या?) बक्षिस Happy

     मिल्या, धम्माल आहे हं. सॉलिड मज्जा आली Biggrin Lol

     -प्रिन्सेस...