संयोजकांचे मनोगत - मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 15 September, 2011 - 20:04

संयोजनाकरता नावं दिलेल्या आम्हा पाच अतिउत्साही आणि मायबोलीवर बर्‍यापैकी नव्या अशा सदस्यांना उचलून रूनीने 'मायबोली गणेशोत्सव संयोजन २०११' च्या मैदानात सोडून दिले, मार्गदर्शन केले आणि मग आमच्याकरता सुरू झाली एक अनोख्या अनुभवांची जंगी मालिका!

सुरूवातीला धडपडलो पण मग लवकरच आम्हाला दिशा सापडली अन हळूहळू गणेशोत्सवाची रूपरेषा बनली. स्पर्धा-कार्यक्रम ठरवणे, त्यांचे नियम आणि माहिती तयार करणे, दवंडी-रिक्षांद्वारे त्यांची घोषणा करणे, कार्यक्रम राबवणे, मायबोलीकरांच्या अनेकानेक शंकांना उत्तरे देणे या सगळ्यात गुंतून गेलो आणि बघताबघता सहा आठवडे निघूनही गेले. शेवटची जबाबदारी निकाल घोषित करण्याची. तीही पार पडली.

.......पण अजूनही एक महत्त्वाचा कार्यक्रम बाकी आहे. कृतज्ञता व्यक्त करण्याचा!

'गणेशोत्सवाचा अजून एक सोहळा खेळीमेळीत, उत्साहात पार पडला.' साधं सोपं विधान! मात्र अनेक जणांनी अनेक प्रकारे हा सोहळा परिपूर्ण करण्यासाठी जे सहकार्य केलं त्याला तोड नाही. त्यांचे आभार मानून मोकळे होण्यापेक्षा हे ऋणानुबंध जोपासायचे आहेत. त्यामुळे इथे केवळ आमची कृतज्ञता व्यक्त करत आहोत.

मायबोलीकरांनी आपापल्या घरचे गणपती आणि आपली दैनंदिन कामं सांभाळूनही ज्या उत्साहाने कार्यक्रमांत भाग घेतला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांना सलाम! बालगोपाळांचे तर विशेष आभार. आईबाबांच्या मागणीला लगेच होकार देऊन आपल्या कलागुणांनी, गोडगोड बोलांनी आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करण्याबद्दल सगळ्या बालगोपाळांना एक भलीमोठी शाबासकी! भरपूर यश मिळावा, बाळांनो!

मायबोलीवरील अनेक जुन्या-जाणत्या सदस्यांनी सुरवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत वेळोवेळी मोलाची मदत केली. 'काही काम लागलं तर खुशाल सांगा', 'जी काही मदत लागेल ती सांगा' असा मदतीचा हात पुढे करण्यापासून ते कार्यक्रम-मंडपात देखरेख ठेवण्यापर्यंत या सर्वांची बहुमोलाची मदत झाली आहे. बरं, आपलेपणा इतका की संयोजकांच्या अनवधानाने झालेल्या काही चुका, संयोजनाला आणि कार्यक्रमांना धक्का लागणार नाही अशा पद्धतीने, पडद्याआडून सांगितल्या. 'हा मायबोलीचा कार्यक्रम आहे' अशी आपलेपणाची भावना बाळगणार्‍या सगळ्यांचे अनेकानेक आभार.

एका अत्यंत कठीण परिस्थितीत आम्ही साजिर्‍याला साकडं घातलं. आणि काहीही म्हणजे काहीही आढेवेढे न घेता त्याने आम्हाला अर्ध्या दिवसात ५-६ अप्रतिम पोस्टर्स बनवून दिली. त्याबद्दल साजिर्‍याचे आभार मानावे तितके थोडेच ठरतील.

या प्रसंगानंतर दिव्याचं आमच्या गृपमध्ये आगमन झालं आणि तिने गणपतीबाप्पांच्या प्रतिष्ठापनेकरता अत्यंत सुरेख आरासी करून दिल्या. यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सवात अ‍ॅनिमेटेड आरास केली गेली आणि यामागची कल्पना आणि मेहनत यांचं पूर्ण श्रेय दिव्याचं. त्यात मुख्य मूर्तीबरोबरच तिने अष्टविनायकांचे मनोहारी दर्शनही घडवले. दिव्याने इतरही कार्यक्रमांसाठी पोस्टर्स आणि रिक्षा बनवून दिल्या. दिव्याला पुन्हापुन्हा धन्यवाद.

प्रतिष्ठापनेच्या मूर्तीकरता मायबोलीवरचे प्रचिकार जिप्सी यांना आम्ही विनंती केली होती. त्यांनी अतिशय तत्परतेने आम्हाला छानशी बाप्पाची मूर्ती प्रचिरूपात उपलब्ध करून दिली. त्याबद्दल जिप्सी यांचे आभार.

बित्तुबंगा यांनीही एका पेचप्रसंगात तत्परतेने मदतीचा हात पुढे केला. त्यांचेही खास आभार.

आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन ज्या मायबोलीकरांनी आम्हाला खास लेख लिहून पाठवले त्या सर्वांचे आभार. दिनेशदा, साजिरा, मंजूडी, जागू, दाद, स्वप्ना_राज, केदार, कविता नवरे, अरूंधती कुलकर्णी तुम्ही दिलेल्या लेखांमुळे गणेशोत्सवाला एक वेगळेच परिमाण लाभले.

भाऊ नमसकर यांनी खुसखुशीत व्यंगचित्रं अगदी लगेच पाठवून दिली. त्याबद्दल मंडळ त्यांचे विशेष आभारी आहे. हास्यदालनाने सर्वांना उत्सवभर हसायला लावले. Happy

सँकी यांनी विविध रूपातील गणपतीची रेखाटने आम्हाला पाठवल्याबद्दल त्यांचेही आभार.

आमचे गुप्त-लेखक/ लेखिका नंदिनी (कथा १) आणि बेफिकीर (कथा २) यांचे खास आभार. तोंड बंद ठेवल्याबद्दल आणि लोकांची योग्य दिशाभूल केल्याबद्दल. Happy

नीधप, जिप्सी आणि आशुचँप ने सुंदर प्रचिमालिका उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळ त्यांचे ऋणी आहे.

उपासक यांनी संगीत दिलेल्या आणि नविनच प्रकाशित झालेल्या 'गान - वीर काव्याचे' या गीत-संग्रहातील काही गाणी गणेशोत्सवाकरता दिली. या गीतसंग्रहाच्या विक्रीतून होणारा सर्व फायदा हा सामाजिक कार्य, स्वा. सावरकरांचे विचार पुस्तिका वाटप, सावरकरांच्या जीवनावर लहान मुलांकरिता Animation Video निर्मिती इत्यादींसाठी वापरण्यात येणार आहे. मायबोलीकर रसिक या स्तुत्य प्रकल्पास भरभरून पाठिंबा देतीलच. उपासक यांचे या निमित्ताने अभिनंदन आणि आभार. आपल्या उपक्रमास मंडळातर्फे शुभेच्छा.

गणेशोत्सवाकरता सुरेल, सुंदर गाणी दिल्याबद्दल रैना, अगो यांचे खास आभार. सुयोग्य काव्यासाठी क्रांती आणि प्रसाद शिरगांवकर तसेच गायन आणि वादनासाठी केदार पावनगडकर आणि सुहास कबरे यांना धन्यवाद. प्रमोद देव यांनी रागांवर आधारीत सुंदर चाली लावून या गाण्यांची गोडी अधिकच वाढवली याबद्दल त्यांचेही आभार. गणपती प्रतिष्ठापनेच्या धाग्यावर खास श्लोक म्हणणार्‍या प्रमोद देव आणि झाशीची राणी यांचेही आभार.

मायबोली शीर्षकगीताची स्पर्धा पाहून, योग यांनी स्वत:हून मायबोली शीर्षकगीताला चाल लावून देण्याचा प्रस्ताव मांडला. या आपुलकीच्या सहकार्याबद्दल योग यांचे विशेष आभार. योग यांनी त्याबरोबरच परीक्षकांची भुमिकाही स्वीकारली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. अजय आणि अ‍ॅडमीन यांनीही आमच्या विनंतीला मान देऊन शीर्षकगीताचं परीक्षण करण्यास होकार दिला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद.

प्रकाशचित्र स्पर्धेच्या परीक्षकांचं खरंच कौतुक! इतक्या प्रवेशिका - त्याही एकसे एक. अतिशय कठीण जबाबदारी तोलून निर्णय दिल्याबद्दल सावली, बित्तुबंगा आणि आशुतोष०७११ यांनाही धन्यवाद.

याच निमित्ताने विशेष उल्लेख करावासा वाटतो तो पूर्ण सहकार्य देणाच्या आमच्या सगळ्यांच्या घरच्या मंडळींचा - अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत! संयोजनात झोकून दिल्यावर घरात झालेले अपरिहार्य बदल कुटुंबातील लोकांनी सहज स्वीकारले आणि जास्तीच्या जबाबदार्‍या हसत हसत पार पाडल्या. त्या सर्वांच्या या मदतीवाचून इतका मोठा व्याप सांभाळणे शक्य नव्हते. या सगळ्यांचे शतशः आभार.

जगाच्या पाठीवरच्या तीन देशातले पाच मायबोलीकर, कामाचा मेळ सहजपणे सांभाळू शकले ते स्काईपच्या कृपेने. स्काईपवरून लिहून अथवा बोलून संपर्क साधल्याने बर्‍याच गोष्टी पटापट हातावेगळ्या करता आल्या. त्यामुळे स्काईपचेही आभार.

अनवधानाने जर कोणाचा उल्लेख करायचा राहून गेला असेल तर क्षमस्व. बर्‍याच जणांनी लहान-मोठा हातभार लावून हा सोहळा परिपूर्ण करण्यास मदत केली आहे. अशा सर्वांचे आभार.

आता सर्वांत महत्त्वाच्या पडद्यामागच्या कलाकारांचे आभार - अ‍ॅडमीन आणि रूनी पॉटर.

