मनाचिये गुंती...

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

जीवनाचा अनादि, अनंत प्रवाह, त्यातून तुमच्या आमच्या ओंजळीत येणारे काही क्षण. कधी रेशीमलडींसारख्या उलगडणार्‍या तर कधी धारदार पात्यासारख्या लखलखणार्‍या जाणिवा. अवतीभवतीच्या जगातले आपणच लोक आपापल्या परीनं एकमेकांची सुखदु:खं वाटून घेत असतो, साथसंगत करत असतो, नातीगोती जपायचा मनापासून प्रयत्न करत असतो. कधी रीत तसं करायला भाग पाडते म्हणून तर कधी अंतरंगात दाटणारी प्रीत, म्हणून.

अख्ख्या जगाबरोबरीने जुळवून घेताना, कधी वाट्याला आलेली, तर कधी असोशीने आपलीशी केलेली नाती जपत असताना, कधी ह्याचं मन, तर कधी तिचं मन जपताना आणि अशाच तर्‍हेने आणखी कोणाकोणाची मनं जपत जगू पाहताना, एखाद्या लख्ख क्षणी स्वतःलाच उलगडू पाहतं स्वतःचं मन. नजरेला नजर भिडवत, आपल्याला त्याच्या अस्तित्त्वाची ओळख पटवू पाहतं.

मनातले सारे उत्कट भाव पुरासारखे
थांबतात मनाच्या उंबरठ्याशी येऊन

आपल्याच मनाशी नातं जुळतानाचा हा प्रवास इतकाही काही सोपा नसतो. मृदूमुलायम पायघड्या घातलेल्या नसतात. सारं काही स्पष्ट दिसासमजायला आणि आहे तसं उमजायला, कित्येक दरवाजे अजून धडका मारून उघडायचे असतात. पलिकडे जे काही असेल, त्याच्याशी डोळा भिडवायची आहे का हिंम्म्मत? का खात्री नाही, म्हणून बंदच दरवाजे?

मग पटापट मिटूनच गेले दरवाजे
नंतर शिवलेले ओठ, गिळलेली आणभाक
अणि एका बंद दाराशी उभी मी
माझेच घर होते ते, पण दरवाजा उघडलाच नाही..

जगापासून लाख जपाल, जगापासून लाख लपाल. मनापासून कसं जपाल? मनाला फसवून, मनाला नाकारत कुठे लपाल? जगाच्या कोलाहलात हरवाल? की दूर दूर कोणता तरी सांदीकोपरा शोधाल? पण मनाला काहीच वर्ज्य नाही, मनाला कुठेच अटकाव नाही. ते शोधतं तुम्हांला अचूक. फार काही प्रश्न वगैरे विचारत नाही. फक्त नजर देतं तुमच्या नजरेला. अनेक प्रश्न असतात त्या नजरेत. अजून बरंच काही. आव्हानं असतात, पर्याय असतात. आवडती तर कधी नावडती उत्तरंही. पेलू शकत असलात तर तुम्हारी बलासे, नाही जमलं पेलायला तर? तरीही तुम्हारी बलासे. मनाला सोयरसुतक नाही. ते फक्त आरसा दाखवणार.

देहाच्याही आत किती दूरदूरचे किनारे
किती सागरांवरुन येती अनोळखी वारे...

जगण्याच्या अफाट रेट्यामध्ये अचानक, अनपेक्षितरीत्या स्वतःचंच मन असं समोर येऊन उभं ठाकतं. नेहमी साथ संगत करणारं हे मन कधीतरी जीवघेणी कोडी घेऊनही सामोरं येतं. प्रसंगी अनोळखी बनून जातं. सहसा बळ देणारं मन कधीतरी एखाद्या श्रांत, क्लांत क्षणी थकून, स्वतःच दुबळं बनून तुकड्यां तुकड्यांत विखरत राहतं. एक तुकडा इकडे, एक तुकडा तिकडे... माझा तुकडा नकी कोणता? कोणता म्हणायचा आपला? हे सगळे तुकडे एकत्र सांधणं म्हणजे परीक्षा. हे कोण आहे नक्की? माझंच ना हे मन?

जन्मापासूनची जरी ही आहे संगत, आहे का विश्वास?
वाढलो एकत्र म्हणून म्हणावा काय सहवास?

कधीतरी उभा दावा मांडतं मन. आपलंच असतं, - आपल्याच आधाराने रहात असतं, की आपण राहतो मनाच्या आधाराने? - पण मस्ती तर बघा! आपला काही काही इलाज चालत नाही. हवं तसं फरफटत नेतं आपल्याला, त्याच्या जगात. नाना प्रकारच्या इच्छा, संवेदना, राग-लोभ हे सारं सारं कुठून येतं? श्वास कोंडायला लावणारे प्रश्न, घुसमट करुन टाकणारी सत्यं.. खजिनाच असतो मनापाशी. कुठून जमवतं? कुठे दडवतं? नेमक्या एखाद्या तलम अचूक वेळीच आपल्याला आठवणही करुन देतं. सुख आणि दु:खांच्या नुसत्या तलम धूसर आठवणींवरही जीव प्राण कंठाशी येईपर्यंत झुलवत ठेवतं. तुमच्या आमच्या सवडीनं, कधीतरी निवांत वेळी प्रकाशाची उबदार तिरीप अलगद तुमच्यापर्यंत आणून सोडणार्‍या खिडकीत बसून शिळोप्याच्या गप्पा केल्यासारखं, अलवारपणे गुपित वगैरे सांगितल्यासारखं वागायला सवड नाही मनापाशी. हजार सुया एकाच वेळी भोसकाव्यात तसं प्रश्नांची, जाणिवांची उधळण करतं मन. बघता बघता छिन्न विछिन्न करुन टाकतं. सावरायचे सोहाळे मागाहून करायचे.

या वेदना, संवेदना, ही स्फुरणे, हे हर्षविषाद
हा कुणाचा दारुण शाप? हा कुणाचा महाप्रसाद?

आयुष्याचा गूढ, अनाकलनीय चेहरा, त्याच्याशी डोळे भिडवून पाहणारं मनच. सगळी सुखदु:खं, आनंद, विषाद, आशा, निराशा ह्या सार्‍यासार्‍याला आपल्या ठायी आसरा देणारं, आपलंस करणारं आणि कुठेतरी तळागाळात लपवून ठेवून जपणारंही मनच. प्रसंगी भांबावणारं, भयभीतही होणारं आणि तरीही प्रत्येक टप्प्यावर इतर कोणी साथ दिली नाही, प्रसंगी स्वतःची सावलीही दूर झाली, तरीही उभा जन्म आपली अंतःस्थ शक्ती पणाला लावून तोलून धरणारं मन.

अर्ध्य जसा ओंजळीत धरला जन्म उभा शिणलेला..

कधीतरी मनाशी नजरभेट करायची आणि मनाची लख्ख नजर तोलायची उमज येते. ती आली, की हळूहळू सूर लागतो, मनोमन संवादाचा एक सलग धागा जुळतो. भोवतीने पसरलेला कोलाहल विरु लागतो, काळोख उजळू लागतो. मुक्ततेच्या सोहळ्याला सुरुवात झाली का?

सर हलकीशी येऊन जाता
मेघ मिळाला मजला
एकरुप मी होता त्याशी
वणवा आतील विझला..

ही तर नुकतीच सुरुवात.. तुमचं आमचं टोचणारं दु:खं, सलणारे अपमान, खुपणारे पराभव, झुळझुळणारी सुखं, ह्या सार्‍याचं गाठोडं तर बांधलेलं असतंच मनाने. ह्याची स्वीकृतीही शिकवतं मन. आनंदसोहळा आता फार दूर उरलेला नसतो. अंतरात जमलेली महफिल आता सरणार नसते.

अंतर्यामीचे काही जोडीत अबोध नाते
दूर राईत एक पाखरु मंजूळ गाते
ओल्या वार्‍याचा गालांओठांना सुखद स्पर्श
अंग शहारे आत दाटतो उत्कट हर्ष

जगामध्ये, जसा आनंदही भरलेला आहे, त्याचप्रमाणे विषादालाही जागा असणारच आणि, प्रत्येकासाठी कधीना कधी तोही भरुन वाहणार. सारी समष्टी एका सुखदु:खाच्या हेलकाव्यावर झुलत राहणार. जगाचा पसारा असाच.

ह्या सार्‍याचे मनाशी नाते जुळले, की ह्या सगळ्यांमधून झंकारणारा एक सुरेल नाद सर्व आयुष्याला व्यापून राहूनही उरेल, हे भान एकदा मनाने आणून दिले की अजून काय राहिले? मग एकच मागणे मागायचे..

गच्च अबोलपणाची सुटो मिठी जीवघेणी
वाचा स्वयंभू प्रकटो सारी उतरुन लेणी
नको शब्दांची आरास, नको निरर्थ सोहळा
एक सूर खरा लागो, उंच चढवून गळा!

