बटर चिकन ( जुन्या मायबोलीमधील कृती)

Submitted by संपदा on 24 September, 2011 - 16:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

१.बोनलेस चिकन १ कि.
२. क्रीम छोटी अर्धी वाटी भरून.
३. गरम मसाला २ टी.स्पू.
४. जिरे पूड, धने पूड प्रत्येकी १ टी.स्पू.
५. कसूरी मेथी १ टे.स्पू.
६. मीठ चवीनुसार.
७. हळद छोटा चमचाभर.
८. कोथिंबीर सजावटीसाठी.

ग्रेव्हीसाठी साहित्य:- १. मध्यम आकाराचे कांदे ५
२. आलं लसूण पेस्ट २ टे.स्पू.
३. टोमॅटो प्युरी १ वाटी भरून.( ह्याने ग्रेव्हीला सुंदर रंग येतो, ह्या ऐवजी ताज्या टोमॅटोची प्युरी करून वापरता येईल.)
४. तूप ३ टे.स्पू.
५. काजू १२- १५
६. खसखस १ टी.स्पू.
७. तिखट चवीनुसार.
८. केशर ८- १० काड्या.
९. काळे मिरे ८- १०.

क्रमवार पाककृती: 

१. बोनलेस चिकनचे तुकडे करून घेऊन त्याला आले लसूण पेस्ट, हळद आणि मीठ लावून २४ तास मॅरिनेट करावे.

२. ग्रील १८०° पर्यंत तापवून त्यात चिकन भाजून घ्यावे. वरून तांबूस रंग आला की ऍल्युमिनियम फ़ॉईल ने झाकून आणखी थोडावेळ भाजावे.

३.काजू गरम पाण्यात भिजवून ठेवावेत आणि केशराच्या काड्या गरम दुधात घालून ठेवाव्यात.

४. पातेल्यात तूप गरम करून खसखस, मिरे भाजून घ्यावे व बाजुला काढून ठेवावे. नंतर आले लसूण पेस्ट घालून चिरलेले कांदे घालून परतावे. कांदे तांबूस व्हायला पाहिजेत.

५. हे मिश्रण थंड झाले की त्यात मिरे, खसखस घालून वाटून घ्यावे.

६. पातेल्यात पुन्हा तूप गरम करून वाटलेले मिश्रण, टोमॅटो प्युरी, तिखट, गरम मसाला घालून उकळावे.

७. काजू वाटून त्याची पेस्ट ग्रेव्हीमध्ये घालावी. केशराच्या काड्या थोड्या चुरडून ग्रेव्हीत घालाव्यात.आवश्यकतेनुसार पाणी घालावे.

८. त्यात भाजलेले चिकन घालून आणखी १० मिनीटे उकळावे.

९. चवीनुसार मीठ घालावे. सर्वात शेवटी क्रीम घालावे आणि कसूरी मेथी चुरडून घालावी. (क्रीम घातल्यावर उकळू नये, त्यामुळे त्यातील तुपाचा अंश वेगळा होतो.)

१०. सर्व्ह करताना बारीक चिरलेली कोथिंबीर आणि उभा चिरलेला कांदा घालावा.

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यांवर अवलंबून आहे :) .
अधिक टिपा: 

१. मूळ कृतीमध्ये लेग पीसेस लिहिले आहेत पण मी नेहमी बोनलेस चिकनच वापरते .

माहितीचा स्रोत: 
सुधा मायदेवांचे लाजवाब सीरीजमधल्या " चिकन " पुस्तकातून साभार आणि स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात थोडीशी बीटाची पेस्ट घातली तरी रंग चांगला येतो.. पावभाजीलाही इतर रंग घालण्यापेक्षा बीटाची पेस्ट घातल्यास रंग छान येतो..

पाकृसाठी धन्यवाद Happy

पाकॄ छान आहे.
मला हे वाचल्यावर आठवले काल मी कसुरी मेथी घालायला विसरले होते Lol
फोटो का नाही ?
मी माझ्याकडचा जुना टाकते Happy ( बटर चिकन , कच्ची बिर्याणी, नान )

Butterchiken1.jpg