जाहीर बातमीफलक - उपक्रम - सावली ट्रस्टच्या विद्यार्थि-विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मदत

Submitted by सुनिधी on 31 October, 2011 - 13:43

नमस्कार मायबोलीकर.

पुण्यातील सावली सेवा ट्रस्ट या गरीब व गरजू तसेच बुधवारातील देहविक्रय करून उपजीविका कमावणार्‍या स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्या मुलामुलींच्या उच्च शिक्षणासाठी काम करणार्‍या सेवाभावी संस्थेला गेल्या महिला दिन उपक्रमात मायबोलीच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा मदत केली व त्या अंतर्गत चार मुलांच्या शिक्षणाचा वार्षिक खर्च उचलला.

त्यानंतर काही जणांनी 'सावली' ला मदत करण्याविषयी विचारणा केली होती. ही संस्था आपल्या मदतीवरच जास्त करुन चालत असल्याने संचालिका मृणालिनी भाटवडेकर ह्यांना दिवाळीअगोदर संपर्क केला असता त्यांच्याकडुन संस्थेच्या मुलामुलींना शिक्षणमदत आणि त्या व्यतिरिक्त दिवाळीनिमित्त त्या मुलामुलींना नवीन ड्रेस घ्यायला जमेल तशी मदत कोणी करु शकले तर खुप चांगले होईल असे सांगण्यात आले. एक चांगल्यापैकी ड्रेस ७०० पर्यंत येऊ शकतो. कॉलेजमधे जाणारे आहेत त्यांना थोडा जास्ती. अशी ६०-७० मुले-मुली आहेत, अशी माहिती मिळाली. ही माहिती संयुक्तावरील मैत्रिणींना समजल्यावर त्यांनी ताबडतोप मदत पाठवायला सुरुवात केली व पाहता पाहता २५००० रुपये जमले. दिवाळी अगोदर ती रक्कम 'सावली' ला सुपुर्त करण्यात आली. त्यातून किमान ३०-३२ ड्रेसेस ची सोय होऊ शकली. मुलांना खुप आनंद झाला असे भाटवडेकर मॅडमनी सांगितले.

आता एका महत्वाच्या उपक्रमाला सुरु करत आहोत त्याची माहिती आपणा सर्वांपर्यंत पोचवत आहोत. हा उपक्रम आहे 'सावली' च्या मुलामुलींना शिक्षणासाठी मदत.

'सावली' ची ही मुले/मुली अतिशय हुषार व मेहनती आहेत. बुधवार पेठेसारख्या वस्तीतुन आलेली आहेत. ती लहानपणापासुन गरिबी, असुरक्षितता, सदैव भांडणे, अपमान, भीती अशा वातावरणात वाढलेली असतात.
त्या सर्व मुलांना एकत्र करुन त्यांच्या आयांच्या व मुख्य म्हणजे त्या मुलीमुलींच्या मनात बाहेरच्या जगाबद्दल विश्वास निर्माण करुन त्यांना शिक्षणाठी तयार करणे, त्यांचे अशांत मन शांत करुन जगायला प्रवृत्त करणे हे काम 'सावली' करते.

भाटवडेकर मॅडमना हा विश्वास पैदा करायलाच ५-६ वर्षे लागली व हळुहळु मुलेमुली ह्यात आनंदाने, विश्वासाने सहभागी होउ लागली.

आज १०० मुले 'सावली' तर्फे शिकत आहेत. काही मुले शिक्षण संपवुन नोकरीला लागलेली आहेत व १०-१५ हजार रुपये पगारावर नोकरी करत आहेत. कॉलेजात जाणार्‍या काही मुलींना 'त्या' व्यवसायात जावे लागु नये म्हणुन कॉट बेसिसवर 'सावली' ने ठेवले आहे. मुलामुलींना 'सावली' तर्फे ज्या कोर्स ला घालता येऊ शकेल (सावलीकडे ह्या मुलांना महागडे शिक्षण देण्याइतके फंड्स नाहीत) त्याला घातले जाते व त्यावर ते नंतर बर्‍यापैकी नोकरी मिळवतील असे पाहिले जाते. उदा. काही मुली नर्सिंग चा कोर्स करतात. नर्सेस ना मागणी असल्यानी त्या लगेच आपल्या पायावर उभ्या रहातात.

