"काका" अशोक मांकड

Submitted by मुकुंद on 4 August, 2008 - 20:20

आजच्या विशी-तिशीतल्या क्रिकेटप्रेमींना अशोक मांकडबद्दल जास्त माहीती नसावी... पण माझे क्रिकेट समजणे.. गावस्करच्या उदयापासुन सुरु झाले.. म्हणजे १९७१-१९७२ पासुन.. त्यावेळच्या वाडेकरच्या टिमने भारताला इंग्लंड व वेस्ट इंडिजच्या दौर्‍यात प्रथमच विजय मिळवुन दिला होता.. त्या वेळेला अशोक मांकड हा सुनील गावस्करचा सलामी भागीदार म्हणुन काही टेस्टमधे खेळला होता... पण अशोक मांकड खर्‍या अर्थाने रणजी ट्रॉफी मॅचेसमधेच चमकला... त्याच्या दु:खद निधनानिमित्ताने मी इथे त्याच्याबदलची... मी स्वतः पाहीलेली एक ठळक आठवण टाकत आहे...

माझ्या लहानपणी.... म्हणजे ७० च्या दशकामधे ब्रेबॉर्न स्टेडिअमवर(१९७५ पर्यंत) व नंतर वानखेडे स्टेडिअमवर नुसत्या टेस्ट मॅचेसलाच गर्दी होत नसे तर रणजी ट्रॉफी फायनल व इराणि ट्रॉफी मॅचेसना सुद्धा तोबा गर्दी व्हायची... त्या काळात टेस्ट क्रिकेट्पटु रणजी मॅचेसमधेही भाग घ्यायचे ...कारण त्यावेळचे क्रिकेट कॅलेंडर आजच्या इतके बिझी नसायचे.. तर अश्या बर्‍याच रणजी ट्रॉफी मॅचेस व इराणि ट्रॉफी मॅचेस मी आधी वडिलांबरोबर व नंतर स्वतः जाउन पाहील्या आहेत. पण एक मॅच मात्र माझ्या स्मृतीत कायमची घर करुन गेली आहे.. ती म्हणजे १९८० ची मुंबई विरुद्ध दिल्ली रणजी फायनल....

वार्षिक परिक्षा झाल्या होत्या त्यामुळे वानखेडेवर ५ दिवस हा सामना बघायला जायची पर्वणी मी सोडणार नव्हतो... मला वानखेडेवरचे ते रणजी फायनलचे वातावरण खुप अवडायचे... नॉर्थ स्टँड मधे बसुन मुंबईची टिम कशी खेळते हे पाहणे म्हणजे एक पर्वणीच असायची... बाहेर... रॅलिफॅन किंवा तत्सम कंपनींज... कार्डबोर्ड कागदाच्या.... मागे इलॅस्टिक रबर असलेल्या...कॅप्स वाटायच्या.. मग त्या लाल-निळ्या रंगाच्या कॅप्स घालुन सगळे लोक वानखेडेवर आत यायचे... नॉर्थ स्टँड मधे बसुन्(टाटा एंड) समोर गरवारे पॅव्हेलियनची माणसे दिसतात..... गरवारे पॅव्हेलियनच्या डाव्या बाजुला... विट्ठलदास दिवेचा स्टँड दिसतो तर डाव्या बाजुला इस्ट स्टँड (आता त्याला बहुतेक सुनील गावस्कर स्टँड म्हणतात..) व त्याच्या वर उंच इन्कम टॅ़क्सची बिल्डिंग दिसते.. उजव्या बाजुला विजय मर्चंट स्टँड (वेस्ट स्टँड) व त्या मागुन मरिन ड्राइव्ह समुद्र किनार्‍यावरुन अधुन मधुन येणार्‍या.. मुंबईच्या उन्हाळ्यात आल्हाददायक वाटणार्‍या.. हवेच्या झुळुका.... अश्या त्या विहंगम सेटींगमधे क्रिकेट पाहणे .. तेही रणजी ट्रॉफी फायनल.. व तेही त्यावेळची मुंबईची रायव्हल टिम.. दिल्ली बरोबरची मॅच.... म्हणजे सर्व क्रिकेटप्रेमींना एक पर्वणीच होती...