ओळी स्व. शांता शेळके ह्यांच्या कवितांमधून.

विषय: 
प्रकार: 

पण मनाला काहीच वर्ज्य नाही, मनाला कुठेच अटकाव नाही. ते शोधतं तुम्हांला अचूक. फार काही प्रश्न वगैरे विचारत नाही. फक्त नजर देतं तुमच्या नजरेला.>>>फार सुरेख!

अगदी मनातलं Happy

मस्तंच. Happy
शांताबाई कवितेतून कधी भांडल्या नाहीत ना दैवाशी? त्यानंतरच्या पिढ्यात संतापायची जणु फॅशनच आली.
शांताबाई, इंदिराबाई शांत सौम्य राहिल्या पण म्हणून त्यांचे महत्त्व, त्यांचा खंबीरपणा काही कमी होत नाही. शैलीत फार जाणवते हे.

सुरेख!! शेवट्पर्यंत वाचेस्तोवर कविता खूप ओळखीच्या वाटत होत्या पण कोणाच्या कळत नव्हत्या.. शांता शेळके!! ग्रेट!! आणि त्या कवितांची लेखात तू केलेली गुंफण!! __/\__ Happy

धन्यवाद लोकहो. Happy

रैना, खरं आहे. 'अंतरीचे धावे' पुस्तकात भानू काळ्यांनी शांताबाईंबद्दल किती मनोज्ञ आठवणी लिहिल्या आहेत. अनौपचारिक साधेपणा हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते, हे काळ्यांनी आवर्जून नोंदवलेले आहे.

शैलजा, निव्वळ अप्रतीम लिहिलं आहेस.

ही तर नुकतीच सुरुवात.. तुमचं आमचं टोचणारं दु:खं, सलणारे अपमान, खुपणारे पराभव, झुळझुळणारी सुखं, ह्या सार्‍याचं गाठोडं तर बांधलेलं असतंच मनाने. ह्याची स्वीकृतीही शिकवतं मन. आनंदसोहळा आता फार दूर उरलेला नसतो. अंतरात जमलेली महफिल आता सरणार नसते.

अंतर्यामीचे काही जोडीत अबोध नाते
दूर राईत एक पाखरु मंजूळ गाते
ओल्या वार्‍याचा गालांओठांना सुखद स्पर्श
अंग शहारे आत दाटतो उत्कट हर्ष

ह्या ओळी विषेश आवडल्या. कारण त्या खूप '+' ve आहेत आणि तेच तर हवं ना.

Happy मस्त Happy

शैलजा, शांताबाईंचे सुंदर काव्य आणि त्याला तुझ्या लखलखत्या शब्दांचे तेवढेच सुंदर कोंदण ! अप्रतिम ! Happy

दिवाळीच्या मुहुर्तावर आम्हां मायबोलीकरांसाठी अशी सुंदर भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Happy

अतिशय सुंदर लिहिलंयस शैलजा... Happy फारच छान

मनाला काहीच वर्ज्य नाही, मनाला कुठेच अटकाव नाही. ते शोधतं तुम्हांला अचूक. फार काही प्रश्न वगैरे विचारत नाही. फक्त नजर देतं तुमच्या नजरेला. अनेक प्रश्न असतात त्या नजरेत. अजून बरंच काही. आव्हानं असतात, पर्याय असतात. आवडती तर कधी नावडती उत्तरंही. पेलू शकत असलात तर तुम्हारी बलासे, नाही जमलं पेलायला तर? तरीही तुम्हारी बलासे. मनाला सोयरसुतक नाही. ते फक्त आरसा दाखवणार.>>>>>>>>>>

हेच तर सत्य आहे, जेवढी तुम्ही त्याला नजरेला नजर देऊ शकाल तेवढे प्रामाणिक राहू शकाल.. Happy

जगामध्ये, जसा आनंदही भरलेला आहे, त्याचप्रमाणे विषादालाही जागा असणारच आणि, प्रत्येकासाठी कधीना कधी तोही भरुन वाहणार. सारी समष्टी एका सुखदु:खाच्या हेलकाव्यावर झुलत राहणार. जगाचा पसारा असाच.
ह्या सार्‍याचे मनाशी नाते जुळले, की ह्या सगळ्यांमधून झंकारणारा एक सुरेल नाद सर्व आयुष्याला व्यापून राहूनही उरेल, हे भान एकदा मनाने आणून दिले की अजून काय राहिले?>>>>>>>>>

ही तर मेडिटेशनची प्रोसेसच .. Happy

Pages