'सावली' ची माहिती मुळात अरुंधतीकडुनच मिळाली आहे व वेळोवेळी अरुंधतीने हा उपक्रम सुरु करण्यासाठी लागणारी मदत केली आहे.

अरुंधती कुलकर्णी ह्यांच्याकडुन मिळालेली महत्वाची माहिती,
आमच्याकडे कामाला येणार्‍या बाईंच्या दोन्ही मुलींच्या शिक्षण खर्चाची जबाबदारी जेव्हा सावली ट्रस्टमार्फत कोणी उचलली तेव्हाच त्यांचे शालेय शिक्षण शक्य झाले आहे. अन्यथा त्यांना मोलमजुरी किंवा धुणीभांडी करायला लागली असती. आणि त्यांची स्थिती बरी म्हणावी एकवेळ, अशा पार्श्वभूमीच्या मुली व मुलांना तिथून मदत मिळते आहे.

सावली ट्रस्टमार्फत मदत केल्या जाणार्‍या प्रत्येक इयत्तेच्या मुलींचा भाटवडेकर बाईंनी एक छोटासा ग्रूप बनवलाय. या मुलींच्या शाळेतील शिक्षकांनाही ग्रूप संकल्पनेमुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला सोपे जात आहे, आणि भाटवडेकर बाईंनाही त्या मुलींना मार्गदर्शन करणे, त्यांच्या प्रगतीचा - घरच्या स्थितीचा आलेख ठेवणे सोपे जाते. या मुली एकमेकींना अभ्यासात मदत करतात, तसेच स्पर्धेच्या भावनेतून जास्तीत जास्त मेहनत घेऊन अभ्यास करण्याचे वातावरण जतन करायला त्याची मदत होते. तसेच प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे एक मुलगी दुसरीचा आधार बनते, तिला मदत करते. त्यांच्या घरी त्यांना जर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली तर या मुली एकमेकींना मदत करू शकतात, तसेच ताबडतोब भाटवडेकर बाईंपर्यंत त्याबद्दल निरोप जातो.

या मुली ज्या वस्तीत राहतात तिथे सतत भांडणे चालू असतात. एका घराला खेटून दुसरे घर. रस्त्यावरच बराचसा संसार. वस्तीत येणारे-जाणारे, विकृत नजरेचे व व्यवहाराचे अनेकजण. विचित्र आहे वातावरण. पण त्यातून या मुलींना सुरक्षित ठेवायचे म्हणजे सोपे काम नाहीए. या मुलींना ''धंद्यात'' न घालण्यासाठी वा त्यांची विक्री न करण्यासाठी तसेच त्यांचे शिक्षण जारी ठेवण्यासाठी कित्येकदा त्यांच्या घरी किराणा भरणे, त्यांचे वा त्यांच्या आईचे वैद्यकीय खर्च करणे, गरजेप्रमाणे काही वस्तूची मदत देणे अशी कसरतही करावी लागते. पण ते अपरिहार्य आहे. पुढे कॉलेजात गेल्यावर त्या ''कमवा व शिका'' धर्तीवर छोटे-मोठे जॉब्ज करून शिक्षण + नोकरी करतात. वेश्याव्यवसायात न पडण्यापासून त्यांना केवळ आणि केवळ त्यांचे शिक्षणच वाचवू शकते आणि सन्मानाने जगण्याची एक चांगली दिशा देऊ शकते.

धन्यवाद अरुंधती!!!

