देऊळ प्रिमियर

Submitted by मंजूडी on 4 November, 2011 - 05:38

"एका दर्जेदार चित्रनिर्मितीमध्ये माध्यम प्रायोजक म्हणून सहभागी होणं, हे 'मायबोली'साठी अतिशय आनंददायक आणि अभिमानास्पद आहे."

३ नोव्हेंबर, २०११ रोजी झालेल्या 'देऊळ' सिनेमाचा प्रिमियर बघताना याची पुरेपूर प्रचिती आली. अतिशय उत्तमरीत्या निर्माण केलेल्या या चित्रपटाच्या प्रिमियर शोला, अर्थात, 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ला मायबोली.कॉमचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याची अभिनव संधी आम्हाला दिली याबद्दल मायबोली, अ‍ॅडमिन आणि टीम माध्यम_प्रायोजक यांचे अनेक अनेक आभार!

अश्या प्रकारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची माझी ही पहिलीच वेळ.. त्यामुळे थोडी धाकधूक मनात होती. दिलेल्या वेळेवर पीव्हीआर सिनेमा, लोअर परळ, स्क्रिन नंबर सात इथे पोचले. तिकिटे ताब्यात घेऊन 'देऊळ' स्पर्धा-खेळ विजेत्या मायबोलीकरांची वाट पाहत बसले. आपापली ऑफिसे संपवून जिप्सी, अश्विनी के, गजानन, साधना, आनंदयात्री हे मायबोलीकर माझ्यासारखेच थोड्या धाकधुकीने, बर्‍याचश्या उत्सुकतेने हजर झाले.

आठ वाजल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतला एकेक तारा यायला सुरूवात झाली. मी आधीच सिनेमा लाऊंजमधे पोचलेली असल्याने परत खाली जाता येत नव्हतं त्यामुळे 'रेड कार्पेट' सोहळा बघता आला नाही. नाना पाटेकर पावणेनऊ वाजता आले, पत्रकारांनी त्यांना घेराव घातला, त्यांचे बाईट्स वगैरे देऊन झाल्यावर प्रिमियर समारंभ सुरू झाला.

चित्रपटाचे निर्माते अभिजीत घोलप यांनी कार्यक्रमाची सुत्रे हातात घेत सिनेमा निर्मितीमागचे पाच खंदे वीर, अर्थात, सिनेमाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, कथा-पटकथाकार आणि मुख्य अभिनेता गिरीश कुलकर्णी, कार्यकारी निर्माते नितीन वैद्य, प्रसिद्धी प्रमुख समीर जोशी आणि राम कोंडिलकर यांची ओळख उपस्थित प्रेक्षकांना करून दिली.
या चित्रपटाचे संपूर्ण महाराष्ट्रभरात एका दिवशी तब्बल ४०४ खेळ सादर होणार आहेत, यामागे केवळ 'मराठी सिनेमा प्रसिद्ध व्हावा, मोठा व्हावा' हा एकच उद्देश आहे हे त्यांनी मुद्दाम नमूद केले.

सिनेमा सुरू झाल्यावर श्रेयनामावलीत मायबोलीचा लोगो एकदम ठळक, सुस्पष्ट आणि मस्त दिसला आणि अंगावर शब्दश: रोमांच उभं राहिलं.

सगळे कलाकार घरगुती कौतुक समारंभाला यावे तसे अगदी जिव्हाळ्याने आलेले होते. कुठेही 'पेज ३' चमचमाट नव्हता. नीना कुलकर्णी, तुषार दळवी, निखिल (आडनाव आठवत नाही, विनोदी कलाकार आहे, अनेक जाहिरातींमधे असतो), सोनाली कुलकर्णी (एकदम सुंदर, शालीन दिसत होती. तिची साडी एकदम क्लासी होती), संदिप सावंत, सुलभा देशपांडे, दिलीप प्रभावळकर, स्वानंद किरकिरे, प्रतिमा कुलकर्णी, ज्योती सुभाष, अतिशा नाईक, शर्वाणी पिल्ले इत्यादी हजर असलेली, माहीत असलेली आणि सध्या आठवत असलेली नावे...

मध्यंतरात गिरीश कुलकर्णी खूपच गडबडीत होते. पण त्यांना गाठून आम्ही मायबोलीतर्फे आलो आहोत हे सांगितले. तेवढ्या गडबडीतही त्यांनी, 'मायबोलीचे अनेक आभार. तुम्ही खूप छान प्रसिद्धी कँपेन केलीत. तुम्ही संपूर्ण चित्रपट बघा आणि तुमचं खरंखुरं मत नक्की नोंदवा, आमच्यासाठी ते खूपच गरजेचं आहे' हे आवर्जून आम्हाला सांगितले.