बर एवढे सारे असुनही या सामन्याला अजुन एक वलय होते.. ते म्हणजे दिल्लीचा कप्तान बिशनसिंग बेदी व मुंबईचा लेजेंडरी डावखुरा फिऱकी गोलंदाज पद्माकर शिवलकर... या दोघांचेही हे बहुतेक रणजीमधले शेवटचे वर्ष होते... बेदीबद्दल तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे.. तो, प्रसना व चन्द्रशेखर.. या तिघांनी मिळुन १९६५ ते १९७९.. तब्बल १४ वर्षे.. सर्व क्रिकेट जगाला आपल्या फिरकी गोलंदाजीने अक्षरशः नाचवले होते... पण मुंबईचा पद्माकर शिवलकर हाही अव्वल दर्जाचा डावखुरा फिऱकी गोलंदाज होता व आपल्या फिरकी गोलंदाजीने त्याने एक वेळ मुंबईला १९६२ ते १९७५ .. अशी तेरा वर्षे लागोपाठ रणजी ट्रॉफी जिंकुन देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.... पण आमच्या दुर्दैवाने या सामन्यात बिशन सिंग बेदीने एकही चेंडु टाकला नाही .. दिल्लीतर्फे गोलंदाजीचा सर्व भार मणिंदर सिंग, अतुल वॉल्सन व मदनलाल यांनीच उचलला व पद्माकर शिवलकर उर्फ पॅडी...हाही मुंबईतर्फे या सामन्यात पुर्णपणे निष्प्रभ ठरला...

पण हा सामना सगळ्या क्रिकेट प्रेमींच्या लक्षात राहीला तो केवळ अशोक मांकड याच्या जबरदस्त...बॅटींगमुळे.. १९८० पर्यंत.. एके काळी बलाढ्य मुंबई संघाचा कप्तान असलेल्या अशोक मांकडने.. कप्तानीची धुरा सोडुन दिली होती.. या सामन्यात एकनाथ सोलकर मुंबईचा कप्तान होता.. पण मॉरली मात्र अशोक मांकडच टिमचा लिडर होता...

पहिल्या डावात बलविंदर सांधुने दिल्लीची त्रेधातिरपिट उडवुन दिलेली मला आठवते... व पहिल्या दिवसअखेर दिल्लीचा पहिला डाव संपुष्टात देखील आला होता... मुंबईची त्यावेळी सलामीची जोडी होती.. रामनाथ पारकर व गुलाम परकार.. दोघेही डोमॅस्टिक क्रिकेटमधे जबरी खेळाडु होते.. रामनाथ पारकर अस्तास जात होता तर गुलाम परकार उदयास येत होता... पण मदनलालने रामनाथ पारकरला लवकर आऊट करुन पहिल्या दिवसखेरीस दिल्लीला थोडी आशा दिली..

दुसर्‍या दिवशी जेव्हा गुरु गुप्तेही(हा गुरु गुप्ते... राहुल मांकड सारखाच... अशोक मांकडने... तो त्याच्या मफतलाल टिममधला असल्यामुळे... वशिल्याने मुंबईच्या टिममधे बहुतेक घुसवलेला होता...) चिपली आउट झाला तेव्हा सगळ्यांना वाटले की मुंबईचीसुद्धा दिल्ली सारखीच परिस्थिती होणार...पण नंतर अशोक मांकड मैदानावर उतरला.. व त्यानंतर दिवसभर दिल्लीला फक्त गुलाम परकारचीच विकेट घेता आली.. तेही दिवसाच्या शेवटी शेवटी.. परकारची सेंचुरी झाल्यावर.. व तो पर्यंत अशोक मांकड दिडशेच्या आसपास पोहोचला होता... मला आठवत आहे.. मैदानावर अशोक मांकड चौकारावर चौकार लगावत होता तर दिवसभर वानखेडेवरचे मुंबईचे प्रेक्षक.. " काका..... मार अजुन एक चौका...." ' काका.. मार अजुन एक चौका..." असे नारे लगावत होते... मुंबईचे प्रेक्षक अशोक मांकडला प्रेमाने "काका" या टोपण नावाने हाका मारायचे. त्याचबरोबर... मदनलाल बॉलिंग टाकायला रन अप घेत असताना... पेक्षक त्याला... " मदनलाल... भैय्या..... मदनलाल...... भैय्या...." असेही दिवसभर हिणवत होते.

तिसर्‍या दिवशीही मांकडने दिल्लीच्या बोलर्सना बदड बदड बदडले... व शेवटी २७० का २८० रन्स करुन तो आउट झाला तेव्हा मुंबईचा स्कोर ५०० च्या वर झाला होता...

दुसर्‍या डावात मग मुंबईच्या सुरु नायक व बलविंदर सांधुने दिल्लीचा परत एकदा खुर्दा करुन मुंबईला एका डावाने विजय मिळवुन दिला... पण माझ्या मते त्या बोलिंग फ्रेंडली पिचवर ज्या सहजतेने "काका" अशोक मांकडने फलंदाजी केली.. त्यासाठी मी त्यालाच मुंबईच्या त्या वर्षीच्या रणजी ट्रॉफीच्या विजयाचा शिल्पकार म्हणीन......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रिकेटमध्ये बाप आणि मुलगा दोघेही सारख्याच प्रमाणात यशस्वी झाल्याची उदाहरणं फारच अपवादात्मक सापडतात. बहुतेकदा वडील तर काही उदाहरणांत मुलगा सरस ठरल्याचं आढळून येतं.

