राधास्वप्न....

Submitted by पुरंदरे शशांक on 13 October, 2011 - 05:45

राधास्वप्न....

दूर शिखरावरती
शांत शांत ती निळाई
पात तृणाचीही गर्द
आज कशी ती सावळी

भास मना का गं होई
श्रांत कान्हा पहुडला
पुष्पे सुवर्ण कांतीची
शेला कटी मिरवला

शिरी शिखराच्या एक
वृक्ष भला बहरला
मोर पीस खोवि कैसे
जैसे मुरारी डोईला

मेघ नभींचे शिखरी
रुळे कुंतल कुरळे
वारा हळुवार सारी
दाही हाती त्या सावरे

उन मऊसे उतरे
मेघ थोडेसे सारुन
स्मित रेखा हरि मुखी
क्षणी जाते उजळून

नाद कालिंदीचा कानी
किती हळुवार येई
हरि अधर स्पर्शाने
वेणू गोड निनादली (शहारली)

रुप श्रीरंगाचे सये
दोन्हीं नयनी मावेना
मिटू घेता नवलाई
कान्हा अंतरी ठाकला......

गुलमोहर: 

व्वा....निसर्गाच्या रूपातूनही राधेला श्रीकृष्णाचे रूप समोर दिसते, याचे अनोखे वर्णन!
अप्रतिम कविता. राधेचे प्रेम निराळे तशी तिच्या स्वप्नांची कविताही निराळी.

फार सुंदर कविता शशांक!
होईन का मी पुन्हा बासरी? घेशील ओठांतूनी?
वाट पाहते तुझी राधिका, वृक्षावृक्षातूनी

"सांज ये गोकुळी" हे गीत आठवलं Happy
सुंदर!!!
होईन का मी पुन्हा बासरी? घेशील ओठांतूनी?
वाट पाहते तुझी राधिका, वृक्षावृक्षातूनी
सलाम उमेश!! छानंच!!