सुरती बटर (जुन्या मायबोलीवरून )

Submitted by नलिनी on 18 September, 2011 - 09:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

जिरे १ टिस्पून
यीस्ट १ टिस्पून
मैदा २२५ ग्रॅ.
पाणी सव्वा कप
दूध १टे. स्पून
साखर १ टिस्पून
मिठ १ टिस्पून
तेल २ चमचे

क्रमवार पाककृती: 

जिरे जरासे भाजुन घ्यावे. ते थोडे रगडुन घ्यावे व त्यावर कपभर गरम पाणी ओतावे. हे जरा आधी करुन ठेवल्यास पाण्याला जिर्‍याचा वास लागतो.

पाव कप साखरमिश्रित कोमट पाणी घेऊन त्यात दूध घालावे व त्यावर चमचाभर ड्राय यीस्ट पसरावी. १० मिनिटानी ते फसफसल्यावर, २२५ ग्रॅम मैदा घेऊन त्यात ते ओतावे. मीठ घालावे.
मग जिर्‍याच्या कोमट पाण्याने मैदा मऊसर भिजवावा. भिजवताना तेल घालावे. नीट मिसळुन, ४० मिनिटे झाकुन ठेवावे.

परत उलट्या मुठीने दाबुन मळावे. मग त्याचे सुपारी एवढे गोळे करावेत. कोरड्या पिठात घोळवुन ते गोळे ट्रेमधे ठेवावेत. वरुन तेलाचा हात लावुन दाबावे, व ट्रे साधारण अर्धा तास झाकुन ठेवावा. परत ते गोळे फ़ुगुन येतील.
ओव्हन २३० अंश सेंटिग्रेड किंआ ४५० F वर गरम करत ठेवावे, मग ट्रे ठेवुन १५ मिनिटे बेक करावे.

याच पिठात तीळ, खसखस वैगरे घालता येईल. ओवा, मिरी पण वापरता येईल.
याच मिश्रणाच्या सुप स्टिक्स करता येतील.

हि कृती दिनेशदादाची आहे. इथे आणखी चर्चा सापडेल.

suratiButter.jpg

अधिक टिपा: 

* मी ड्राय यीस्ट न वापरता कंप्रेस्ड अ‍ॅक्टिव यीस्ट वापरले.

* बेक करातना १५ मिनिटांनंतर तापमान कमी केले. १७० डी.फॅ. वर तासभर ठेवले. छान कुरकुरीत झाले.

माहितीचा स्रोत: 
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/122197.html?1203437361
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतायत. नलिनी, ती सगळी रेसिपी पुन्हा इथे लिहून आणि धागा सार्वजनिक करणार का? सध्या ग्रूपबाहेर दिसणार नाही.

नलिनी , काय मस्त दिसताहेत ते बटर. मस्तच रेसीपी. नक्की करुन बघणार. Happy

लिंकमधली प्रज्ञाची कृती पण छान वाटती आहे एकदम.

सायो, जागू, बिल्वा, सिमा, धन्यवाद!

रेसीपीचे सगळे श्रेय दिनेशदादाला. मी फक्त करून पाहिले आणि इथे फोटो टकला. Happy

लिंकमधली प्रज्ञाची कृती पण छान वाटती आहे एकदम.>>> ह्म्म. मी पण करून पहाणार आहे पुढल्यावेळी, तिच्या पद्धतीने.

ते मैद्याचे प्रमाण तेव्हडे कपाच्या मापात लिहाना. या विकांताला करुन पहाण्यात येइल. दही-बटर साठी आपल्या आवडीच्या साईझचे करता येतील Happy

वर्षा_म, ज्या कपाने सव्वा कप पाणी घेणार ते अडीच ते तीन कप मैदा घे.
आपण मैदा ज्या मापाने मोजून घेतो त्याच्या निम्म्या कींवा निम्म्यापेक्षा जरा कमी प्रमाणात पाणी घ्यायचे.

ज्या कपाने सव्वा कप पाणी घेणार ते अडीच ते तीन कप मैदा घे. >> ओके. तसेही मी मेजरींग कपच वापरेल.

अनघा_मीरा, गव्हाच्या पीठाचे पण छान होतील. फक्त यीस्ट थोडं जास्त घ्यायला हवं. जरा उबदार जागेत ठेवून पीठ चांगलं फुगून यायला हवं.
दिपा, ड्राय यीस्ट वापरतेस का तू? त्यासाठी जाणकार देतील अधिक टिपा.
मी नेहमी कंप्रेस्ड यीस्ट वापरते. पाणी कोमट असावे, खूप गरम नसावे. त्यात यीस्टसाठी खाद्य म्हणून जरासं दूध आणि साखर घालावे. १५ मिनिटात यीस्ट पाण्यावर तरंगून येते. ते मैद्यात घालून पिठ भिजवले की ते उबदार जागेत ठेवावे. मी तर अर्धा मिनिट ओव्हन तापवून त्यात पिठ कापडाने झाकून अर्धा तास ठेवते. पिठ मस्त फुगून येते.
जाणकार आणखी टिपा नक्की देतील इथे.

इथल्या ब्रेडच्या रेसिप्यांमधे सांगतात की यीस्ट फसफसण्यासाठी साखर , मैदा, थोडे कोमट पाणी ११०-११५ डि फॅ पर्यंतच हे तिन्ही हवे. मीठाशी संपर्क आला की यीस्ट फसफसण्याची क्रिया मंदावते. म्हणून फसफसल्यावर सुद्धा आधी अजून थोडा मैदा शिंपडून मगच मीठ घालावे.