पाऊलवाट- मनोगत- ज्योती चांदेकर

Submitted by माध्यम_प्रायोजक on 7 November, 2011 - 03:20

स्टेट ऑफ द आर्ट फिल्म्सची निर्मिती असलेला ’पाऊलवाट’ हा चित्रपट १८ नोव्हेंबर, २०११ रोजी प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक आदित्य इंगळे ह्यांचा हा पहिलाच चित्रपट. अभिराम भडकमकर ह्यांची कथा- पटकथा, नरेन्द्र भिडे ह्यांचं संगीत आणि वैभव जोशी ह्यांची गीतं असलेल्या ह्या चित्रपटात ज्योती चांदेकर, सुबोध भावे, मधुरा वेलणकर, आनंद इंगळे, हृषिकेश जोशी आणि किशोर कदम ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या निमित्ताने ज्योतीताईंकडून त्यांच्या भूमिकेबद्दल, सिनेमाबद्दल आणि संपूर्ण टीमबद्दल जाणून घेतलं.

’पाऊलवाट’ एक सरळ साधा संगीतमय असा सिनेमा आहे. हृषिकेश मुखर्जी, राजा परांजपे ह्यांचे सिनेमे कसे कथेवर आधारित असायचे, तसाच कथा हा आत्मा असलेला असा हा सिनेमा आहे. ह्या चित्रपटातले प्रत्येक पात्र आयुष्यात काही ना काही संघर्ष करत आहे. अ‍ॅक्शन, धांगडधिंगा, आरडाओरडा असं काहीही नसलेली ही एक ’क्लीन’ कथा आहे, जी आजकालच्या पिढीचंही काहीतरी प्रबोधन करू शकेल.

JC.jpg

ह्या सिनेमातलं माझं पात्र म्हणजे ’आक्का’. आक्का ह्या मुंबईमध्ये एकट्या राहणार्‍या बाई आहेत. अस्तित्वाची आणि जगण्याचीच धडपड करत असलेल्या ह्या आक्कांच्या घरात अनंत (सुबोध भावे) पेईंग गेस्ट म्हणून रहायला येतो. एकट्या असल्यामुळे आक्कांचा स्वभाव अगदी रुक्ष वाटावा असा आहे. तडकफडक बोलणं, जे मनात येईल ते तोंडावर बोलून मोकळं होणं- असा स्वभाव असलेल्या ह्या आक्का, आनंद घरात रहायला लागल्यानंतर त्यांना आपल्या एकटेपणाची जाणीव व्हायला लागते. त्यानंतर त्या हळूहळू बदलतात जातात. अनाहूतपणे त्या अनंताची आई होतात, त्याच्यावर लांबूनच का होईना, पण आईच्या मायेची पाखर घालू लागतात. त्यांच्यात नकळत एक मार्दव, एक हळूवारपणा येतो. त्यांच्या नात्याचं सुरेख असं ह्रुदयस्पर्शी चित्रण ’एक अनोळखी फूल’ ह्या साक्षात आशाताईंनी गायलेल्या गाण्यातून केलं आहे. आणि मग ह्या अनोख्या नात्याचा काय प्रवास होतो, हे चित्रपटात उलगडत जातं.

चित्रपटाचे आमचे कॅप्टन म्हणजे दिग्दर्शक आदित्य इंगळे. आदित्य आणि मी ह्या आधी ’सुखांत’ ह्या चित्रपटात आधी एकत्र काम केलं आहे. तेव्हा तो ’सुखांत’चा सहायक दिग्दर्शक होता. त्यामुळे आमचं ट्युनिंग जमलेलं होतंच. ह्या भूमिकेसाठी मी योग्य निवड आहे असा त्याचा विश्वास होता. असा विश्वास आपल्या दिग्दर्शकाचा आपल्यावर आहे हे माहित असलं की आपल्याही कामाचा कस लागतो. आपल्यातलं उत्तम आपण त्या भूमिकेला देतो. आदित्य एक दिग्दर्शक म्हणून अतिशय शांत आहे. सेटवर आरडाओरडा वगैरे तो मुळीच करत नाही. एखादा शॉट त्याला परत हवा असला, तर तो ’आपण परत करूया का ज्योतीताई?’ असं अगदी शांतपणे विचारतो. त्यामुळे साहजिकच आपणही दिग्दर्शकाचं समाधान होईपर्यंत काम करायला तयार होतो.

नरेन्द्र भिडे ह्यांनी संगीताची बाजू तर सांभाळली आहेच, पण ते ह्या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकीही एक आहेत. सहसा कोणत्याही निर्मात्याने त्याच्या चित्रपटाबद्दल कायम सावध पवित्रा घेतलेला असतो. काय चाललं आहे नक्की ह्यावर त्याचं बारीक लक्ष असतं. पण नरेन्द्रने सेटवर अगदी घरच्यासारखं वातावरण जपलं. तो आणि इतर निर्मातेही आम्हाला सतत ’चीअर-अप’ करत असत. सेटवर अगदी खेळीमेळीचं वातावरण असल्यामुळे काम करायला एक वेगळाच उत्साह आम्हाला येई. ’पाऊलवाट’ हा एक सांगीतमय सिनेमा आहे. ह्यात नरेन्द्रने सर्व प्रकारचे संगीत दिले आहे. ह्यात शास्त्रीय ढंगाचे गाणे आहे, उपशास्त्रीय बाजाची एक हिंदी गझल आहे, ’उडनछू’ असे एक धमाल बालगीत आहे, एक अंगाई आहे, एक रॉक गाणेही आहे. आशा भोसले, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, शोभा जोशी, विभावरी जोशी, जसराज जोशी असे नामवंत गायकही आहेत. ह्या चित्रपटाचा अल्बम हा एक संपूर्ण अल्बम म्हणून नरेन्द्रने तयार केला आहे.

ह्या चित्रपटात माझं सर्वात जास्त काम सुबोध भावे बरोबर आहे. सुबोध हा आपली भूमिका समजून घेऊन त्यावर विचार करणारा अभिनेता आहे असं मी म्हणेन. त्याला अभिनयाची उत्तम समज आहे आणि अगदी मनापासून तो त्याची भूमिका वठवतो. सर्वच कलाकारांना तो योग्य तो आदर देतो. आमच्या सीनच्या आधी आम्ही एकमेकांशी चर्चा करायचो, आणि त्या विचारविनिमयानंतर टेक व्हायचा. त्यामुळे आमच्यात रॅपो फार चांगला होता.

मधुरा वेलणकर, अभिराम भडकमकर, ह्रिषिकेश जोशी, आनंद इंगळे, सुबोध ह्या सर्व तरूण मंडळीमुळे सेटवर कायम ’जान’ असायची. वातावरण एकदम हलकेफुलके असायचे. हे सगळे अतिशय गुणी कलाकार आहेत. टीममध्ये असे कलाकार असले की कामाचं टेन्शन येत नाही, उलट हुरूप येऊन काम केलं जातं. आनंद तर सेटवर येताच सगळ्यांना हसवायला लागतो. ह्या वातावरणामुळे आम्ही सर्व अगदी ’कम्फर्टेबल’ असायचो सेटवर. अगदी मजामजा करत आम्ही हा सिनेमा पूर्ण केला. आपले प्रेक्षकही ह्या चित्रपटाचा आनंद घेतील अशी मला आशा आहे.
--

(मुलाखत आणि शब्दांकन- पूनम छत्रे)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला फारच कमी नाटकात / चित्रपटात बघायला मिळाले. पण ज्या भुमिकांत बघितले, त्या सर्वांसाठी योग्य निवड तूम्हीच होतात.

छान. Happy