भारतीय क्रिकेटचा विचार करायचा तर वडीलच सरस ठरल्याची दोन ठळक उदाहरणं म्हणजे विनू मंकड आणि सुनिल गावसकर! अशोक मंकड आणि रोहन गावस्कर त्यांच्या जवळपासही पोहोचू शकले नाहीत. उलट मोहिंदर अमरनाथ लालाजींपेक्षा खूपच यशस्वी ठरला, मात्रं सुरिंदर अमरनाथ तुलनेने अपयशीच ठरला.

बाकी देशांचा विचार करताही वडील यशस्वी झाल्याचीच ज्ञास्तं उदाहरणं आढळून येतात. पार व्हिक्टर ट्रंपर पासून ते जेफ मार्शपर्यंत जॉर्ज हेडली, ग्रॅम पोलॉक, अली बाकर, इयन बोथम, डेनिस लिली, हनिफ महंमद यांच्या तुलनेत त्यांची मुलं अयशस्वीच म्हणावी लागतील. मुलं जास्तं यशस्वी ठरल्याची उदाहरणं म्हणजे डेरेक प्रिंगल आणि क्रिस केर्न्स! डॉन प्रिंगल आणि लान्स केर्न्सपेक्षा दोघांची कामगिरी नक्कीच सरस होती१

बाप आणि मुलगा सारख्याच प्रमाणात यशस्वी ठरल्याचं माझ्या पाहण्यातलं एकमेव उदाहरण म्हणजे पीटर आणि शॉन पोलॉक!

रणजी किंवा डोमेस्टीक क्रिकेटमध्ये किंग पण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अवसानघातकीपणा करण्याबद्दल कुप्रसिद्ध होते, अशोक मांकड...

vijay manjrekar aani sanjay manjrekar. vijay manjrekar was a very technically perfect batsmen, but could not make it big in international arena, whereas son sanjay manjrekar also a very fine batsman was reckoned for his technical finesse in batting. sanjay manjrekar made a mark in the india's tour of west indies. Happy

वडिल प्रसिद्ध नाहीत मात्र मुलगा प्रसिद्ध कॅटेगरीतः वडिल प्रसिद्ध नसतील, फारसे आंतरराष्ट्रीय खेळले नसतील तर आपल्याला माहिती नसते. मुलगा मात्र माहिती असतो. म्हणुन तसा बायस दिसतो.

स्पार्टाकस, वडिल-मुलगा जोडीचा विचार करता, त्यातही, मुलगा वडिलांपेक्षा जास्त यशस्वी क्रायटेरिया लावताना युवराज सिंग - योगराज सिंग चा विचार प्रामुख्याने आला.

फेरफटका | 5 March, 2015 - 13:13 नवीन
स्पार्टाकस, वडिल-मुलगा जोडीचा विचार करता, त्यातही, मुलगा वडिलांपेक्षा जास्त यशस्वी क्रायटेरिया लावताना युवराज सिंग - योगराज सिंग चा विचार प्रामुख्याने आला.

>>
गुड वन!
आणि युवराजने सिक्सर मारल्या तो स्टुआर्ट ब्रॉड ख्रिस ब्रॉड चा मुलगा ना !

छान लेख. अशोक मन्कड बद्दल ठाऊक नव्हते आणि रणजी एव्हढी वलयांकित असल्याचेही. लहानपणी म टा मध्ये रणजीबद्दल वाचल्याचे थोड़े आठवते आहे...

अरे इतक्या दिवसांनी हा लेख वर आला?

वत्सला.. माझ्या लहानपणी नुसते रणजी-इराणी ट्रॉफीच नाही तर शिवाजी पार्कवर होणार्‍या कांगा लिगच्या व निरलॉन, टाटा, मफतलाल वगैरे कंपन्यांच्या टाइम्स शिल्डच्या इंटरक्लब सामन्यांना सुद्धा एक वलय होते

.त्या वेळेला तश्या सामन्यात सगळे टेस्ट प्लेयर्स सुद्धा हिरीरीने भाग घेउन खेळायचे. तश्या सामन्यात मग शिवाजी पार्क किंवा आझाद मैदानावर मग मला व माझ्यासारख्या इतर क्रिकेट वेड्या क्रिकेटप्रेमिंना गावस्कर, वेंगसरकर, वाडेकर, संदिप पाटिल, रवि शास्त्री सारखे क्रिकेट प्लेयर्स कॅनव्हासच्या तंबुमधे साध्या प्लास्टिकच्या खुर्चिवर बसलेले जवळुन दिसायचे..