अ‍ॅडमीन आणि रूनी पॉटर यांच्या कार्याची व्याप्ती अचंबित करणारी आहे. अ‍ॅडमीनकडे 'मॅड आय मूडी' चा डोळा आहे हे गुपित त्यांनी आमच्याकडे उघड केले. Happy असणारच. त्याशिवाय इतक्या ठिकाणी इतके बारीक लक्ष ठेवणे शक्य नाही. रूनीची एनर्जी थक्क करण्यासारखी आहे. आणि ती एक अत्यंत सुयोग्य मार्गदर्शक आहे. आमच्या कामात अजिबात कुठेही ढवळाढवळ न करता केवळ योग्य तिथे, योग्य वेळी आणि योग्य तितकाच सल्ला दिला.

अनोळखी आणि ज्यांची क्षमता माहितीही नाही अशा सदस्यांवर गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे संयोजन टाकल्याबद्दल, त्यांना त्यात पूर्णपणे त्यांच्या मर्जीने काम करण्याचे स्वातंत्र्य दिल्याबद्दल आणि एकूणच आंतरजालावरच्या अशा अनोख्या उपक्रमाच्या संयोजनाचा अद्भुत अनुभव आम्हाला दिल्याबद्दल, अ‍ॅडमीन आणि रूनी, तुमचे शतशः आभार. तुमच्या अपेक्षांना आम्ही पात्र ठरलो आहोत की नाही ते माहिती नाही, मात्र या निमित्ताने मायबोलीची जी जवळून ओळख झाली, या व्यासपीठाची जी ताकद लक्षात आली ती विस्मयकारक होती.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मायबोलीच्या व्यासपीठावर आम्हाला आमची सेवा रूजू करण्याची संधी दिल्याबद्दल मायबोली आणि समस्त मायबोलीकरांचे पुन्हा एकदा आभार. तुम्ही सर्वांनी कार्यक्रमांना दिलेली दिलखुलास दाद हाच आमचा श्रमपरिहार!

********************************************************

चित्रांगण - १ (नांदी, दवंड्या, आरास आणि स्पर्धा फलक) - मायबोली गणेशोत्सव २०११

चित्रांगण - २ (सांस्कृतिक कार्यक्रम, रिक्षा आणि जाहिरात) - मायबोली गणेशोत्सव २०११

मायबोली गणेशोत्सव २०११ - निकाल आला!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच संयोजकांचं मनापासून अभिनंदन .. खूप छान झाला उत्सव आणि रैना म्हणते तशी सांगताही उत्सवाला साजेशी!

मस्तच! Happy

व्वा! मस्त माहिती पुरवलित Happy
वर्षागणिक दरवर्षीचा गणेशोत्सव आधी पेक्षा अधिकाधिक उठावदार, चित्तवेधक, बहुसन्ख्य मायबोलिकरान्चे उत्साही सहभागाने रसरसता होत जातो आहे असे वाटते.

तुम्ही आम्हाला इतक्या विश्वासाने ही संधी दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद.>>> +१

रैना +१

संयोजकांना मुजरा ! Happy
<< आम्ही रोज आनंदाने अनुभवत असलेल्या गणेशोत्सवा मागे इतकी प्रचंड मेहनत आहे हे ज्ञात झालं.
आपल्या सर्वांचं प्रचंड कौतुक आणि आभार. >> डॉकना अनुमोदन.
रैना +१

अभिनंदन संयोजक. कार्य उत्तम पार पाडलेत.

संयोजकांचा 'अ‍ॅटिट्युड' चांगला होता. कुठच्याही ग्रुपमधल्या मंडळांमधल्या सगळ्यांच्या वृत्तींचा-पद्धतींचा जो एक कॉन्सॉलिडेटेड इफेक्ट तयार होतो- त्यातून असं काहीतरी चांगलं निघणं थोडं अवघड असतं. एकत्रितपणे असं काहीतरी चांगलं निघणं, हे मायबोलीवर असं बर्‍याच वेळा अनुभवायला मिळतं, ही सुखावह, स्वागतार्ह गोष्ट.

अनवधानाने, योग यांनी मायबोली शीर्षकगीताचे परीक्षक म्हणूनही काम पाहिले ही गोष्ट मनोगतात लिहिली गेली नव्हती. ती आता लिहिली आहे.

संयोजक मंडळी,

इतके आभार (वा दिलगिरी) नको.. यादीत नामोल्लेख पुरेसा आहे. Happy ईथे अनेक लोक अनेक प्रकारे मदतीस हातभार लावत असतात. अनवधानाने काही वेळा ऊल्लेख राहून जातो. असो.

गणेशोत्सव अत्योत्कृष्ट रितीने आयोजित केल्याबद्दल संयोजक समितीतील कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन.

संयोजक , अ‍ॅडमीन , पॉटर बाई , सर्व सहभागी मायबोलीकरांच मनापासुन अभिनंदन अन धन्यवाद. खुपच छान कार्यक्रम झाला.

Pages