एकूणच सोहळा सुरू व्हायला झालेला उशीर आणि घड्याळाचे पुढे धावणारे काटे यांचा विचार करत आम्ही सिनेमा मध्यंतरापर्यंत बघून निघायचे ठरवले. सिनेमा पूर्ण पाहिलेल्या मायबोलीकरांकडून चित्रपटाविषयी वृत्तांत येईलच. आम्हाला 'फर्स्ट डे हाफ शो' बघितल्याची हळहळ आहे, त्याचे प्रायश्चित्त म्हणून सिनेमा पूर्ण पाहिल्यावरच परीक्षण लिहू.

'देऊळ' सिनेमाविषयी मायबोलीवर सादर केलेल्या स्पर्धा-खेळांमुळे, मुलाखतींमुळे तुम्हालाही सगळ्यांना चित्रपट बघण्याची प्रचंड उत्सुकता असेलच, तुमची निराशा होणार नाही एवढी माझ्याकडून खात्री Happy

Groups audience: 

छान आणि मोजकं लिहिलं आहेस!

मला चित्रपट आवडला. दिग्दर्शन, अभिनय, शूटींग(छायाचित्रण म्हणतात ना हो? :)) छानच!
लोक्सांनो, तुम्ही एकदा चित्रपट पाहून आलात की मग इथे अजून लिहेन.. Wink

आजूबाजूच्या परिस्थितीवर डायरेक्ट-इनडायरेक्ट, सूचकपणे, मर्मिकपणे भाष्य करणारा चित्रपट... उषा नाडकर्णी धम्माल! मालिकांचं गुंतणंही भारी! मंदिरातला अभंग खूप आवडला... गिरीश कुलकर्णींचा अगदी सहज अभिनय...

नाणेघाट दिसल्यावर कुणीतरी ओळखीचं भेटल्याचा फील आला.. Happy

मंजू, मस्त लिहिला आहेस वृत्तांत.

भले भले कलाकार यात आहेत. त्यातल्या कुणा कुणाच्या वाट्याला छोट्याच भुमिका आहेत पण त्यातही त्यांचे टॅलेंट दिसून येते, आतिशा नाईकची सरपंच असो की उषा नाडकर्णींची सरपंचांची सासू असो. गिरीश कुलकर्णी, मोहन आगाशे, नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी यांच्याबद्दल काय बोलणार? महान आहेत.

कितीतरी प्रसंगांतून एकदम खुसखुशीत विनोद निर्मिती केली आहे. सरपंचांना बोलावणं येतं आणि सरपंच आल्यावर एकदम स्वयंपाकघरात जाऊन सोनालीबरोबर लाडू वळायला बसतात आणि एकीकडे माजघरातील पुरुष मंडळींबरोबर बोलतात. आतिशा लाडू वळायला बसल्याबरोबर मला खुसुखुसु हसूच यायला लागलं.

मी पण अर्धाच सिनेमा पाहिला Sad

गिरिश कुलकर्णी एकदम धावपळीत असूनही त्यांना भेटल्यावर त्यांचं खूप छान रेसिप्रोकेशन मिळालं.

ज्योती सुभाष यांची गॉगल लावून टिव्ही बघणारी म्हातारी असो. <<
दोघी वेगळ्या आहेत गं.
गॉगलवाली म्हातारी टॉम्या उर्फ जांबुवतराव (हृषिकेश जोशी) च्या घरातली.
ज्योती सुभाष केश्याची (गिरीश) आई.

चित्रपट बघायची उत्सुकता निर्माण केली आहे या लेखाने. इथे बसल्यबसल्या कालच्या कार्यक्रमाचा 'फील' दिल्याबद्दल धन्यवाद.

मस्तच. मला मायबोलीचा लोगो दिसला का हेच विचारायचं होतं..

अ‍ॅडमिन आणि इतर माध्यम प्रायोजक, मायबोली माध्यम प्रायोजक आहे अशी प्रेस रीलीज काढली असती तर...!! Happy

निखिल (आडनाव आठवत नाही,>>>> रत्नपारखी? "मसाज" वाला !!
मस्त वृत्तांत, चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे..
आभार मंजुडी Happy

>.सिनेमा सुरू झाल्यावर श्रेयनामावलीत मायबोलीचा लोगो एकदम ठळक, सुस्पष्ट आणि मस्त दिसला आणि अंगावर शब्दश: रोमांच उभं राहिलं>> मस्त!!
छान वृतांत मंजे.
मायबोली परिवारासाठी खास शो ठेवणार का? Proud

मस्त वृ Happy सिनेमा बघण्याची उस्तुकता वाढलेय आता Happy

मी ह्यावेळी तुमच्या बरोबर हाफ का होईना हा सोहळा बघायची संधी मिस केली Sad असो जमेल तेव्हा बघेनच Happy

मस्तं लिहिलंयस. उत्सुकता वाढवलीये इतकं नक्की. 'देऊळा'त जायचा योग कधी जमतोय ते पाहूया. थोड्या दिवसांनी हाऊसफुल्लचा बोर्ड पहायला मिळोत एवढीच आशा.