इन्फॅक्ट माझ्या लहानपणच्या पहिल्या ठळक आठ्वणींमधली एक अविस्मरणिय आठवण म्हणजे शिवाजी पार्कवर राजस्थान व पारशी सायकलिस्ट यांच्यातला एक कांगा लिगचा सामना बघत असताना मला चक्क राजस्थान क्लबच्या तंबुमधे सलिम दुराणिच्या पायाखाली गवतावर बसायचे भाग्य लाभले होते.. त्या दिवशी मला स्वर्ग २ बोटे उरला होता.. सलिम दुराणिला इतक्या जवळुन बघायला मिळाले म्हणुन..

मग त्यानंतर थोडा मोठा झाल्यावर मी शिवाजी पार्क जिमखान्याच्या माळ्याशी सलगी केली. माझी शाळा बालमोहन विद्यामंदिर शिवाजी पार्कच्या बाजुलाच असल्यामुळे रोज शाळा सुटली की मी शिवाजी पार्क जिमखान्याची जी एक मजली पक्की बिल्डिंग होती त्याच्या आसपास व जिमखान्याच्या पिचवर उगाच रेंगाळत बसायचो व मला स्वतःला त्या पिचवर शिवलकरची बोलिंग खेळत आहोत असे इमॅजिन करण्याच्या स्वपरंजनात गुंतुन जायचो. त्या माळ्याशी सलगी केल्याचा एक फायदा असा झाला की रविवारच्या कांगा लिग सामन्याच्या वेळेला मला शिवाजी पार्क जिमखान्याच्या पायरीवर बसायची संधी मिळाली. तेव्हा शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे थोडे प्रौढ झालेले रमाकांत देसाइ, मनोहर हर्डिकर,विशू बोंद्रे व वासु परांजपे ऐन उमेदितले अजित वाडेकर, अब्दुल इस्माइल व पद्माकर शिवलकर व नविनच उदयाला आलेला शाळकरी संदिप पाटिल अशी लोक खेळायचे. एकदा मनोहर हर्डिकर व अजित वाडेकर दोघेही शतक ठोकुन लंचला पॅव्हिलन मधे परत येत होते तेव्हा जिमखान्याच्या पायरीवरुन उठुन त्यांना आत जायला वाट करुन देताना टाळ्या वाजवताना मला एकदम संत नामदेवांना जसा पंढरपुरला विठोबाच्या मंदिराच्या पायरीवर बसताना वाटायचे तसे वाट्त होते.. जाउ दे.. गेले ते इनोसंट दिवस..

आताच्या जमान्यात असे सध्याचे दिग्गज क्रिकेटिअर्स.. कांगा लिग मधे शिवाजी पार्कवर तर सोडाच पण रणजी-इराणी ट्रॉफी मधे वानखेडेवर सुद्धा दिसणे दुर्मिळ!

जुन्या आणि तितक्याच हृदयात अगदी घर करून राहिलेल्या या आठवणी वाचताना पापण्या ओलावल्याचे जाणवलेही नाही. अशोक मंकड (आम्ही क्रिकेटप्रेमी त्याना "स्टिव्ह मॅक्विन" या नावाने ओळखत असू. 'ग्रेट एस्केप" आणि "बुलीट" हे दोन चित्रपट खूप गाजत होते. मंकडचे व्यक्तिमत्व स्टिव्हसारखेच होते) असे एक व्यक्तिमत्व होते...जे कसोटी विश्वापेक्षा रणजीमध्येच जास्त गाजले आणि रमलेही....अजित वाडेकर, सुनिल गावस्कर, फरूख इंजिनिअर, दिलीप सरदेसाई, एकनाथ सोलकर अशी नावे नजरेसमोर आणली म्हणजे हे लोक किती दादा होते आणि क्रिकेटच्या इतिहासात किती उच्च स्थानावर होते याची कल्पना आजच्या पिढीलाही असेल...पण प्रत्यक्षात ही सारी मंडळी अशोक मंकड या व्यक्तिमत्वापुढे अगदी विनम्रपणे उभी आहेत असेच वाटत राहायाचे. सुनिल गावस्कर यानी दूरदर्शनच्या जमान्यात क्रिकेटविषयक १३ भागाची एक मालिका सादर केली होती....त्यातील एक भाग पूर्णपणे "अशोक मंकड" यांच्यावर होता आणि "आम्ही त्यांच्याकडून येणार्‍या सूचनांचे किती कटाक्षाने पालन करत असू...." याचा आदरपूर्वक उल्लेख केला होता.

