मुंगीताई..

Submitted by पुरंदरे शशांक on 16 September, 2011 - 06:52

मुंगीताई..

मुंगीताई , मुंगीताई
तुरुतुरु धावता घाई
पाय कसे दुखत नाही
मज्जा भारी वाटे बाई

शिस्तीत कशा चालता तुम्ही
रांग कधीच मोडत नाही

समोर येता दुसरी ताई
कानगोष्टी करुन जाई

रॅकवर उंच ठेवले जरी
नाव डब्यावर नसले तरी

शोधून काढता केक - खारी
मला गंमत वाटते भारी

उंच स्टुलावर चढते तोच
आईची एकदम जाते झोप

धडपड सारी माझी ऐकून
आई ओरडे पाठीमागून

"हा काय मेला फाजीलपणा
जेवण नको नी खाऊ आणा"

आवाज बिल्कुल न करता
खाऊ तेवढा कसा शोधता

माझ्याशी गट्टी कराल का ?
सिक्रेट तेवढे सांगाल का ?

फ्रेंडशीपसाठी काय देऊ
कॅडबरीचा आवडेल खाऊ ?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान.