असंभव

Submitted by क्रांति on 20 September, 2011 - 08:26

पुन्हा एक भुलवणारा मिसरा!

मनासारखे घडतच नाही, म्हणून इतके अकांडतांडव?
कशास त्याची वाट पहावी? जे घडणे आहेच असंभव?

बुद्धी सांगे स्थितप्रज्ञ हो, मन गुणगुणते, हवे तसे कर
मन-बुद्धीच्या द्वंद्वामध्ये एकदा तरी मनास जिंकव!

रंग, कुंचला, कोरा कागद बघून हाती गगन बोलले,
किती तोकडे चित्र काढशिल? घे, या सार्‍या दिशाच रंगव!

भूतकाळ सरकत्या सावल्या, भविष्य वाळूवरचे मृगजळ
वर्तमान अनमोल देणगी, तुझी संपदा त्यातच गुंतव

जेव्हा जेव्हा तिला दिली मी मात, बोलली चिडून नियती,
वजीर कुठला, प्यादे कुठले? आधी या वादाला संपव!

अहंकार उन्मत्त गर्जला, मी हे केले, मी ते केले
हसून मी इतकेच बोलले, जा, जात्या काळाला थांबव!

माझ्या नसण्यावर केव्हाचे शिक्कामोर्तब झाले आहे,
आता उरला केवळ माझ्या नसूनही असण्याचा संभव!

[मतल्यात आकांडतांडव या शब्दात सूट घेतली आहे Happy ]

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

क्रान्ती ऑन फायर!

भूतकाळ सरकत्या सावल्या, भविष्य वाळूवरचे मृगजळ
वर्तमान अनमोल देणगी, तुझी संपदा त्यातच गुंतव>>> शब्दरचना सुंदर!

जेव्हा जेव्हा तिला दिली मी मात, बोलली चिडून नियती,
वजीर कुठला, प्यादे कुठले? आधी या वादाला संपव!>>> छान

अहंकार उन्मत्त गर्जला, मी हे केले, मी ते केले
हसून मी इतकेच बोलले, जा, जात्या काळाला थांबव!>>> उत्तम

माझ्या नसण्यावर केव्हाचे शिक्कामोर्तब झाले आहे,
आता उरला केवळ माझ्या नसूनही असण्याचा संभव!>>> सर्वोत्तम!

गझल आवडली.

-'बेफिकीर'!

रंग, कुंचला, कोरा कागद बघून हाती गगन बोलले,
किती तोकडे चित्र काढशिल? घे, या सार्‍या दिशाच रंगव!

>> वाह..!

बापरे!!!
ही गझल.... प्रिंट काढून फ्रेम करून भिंतीवर लावावी अशी झाली आहे..

काय आवडलं नाही हाच प्रश्न आहे... सुपर्ब!! सुपर्ब!! सुपर्ब!!

माझ्या नसण्यावर केव्हाचे शिक्कामोर्तब झाले आहे,
आता उरला केवळ माझ्या नसूनही असण्याचा संभव! .. सर्वोत्तम.

सुंदर गझल. Happy

अहंकार उन्मत्त गर्जला, मी हे केले, मी ते केले
हसून मी इतकेच बोलले, जा, जात्या काळाला थांबव!

माझ्या नसण्यावर केव्हाचे शिक्कामोर्तब झाले आहे,
आता उरला केवळ माझ्या नसूनही असण्याचा संभव!

--खुप सुंदर शेर...

--मस्त गझल

रंग, कुंचला, कोरा कागद बघून हाती गगन बोलले,
किती तोकडे चित्र काढशिल? घे, या सार्‍या दिशाच रंगव!

व्वाह!!!

माझ्या नसण्यावर केव्हाचे शिक्कामोर्तब झाले आहे,
आता उरला केवळ माझ्या नसूनही असण्याचा संभव!
ब्येष्ट!!
Happy

एक सांगायचं राहिलं - ही गझल कमालीच्या सहजतेने उतरली आहे... मला जरी एक-दोनच शेर फार आअवडले असले तरी शब्दांचा वावर बघून छानच वाटलं... Happy

सुरेख गझल, क्रांतीजी.
तुमच्या सर्व गझलांत मला आजवर सर्वाधिक आवडलेली गझल आहे ही !! Happy

असेच लिहीत रहा आणि आम्हाला आनंद देत रहा, ही विनंती.

(आमचाही दंडवत स्वीकारणे!) Happy

बाबो!! क्रांती....अग काय, कसलं अफाट लिहिलयस. आणि सहज केवढ सगळ, मला तर नुसतं गझल म्हटल तरी धापच लागते, त्यात एवढं मोठं वृत्त आणि सहज आलेले शेर. खरोखरच वाकून नमस्कार Happy

शब्दलीलालाघवे, गजलसम्राज्ञी.... तुज नमो, तुज नमो...