रणजी आणि मुंबई संघ यांचे अतूट असे नाते. रणजी ट्रॉफी मुंबईच्या बाहेर कधीच जाणार नाही अशीच स्थिती होती असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती होत नव्हती. भारतीय संघ "कसोटी" साठी निवडला गेला म्हणजे त्यात एकट्या मुंबईचेच....वाडेकर, गावसकर, सरदेसाई, इंजिनिवर, सोलकर, वेंगसरकर, मंकड ही नावे प्रकर्षाने घेतली जात असत...फक्त गोलंदाज म्हणून मग बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखर, वेंकटराघवन, सुर्ती अशी काही नावे...अन्य राज्यातील.

मुंबईने फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू दिले पण का कोण जाणे नजरेत भरावा असा गोलंदाज भारतीय संघाला दिला नाही. पद्माकर शिवलकर, रमाकांत देसाई, बाळू गुप्ते, मिलिंद रेगे, अजित पै अशी काही तुरळक नावे अधेमधे येत राहिली पण शिवलकर यांची किर्ती केवळ रणजीपुरतीच मर्यादित राहिली.....एकदा तर सुनिल गावस्कर याना पंजाबमधील असंतोषाला सामोरे जावे लागले होते. "सनी डेज" मध्ये त्यानी लिहिले होते "बिशनसिंग बेदीला मुंबईचा पद्माकर शिवलकर हा चांगला पर्याय होऊ शकतो..." ~ हे एक तसे निरुपद्रवी विधान होते, पण त्यामुळे उत्तरेतील जनतेत प्रचंड क्षोभ उसळला होता. शिवलकरने कधीच भारतीय संघात स्थान मिळविले नाही.

अशोक मांकड यांचे चिरंजीव हर्ष मांकड याने मात्र आई निरुपमा यांच्या पावलावर पाऊल टाकत टेनिस विश्वात प्रवेश केला होता.

मामा,
मुंबईने भारताला दिलेला एकमेव चांगला बॉलर म्हणजे अजित आगरकर!
दुर्दैवाने त्याच्या बॉलिंगवर अनेक कॅच ड्रॉप केले आणि तो स्वतःही अनेकदा कन्सिस्टंट नव्ह्ता!

युवराज - योगराज सिंग, विजय - संजय मांजरेकर, क्रिस ब्रॉड - स्ट्युअर्ड ब्रॉड यांच्या विरुद्धचं उदाहरण म्हणजे कॉलीन कौड्री आणि क्रिस कौड्री! क्रिस कौड्री कॉलिनच्या जवळपासही कधी पोहोचला नाही.

मुंबईने भारताला दिलेला एकमेव चांगला बॉलर म्हणजे अजित आगरकर!
दुर्दैवाने त्याच्या बॉलिंगवर अनेक कॅच ड्रॉप केले आणि तो स्वतःही अनेकदा कन्सिस्टंट नव्ह्ता! >> +१.

पॅडी शिवलकर बाबत बरच politics झाले नि त्याला कसोटी संघाबाहेर ठेवले गेले असे म्हणतात. तेच राजिंदर गोयल बाबतही झाले असे वाचलेले.

>>मुंबईने भारताला दिलेला एकमेव चांगला बॉलर म्हणजे अजित आगरकर! <<
आगरकर चांगला तर बलविंदर सिंग संधु उत्तम म्हणायला हरकत नसावी... Happy

स्पार्टाकस.....राईट. काही गोलंदाज स्वतःसोबत आपल्या दुर्दैवालाही बरोबर घेऊन येतात...कारण गोलंदाजीसोबत उत्तम आणि अत्युत्तम क्षेत्ररक्षकांचीही साथ त्याना हवी असते. चंद्रा, बेदी, प्रसन्ना, वेंकट या फिरकीपटूंच्या जादूई गोलंदाजीला एकनाथ सोलकर, फरूख इंजिनिअर, अजित वाडेकर, अबिद अली असे एकापेक्षा एक चपळाईचे क्षेत्ररक्षक होते हेही मान्य करणे गरजेचे आहे.

शिवाय अंतर्गत कलहही बेफिकिरपणाला खतपाणी घालत असतो. मध्यंतरी सध्याच्या संघातील विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांच्यात झेल न पकडू शकल्याबाबत भलतीच गरमागरमी झाली होती ते आपण टीव्हीवर पाहिले आहेच.

शिवलकर जसा संधी न मिळण्याबाबत दुर्दैवी ठरला तीच गोष्ट अब्दुल इस्माईलबाबतही बोलता येईल.