वर्षाखेरीस 'सावली' आपल्याला त्या मुलांचे निकाल व प्रगती कळवतील. संस्थेचा ऑडीट रिपोर्ट पण कळवतील.
संस्थेचा प्रशासनावर शून्य रुपये खर्च होतो. तुम्ही देणगीरूपात दिलेला प्रत्येक पैसा मुलांच्या कल्याणासाठी वापरला जातो हे संस्थेने आवर्जून कळविले आहे.

वर लिहिल्याप्रमाणे 'सावली' संस्था आपल्या मदतीवरच चालते त्यामुळे हा उपक्रम मायबोलीवर जाहीरपणे राबवला गेला तर खुप मुलामुलींचे कल्याण होऊ शकेल ह्या हेतुने हा दुवा चालु केला आहे.

आर्थिक माहिती-

एका मुलाचा/मुलीचा १ वर्षाचा शैक्षणिक खर्च ५००० रुपये असतो. ह्या मुलामुलींना एकाने सलग ३ वर्षे मदत केली तर त्यांचे कॉलेज शिक्षण व्यवस्थीत पुर्ण होईल व डिग्री मिळेल.

आपल्याला कोणालाही ह्या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर कृपया इथे वा ईमेल ने कळवु शकता.
सहभागी व्हायचे असेल तर सध्या अशी माहिती लागेल,

१. तुम्हाला किती मुलांना/मुलींना मदत करायची इच्छा आहे?
२. ह्याचे उत्तर देणे शक्य असेल तर छान - किती वर्ष तुम्ही ही मदत करु शकता? त्या मुलीचे शिक्षण पुर्ण होईपर्यंत जमेल का? (सध्या तरी १ वर्ष असेच धरुन चालत आहे).
३. तुम्हाला त्या मुलींशी पत्रव्यवहार करायचा असेल तर तुमचा (शक्यतो) भारतातला पत्ता. कारण ती मुले-मुली परदेशी पत्र कितपत पाठवु शकतील माहीत नाही. प्रीपेड पाकीट पण त्यांना पाठवु शकता जेणेकरुन मुले आपल्याला पत्र लिहु शकतील. ईमेल पाठवायचे झाल्यास तुम्ही ते भाटवडेकर मॅडमना पाठवू शकता, जे त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करता येईल.

ही माहिती मिळाल्यावर प्रत्येक सदस्याला स्वतंत्र ईमेल करु.
मुलामुलींची माहिती जाहीर न करता प्रत्येकाला त्यांची मदत ज्या विद्यार्थ्यासाठी वापरली जाणार आहे त्याच मुलांची/मुलींची माहिती पाठवु व जमल्यास पत्ते पण. भाटवडेकर मॅडमना पण त्यात कॉपी करु. सदस्यांना पत्राद्वारे मुलामुलींशी संपर्क करायला हरकत नसेल तुमचे पत्ते ईमेल ने कळवा.

सध्या मलाच संपर्क करा.

खाली सुपंथ च्या खात्याची माहिती देत आहे. तुम्ही त्यावर पैसे पाठवु शकता. मेमो 'सावली शिक्षण फंड' असा लिहावा.

Account holder name : Kedar Joshi
Bank : ICICI
Branch : Shivajinagar, Pune
Account number : 003901032042

केदार जोशी ह्यांनी दिवाळी ड्रेस उपक्रम व ह्याही उपक्रमासाठी सुपंथतर्फे मदत करण्याची नेहमीप्रमाणे तयारी दाखवली आहे, आणि ते तशी मदत करतही आहेत, त्याबद्दल त्यांचे मनापासुन आभार.

मृणालिनी भाटवडेकर.
त्यांचा संपर्क क्रमांक : ९८२३२७०३१०
पत्ता : ई १००४, ट्रेझर पार्क, संतनगर, पर्वती, पुणे ९.

धन्यवाद!!

काहीही प्रश्न असतील तर इथे लिहावेत.