सध्या वृत्तपत्रांच्या जाहिरातीमधे मायबोलीचा लोगो झळकतोय त्याबद्दल अभिनंदन.

मस्त वृ.

काल खरेच मजा आली. मलाही याआधी कोणी असले आमंत्रण दिले नव्हते त्यामुळे मीही अगदी आनंदाने गेले कार्यक्रमाला Happy

मायबोलीचा लोगो दिसल्यावर खुप आनंद झाला. मी आईला दाखवला लोगो, 'ती बघ आमची मायबोली दिसतेय तिथे' म्हणुन. मी दिवसभर माबो माबो म्हणुन बडबडत असते तिथुन चित्रपटाच्या प्रिमियरची निमंत्रणे येऊ शकतात याचे तिला आश्चर्य वाटले. (माबो जॉइन करायची काही फी आहे का? हेही विचारुन घेतले तिने लगे हाथ Happy )

चित्रपट अर्धाच पाहिला. संवाद अगदी चुरचुरीत, पंचेस अगदी दणकेबाज आहेत, गावच्या भाषेचा लहेजा चांगला साधलाय आणि कलाकारांकडुन कामेही अगदी व्यवस्थित करुन घेतलीत. चित्रपट पाहताना डोळ्यांना/कानांना फारसे काही खटकत नाही. बाकीचे परिक्षण तज्ज्ञ मंडळी करतीलच. उरलेला अर्धा पाहण्याची अर्थातच उत्सुकता आहेच. जवळच्या चित्रपटगृहात लागलायही. तेव्हा शुभस्य शीघ्रम करावे हेच योग्य. Happy

अरे वा. आगे बढो. फोटो कुठे आहेत प्रीमियरचे.
जिप्सी होता ना तिकडे म्हणजे मायबोलीचा ऑफीशियल फोटोग्राफर होता की समारंभाला, तेव्हा जिप्सी तू फोटो टाकले नाही तर तुला अजिबात माबोवर येऊ देणार नाही Proud

कधी बघायला मिळणार देऊळ? Sad
छानच वृत्तांत...
सिनेमा सुरू झाल्यावर श्रेयनामावलीत मायबोलीचा लोगो एकदम ठळक, सुस्पष्ट आणि मस्त दिसला आणि अंगावर शब्दश: रोमांच उभं राहिलं.>>>>>>> रोमांच उभे राहिले पाहिजे ना? वाचताना थोडं खटकलंय म्हणून सांगितलं Happy

बाकी मी गिरीश कुलकर्णीची मी गंध , गाभ्रीचा पाऊस, विहिर बघितल्यापासून डायहार्ड फॅन झालेली आहे Happy

आमच्या इथे "बहार" ला लागला आहे. उद्याच जाऊन पहायचा अस ठरवलं आहे.
बहारला कुठल्याही सिनेमाला इनमिन तीन प्रेक्षक असतात.
देऊळ ने त्या सिनेमागृहाची ही परंपरा मोडीत काढावी हीच इच्छा .
<<मायबोलीसाठी तर हि फक्त सुरवात आहे. पुढेमागे मायबोलीच निर्मिती क्षेत्रात उतरली तर नवल वाटायला नको.>>
दिनेशदा तुम्हाला किलोभर साखर Happy

मल्टीप्लेक्स? नाही ग माझ्या मते एकच स्क्रीन आहे. मी तिथे एकदाच गेले होते. २-३ आठवड्यांपूर्वी "मौसम" बघायला.संद्याकाळी ६ वाजता.मी आणि मैत्रीण.
बुकिंग क्लार्क म्हणाला . तुम्ही दोघीच प्रेक्षक आहात म्हणून दाखवू शकत नाही.
पण तुम्ही ६.१५/६.२० पर्यंत येऊन बघा . जर थोडे प्रेक्षक आले तर आम्ही दाखवू. तसे ६.२० ला गेलो.
तर वौचमन नी हसून स्वागत केलं.या या या म्याडम अजून चार प्रेक्षक आले आहेत.:)
अशा प्रकारे टोटल ३५० आसन व्यवस्था असलेल्या सिनेमागृहात आम्ही ६ प्रेक्षकांनी " मौसम " सिनेमा बघितला:)
सिनेमागृहाच नाव "बहार " च आहे .

Pages