अशोक.. मला वाटत तुमच्या मनात मुंबई क्रिकेट्च्या ज्या आठवणी घर करुन आहेत त्याच माझ्याही मनात घर करुन आहेत.

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मुंबई व रणजी ट्रॉफी यात एक अतुट नाते होते.. ती ट्रॉफी जिंकायचीच अशी इर्षा मुंबईचे सगळे क्रिकेटपटु बाळगुन असायचे.. मुंबईचे कर्णधारपद भुषवलेले क्रिकेटपटु जिंकण्यासाठीच क्रिकेट खेळण्याची आपल्या संघाकडुन अपेक्षा ठेवायचे.. माझ्या असे ऐकण्यात व वाचण्यात आले होते की तसे खेळण्यात मुंबईचा मिड ६० मधला कर्णधार मनोहर उर्फ"मन्या "हर्डिकर खुप फेमस होता. मनोहर हर्डिकरना टेस्ट किंवा रणजी मधे खेळताना पाहण्याचे भाग्य मला लाभले नाही कारण तेव्हा मी जन्मालाच आलो नव्हतो पण त्यांना शिवाजी पार्क जिमखान्याच्या कर्णधारपदी त्यांच्या चाळीशीमधे पाहण्याचे भाग्य मला अनेक वेळा लाभले होते. अशोक मांकडच्या एका मुलाखतीत मी वाचले होते की मुंबईसाठी जिंकायचेच या इर्षेने खेळायचे बाळकडु त्याला मनोहर हर्डिकर यांच्याकडुनच मिळाले होते. अशोक मांकड सुनिल गावस्करला थोडे सिनिअर होते. त्यामुळे १९६७-६८ ला जेव्हा गावस्कर मुंबई संघात आला तेव्हा त्याच्यावर अशोक मांकडचा प्रभाव पडणे स्वाभाविकच होते.

मी वर कांगा लिगबद्दल लिहीले आहेच. त्या मुंबईतल्या कांगा लिगबद्दल एक पुस्तकच लिहीता येइल इतक्या आठवणी माझ्याकडे आहेत. कांगा लिग सामने मुंबईत ऐन मॉन्सुन च्या वेळेला होत. त्यामुळे पावसाने खराब झालेल्या पिचवर या सगळ्या मुंबई क्रिकेटिअर्सची परिक्षा व्ह्यायची व ते त्या परिक्षेत डिस्टिंक्शनने पास व्हायचे! गावस्करसारखा खेळाडु वेस्ट इंडिज, इंग्लंड किंवा न्युझिलंड च्या दौर्यावरुन आद्ल्या रात्री परत येउनसुद्धा दुसर्‍या दिवशी सकाळी असलेल्या त्याच्या लाडक्या दादर युनिअन क्लबच्या... शिवाजी पार्क जिमखान्या विरुद्ध असलेल्या... कांगा सामन्याला हजर असायचा यातच तुम्हाला कांगा लिग व क्लब सामन्यांना ते किती मह्त्व देत हे समजुन येइल. वरच्या पोस्ट मधे मी चुकुन वासु परांजपे शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे खेळायचे असे लिहीले होते .. ते जर चुकुन वासु परांजपे, गावस्कर किंवा वेंगसरकरने वाचले असते तर ते माझ्यावर जाम भडकले असते कारण वासु परांजपे दादर युनिअन क्लबचे कप्तान होते व दादर युनिअन व शिवाजी पार्क जिमखाना यांच्यात "फिअर्स" रायव्हलरी होती!दादर युनिअनतर्फे वासु परांजपे, सुनिल गावस्कर्,रामनाथ केणी, विट्ठल पाटील,उर्मिकांत मोदी तर शिवाजी पार्क जिमखाना तर्फे मनोहर हर्डिकर, अजित वाडेकर्,पद्माकर शिवलकर्,रमाकांत देसाइ,अब्दुल इस्माइल, संदिप पाटिल.. आणि यांच्यातले सामने पाहणे म्हणजे पर्वणीच असायची. ते सामने बघता आले हे मी माझे भाग्य समजतो. अशोक...माझ्या स्मरणातल्या काही मोजक्या गोल्डन मेमरीज पैकी त्या आहेत!

राज.. अशोक मांकड जरी टेस्ट मॅचेसमधे जास्त चमकला नाही तरी रणजी कप्तानकीमधे त्याने जी कल्पकता दाखवली व जशी फलंदा़जी केली तशी फार थोड्या जणांनी दाखवली किंवा केली असेल. तो काळ असा होता की जे खरे दर्दी क्रिकेटप्रेमी होते त्यांच्या लेखी रणजी ट्रॉफी हिरो सुद्धा हिरोच होते. म्हणुनच मला त्या वेळेला पद्माकर शिवलकर, राजिंदर गोयल,अशोक मांकड सारखे व आजही अनमोल मुजुमदार सारखे 'अनसंग" रणजी "विर" यांचे खुप खुप कौतुक वाटायचे व वाटते.