*** आजतागायत मायबोलीकरांनी संयुक्ता सुपंथ उपक्रमातून 'सावली'तील एकूण २६ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. मायबोलीकरांच्या विधायक जाणिवांची व प्रयत्नांची ही यशस्वी पावतीच म्हणता येईल!


**** ता. क. - हा न संपणारा उपक्रम आहे त्यामुळे ह्या उपक्रमात आपण केव्हाही सहभागी होऊ शकता. आपली इच्छा आम्हाला ईमेल ने कळवु शकता किंवा इथे पण लिहु शकता ****

सावली सेवा संस्थेने दिलेले आभारपत्र
maayboli sanyukta supanth thanks certificate PDFOnline.pdf

सावली संस्थेतील मुलांना दिलेल्या भेटीचा हा वृत्तांत : http://www.maayboli.com/node/32497

मागोवा -

ह्या मायबोली उपक्रमातर्फे १० फेब्रुवारी २०१२ पर्यं एकुण २७ मुलांची ह्या वर्षीच्या शिक्षणाची सोय केली गेली आहे. ह आकडा जसा बदलेल तसे इथेच बदल करत राहु.

अजुनही देणगीदार संपर्क करत आहेत.
ह्यातल्या काहींनी ३ वर्षाची देखील एकदम सोय केली आहे. काही जणांनी एकापेक्षा जास्त मुलांची जबाबदारी उचलली आहे.
सर्व देणगीदारांना त्यांच्या मानस अपत्याची माहिती व फोटो पाठवले आहेत. व पावत्याही पाठवल्या आहेत.

सर्व देणगीदारांचे खुप आभार.
खालील व्यक्तींकडुन ह्यासाठी नेहमीच मदत झाली व होत राहील.
केदार जोशी - त्यांच्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातुन वेळोवेळी सुपंथतर्फे सावलीला आलेल्या देणग्या लगेच पाठवल्या.
अरुंधती कुलकर्णी - सतत सावली च्या भाटवडेकर मॅडमना संपर्क साधुन त्यांच्याकडुन लागेल ती माहिती घेतली व आपल्याला पुरवली.
भाटवडेकर मॅडम - कितीही रात्री फोन केला तरी सर्व माहिती लगेच लिखीत स्वरुपात दिली. ह्यापुढेही त्या सर्व मुलांची प्रगती, संस्थेचा अहवाल वगैरे योग्यवेळी पाठवत रहातीलच.
वेबमास्तर - मायबोली तर्फे हा उपक्रम करु दिला हे कधीच विसरता येणार नाही व उपक्रमाबाबत मार्गदर्शन पण केले.
संयुक्ता - संयुक्ता मधुन वेगवेगळ्या कल्पना पुढे आल्याने होऊ शकला.

ह्यापुढे सावलीचे अहवाल सर्व देणगीदारांना ईमेल मधुन पाठवले जातील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावली संस्थेच्या भाटवडेकर मॅडमनी संयुक्ता सुपंथ तर्फे ज्या मुलामुलींचे शिक्षण आपल्या मायबोलीकरांनी प्रायोजित केले आहे त्या मुलामुलींचे वार्षिक निकाल पाठविले आहेत. त्या त्या प्रायोजकांना त्यांनी प्रायोजित केलेल्या मुलामुलीचा निकाल पाठवणारच आहोत.
इथे नाव उघड न करता लिहितेय, यातील एका मुलीला बी एस सी तृतीय वर्षाला ७०% मिळाले व तिला एम सी एस ला अ‍ॅडमिशन मिळाली असून लीला पूनावाला फाऊंडेशनची शिष्यवृत्तीही तिला मिळाली आहे. (एमसीएस ची फी ५०,००० रुपये होती. २०,००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली.)
एका मुलीला बारावीला ८३% पडले व तिने बी सी ए साठी अ‍ॅडमिशन घेतली आहे.
एका मुलाला व्ही आय टी इंजिनियरिंगला कॉम्प्युटर इंजिनियरिंगला प्रवेश मिळालाय.
एका मुलीला सिंहगड इंजिनियरिंग कॉलेजला कॉम्प्युटर इंजिनियरिंगला प्रवेश मिळालाय.
एका मुलाला एमबीएला अ‍ॅडमिशन मिळाली आहे.
एकीला बारावीला ७०% मिळाले आहेत.
एका मुलाला इलेक्ट्रिकल डिप्लोमा द्वितिय वर्षाला ६३% मिळाले आहेत.