असामी.. पॅडी शिवलकरबरोबर राजकारण झाले की त्या वेळेला बापु नाडकर्णी व बिशनसिंग बेदी त्याच्या मधे अडथळा म्हणुन आले(नंतर एकनाथ सोलकर) हा वादाचा विषय होउ शकतो.. तेव्हा जाउ दे..:) मी माझ्या एका दिवाळी अंकाच्या लेखात पद्माकर शिवलकर बद्दल लिहीताना या विषयावर थोडे लिहीले होते. असो.

पण इतक्या दिवसांनी अशोक मांकड बद्दल वाचुन तुम्ही सगळ्यांनी त्याचा आदर केलात याने मला खुप समाधान वाटले. ही डिझर्व्ह्ड ईट! धन्यवाद!

सुनिल गावसकरसारख्य बॅट्समनला ज्याची बॉलिंग खेळण्याची थोडी का होईना पण धास्ती वाटायची ('आयडॉल्स' मध्ये स्वत: ते कबूल केलं आहे) असा बॉलर म्हणजे राजिंदर गोयल! केवळ बेदीचे समकालीन असल्याने गोयल आणि पॅडी शिवलकरला भारतातर्फे खेळता आलं नाही!

असाच एक दुर्दैवी रणजी खेळाडू म्हणजे अमोल मुजुमदार! तेंडुलकर, कांबळी यांच्यापाठोपाठ तोदेखील भारताच्या टीममध्ये येईल अशी खुद्द रमाकांत आचरेकरांची अपेक्षा होती, परंतु विश्वनाथच्या सिलेक्शन कमीटीने कर्नाटकच्या सुजीत सोमसुंदरसारख्याला संधी दिली पण मुंबईच्या अमोलला नाही!

काका हे नाव त्यांना राजेश खन्नाचा पंखा असल्यानि पडल होतं.
त्यावेळच्या अनेक मुंबई क्रिकेटर्सना त्यांनि वेळोवेळी आधार आणि मार्गदर्शन केल होतं. संदीप पाटिल त्यातिलच एक. संदीप पाटिल कुठल्याहि टुर वर असला तरि मंकड त्याच्याशि पत्रव्यवहार करुन त्याच्या चुका वगैरे कळवत आणि अशाच एका ईंग्लंड टुर वर पाटिलच्या रन होत नसताना मंकड यांनी त्याला मोठं पत्र लिहुन नक्कि काय कर असे सांगितल होतं. त्या नंतर पाटिल त्या टुर मधे खूपच यशस्वी ठरला. हि आठवण पाटिल यांनि बॉम्बे बॉयज या पुस्तकात सांगितलि आहे.

युरो,

ते विनू मांकड बद्द्ल आहे अन दुर्देवाने ते अखिलाडू व्रुत्तीचे निदर्शक मानले जाते Sad
खरे तर त्यात तसे काहीच नाही .

मुकुंदराव....

तुमच्या प्रतिसादातील आदरणीय मनोहर हर्डिकर यांचे नाव वाचून संतोष झाला. सचिन तेंडुलकर यांचे गुरुवर्य म्हणून लोक रमाकांत आचरेकर सरांचे नाव वाचत आले आहे. पण मुंबईच्या "रणजी" संघाचे गुरू म्हटल्या जाणाच्या मान ज्या काही ज्येष्ठांना जातो त्यात विजय मर्चंट, शरद दिवाडकर आणि मनोहर हर्डिकर यांचे नाव अत्यंत आदराने घेणारी पिढी मला माहीत आहे. सर्वार्थाने क्रिकेटचे दिग्दर्शक म्हणून कित्येकांनी मुंबईच्या विविध क्रिडांगणावर झोकून दिले होते.

मुंबई आणि महाराष्ट्र संघ यांच्यातील "रणजी युद्ध आणि ईर्षा" ज्याना पाहायला मिळाली आहे त्याना जाणवत असेल की कसोटी क्रिकेटपेक्षाही किती तडफेची चुरस या दोन संघात असे. चंदू बोर्डे, चेतन चौहान, विठ्ठल जोशी, सुरेन्द्र भावे, पांडुरंग साळगावकर, हेमंत कानिटकर आदी गुणी खेळाडूंचा समावेश असतानाही यानी कधी मुंबईवर मात केल्याचे तुरळकच उदाहरण झाले आहे....तसे घडले होते आमच्या कोल्हापूरात झालेल्या मुंबई-महाराष्ट्र साखळी "रणजी" सामन्यात. एकट्या चेतन चौहानने अब्दुल ईस्माईल, शिवलकर, राकेश टंडन आदींचा मुकाबला करून फलंदाजीची धुरा वाहिली होती तर साळगावकर आणि विठ्ठल जोशी यानी गोलंदाजी सुरेख केली.

कांगा आणि टाईम्स शिल्ड यातील चुरस पाहायची असेल तर मुंबईच्या विविध मैदानावर फुलत गेलेली गर्दी आठविणारे आजही इथे असतील. पाकिस्तानचा हीरो इम्रानखान यानी मुंबई मधील क्रिकेटचा ज्वर पाहिला होता. त्यानी नोंदविले आहे की पाकिस्तानात या रितीने क्रिकेट खुलत गेले पाहिजे. क्रिकेटर्स तयार होतात ते अशा मैदानावर जिथे खेळण्यासाठी भारतीय कसोटी संघात निवड झालेले खेळाडू नेहमीच उत्सुक असतात.

वन डे आणि २०-२- आणि आयपीएल नंतर रणजी दुलीपचे महत्त्व पार नाहीसे झाले आहे असे जे चित्र दिसत्ये ते क्रिकेटसाठी खरेतर चिंताजनक आहे.

अशोक मांकड एक उत्कृष्ट फलंदाज होता. त्याच्या डेब्यू सिरिज मध्ये ऑसीज विरूद्ध त्याचा चांगला स्कोअर होता अस वाटतय. गावस्करच्या डेब्यू सिरीज मधेही तो चांगला खेळला होता.
डोमेस्टिक क्रिकेटचा तर तो दादाच होता. दुर्दैवाने तो फॉर्म , सातत्य त्याला टेस्ट मध्ये दाखवता आले नाही.

एका दुलीप ट्रॉफिच्या सामन्यात बोर्डेने पश्चिम विभागाचा कर्णधार असताना अशोकची ऑफस्पिन वापरून मॅच जिंकली होती. साल आठवत नाही.

ऑस्ट्रेलियात ७७-७८ (?) च्या सिरीज मधे शेवटच्या टेस्ट मधे ४७८ चेस करताना (हो ४७८) अशोक असे पर्यंत आपल्याला चान्स होता. त्याची टोपी विकेटवर पडल्याने तो आउट झाला , ४० एक रन करून आणि मग आपण हरलो , साधारण पन्नासच्या फरकाने. (रेकॉर्डस बघा या सिरीजचे ,मस्त आहे, आपण ३-२ हरलो, एक जिंकली डावाने, आणि एक २०० रन ने, हरलो १२-१४ रन, २ विकेट आणि ५० रन).

अशोक मांकड उत्कृष्ट कोच होता. लवकर गेला बिचारा.

मुकुंदराव, कांगा लीगच्या आठवणी मस्त. तेंव्हा टाईम्स शिल्डही खूप प्रतिष्ठेची स्पर्धा होती.

अरे मुकुंदा, त्या वाक्यात काकाला कमी लेखण्याचा उद्देश नव्हता, तर मुंबईच्या क्रिकेटपटुंची दुरावस्था मांडण्याचा प्रयत्न होता. अनेक रणजीत चमकलेले मुबईचे खेळाडु कधी कोटा तर कधी बॅडपॅच मुळे कसोटीत दीर्घकाळ टिकले वा आलेच नाहित. किती जणांची नांव घेउ - रामनाथ पारकर (गावस्कर), गुलाम परकार, झुल्फिकार परकार (इंजीनियर, किरमाणी), चंदु पंडित, वासिम जाफर...

जेमतेम पांच फुट उंचीचा, होल्डरच्या बाउंसरला बेधडक हुक करून स्टॅंडमध्ये भिरकवणारा रामनाथ पारकर; एकट्याने कव्हर्समध्ये चित्त्यासारखी झेप घेउन चेंडु अडवणारा गुलाम परकार; धावांचा पाऊस पाडणारा वासिम जाफर, असे बरेच मुबईचे अनसंग हिरो आहेत...

पॅडी शिवलकरबरोबर राजकारण झाले की त्या वेळेला बापु नाडकर्णी व बिशनसिंग बेदी त्याच्या मधे अडथळा म्हणुन आले(नंतर एकनाथ सोलकर) हा वादाचा विषय होउ शकतो.. तेव्हा जाउ दे >> निरधास्त पणे लिहा मुकुंदा. माझी माहिती ऐकिव आहे किंवा लहान असताना क्रीडा पाक्षिकांमधे वाचलेली आहे.