असेच इतर मुलामुलींचे निकाल त्यांनी पाठवलेत. सुनिधी त्या त्या देणगीदात्यांना निकाल पाठवणार आहेच.
एकूणात आतापर्यंत मायबोलीकरांनी ३१ मुलांचे शिक्षण प्रायोजित केले आहे. ही मुले जिद्दी, मेहनती आहेत. घरच्या बिकट परिस्थितीतून, बकाल वातावरणातून शिक्षणाच्या ताकदीवर बाहेर येऊ पाहत आहेत. त्यांच्या पंखांमध्ये बळ येण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने दिलेले योगदान मोलाचे ठरणार आहे.
सर्व देणगीदात्यांचे मनःपूर्वक आभार. Happy

दिवाळीसाठी जर कोणाला या मुलामुलींसाठी नवे कपडे प्रायोजित करायचे असतील तर अवश्य सांगा. त्यांनाही दिवाळीचे खूप अप्रूप असते. आपली ही लहानशी कृतीही त्यांचा उत्साह वर्षभर टिकवण्यासाठी, त्यांना उत्तेजन देण्यासाठी पुरेशी ठरते. Happy

बघताबघता सावली-शिक्षण उपक्रमाला एक वर्ष पुर्ण झाले. २०१३ हे ह्या उपक्रमाचे दुसरे वर्ष.

सर्व देणगीदारांना मुलांचे निकाल कळवण्यात आले व संस्थेचा वार्षिक अहवाल देखील पाठवण्यात आला. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत रहात असुन देखील सर्व मुले पास झाली आणि काहीजण तर उत्तम मार्काने पास झाले.
एका मुलीचे शिक्षण संपल्यावर योग्य तरुणाशी लग्न झाले. दोघांना छान नोकरी आहे आणि दोघे खुष आहेत. पुढील उच्चशिक्षण ती आपल्या पायावर उभी राहुन घेऊ शकेल.

ह्याहीवर्षी हा उपक्रम आपण पुढे चालु ठेवला आहे.

ज्या देणगीदारांनी मदत पाठवली त्यांना ईमेलने देणगी पोचल्याचे कळवण्यात आले आहे. फक्त एका देणगीदाराचे नाव कळु शकले नाही. जर त्यांना टॅक्स साठी पावती हवी असेल तर ईमेल नाव कळवु शकता.

आत्तापर्यंत जमा झालेली रक्कम ह्या आठवड्यात सावली संस्थेला पाठवत आहोत व त्यांच्याकडुन टॅक्स ची पावती मिळाली की तुम्हाला लगेच पाठवु.

अजुनही राहिलेल्या कोणाला देणगी पाठवायची असेल तर स्वागत आहे. धाग्यावर 'सुपंथ' ची माहिती दिलेली आहेच.
मेमो मधे 'सावली-शिक्षण' असे नमुद करावे.

पुन्हा एकदा सर्व दात्यांचे मनापसुन आभार.

'सावली' उपक्रमाला यथाशक्ती मदत पाठवली आहे.
सुनिधी, एका चांगल्या उपक्रमाची ओळख करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
सावलीच्या मुलामुलींना खूप शुभेच्छा आणि अनेक शुभाशिर्वाद. भरपूर शिका. मोठे व्हा.

Pages